कर्करोग - एक अनुभव

 Cancer - An Experience
Cancer - An Experience

कर्करोग या उच्चारासरशीही घाबरायला होते. पण आता योग्य त्या उपचारांनी हा आजार बरा होतो. मात्र या रुग्णांनी मनाची उभारी दाखवायला हवी. जीवनाकडे सकारात्मक नजरेने पाहायला हवे. तसे घडले तर, त्याचा त्यांना खूप फायदा होतो. याविषयी एका रुग्णानेच सांगितलेला हा अनुभव. 

‘कर्करोग हा मला वरदान आहे’, असे मी सांगतो आणि त्यात काहीही चुकीचे अगर अतिशयोक्तीचे नाही. 

कर्करोगाचा मी स्वतः रुग्ण असल्यामुळे, हा आजार किती वाईट आहे, त्रासदायक आहे, जीवघेणा आहे हे मला माहीत आहे. कर्करोग हा रुग्ण आणि आजूबाजूच्या इतरांनाही फार काळजीत टाकणारा आहे, त्यांची आणि डॉक्‍टरांचीही कसोटी पाहणारा आहे, अशा अनेक गोष्टींचीही मला कल्पना आहे. शिवाय इतर कर्करोगग्रस्तांचे, त्यांच्या जवळच्या माणसांचे, नातेवाइकांचे निरीक्षण करीत असल्यामुळे एकंदर परिस्थितीचे गांभीर्य जाणून आहे. तरीही मी कर्करोगाला वरदान मानतो. 

कर्करोगाच्या रुग्णाने आणि इतर संबंधित सर्वांनी ‘सकारात्मक तऱ्हेने विचार करावा’ असे सांगणे सोपे आहे. ‘ज्याचे त्यालाच कळे’ ही म्हण या ठिकाणी सार्थ ठरते, तरी पण त्या म्हणीत खूप अर्थ आहे. मात्र माझ्या सुदैवाने आणि परमेश्‍वराच्या कृपेने, आईवडिलांच्या कृपेने आणि इतर सर्व सुहृदांच्या सदिच्छेमुळे मी काही वेगळाच विचार करू शकलो. एका परीने ‘हे वरदान आहे’ अशी मी माझी मनोभूमिका तयार केल्यामुळे मला त्याच तऱ्हेच्या गोष्टी दिसत गेल्या, सुचत गेल्या, कृतीत आल्या असे जर मी म्हटले तर ते अधिक योग्य ठरेल. माझ्या स्वतःमध्ये, माझ्या विचारांत, जे काही सकारात्मक बदल झालेले दिसले, वाटले त्याची यादी फारच मोठी होईल. परंतु वानगीदेखील आणि कोणालाही उपयोगी पडावेत म्हणून त्यातील काही देत आहे. 

- जसा कोणालाही काही मोठा आजार होतो, किंवा कोणालाही काही अपघात होतो, अशा तऱ्हेत मोडणारा हा एक प्रकार आहे, हे आधी समजून घेतले. परमेश्‍वरावर जो पूर्वी विश्‍वास होता, तो अधिक दृढ झाला. 

- कर्करोगाने आजारी असूनसुद्धा आपण स्वतःसाठी, इतरांसाठी आणि कर्करोगाने जे आजारी आहेत त्यांच्यासाठी काहीतरी करू शकतो, ही जाणीव निर्माण झाली. 

- अनेक लोक आपल्यापेक्षा अधिक आजारी आहेत, वाईट परिस्थितीत आहेत, दुःखात आहेत, याची जाणीव होऊन आपण किती नशिबवान आहोत, असे वाटू लागले. 

- समोरच्याला समजून घेणे आवश्यक वाटू लागले. किंबहुना, दुसऱ्यांचे बोलणे ऐकून घेण्यासाठी आपला कान दिला पाहिजे ही जाणीव झाली. साहजिकच सर्व परिस्थितीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला, तो अधिक सुज्ञ, समजदार, संयुक्तिक झाला, शिवाय त्यामुळे एकंदर आकलनशक्ती वाढली. 

कर्करोगाने आजारी असलेल्या इतर रुग्णांना, त्यांच्या सुहृदांना जेव्हा चार उत्साहवर्धक गोष्टी सांगितल्या, तेव्हा त्यांच्या चेहेऱ्यावर दिसलेले समाधान आणि निर्माण झालेली वेगळ्याच तऱ्हेची वैचारिक ऊर्जा मी पाहिली, तेव्हा वाटलेल्या समाधानाची तुलना दुसऱ्या कशाशीही करता येणार नाही. माझी, कोणाचेही बोलणे ऐकून घेण्याची क्षमता वाढली. कारण त्याला किंवा त्यांना समजून घेण्याकरता ते आवश्‍यक आहे, हे मनात वाटू लागले होते. 

- आपण रुग्णालयात आजारी असताना आणि नंतरसुद्धा ज्यांनी ज्यांनी आपल्याला कोणत्याही तऱ्हेची मदत केली, त्यांचे त्यांचे योग्य त्या तऱ्हेने आभार मानणे जरूर वाटू लागले, अनेकदा. 

- वैचारिक समज आणि उमज वाढत गेली. आणि समज व उमज यातला फरक जाणून आला. म्हणजे, समजणे उमजले आणि उमजणे समजले. ‘आलेला प्रत्येक दिवस आपला’ हे माहीत होऊन त्या दिवसाचा आपल्या शक्‍यतेप्रमाणे व क्षमतेनुसार कसा सदुपयोग करायचा किंवा करावा, हे विचार मनात येऊ लागले. 

- पूर्वी संगीत, म्हणजे कोठल्याही तऱ्हेचे असो, ते फक्त ऐकणे होत असे. आता ते समजून घेऊन ऐकण्यातली रसिकता वाढली. त्यातील काव्य, माधुर्य आणि गाणे लिहिणाऱ्याच्या प्रतिभेचा विलास वगैरे. त्यामुळे ‘या जगण्यावर शतदा प्रेम करावे़’ हे उमगले आणि आता किती दिवस राहिले आहेत, अशा चुकीच्या विचारांना मनांत काही न थारा देण्याची शक्ती निर्माण झाली. कारण येणे किंवा जाणे हे आपल्या हातात नसताना, त्यावर विचार करणे हा वेळेचा आणि शक्तीचा अपव्यय आहे, हे कळून चुकले. 

- आपल्याकडे नाही काय, यापेक्षा, आपल्याकडे आहे काय, या विचारांकडे वृत्ती पूर्णपणे वळू लागली. भेटण्यासाठी येणाऱ्याला जर आपणच विचारले, की ‘तू, तुम्ही किंवा आपण कसे आहात?’ त्या वेळेस त्यांच्या चेहेऱ्यावर फुटणारे हसू पाहावेसे वाटू लागले. 

मधेच काही गमती सांगून परत विषयाकडे वळतो. 
एकदा माझ्या मित्राने मला दूरध्वनीवर विचारले, की ‘चित्रपट पाहायला येणार का?’ मला कोठल्याही गर्दीच्या ठिकाणी जाण्याची परवानगी नसल्यामुळे मी साहजिकच उत्तर दिले, ‘‘अरे! हल्ली मी चित्रपट पाहात नाही.’’ त्यानंतर दोनच दिवसांनी माझा तो मित्र घरी आला असताना मी पेनड्राइव्हर असलेला एक चित्रपट पाहात असताना दिसलो. माझा मित्र रागानेच मला म्हणाला, ‘‘कमाल आहे तुझी! चांगल्याच थापा मारतोस? परवाच म्हणाला होतास, ‘हल्ली चित्रपट पाहात नाही म्हणून.’’ नंतर त्याची समजूत काढण्यासाठी मला त्याला दोन वेळा चहा पाजावा लागला. माझा रक्ताचा कर्करोग बाहेर दिसत नसल्यामुळे आणि केमोथिरपीची औषधे घरीच घेत असल्यामुळे, माझा एक मित्र, ज्याला नुसतेच माहीत होते, की मी ब्लड कॅन्सरने आजारी आहे, तो घरी आल्यानंतर मला म्हणाला, ‘‘तुला काय झाले आहे? पूर्वीसारखाच आहेस? मग येतोस का उद्या पर्वतीवर?’’ मला हसू आवरेना. त्याला घेऊन मी खिडकीजवळ गेलो आणि म्हणालो, ‘‘ती बघ पर्वती टेकडी, मी रोजच जातो पर्वतीवर मनाने.’’ 
याहून गमतीचा प्रसंग म्हणजे आमच्या कट्ट्यावरचा एक मित्र घरी आला आणि गप्पांच्या ओघात त्याला काय काय आजार आहेत, म्हणजे मधुमेह, उच्च रक्तदाब आणि इतर काही आजार कसे आहेत आणि त्यांना तो कसे तोंड देत आहे हे बराच वेळ सांगत होता. मीपण त्याचे सर्व बोलणे काळजीपूर्वक ऐकून घेऊन म्हणालो, ‘‘प्रकृतीला जप, औषधे वगैरे वेळेवर घेत जा.’’ माझा मित्र जो मला भेटायला आला होता, तो ‘बाय’ असे म्हणून जो गेला, तो घरातल्या दरवाज्यापासूनच परत आला. म्हणाला, ‘‘अरे! सॉरी बरं का! मी खरे म्हणजे आलो होतो तुझ्या प्रकृतीची चौकशी करायला. परंतु तूच माझी चौकशी केल्यामुळे ही गडबड झाली.’’ मी फक्त एक स्मितहास्य केले. म्हणालो, ‘‘आता चहाच घेऊन जा. साखर वेगळी देतो.’’ अशा अनेक गमती-जमती घडत असतात. मी हे तुम्हाला सांगू शकतो हे वरदानच नाही का? कोणालाही असे वाटण्याचा संभव आहे, की हे स्वप्नरंजन तर नाही ना? की, असे मला वाटायला पाहिजे. 

पण कोठलाच आजारी माणूस स्वप्नरंजन करू शकत नाही ही वस्तुस्थिती आहे. माझा लेखनप्रपंच जो पूर्वी कमी होता तो आता वाढला आहे. त्याने विविध विषयांना स्पर्श करायला सुरवात केली आहे. 

संतपरंपरेतील काहींच्या निवडक ग्रंथांचे वाचन करताना ते अधिक अर्थगर्भ वाटू लागले आहेत. 

दुसऱ्यांना अधिकाधिक समजून घेण्याच्या कलेत वृद्धी होऊ लागली आहे. वाचन आणि मनन यामध्ये मननाचे महत्त्व जास्त लक्षात येऊ लागले आहे. 

एक विशेष गोष्ट लक्षात आली, की देव्हारा चकाचक करणे, देवपूजेकरता आपण जसे अंघोळ करताना वापरतो तसे गरम पाणी वापरणे, देवांना नीट स्नान घालणे, यामध्ये एकीकडे आपण स्वतःच्या मनाची, मानसिक धारणेची स्वच्छता करत असतो. ज्यामुळे देवपूजेनंतर मन प्रसन्न होणे, हे असले पाहिजे. 

मला याची पूर्ण कल्पना आहे, जे अनेक लोक कर्करोगाला उत्तम तऱ्हेने तोंड देत आहेत, त्यापैकी कित्येक रुग्ण शारीरिक पीडेच्या गंभीर अवस्थेतून जात आहेत. या आजाराचे गांभीर्य लक्षात आल्यामुळे ते मनाचे संतुलन राखण्यात अपयशी होत असतील. अशा तऱ्हेच्या रुग्णांना हा लेख वाचणे आणि समजून घेणे हेसुद्धा कठीण असण्याचा संभव आहे. ज्याप्रमाणे सुख हे आपल्याकडे चालून येते, त्याप्रमाणे दुःखही चालून येते, हे मान्य करणे जरूर आहे. दोन्हीही अवस्थांची कारणमीमांसा करणे योग्य होणार नाही, या मतापर्यंत मी आलो आहे. त्यापेक्षा जे आहे ते मान्य करणे बरे, असे वाटणे महत्त्वाचे. 

एका संतांच्या ग्रंथात त्यानी असे लिहिले आहे, की जर माणसाला ‘मी’ आणि माझे, म्हणजेच माझा देह, हे वेगवेगळे करता आले तर देहाला झालेले दुःख ‘मी’ला होणार नाही. 
हा थोर संतांचा जो विचार आहे, तो समजून घेण्याचा माझा प्रयत्न चालू आहे आणि तो चालू राहणार आहे. परंतु वाचनाचे मनन करण्याची बुद्धी होणे यालाच ‘वरदान’ म्हणणे चूक होईल का? 

जाता जाता एक आणखी गमतीची गोष्ट सांगाविशी वाटते. या तऱ्हेचे विचार प्रकट करावे, असे मी जेव्हा माझ्या खास आणि जवळच्या मित्राकडे बोललो तेव्हा तो म्हणाला, ‘‘तू फार शहाणा झाला आहेस! एखाद्या तत्त्वज्ञाप्रमाणे असे लिहून तू काय मिळविणार आहेस? तुझे विचार चांगले आहेत. ते स्वतःजवळच ठेव.’’ 

मित्रांनो, मला हा लेख लिहून जे काय समाधान मिळाले, हे मलाच माहीत. तुम्हालाही हा लेख वाचून समाधान मिळवण्याची दिशा सापडो! 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com