शरीर व तोल यांचे संतुलन उत्साही जीवनाचे रहस्य 

Body balancing and Life
Body balancing and Life

संतुलन महत्त्वाचे. आयुष्यात काही मिळवायचे असेल तर तना-मनाचे संतुलन साधायला हवे. तरच आयुष्यातील धावपळ जमते. त्यासाठीची उर्जा मिळवता येते, राखता येते. 

दिवसेंदिवस प्रत्येकाच्या आयुष्यात धावपळ आणि दमणूक वाढतच चालली आहे. मग अशा स्थितीत अधिक एनर्जी मिळवायची कोठून? तर ती आपल्या शरीराच्या तोलाच्या संतुलनाने! 

प्रत्येक व्यक्ती आपल्या जीवनातील खाण्याचा, मनाचा, कामाचा व बॅंकेतील बॅलेन्सचा विचार करतो, पण शरीराच्या बॅलेन्सचा कुणीही विचार करत नाही! आपण रोजच्या हालचाली करताना, आपले शरीर हाकताना आपल्या शरीरावर किती ताण पडत आहे याचा विचारच करत नाही! 
शरीराचा तोल सांभाळण्यामध्ये पाठीच्या कण्याची फार महत्त्वाची भूमिका आहे आणि शरीराचा तोल बॅलेन्स जर उत्तम असेल तर "फिजिकल व मेन्टल एनर्जी' आपोआपच वाढेल यात शंका नाही. शरीरामध्ये "नॅच्युरल ऑटोपायलट' सिद्ध असतो, ज्यामुळे शरीराची "अलाइनमेंट' होते. तेव्हा हा विषय समजून घेणे अतिशय आवश्‍यक आहे. पाठीचा मणका ३३ मणक्‍यांनी बनलेला आहे. यामध्ये मज्जारज्जू (स्पायनल कॉर्ड) बसलेला आहे. ज्यामार्फत मेंदू सर्व अवयवांशी संवाद करत असतो, आपल्या सतत बदलत राहणाऱ्या हालचालींची माहिती प्रति सेकंदाला मज्जारज्जू मेंदूला पोचवतो व शरीराची बदललेली स्थिती समजून मेंदू स्नायूंना संदेश पाठवतो. नंतर स्नायू आकुंचतात व शरीराचा तोल सांभाळतात. 

संशोधनाद्वारे असे सिद्ध झाले आहे, की मणक्‍याच्या स्थिरतेसाठी आपल्या पाठीच्या कण्याच्या बाजूने स्नायू सगळ्या हालचाली करताना चांगल्या स्थितीत असणे सर्वांत गरजेचे आहे. पण हे स्नायू थकल्यास किंवा दुखावल्यास मणका शरीराचे वजन झेलायला लागतो. मणक्‍यामधून आपल्या हाता-पायांना संवेदना पोचवणाऱ्या नसा बाहेर पडतात. मणक्‍यावर ताण आला, की मणक्‍यामधील अंतर कमी होते व मणक्‍यामधील "डिस्क प्रोलॅप्स' होते. यालाच "स्पॉंडिलॉसिस' म्हणतात. यामुळे मणक्‍यामधून बाहेर पडणाऱ्या नसांवर दाब येतो व हाता-पायाला मुंग्या येणे; थकवा वाटणे, पाठ दुखणे, मानेवर ताण येणे हे सर्व सुरू होते. 

शरीराचा तोल सांभाळण्याकरिता मेंदूबरोबर मुख्यतः तीन अवयव काम करतात, ते म्हणजे डोळे, अंतरकर्ण व पायांतील संवेदना. 

अंतरकर्ण शरीर स्थितीबद्दल ९० ते १०० इतक्‍या संवेदना प्रत्येक मिलि सेकंदाला मेंदूला पाठवत असतो. डोळे व पाय थकल्यास अंतरकर्णामधल्या "बॅलेन्स सिस्टिम'वर सगळा भार पडतो आणि तो सुदृढ नसल्यास तोल जायला लागतो किंवा चक्कर यायला लागते. मधुमेहामध्ये तोल सांभाळण्याकरिता विशेष काळजी घ्यायला हवी, कारण "न्यूरोपॅथी'मुळे पायातील संवेदन काम करत नाहीत, त्याचबरोबर "रेटिनोपॅथी' झाल्यास डोळ्यांकडून येणाऱ्या संवेदना थकतात व सगळा भार अंतरकर्णांवर येतो आणि तोल जाण्यास सुरवात होते. शरीराचा तोल सांभाळण्यामध्ये अंतरकर्णामधील "बॅलेन्स सिस्टिम ऑर वर्टिब्युलार सिस्टिम'चा फार मोठा वाटा आहे. मेंदूजवळ वसलेल्या "बॅलेन्स सिस्टिम'ची आपली आपण तपासणी कशी करावी? 
प्रथम दोन्ही पाय जुळवून डोळे मिटावेत व तोल जात आहे का ते बघावे; हे सोपे वाटल्यास एका पायावर उभे राहून डोळे मिटून परत तोल जात आहे का ते बघावे. तो जात असल्यास आपल्या शरीराचा तोल सुधारायला हवा असे समजावे! 

आपल्या चारचाकीचे आपण "बॅलेन्सिंग' करून घेतो, तसेच आपल्या शरीराच्या तोलाकडे/ बॅलेन्सकडे पण विशेष लक्ष द्यायला पाहिजे. 

प्रत्येकाला "सेन्स ऑफ बॅलेन्स' शरीराचा तोल मेंटेन करण्याची जाणीव असणे अतिशय महत्त्वाचे आहे. मणक्‍याच्या स्थिरतेमुळे, अंतरकर्णामधल्या बॅलेन्स सिस्टिमच्या इन्ज्युरी टळतील, पडायला होणार नाही; किंवा अगदी पडायला झाले तर जास्त दुखापत/ फ्रॅक्‍चर होणार नाही, कारण शरीर सावरेल. अगदी शेवटच्या श्‍वासापर्यंत आपल्या हालचाली थांबणार नाहीत व दुसऱ्यावर अवलंबून राहणार नाहीत, त्यासाठी प्रयत्न केला पाहिजे."मूव्हमेंट इज लाइफ' हा कॉन्सेप्ट महत्त्वाचा आहे. 

आपण सकाळी उठल्यावर डोळे मिटून मणक्‍यांच्या स्थिरतेचा विचार करावा. शरीर दुखत असल्यास त्याकडे लक्ष द्यावे. घरकाम करणाऱ्या स्त्रियांसाठी याचा भरपूर उपयोग होईल. साधारणतः अशी समजूत असते, की घरकाम म्हणजे सर्वांत सोपे. खरेतर घरकामामध्ये सर्व सांधे स्नायू वापरलेले जातात व शरीर "अलाइन्ड' असल्यास ही कामे सोपी होतील. 

अलीकडे भारतीय स्त्रियांमध्ये "ओस्टेओपोरोसिस' हाडे ठिसूळ होण्याचे प्रमाण अतिशय वाढले आहे. त्याचे प्रमुख कारण म्हणजे स्नायूंमध्ये ताकद नसल्यामुळे हाडे, मणके सगळा भार घेतात, आणि कालांतरानी या हाडाची झीज होऊ लागते. आता ही क्रिया ४० व्या वर्षी सुरू होताना दिसते, तेव्हा याचे वेळीच उपाय करणे अतिशय आवश्‍यक आहे. 

दुसरी गोष्ट म्हणजे तोल जात असेल, चक्कर येत असेल तर, खूप त्रास होत असताना एक-दोन आठवडे औषधे घ्यावीत. परंतु नंतर मात्र याचे मूळ कारण शोधणे अतिशय गरजेचे आहे. औषधांमुळे चक्कर दबली जाते, ती काही बरी होत नाही. औषधे थांबवली, की पुन्हा त्रास सुरू होतो. फक्त व्यायामानेच चक्कर व तोल कायमस्वरूपी बरे होऊ शकतात. 

दैनंदिन आयुष्यामध्ये संगणकावर अनेक तास काम करणे; तासन्‌तास एका जागी कामासाठी बसणे, खराब रस्त्यावरून गाडी चालवणे, तासन्‌तास फोनवर बोलणे या सगळ्यामुळे नैसर्गिक शरीरस्थिती "पोस्चर' बिघडते. 

पाठीच्या कण्याचे स्नायू नीट काम करत नाहीत व त्यामुळे अधिक थकवा येऊ लागतो. आपण दिवसाच्या शेवटी गळून जातो. अशा स्थितीत व्यायाम होत नाही, कामामुळे वेळचे वेळेवर जेवण नाही आणि असे आपले शरीर हाकताना पाठीच्या शरीरावर किती ताण येत असेल याचा आपण विचारच करत नाही. या चक्रव्यूहातून बारेर पडायचे असेल तर शरीराचे संतुलन झालेच पाहिजे. 

अंतरकर्णांमध्ये अस्थिरता निर्माण झाली, की शरीराची तोल जाण्याची संभावना, दगदग, चक्कर येणे, वयस्कर लोकांमध्ये नव्हे तर आता तरुणांमध्येसुद्धा दिसून येत आहे. तोल गेला की बॅडमिंटन खेळतानासुद्धा पडून फ्रॅक्‍चर होऊ शकते. 

वयस्कर लोकांमध्ये फ्रॅक्‍चर नेक फिमर; मांडीच्या हाडाचे फ्रॅक्‍चर होते. हे सगळे काही निव्वळ "बॅलेन्स्ड बॉडी' झाली तर टळू शकते. त्याची जनजागृती भारतामध्ये होणे आवश्‍यक आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com