esakal | सांधेदुखीसाठी तपासण्या
sakal

बोलून बातमी शोधा

सांधेदुखीसाठी तपासण्या

सांधेदुखी नेमकी कशामुळे हे निश्‍चित करण्यासाठी काही तपासण्या कराव्या लागतात. या तपासण्या उपचारांची नेमकी दिशा ठरवण्यासाठी उपयुक्त ठरतात.

सांधेदुखीसाठी तपासण्या

sakal_logo
By
डॉ. हरीश सरोदे

सांधेदुखी नेमकी कशामुळे हे निश्‍चित करण्यासाठी काही तपासण्या कराव्या लागतात. या तपासण्या उपचारांची नेमकी दिशा ठरवण्यासाठी उपयुक्त ठरतात.

अलीकडे खूप जणांना सांधेदुखीचा त्रास होत असतो. सांधेदुखी मुख्यत्वे सांध्याच्या दोन हाडांमधील आवरण खराब होणे, जंतुसंसर्ग, ऑटोइम्युन (स्व-प्रतिकारशक्तीरोध) आजार, वयानुसार अथवा अतिरिक्त वजनामुळे होणारी झीज अशा विविध कारणांमुळे उद्भवतात. सांध्यांना सूज येते आणि त्याला संधिवात म्हणतात. त्यामुळे सांधेदुखीच्या समस्यांमध्ये विविध तपासण्या करणे आवश्‍यक ठरते. साधारणपणे सांधेदुखीच्या रुग्णांसाठी आरए, सीआरपी, अँटी-सीआरपी, युरिक ॲसिड, इएसआर या तपासण्या प्राथमिक स्तरावर केल्या जातात. याशिवाय एएसओ ही तपासणीदेखील केली जाते.

 या तपासण्यांचे महत्त्व जाणून घेऊया.
आरए फॅक्‍टर

ऱ्ह्युमेटॉईड अर्थारायटिससाठी ही तपासणी केली जाते. हा संधिवात ऑटोइम्युन प्रकारचा असतो. यामध्ये एक अथवा अनेक सांधे दुखणे, त्यांना सूज येणे, तिथे उष्णता वाढणे, त्वचेवर गोळे येणे अशा तक्रारी असू शकतात. 

ऑटोइम्युन म्हणजे काय? ज्या वेळी काही कारणाने शरीरातल्या प्रतिकारशक्ती नियंत्रित करणाऱ्या यंत्रणेत बिघाड होतो, त्या वेळी शरीरातील घटकांविरुद्ध त्यांचे कार्य उद्दीपित होऊन शरीरातील घटकांवर हल्ला करणारे घटक निर्माण होऊ लागतात. म्हणजे आपल्या प्रतिकारशक्तीला विरोध करणारी यंत्रणा आपल्याच शरीरात तयार होते. यामधून उद्भवणाऱ्या आजारांना ऑटोइम्युन आजार असे म्हटले जाते.  

ऱ्ह्युमेटॉईड अर्थारायटिसमध्ये चुकीच्या संदेशवहनामुळे शरीरातील गॅमा ग्लोबुलीन या प्रथिनाविरुद्ध पदार्थ प्रतिकारयंत्रणा तयार करू लागते. या पदार्थांचे मोजमाप आरए चाचणी करते. 

सामान्य पातळी : आरए फॅक्‍टरची पातळी वीसपर्यंत सामान्य समजली जाते. अर्थात ही तपासणी काही इतर कारणामध्येही पॉझिटिव्ह निष्कर्ष दाखवू शकते. उदाहरणार्थ -

जुनी दुखणी, जंतुसंसर्गग्रस्त हृदयाचे आजार, मधुमेह, कर्करोग, तसेच एसएलइ अथवा जोग्रेन हा शरीरातील ओलावा निर्माण करणाऱ्या ग्रंथींवर प्रभाव पाडणारा ऑटोइम्युन आजार. 

अँटीसीसीपी चाचणी
शरीरात सीसीपी (सायट्रिक सायट्रुलिनेटेड पेप्टाईड) हे पेशींच्या कार्यांमध्ये उपयुक्त असे प्रथिन असते. स्वप्रतिरक्षितरोधी प्रक्रियेत शरीरात त्याविरुद्ध पदार्थ तयार होतात. त्याला अँटीसीसीपी म्हणजे सीसीपीविरोधी कार्य करणारा घटक म्हटले जाते. त्यामुळे या तपासणीत या घटकाची मोजणी केली जाते. 

सामान्य पातळी :  वीसपर्यंत. 
ज्या रुग्णांची आरए तपासणी निगेटिव्ह आलेली आहे, त्यांच्यामध्ये आणि पॉझिटिव्ह आहे त्यांच्यातही ही तपासणी महत्त्वाची ठरते. ही तपासणी बहुतांशी दुसऱ्या आजारांमध्ये पॉझिटिव्ह येत नाही, म्हणजेच आरए चाचणीप्रमाणे इतर आजारात निष्कर्ष पॉझिटिव्ह दिसत नाहीत. म्हणजेच ही जास्त अचूक निदान करणारी चाचणी ठरते. आरए तपासणीपेक्षा यामधून लवकर निदान होण्याची शक्‍यता असते. ही चाचणी रुग्णाचा आजाराचा टप्पा समजून घ्यायला आणि तो पूर्ण बरा होऊ शकेल का, याबाबत उपयोगी पडते.    

सीआरपी चाचणी
सीआरपी म्हणजे सी रिॲक्‍टिव्ह प्रथिने. सीआरपी हा घटक यकृतामध्ये तयार होतो. या घटकाची सामान्य पातळी शून्य ते सहा इतकी असते. शरीराला होणारी इजा अथवा सूज यामध्ये हे मोठ्या प्रमाणावर तयार होऊन रक्तप्रवाहात सोडले जाते. त्यामुळेच या घटकाला तत्पर प्रतिक्रियाकारक घटक समजले जाते. 

या चाचणीचे निष्कर्ष पुढील आजारांमध्ये जास्त येतात :
तीव्र संसर्ग ः जीवाणूंचा संसर्ग, बुरशीजन्य संसर्ग, आतड्याला सूज येण्याचे आजार, आरए अथवा लुपस हे आजार, हाडांमध्ये अन्‌ स्नायूंमध्ये उद्भवलेला संसर्ग.

उपचार परिणामकारक होतो आहे की नाही हे पाहण्यासाठीदेखील ही चाचणी अत्यंत महत्त्वाची असते. एखाद्याची चाचणी ८५ अशी आली आणि उपचारादरम्यान काही दिवसांनी परत बघितल्यास ४० आली, तर उपचार योग्य रीतीने होतो आहे याची खात्री करता येते. 

युरिक ॲसिड टेस्ट
शरीरामध्ये चयापचयाची प्रक्रिया निरंतर सुरू असते, त्यामध्ये प्युरीन नावाचा घटक तयार होतो. हा घटक अनावश्‍यक असल्याने त्याचे विघटन करून युरिक ॲसिड तयार केले जाते. युरिक ॲसिड हे शरीरातून मोठ्या मात्रेत लघवीद्वारे व अल्प मात्रेत मलाद्वारे बाहेर टाकले जाते. ज्या वेळी युरिक ॲसिड मोठ्या प्रमाणावर तयार होते आणि त्याचे उत्सर्जन पुरेसे होऊ  शकत नाही तेव्हा हे बारीक टाचणीसारख्या स्फटिक रूपात साठते आणि ते सांध्यांमध्ये साठून त्या ठिकाणी वेदना आणि सूज निर्माण होते. तसेच हे स्फटिक मूत्रसंस्थेत मूतखड्यात परिवर्तित होतात. युरिक ॲसिडमुळे होणाऱ्या सांधेदुखीला गाऊट संबोधले जाते. 

युरिक ॲसिड का वाढते?
    खाण्यामधील ‘रेड मीट’चे प्रमाण जास्त असणे. 
    कृत्रिम प्रथिनयुक्त पदार्थ जास्त प्रमाणात असणे.
    शेंगदाणे, वाटाणे मोठ्या प्रमाणावर खाण्यात असणे.
    कर्करोगावरील औषधांचे सेवन करण्याने. 
    मूत्रसंस्थेच्या आजारात. 
सामान्य पातळी : पुरुषांमधे सातपर्यंत आणि स्त्रियांमधे सहापर्यंत.

ईएसआर
म्हणजे एरिथ्रोसाईट सेडिमेंटेशन रेट. सर्व प्रकारच्या सांधेदुखीमध्ये या चाचणीचा अहवाल हिमोग्राम या मूलभूत चाचणीसमवेत घेतला जातो. कोणत्याही सूज आलेल्या अवस्थेत अथवा संसर्गामध्ये रक्तपेशी या वजनाने जड होतात. या रक्तपेशी अधिक वेगाने आणि अधिक प्रमाणात खाली तळाशी जातात. या गुणधर्मामुळे रक्ताच्या स्थिर अशा उभ्या स्तंभामध्ये प्रामुख्याने लाल रक्तपेशी वेगाने तळाशी जातात आणि इएसआर जास्त येतात. अशा चाचण्यांना प्रोग्नोस्टिक चाचण्या (रोगाचा प्रसार आटोक्‍यात येतो आहे का, याचा ढोबळमानाने अंदाज देऊ शकणे) म्हणतात . याचाही वापर उपचार सुरू असताना प्रतिसाद कसा आहे हे बघण्यासाठी केला जातो. ही चाचणी सकाळच्या वेळेस करणे हितावह असते. कारण संध्याकाळी याचा निष्कर्ष सामान्य परिस्थितीतही जास्त येऊ शकतो. 

सामान्य पातळी : वेस्टरजेन पद्धत : पुरुष ३ ते ५,  स्त्री : ३ ते ७. 
                    विंट्रोब पद्धत : पुरुष  ० ते ९,  स्त्री : ० ते २० 

एएसओ टायटर टेस्ट
म्हणजे अँटी स्ट्रेप्टोलायसिन टेस्ट. स्ट्रेप्टोकोकस नावाच्या जीवाणूंच्या प्रादुर्भावामुळे शरीरात एक घातक असे द्रव तयार होते. त्याला स्ट्रेप्टोलायसिन म्हणतात. या द्रवाच्या विरुद्ध शरीर लढा देते त्या वेळी अँटी स्ट्रेप्टोलायसिन अँटीबॉडीजची निर्मिती होते. 
या अँटीबॉडीज प्रादुर्भावाच्या एक ते तीन आठवड्यांत तयार होतात. तीन ते पाच आठवड्यांत त्यांचे प्रमाण सर्वाधिक असते आणि सहा ते बारा महिन्यांत त्या सामान्य पातळीला पोचतात. घशामध्ये स्ट्रेप्टोकोकस जीवाणूच्या ए प्रकारच्या आणि काही वेळा जी आणि एस प्रकारच्या उपप्रकारांनी संसर्ग होतो. हा संसर्ग पुरेसे उपचार झाले नाहीत अथवा ते तीव्र असल्याने लवकर हटले नाही, तर गंभीर गुंतागुंत उद्भवते. यामध्ये ऱ्हुमेटिक फिवर नावाचा आजार होतो. यामध्ये सांधे सुजणे, दुखणे, लाल होणे, त्वचेवर दुखणाऱ्या गाठी येणे असे होते. शिवाय हृदयातील जंतुसंसर्ग. मूत्रसंस्थेतील जंतुसंसर्ग उद्भवू शकतो. त्यामुळे या चाचणीमध्ये सांधेदुखीचे कारण हे तर नाही ना, असे बघितले जाते. 
सामान्य पातळी : ० ते २००.
या सर्व तपासण्यांखेरीज निदानात अडचणी आल्यास, एएनए, एएनए ब्लॉट, एचएलए बी अशा चाचण्या कराव्या लागतात. म्हणूनच एका आजाराचे अचूक निदान करताना रुग्णाला अनेक तपासण्यांना सामोरे जावे लागते आणि ते आवश्‍यकदेखील ठरते.