आमदोष आणि आहार

डॉ. श्री बालाजी तांबे (www.balajitambe.com)
Tuesday, 7 March 2017

आम म्हणजे विषद्रव्य. आहाराचे पचन करणारा जाठराग्नी व त्यापासून रसरक्तादी धातू तयार करण्याचे काम करणारे धात्वाग्नी जेव्हा मंद होतात, तेव्हा न पचलेला व धातू स्वरूपापर्यंत न पोचलेला अर्धवट कच्चा असा अन्नरस म्हणजे "आम' होय. हा आम अशा स्थितीतला असतो की धड त्याचे शक्‍तीतही रूपांतर होत नाही, तसेच मलमार्गाने विसर्जनही होत नाही. असा जड, चिकट, बुळबुळीत, तारयुक्‍त, दुर्गंधी, द्रव स्वरूपाचा आम अनेकविध रोगांचे मूळ कारण असतो.

अतिप्रमाणात आहार करण्याने आमदोष तयार होतो, जो पुढे अनेक रोगांना आमंत्रण देऊ शकतो हे आपण मागच्या वेळी पाहिले.

आम म्हणजे विषद्रव्य. आहाराचे पचन करणारा जाठराग्नी व त्यापासून रसरक्तादी धातू तयार करण्याचे काम करणारे धात्वाग्नी जेव्हा मंद होतात, तेव्हा न पचलेला व धातू स्वरूपापर्यंत न पोचलेला अर्धवट कच्चा असा अन्नरस म्हणजे "आम' होय. हा आम अशा स्थितीतला असतो की धड त्याचे शक्‍तीतही रूपांतर होत नाही, तसेच मलमार्गाने विसर्जनही होत नाही. असा जड, चिकट, बुळबुळीत, तारयुक्‍त, दुर्गंधी, द्रव स्वरूपाचा आम अनेकविध रोगांचे मूळ कारण असतो. चरकसंहितेत आमदोष शरीरात साठण्याची बरीच कारण दिलेली आहेत,
न खलु केवलमतिमात्रमेवाहारराशिमाम-प्रदोषकरमिच्छन्ति, अपि तु खलु गुरुरूक्षशीतशुष्कद्विष्टविष्टम्भि-विदाह्यशुचिविरुद्धानामकाले चान्नपानानामुपसेवनं कामक्रोधमोहेर्ष्याह्रीशोकमानोद्वेगभयोपतप्तमनसा वा यदन्नपानमुपयुज्यते, तगप्याममेव प्रदूषयति ।
...चरकसंहिता विमानस्थान

केवळ अतिप्रमाणात सेवन केलेले भोजनच आमदोषाला कारणीभूत ठरत नाही तर गुरु म्हणजे पचण्यास जड पदार्थ, शरीरात कोरडेपणा वाढविणारे पदार्थ, फार थंड पदार्थ, अप्रिय पदार्थ, मलावष्टंभ करणारे पदार्थ, जळजळ करणारे पदार्थ, अशुद्ध पदार्थ तसेच विरुद्ध आहार हा सुद्धा आमदोषकारक असतो. काम, क्रोध, लोभ, मोह, ईर्षा, लज्जा, शोक, अहंकार, उद्वेग, भीती उत्पन्न झाली असता जर अन्नपानाचे सेवन केले तर त्यातूनही आमदोष तयार होऊ शकतो.

अतिप्रमाणात झोपणे किंवा जागरण करणे यामुळेही शरीरात आमदोष तयार होतो.
शरीरात आम वाढला की शरीरावर पुढील लक्षणे दिसू लागतात.
स्रोतोरोधबलभ्रंशगौरवानिलमूढताआलस्यापक्तिनिष्ठिवमलसारुचिक्‍लमाः ।

* अंग जखडल्यासारखे वाटते, विशेषतः सकाळी उठल्यावर हालचाल करताना सुरवातीला कडकपणा (स्टिफनेस) जाणवतो.
* शरीरशक्‍तीचा ऱ्हास होतो.
* शरीरास जडपणा प्राप्त होतो, आळस भरल्यासारखा वाटतो.
* पचन योग्यप्रकारे होत नाही, गॅसेस होतात.
* तोंडाला चव नसते, मल-मूत्रविसर्जन समाधानपूर्वक होत नाही.
* उत्साह राहत नाही.

आम हे चिकट विषद्रव्य असल्याने सर्व धातूंत लीन होऊन राहते व शरीरात निरनिराळ्या ठिकाणी जाऊन प्रकृतिनुरूप किंवा शारीरिक परिस्थितीनुसार रोग उत्पन्न करू शकते. उदा. सांध्यांमध्ये आम पोचला तर आमवात (सांधेदुखी) होतो, रक्‍तामध्ये साठून राहिला तर रक्‍तातील चरबीचे प्रमाण वाढलेले सापडते, रक्‍तवाहिन्यांमध्ये गेला तर त्यांच्यात अवरोध निर्माण होतो, फुफ्फुसांमध्ये पोचला तर फायब्रॉसिसारखे रोग होऊ शकतात. अशा प्रकारे मूळ कारण एकच "आम' असले तरी त्याचा परिणाम म्हणून विविध रोग होऊ शकतात.

म्हणून आमदोषाची लक्षणे दिसू लागली की लगेच त्यावर उपाययोजना करणे भाग असते. यात महत्त्वाची असते आहारयोजना. यात भूक असेल तितक्‍या प्रमाणातच जेवण करणे, दिवसभर प्यायचे पाणी अगोदर उकळलेले आणि गरम असताना पिणे, आहारात आल्याचा अंतर्भाव करणे, तसेच नियमित चालायला जाणे, पोट साफ होण्याकडे लक्ष देणे आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे पचण्यास हलके आणि स्वतःच्या प्रकृतीला अनुकूल अन्नसेवन करमे महत्त्वाचे असते. मात्र आमदोष फारच वाढला असेल तर त्यावर "लंघन' हाच एकमेव उपाय असतो. याबाबतीत चरकाचार्य म्हणतात, आमदोषामुळे विकार झाला असेल तर जेवणाची वेळ झाली असली; पण रुग्णाला भूक लागली नसेल तर त्याला आहार न देता केवळ आमदोष पचविणारे औषध द्यावे. त्यानंतर पुन्हा जेवणाची वेळ झाली आणि तरीही भूक लागली नसेल तर औषधसुद्धा न देता रुग्णाला पूर्ण लंघन करवावे, कारण आमदोषामुळे अशक्‍त झालेला अग्नी औषधसुद्धा पचविण्यास समर्थ नसतो.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: diet ayurved