वाढत्या उन्हाळ्यात मधुमेही

संतोष शेणई
Friday, 13 April 2018

वाढत्या उन्हाळ्याचा त्रास तर सर्वांनाच होतो. पण मधुमेही रुग्णांना होणारा त्रास अधिक असतो. त्याचे स्वरुपही काहीवेळा वेगळे असते. मधुमेहींना उन्हाळ्यात आरोग्याची काळजी अधिक घ्यायला हवी.

उन्हाळा वाढतो आहे. पस्तीस ते बेचाळीस अंशापर्यंत पारा चढला आहे. या वाढत्या उन्हाचा त्रास सर्वानाच होताना दिसतो. साधारणतः कोणताही आजार नसलेल्याला उकाड्याचा त्रास होत असेल, तर काही आजार असल्यास हा त्रास थोडा अधिकच वाटतो. जर आपल्याला मधुमेह असेल तर या दिवसांत विशेष काळजी घ्यायला हवी. मधुमेही रुग्णांनी काळजी घेतली नाही तर त्यांना या दिवसांत कोणत्या त्रासांना सामोरे जावे लागणे संभवते? मधुमेह एका मर्यादेत असला, तर तो रुग्णाच्या जिवावर बेतत नाही, हे नक्की. पण मधुमेह जरा संधी मिळाली तर, म्हणजे कोणत्याही कारणाने मर्यादा ओलांडली गेली, तर मात्र आरोग्याच्या बाबतीत भलतीच गुंतागुंत निर्माण करणारा ठरतो. 

मधुमेह वाढल्याची सरसकट लक्षणे उन्हाळ्यातही तितक्‍याच प्रखरतेने दिसून येतात. हातापायांना सूज येणे, चक्कर येणे, अशक्तपणा येणे, जखम लवकर न भरणे, वारंवार लघवीची भावना येणे, सतत मनावर ताण जाणवणे, उन्हाळ्यामुळे विशेषतः शरिराच्या अंतर्भागात गळू किंवा फोड आल्यास तो लवकर न सुकणे आदी लक्षणे मधुमेह वाढल्याचे चिन्हेअसतात.

उन्हाळ्यात मधुमेह वाढण्याची कारणे समजून घ्यायला हवीत.
शीतपेये आणि बाहेरचे खाणे : उन्हाळ्यात तहान खूप लागते. परंतु, आपण सगळेच या दिवसांत प्यायच्या पाण्याच्या दर्जाबाबत अत्यंत ढिसाळपणा दाखवतो. घरातून बाहेर पडताना शुद्ध व घरच्या पाण्याची बाटली आपण सोबत ठेवली नाही, की बाहेर लिंबू सरबत, ज्युस, शीतपेये आदी थंड आणि गोड पदार्थ पिण्याकडे आपला कल अधिक असतो. परिणामी, अशा पेयांमधून शरीरात साखरेचे प्रमाण वाढायला लागते व मधुमेहाचे प्रमाणही वाढते. या दिवसांत आपण ताजे दही किंवा ताक पिण्यावर भर द्यायला हवा.

आंबा व अन्य रसदार फळांचे अतिसेवन : विशेषतः आपल्याकडचा उन्हाळा हा सुट्ट्यांचा काळ असतो. त्यामुळे लोक सुट्टीवर जातात. बाहेरचे खाणे वारंवार होते. शिवाय, आंबाप्रेमी मधुमेहींना या दिवसांत अधिक त्रास झाल्याचे दिसून येते. आंब्यासारख्या रसदार फळांमध्ये साखरेचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे या दिवसांत आंब्यामुळे मधुमेह वाढण्याचे प्रमाणही रुग्णांमध्ये जास्त दिसून येते.

गरोदर महिलांनी घ्यावयाची काळजी : गरोदर महिलांमध्ये तात्पुरता का होईना, पण मधुमेह वाढण्याचे प्रमाण अधिक दिसून येते. रोजच्या  जीवनशैलीत गरोदरपणामुळे काही बदल करणे अपेक्षित असते, परंतु, तसे न केल्यास शरीरातील साखरेचे प्रमाण वाढते व मधुमेहाचा धोका संभवतो. परिणामी, प्रसुतीकाळात अडचणी निर्माण होण्याची भीती असते. गोड पदार्थ कमी खाणे, जास्तीत जास्त पाणी पिणे ही प्राथमिक काळजी या दिवसांत गरोदर महिलांनी घ्यायला हवी.

मधुमेहींनी उन्हाळ्यात संभवणारे धोके लक्षात घ्यायला हवेत.
डिहायड्रेशन - उन्हाळ्याच्या दिवसांत आपल्याला घाम खूप येतो. परिणामी, घामावाटे शरीरातील पाणी मोठ्या प्रमाणात बाहेर टाकले जाते. साधारणतः निरोगी व्यक्तीलाही अशा परिस्थितीत योग्य त्या प्रमाणात पाणी न प्यायल्याने डिहायड्रेशनची किंवा अन्य समस्या उद्भवू शकते. शरीरातील पाण्याचे प्रमाण राखले गेले नाही, तर कोणताही आजार नसलेली व्यक्तीही अगदी गळून जाते. मधुमेहींच्या बाबतीत हा धोका दुप्पट होतो.

वारंवार लघवी होणे : मुळातच मधुमेहाचा विकार असलेल्या रुग्णांमध्ये लघवी होण्याचे प्रमाण अधिक दिसून येते. त्यातही उन्हाळ्यात हे प्रमाण जास्तच वाढते. जेवढे लघवीवाटे व घामावाटे पाणी शरीराबाहेर टाकले जाते, त्यापेक्षा थोडे जास्त पाणी प्यायला हवे. परंतु, सर्वांकडून त्या प्रमाणात पाणी प्यायले जात नाही. अशावेळी अशक्तपणा, चक्कर येणे आदी धोके उद्भवतात.

मूत्रपिंडाचे विकार असेल तर सावध असा : उन्हाळ्याच्या दिवसात पाणी कमी प्यायले गेल्याने व तरीही लघवी वारंवार होत असल्याने शरीरातील पाण्याचे प्रमाण संतुलित राखले जात नाही. शिवाय, मूत्रपिंडाचे आजार असलेल्या रुग्णांना काही जास्त शक्तीची औषधे व गोळ्या दिल्या जातात, ज्यामुळे रुग्णांच्या शरीरातील उष्णतेचे प्रमाण वाढते. अशा रुग्णांनी आपल्या लघवीचे प्रमाण, रंग आणि त्यातून रक्त पडत नाही ना आदी धोक्‍यांकडे लक्ष दिले पाहिजे. कारण, मधुमेह आणि मूत्रपिंडाच्या विकारांचे अत्यंत जवळचे नाते आहे. चार पैकी एक मधुमेही हा मूत्रपिंडाच्या आजारांनी त्रस्त असतो.

गॅंगरिनची भीती : मधुमेही रुग्णांना उन्हाळ्याच्या दिवसांत एखादी जखम झाली आणि ती लवकर भरून निघत नसेल तर अशा व्यक्तींना गॅंगरिनचा धोका असतो. या दिवसांत घामामुळे त्वचा कायम ओलसर राहते. त्यामुळे ‘फंगल इन्फेक्‍शन’चा धोका वाढतो. पायाच्या बोटांमधील बेचक्‍या, जांघेचा भाग, हाताची बोटे आदी अवयवांना जास्तीत जास्त कोरडे राखता येईल याची काळजी घेणे उन्हाळ्याच्या दिवसांत अत्यावश्‍यक असते. या भागाची सतत पाहणी करणे आवश्‍यक आहे. 

काय काळजी घ्याल?
वर्षभर आपण आपल्या प्रत्येक आजाराबाबत जितके जागरुक असतो, त्यापेक्षा दुप्पट जागरुकता उन्हाळ्याच्या दिवसांत राखणे अत्यावश्‍यक असते. उन्हाळ्याच्या दिवसांत मधुमेहींनी व मूत्रपिंडाचे विकार असलेल्या रुग्णांनी विशेष काळजी घ्यायला हवी. या रुग्णांच्या उपचारांत या दिवसांत विशेष बदल केले जाऊ शकतात. शरीरातून पाण्याचे प्रमाण कमी करणाऱ्या डाययुरेटिक औषधांचा डोस या दिवसांत कमी केला जातो. त्यामुळे शरीरात पाणी संतुलित प्रमाणात राहावे व रुग्णाला डिहायड्रेशनचा धोका संभवू नये, असा प्रयत्न केला जातो. मधुमेह असलेल्या रुग्णांनी आपल्या शरीरातील साखरेचे प्रमाण, रक्तदाब आणि लघवी यांची वारंवार तपासणी करून त्यात काही वर-खाली असेल तर त्यावर वेळीच उपचार घेणे गरजेचे असते. एखादी जखम झाल्यास, त्यावर डॉक्‍टरी इलाज करावा, ती चिघळू देऊ नये.

इन्शुलिनबाबत 
मधुमेह असलेल्या व्यक्तींसाठी इन्शुलिन या संप्रेरकाचे डोस दिले जातात. त्या-त्या रुग्णांच्या शारीरिक कुवतीवर व मधुमेहाच्या प्रमाणावर हे डोस अवलंबून असतात. इन्शुलिनचे इंजेक्‍शन बऱ्याचदा रुग्ण किंवा त्याचे नातेवाईक घरच्या घरीच घेतात. उन्हाळ्याच्या दिवसांत मात्र हे इन्शुलिन साठवून ठेवण्याच्या बाबतीत रुग्ण बऱ्याचदा निष्काळजीपणा करताना दिसतात. एका ठराविक थंड वातावरणात इन्शुलिनची इंजेक्‍शन्स साठवून ठेवावी लागतात, उन्हाळ्यात हे तापमान संतुलित राखणे जिकीरीचे जाते.

विशेषतः बाहेर फिरायला किंवा कामाच्या ठिकाणी गेल्यावर रुग्ण गाडीत असलेल्या बॅगेत ही इंजेक्‍शन्स ठेवून देतात,.गाडी लॉक करून बाहेर पडतात. बंद गाडी प्रचंड तापते व काही तासांत हे इन्शुलिन निकामी होऊन जाते. अशा रुग्णांकडून इन्शुलिन घेऊनही मधुमेह वाढल्याच्या तक्रारी या दिवसांत जास्त येतात. इन्शुलिनची इंजेक्‍शन्स किंवा अम्प्युल्स ड्राय आईसच्या पॅकमध्ये सांभाळता येतात. आठ-दहा तासांसाठी या पॅकमध्ये इन्शुलिन व्यवस्थित राहू शकते. विशेषतः बाहेर फिरायला गेल्यावर या गोष्टीचे भान प्रत्येक मधुमेही रुग्णाने ठेवणे अत्यंत आवश्‍यक आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Diabetics should take more care of the health of the summer