पावसाळ्यातील साथरोग स्वाइन फ्लू आणि डेंगी

पावसाळ्यातील साथरोग स्वाइन फ्लू आणि डेंगी

पावसाळ्याबरोबर स्वाइन फ्लू आणि डेंगी हे आजारही येतात. या दोन्हींमुळे घाबरून जाण्याची काहीच गरज नसते. फक्त वेळीच काळजी घेणे आवश्‍यक असते. काळजी घेतली नाही तर एखादवेळी जिवावर बेतू शकते. हे आजार होऊ नयेत म्हणून आणि झाले तर काय करायचे, काळजी कशी घ्यायची, उपाय-उपचार काय?
 डॉ. प्रदीप आवटे
(लेखक शासनाच्या एकात्मिक रोग सर्वेक्षण कार्यक्रमाचे राज्य सर्वेक्षण अधिकारी आहेत.)

‘नेमेचि येतो मग पावसाळा’ या म्हणीइतकीच आपल्याकडे अजून एक म्हण प्रसिद्ध आहे आणि ती म्हणजे ‘उन्हाळा योगी, हिवाळा भोगी तर पावसाळा रोगी!’ जीवनदायी पावसाचे रोगराईशी असणारे नाते विरोधाभासी आहे खरे. म्हणे अशा विरोधाभासांनीच तर आयुष्य भरून उरले आहे. थोडक्‍यात काय, पाऊस अंगणात थुईथुई नाचतो आहे, याचा आनंद आहेच, पण त्या सोबतच येणाऱ्या रोगराईची काळजी आपल्याला घ्यायला हवी. 

पावसाळ्यात वाढणारे आणि पावसासोबत आपल्या भेटीला येणारे दोन महत्त्वाचे आजार म्हणजे स्वाइन फ्लू आणि डेंगी! हे दोन्ही विषाणूजन्य आजार आहेत, पण दोघांचे आपल्यापर्यंत येण्याचे रस्ते वेगवेगळे. म्हणजे एक पीएमटीने येणारा, तर दुसरा ओला-उबेर करून स्पेशल कॅबने आपल्या दारापर्यंत पोचणारा. स्वाइन फ्लू हा रुग्णांच्या शिंकण्या-खोकण्यातून उडालेल्या थेंबांवाटे हवेतून पसरणारा, त्यामुळे वेगात पसरणारा. तर डेंगी एडिस एजिप्ती या डासावर स्वार होऊन आपला पत्ता शोधत येणारा.

स्वाइन फ्लू 
ताप, सर्दी, घशात खवखव, अंगदुखी ही स्वाइन फ्लूची सर्वसामान्य लक्षणे. काही वेळा उलटी, जुलाब ही लक्षणेदेखील आढळतात. स्वाइन फ्लू हा तसा सौम्य आजार, पण काही रुग्णांमध्ये मात्र तो गंभीर वळण घेऊ शकतो. स्वाइन फ्लूबाबतीत महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याच्यावर ऑसेलटॅमीवीर ज्याला आपण टॅमिफ्लू या नावाने ओळखतो हे औषध उपलब्ध आहे. टॅमिफ्लू औषधाचा विचार करण्यापूर्वी आपण लक्षात घेतले पाहिजे की, प्रत्येक सर्दी, खोकला म्हणजे स्वाइन फ्लू नव्हे. सर्दी, खोकल्याची इतरही अनेक कारणे असतात. पण त्याच वेळी सर्दी, खोकला किरकोळ म्हणून अंगावर काढणेही चुकीचे आहे. मुळात स्वाइन फ्लूवरील उपचार सुरू करण्यासाठी रुग्णाची प्रयोगशालेय तपासणी करण्याची आवश्‍यकता नाही. आपण रुग्णाच्या लक्षणांनुसार त्यांची सौम्य (अ वर्ग), मध्यम (ब वर्ग) आणि गंभीर (क वर्ग) अशा गटांत वर्गवारी करतो आणि त्यानुसार त्यांना उपचार देतो. यामध्ये कुठेही प्रयोगशाळा निदान झाले नाही म्हणून उपचारांचा खोळंबा होत नाही किंवा उपचारास उशीर होत नाही. पुढे दिलेली माहिती वाचल्यावर हे आपल्या लक्षात येईल. 
 
स्वाइन फ्लू रुग्णांचे वर्गीकरण आणि उपचार 
अ वर्ग - लक्षणे - ताप १००.४ अंशांपेक्षा कमी, खोकला, घशात खवखव, फ्लूची अन्य लक्षणेही दिसतात.

उपचार - रुग्णाला लक्षणानुसार नेहमीचे सर्दी खोकल्यासाठीचे उपचार द्यावेत आणि या उपचारांनी त्यांना २४ ते ४८ तासात फरक पडला नाही, तर ऑसेलटॅमीवीर सुरू करावी. मात्र रुग्णास अतिजोखमीचे इतर आजार असतील तर इतर उपचारात वेळ न घालविता ताबडतोब ऑसेलटॅमीवीर सुरू करावी.

ब वर्ग - लक्षणे - ताप १००.४ अंशांपेक्षा जास्त, बाकी लक्षणे वरीलप्रमाणेच, पण तीव्रता जास्त. 

उपचार - अशा रुग्णास ताबडतोब ऑसेलटॅमीवीर सुरू करावी.

क वर्ग - लक्षणे - रुग्णास धाप लागणे, श्वसनास त्रास, रक्तदाब कमी होणे, खोकल्यातून रक्त पडणे अशी लक्षणे आढळतात.

उपचार - रुग्णास रुग्णालयात भरती करावे. त्याचा स्वॅब प्रयोगशाळेस पाठवावा, मात्र निदानाची वाट न पाहता लगोलग ऑसेलटॅमीवीर सुरू करावी. 

 सौम्य गटातील व्यक्तींना आपण ऑसेलटॅमीवीर हे औषध लगेच सुरू करत नाही. अशा रुग्णाला आपण नेहमीचे सर्दी, खोकल्यासाठीचे उपचार देतो आणि या उपचारांनी त्यांना दोन दिवसात फरक पडला नाही तर ऑसेलटॅमीवीर सुरू करतो. मात्र फ्लूची लक्षणे जरी सौम्य असली तरीही ज्या रुग्णांना इतर अतिजोखमीचे आजार आहेत, त्यांना मध्यम गटातील रुग्णांप्रमाणे तातडीने ऑसेलटॅमीवीर सुरू करतो. या सगळ्या वर्गीकरणाचा हेतू एकच आहे आणि तो म्हणजे रुग्णास लक्षणे सुरू झाल्यापासून ४८ तासांत ऑसेलटॅमीवीर सुरू करणे हितकर ठरते. कारण हे औषध वेळेत सुरू झाल्यास अत्यंत गुणकारी ठरते आणि न्यूमोनिया वगैरे गुंतागुंत होऊन आजार जिवावर बेतत नाही, त्यामुळे हे औषध वेळेवर सुरू होणे, ही रुग्ण आणि डॉक्‍टर या दोहोंचीही जबाबदारी आहे. या उपचारांसोबतच गरम पाण्यात मीठ-हळद टाकून गुळण्या करणे, गरम पाण्याची वाफ घेणे, कोमट पाणी पिणे अशा गोष्टी लवकर बरे होण्यासाठी मदत करतात.

अतिजोखमीच्या व्यक्ती 
 गरोदर स्त्रिया
 उच्च रक्तदाब आणि इतर हृदयरोग असणाऱ्या व्यक्ती
 मधुमेह 
 स्थूलत्व
 फुप्फुस, यकृत, मूत्रपिंड यांचे आजार असणाऱ्या व्यक्ती
 चेतासंस्थेचे आजार असणाऱ्या व्यक्ती
 प्रतिकारशक्तीचा ऱ्हास झालेल्या व्यक्ती
 दीर्घकाळ स्टेरॉईड औषधे घेत असलेल्या व्यक्ती अशा व्यक्तींना फ्लूची सौम्य लक्षणे आढळली तरी टॅमीफ्लू सुरू करायला हवी. 

अनेकदा जवळच्या कुणास स्वाइन फ्लू झाला की जवळची मंडळी भयभीत होतात. त्या प्रत्येकाला आपणही ऑसेलटॅमीवीर हे औषध घेतले पाहिजे, असे वाटते. असे घाबरून जाण्याचे कारण नाही आणि प्रत्येक रुग्णाजवळ असलेल्या व्यक्तीने हे औषध घेण्याची गरजही नाही. मात्र रुग्णाच्या निकट सहवासितांपैकी ज्यांना अतिजोखमीचे आजार आहेत त्यांना वैद्यकीय सल्ल्याने प्रतिबंधात्मक उपचार सुरू करणे गरजेचे आहे.

बहुतांश फ्लू रुग्ण हे सौम्य स्वरूपाचे असतात. त्यांना रुग्णालयात भरती करण्याची आवश्‍यकता पडत नाही. त्यामुळे अशा फ्लू रुग्णांची घरी कशी काळजी घ्यावी, हे आपण शिकले पाहिजे. आपण सर्वांनी स्वाइन फ्लू आणि त्यावरील उपचार समजावून घेऊन वेळेत वैद्यकीय सल्ला घेतला तर या आजारावर मात करणे अवघड नाही. स्वाइन फ्लूवर लसदेखील उपलब्ध आहे. विशेषत- अतिजोखमीच्या व्यक्तींनी ती वैद्यकीय सल्ल्याने घ्यावी. मात्र या लसीमुळे मिळणारी प्रतिकारशक्ती ही साधारणपणे आठ महिने ते एक वर्ष टिकणारी असल्याने ती दरवर्षी घ्यावी लागते. गरोदर स्त्रिया, उच्च रक्तदाब आणि मधुमेही रुग्ण, तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी ही लस शासन पातळीवर मोफत व ऐच्छिक स्वरूपात उपलब्ध आहे. 

 फ्लू काय किंवा सध्या आपल्यासमोर आ वासून उभा राहिलेला क्षयरोगासारखा जीवघेणा आजार काय, आपल्या काही चुकीच्या सवयी बदलून या आजारांवर नियंत्रण आणणे शक्‍य आहे. हे आजार हवेवाटे म्हणजे शिंकण्या-खोकण्यातून पसरतात. त्यात अनेक जण इतस्तत- थुंकत राहतात, यामुळे या जंतूंच्या प्रसाराला बळ मिळते. आपण ही साधी सवय बदलली तरी या आजारांचे प्रमाण कमी व्हायला किती तरी मदत मिळणार आहे. ज्याला आपण ‘रेस्पिरेटरी एटीकेटस’ म्हणतो, त्या आपण पाळायला हव्यात. यासाठी धूम्रपान, तंबाखू, गुटखा यांना आपण निर्धाराने ‘नाही’ म्हणायला हवे.  शिंकताना-खोकताना नाकातोंडावर रुमाल धरणे, हात पुन्हा पुन्हा स्वच्छ धुणे, आपल्याला फ्लूची लक्षणे असतील तर आपला जनसंपर्क कमी करणे, या साध्या साध्या गोष्टी आपले व आसपासच्यांचेही फ्लूपासून रक्षण करतील. महत्त्वाचे म्हणजे आहार आणि विहार. शारीरिक व मानसिक ताण टाळणे, भरपूर पाणी पिणे आवश्‍यक आहे. 
 
डेंगी  
डेंगी आणि चिकूनगुनियाचा एडीस डास मुख्यत्वे घरगुती पाणीसाठ्यात वाढणारा डास आहे. जे पाणीसाठे उघडे आहेत अशा साठ्यात, कुंड्या, फुलदाण्या, कारंजी, कुलरचे ट्रे, पक्ष्यांना/प्राण्यांना पाणी पिण्यासाठी केलेल्या खोलगट जागा अशा ठिकाणी साचलेल्या पाण्यात या डासाची वाढ होते. या शिवाय खराब टायर्स, नारळाच्या करवंट्या, इतस्तत- पडलेले प्लॅस्टिकचे डबे, बाटल्या, पिशव्या छतावर ठेवलेल्या वस्तू, अंथरलेले प्लॅस्टिक, झाडांचे खोलगट बुंधे, रांजण अशा एक ना अनेक ठिकाणी हा डास जन्माला येतो. अगदी पिण्याच्या पाण्याच्या बाटलीच्या उपड्या  पडलेल्या टोपणात साचलेले पाणी जरी त्याला सात-आठ दिवसांकरिता मिळाले तरी त्यात एडीस बाळाचा जन्म होतो. एडीस डासाची अंडी पाण्याशिवाय एक वर्षभरही टिकू शकतात. डेंगीवर कोणतेही औषध आजमितीला उपलब्ध नाही. त्यामुळे डेंगी नियंत्रणाचे केवळ तीनच उपाय आपल्या हातात आहेत आणि ते म्हणजे प्रभावी डास नियंत्रण, अधिक प्रभावी डास नियंत्रण आणि अत्याधिक प्रभावी डास नियंत्रण...!

अत्यंत वेगाने होत असलेले नियोजनशून्य शहरीकरण डेंगी वाढीचे एक प्रमुख कारण. वाढती लोकसंख्या, प्रचंड प्रमाणात होत असलेले स्थलांतर, वाढते आंतरराष्ट्रीय दळणवळण, अपुऱ्या नागरी सुविधा, अविघटनशील वस्तूंचा (बाटल्या, डिस्पोजेबल कप, प्लॅस्टिक वस्तू, टायर्स) यांचा मोठ्या प्रमाणावरील वापर या व अशा अनेक कारणांनी डेंगीचे प्रमाण वाढण्यात हातभार लावला आहे. 

वातावरणात होणाऱ्या बदलाने, ग्लोबल वॉर्मिंगने या आजाराला हातभार लावला आहे. साधारणपणे २५ ते ३० अंश सेल्सियस तापमान आणि ७०-८० आर्द्रता ही डेंगी डासाच्या वाढीकरिता आवश्‍यक असते. या प्रकारच्या वातावरणात अंडी ते प्रौढ डास हा प्रवास सात ते आठ दिवसात पूर्ण होतो. तापमान कमी असल्यास अंडी उबण्याचा कालावधी वाढतो. ग्लोबल वॉर्मिंगमुळे वाढत्या तापमानात डासाचे जीवन चक्र अधिक वेगात पूर्ण होते, त्यामुळे त्यांची उत्पत्ती वाढते, डासाच्या शरीरातील विषाणूंची वाढही अधिक वेगात होते, डासांचे चावण्याचे प्रमाणही वाढते. तापमान वाढीमुळे पूर्वी ज्या भागात एडीस आढळत नव्हता त्या भागातही या डासाला थारा मिळतो.

काय करू शकतो?
प्रभावी डास नियंत्रण करण्यासाठी आपल्या सर्वांच्या सहभागाची आत्यंतिक आवश्‍यकता आहे. आपल्या घरातील पाण्याची भांडी व्यवस्थित झाकणे, आपल्या घरात किंवा अवतीभवती नळगळती असू नये, घरातील फुलदाण्यांतील पाणी दिवसाआड बदलणे किंवा कुंड्यात डास अळीनाशक ग्रॅन्युल्स टाकणे, इमारतीवरील पाण्याच्या टाक्‍या व्यवस्थित झाकलेल्या असणे, खिडक्‍यांना डास प्रतिबंधक जाळ्या बसविणे, झोपताना मच्छरदाणीचा वापर करणे, घराभोवतीचा परिसर स्वच्छ ठेवणे, अवतीभोवती, घराच्या छतावर प्लॅस्टिकच्या वस्तू, इतर खोलगट वस्तू असतील तर त्या नष्ट करणे अथवा नष्ट करणे शक्‍य नसेल तर त्यात पाणी साठणार नाही अशा पद्धतीने ठेवणे, खराब टायरांमध्ये पाणी साचणार नाही याची दक्षता घेणे, या व अशासारख्या गोष्टी आपण साऱ्यांनी नियमितपणे करणे आवश्‍यक आहे. विशेषत- सुटीवर जाताना कमोड झाकून ठेवणे, पाण्याची भांडी मोकळी करून पालथी घालून ठेवणे, नळ ठिबकून अनावश्‍यक पाणी साचणार नाही याची काळजी घेणेही आवश्‍यक आहे. डेंगीचा डास दिवसा चावतो आणि दिवसा आपण सगळे आपापल्या कामाच्या ठिकाणी असतो. त्यामुळे केवळ आपले घर आणि घराभोवतीचा परिसरच नव्हे तर आपल्या कामाच्या ठिकाणीदेखील डासोत्पत्ती होणार नाही याची खबरदारी घ्यायला हवी. 

स्वाइन फ्लूप्रमाणे डेंगीदेखील मुख्यत्वे सौम्य स्वरूपाचा आजार आहे. वैद्यकीय सल्ल्याने तापावरील औषध आणि पुरेसे द्रवपदार्थ घेत राहिले तर बरेचसे रुग्ण बरे होतात. प्लेटलेट कमी होण्याचा बागुलबुवा दाखवला जातो. पण या पेशी अगदी वीस हजारापर्यंत कमी झाल्या तरी त्या बाहेरून द्यायची गरज भासतेच असे नाही. काही वेळा मात्र रुग्णामध्ये गुंतागुंत निर्माण होऊ शकते. वैद्यकीय सल्ल्याने कोणताही उपचार घेणे महत्त्वाचे!

तो ये बारिश कुछ नये गुल भी खिलायेगी...बस्स अपने सेहत का ध्यान रखना!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com