सुजाण  पालकत्व  निभावताना

डॉ. अनिल परदेशी
Friday, 4 May 2018

तुमचे मुलांसोबतचे असणे मुलांना आत्मविश्‍वास देते. तुम्ही कितीही कार्यमग्न राहा, पण स्वतःच्या मुलांना जपा व त्यांच्यासाठी वेळ काढा. 

अपत्यप्रेम ही गोष्टच मुळात विलक्षण आहे. ‘दृश्‍यम’ चित्रपट आठवतो ना! त्यातील विजय साळगावकर दोन मुलींचा पिता असतो. त्याचा एक डायलॉग आहे. ‘इन्सान अपनी फॅमिली के बिना जी नहीं सकता और उनके लिए वो कुछ भी कर सकता हैं.’ असाच काहीचा प्रत्यय तेव्हा येतो, जेव्हा घरात नवीन मूल जन्माला येते. भारतीय वैद्यकशास्त्रामध्ये एक खूप छानसा विचार आहे. ‘पुत्रवदेवैनं पालयेदातुरं भिषक्‌’ म्हणजे रुग्णाला तुमचे मूल समजून चिकित्सा करा. याचाच एक अर्थ असा आहे, की माणूस स्वतःच्या बालकाची अथवा मुलाची जेवढी काळजी घेतो, तेवढी इतर कशाचीच नाही. 

सुजाण पालकत्वामुळेच मुलाची वर्तणूक आणि सामाजिक कौशल्ये ही वृद्धिंगत होत असतात. जबाबदार पालकत्वाचे उदाहरणच जर द्यायचे झाले, तर बालकाने केलेल्या योग्य गोष्टी त्याच्या नजरेस आणून देणे आणि बालकाच्या काही कृती, म्हणजे प्रेम, आनंद, शांतता, संयम, चांगुलपणा, दयाळू वृत्ती, विनम्रता, विश्‍वासूपणा आणि स्वनियंत्रण यापैकी असणाऱ्या अथवा दिसणाऱ्या गुणांचे कौतुक करायची संधी न गमावणे. 

काही महिन्यांपूर्वी एका रुग्णालयामध्ये एक केस आली. दीड वर्षे वयाच्या बालकाला अतिमात्रेत औषध दिल्यामुळे पॅरासिटामॉलची विषबाधा झाली होती. अखेर त्या बाळाचे यकृत पूर्णतः खराब झाल्यामुळे यकृतरोपण करावे लागले. बाळाचा ताप काही उतरत नाही म्हणून दर एक-एक तासाला आई, आजी, काका असे सर्व जण बाळाला तापाचे औषध पाजत होते. एकत्र कुटुंब असूनसुद्धा कुणालाही असे वाटले नाही, की बाळाला आपण लगेच डॉक्‍टरांकडे घेऊन गेले पाहिजे. तसे जर केले असते तर कदाचित ती केस यकृत रोपणापर्यंत गेली नसती. बालकांकडे पालकांचे संपूर्ण दुर्लक्षच होते आहे, असे नाही. उलट माझे अनुभव या बाबतीत वेगळे आहेत. बालरुग्ण किंवा बालकांना तपासत असताना एक गोष्ट प्रामुख्याने जाणवते, ती म्हणजे बालकांबाबतीत सांगितलेली कुठलीही गोष्ट बाळाचे पालक गांभीर्याने घेत असतात. मी कित्येक मातांना बाळाच्या काखेतील तापमान कसे मोजायचे किंवा जुलाब झाल्यानंतर ओ.आर.एस. कधी आणि किती प्रमाणात द्यायचे याचे प्रात्यक्षिक दिल्यानंतर त्यांच्याकडून ती कृती व्यवस्थित होताना मी अनेकदा पाहिले आहे. 

बालकाच्या जन्मापासून ते बालक पाच वर्षांचे होईपर्यंतचा काळ हा अत्यंत महत्त्वाचा असतो. खास करून पालकांची तर कसोटीच असते. बालकांच्या बाबतीत होणाऱ्या अनेक अपघातात्मक गोष्टी याच कालावधीत जास्त होतात असे दिसते. एकदा एका पालकांचा मला फोन आला, की आठ महिन्यांच्या बाळाने सेफ्टी पीन गिळली आहे, इमर्जन्सी होती. ‘हिस्टरी’ घेतल्यानंतर समजले, की बाळाने सेफ्टी पीन गिळून चौवीस तास झाले होते. बाळाने उलटी केल्यामुळे त्याला नजीकच्या बालरोगतज्ज्ञांकडे नेले होते. तिथे बाळाच्या आईने सहज शंका उपस्थित केली होती, की तिच्या ड्रेसिंग टेबलवरील तीन सेफ्टी पिनांपैकी दोनच तिथे काल दिसल्या. म्हणजे आईला हे नक्की माहीत नव्हते, की बाळाने पिन गिळली आहे म्हणून. उलटीच्या तक्रारीसाठी डॉक्‍टरकडे नेले होते, पण शिक्रापूरच्या त्या प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञांनी शंकानिरसन म्हणून बाळाचा एक्‍स रे केला असता त्यात टोक वरच्या बाजूस असणारी व उघडलेली सेफ्टी पिन दिसत होती. ती खरोखरच खूप मोठी इमर्जन्सी होती. आमच्या ‘ऑन कॉल मेडिकल ऑफिसर’चा ड्यूटीचा पहिलाच दिवस होता. म्हणून मी ऑन कॉल मेडिकल ऑफिसरसह त्या केसला फॉलो करायचे ठरवून ॲम्ब्युलन्स घेऊन पुण्याच्या केईएमला रुग्णाला हलवले. तासाभरातच त्या बालकाच्या अन्ननलिकेतील ‘ती’ सेफ्टी पीन बाहेर काढली गेली. बालकांकडे पालकांचे खरेंच खूप बारीक लक्ष असावे लागते. नाही तर असे अपवादात्मक का होईना पण अपघात होत राहतात. लहान बालकांना होणाऱ्या आरोग्य समस्यांपैकी प्रमुख म्हणजे श्‍वसनसंस्थागत (रेस्पिरेटरी) आजार म्हणजे सर्दी, ताप, खोकला, घर्घर आवाज व त्यानंतर दुसरे म्हणजे अन्नवहसंस्थागत (गॅस्ट्रोइंटेस्टीनल) आजार म्हणजे उलटी, जुलाब, भूक कमी होणे, शीची जागा लाल होणे ही लक्षणे प्रामुख्याने असतात. 

 ज्यांनी बाळाचा ताप किंवा एखादे लक्षण कमी व्हावे यासाठी बाळाच्या उशाशी बसून रात्र जागवली असेल, असे सर्व पालक बालकाचे आरोग्य जपणे हे खरेच किती महत्त्वाची गोष्ट आहे हे जास्त चांगल्या प्रकारे सांगू शकतात. 

काही वर्षांपूर्वी चाकणमधील एका आईने बालकाला घरच्या घरी वाफ देण्याची शक्कल लढवली. त्या माऊलीने घरी असणाऱ्या वाफ घेण्याच्या वॉटर स्टीमरने बालकाला वाफ देण्याचा फक्त प्रयत्न केला असता बालकाची नाजूक असणारी चेहऱ्याची त्वचा ‘बर्न इंज्युरी’ने अक्षरशः सोलून निघाली होती. नंतर योग्य ते उपचार करून ती त्वचा व्यवस्थित करण्यात आली. ही नकारात्मक उदाहरणे सांगण्याचा उद्देश हाच आहे, की भावनेच्या भरात आपल्या बालकाच्या आरोग्यासाठी खूप काही करण्याचा प्रयत्न करू नये. असे आपल्या मनाने केलेले उपचार बालकाच्या जिवावर बेतू शकतात. उपचार करताना काही गोष्टी नजीकच्या डॉक्‍टरच्या सल्ल्यानुसार करा. आपण त्यांनी सांगितल्याप्रमाणे जर वागलो, तर ते बालकाच्या आरोग्यासाठीच चांगले असेल. अनेक माता-भगिनी माझ्याकडे येऊन सांगतात, की बालकाचे वजन वाढत नाही. वजन तर वय व उंचीनुसार बरोबर असते. अधिक चौकशी केल्यानंतर समजते, की शेजारच्या वा नात्यातील त्याच वयाच्या मुलाचे वजन जास्त असते, म्हणून आपल्या मुलाचे वजन आवश्‍यकतेपेक्षा कमी असल्याचा समज करून घेतला आहे. मग अशा वेळी एक डॉक्‍टर म्हणून मुलाची वाढ, वजन, उंची याविषयी  पालकांचे कौन्सिलिंग करणे खूप गरजेचे असते. बऱ्याचदा डॉक्‍टरांनी दिलेल्या अँटिबायोटिक औषधाचा पालक पूर्ण डोस न देता लक्षणे थांबल्यावर मध्येच बंद करून भविष्यकालीन वापरासाठी घरामध्ये साठवून ठेवतात. अशा वेळी त्यांना कौन्सिलिंग करणे क्रमप्राप्त असते. 

आज आपण एकविसाव्या शतकामध्ये वावरत असताना आपली जीवनशैली बदलली आहे आणि याचा परिणाम ‘पालकत्वा’वर देखील झाला आहे हे नाकारून चालणार नाही. माझा एक मित्र व त्याची पत्नी दोघेही इंजिनिअर. आयटी कंपनीत काम करतात. सकाळी जाताना त्यांच्या अडीच वर्षांच्या बालकाला पाळणाघरात सोडून जातात व थेट संध्याकाळी येताना घरी आणतात. नोकरी करणे, पैसे कमावणे यात गैर असे काहीच नाही. उलट या स्पर्धात्मक युगात टिकण्यासाठी ते गरजेचे आहे. पण कुठेतरी या गोष्टीचा देखील आपण विचार करायला हवा, की या सर्व प्रक्रियेमध्ये बालकाचे निरागस बालपण होरपळून तर निघत नाही ना? बाळ आणि आईचे एक वेगळेच नाते असते. या नात्याची नाळ ही गर्भावस्थेमधील जैववातावरणात जोडली जाते आणि ती बालकाच्या जन्मानंतर सुद्धा शेवटपर्यंत तशीच राहते. लॅन्ड्री या संशोधकाने २००१ मध्ये केलेल्या संशोधनात एक गोष्ट अशी नमूद केलीय, की जबाबदार पालकत्वामुळे प्रीटर्म गर्भावस्था पूर्ण होण्यापूर्वी झालेला जन्म किंवा आर्थिकदृष्ट्या मागास पार्श्‍वभूमी असणाऱ्या बालकाची वाढ आणि जडणघडण व्यवस्थित होते. जे. एल. लुबी यांने २०१२ मध्ये सुजाण अथवा जबाबदार पालकत्वाबद्दल एक अतिशय महत्त्वाचें संशोधन केलें आहे. बालकाच्या सुरवातीच्या काळामध्ये जर पालकांनी जबाबदार अथवा सुजाण पालकत्व दाखविले तर त्याच शाळापूर्व वयाच्या बालकाच्या मेंदूमधील हिप्पोकॅमल रिजनच्या जास्त आकारमानाचा खूप जवळचा संबंध आहे. हे हिप्पोकॅमल आकारमान बालकाची सामाजिक आणि मानसिक वाढ जास्त चांगल्या प्रकारे करते. पालकांच्या बालकावरील विशेष लक्ष असण्याने मूल स्वतःमध्ये आत्मविश्‍वास अनुभवते आणि तो आत्मविश्‍वास मुलाच्या वागण्याबोलण्यात दिसून येतो. मला एक उदाहरण नेहमी आठवते, की एक साडेतीन वर्षांचा मुलगा ज्यास लिहिता वाचता येत नाही, पण भगवद्‌गीतेचा पंधरावा अध्याय मुखोद्‌गत होता. हे फक्त सुजाण पालकत्वाचेच द्योतक आहे. कारण घरामधील तशी वातावरणनिर्मिती हे बालकांवरील संस्कारच असतात. 

सुजाण पालकत्वाची सर्वांत जास्त अजून गरज भासते, ती म्हणजे मूल वयात येताना, नेमके त्याच वेळी मुलाची दहावी वा बारावी असते. ‘प्राप्तेषु षोडशे वर्षे पुत्रंमित्रवदाचरेत्‌’ या न्यायाप्रमाणे पालकांनी अशा वेळी एक मित्र अथवा मैत्रिणीप्रमाणे मुलांना वागवणे हे कधीही चांगले. त्यासाठी मी माझ्या एका इंजिनिअर मामाचे उदाहरण देईन. त्यांनी मुलाच्या बारावीच्या दरम्यान स्वतःच्या दिनचर्येला मुलाच्या ट्यूशन्स ग्रंथालयाच्या वेळेप्रमाणे जुळवून घेतले. म्हणजेच मुलासाठी ते सर्व पोषक वातावरण तयार करून दिले, ज्याची त्याला गरज होती. त्याचा सकारात्मक परिणाम मुलावर होऊन त्याला चांगल्या महाविद्यालयात प्रवेश मिळाला. केईएममध्ये पदव्युत्तर शिक्षण घेत असताना एक गोष्ट माझ्या नजरेला आली, ती म्हणजे आमचे मार्गदर्शक त्यांच्या त्याच महाविद्यालयामधील मुलीच्या पदवी परीक्षेदरम्यान एक महिनाभर सुटी घेऊन मुलीला घरी परीक्षेविषयी मार्गदर्शन करीत असत. यातून एकच गोष्ट दिसून येते, ती म्हणजे एक पालक म्हणून आपण कधीही कुठेही कमी पडत नाही आणि पडायलाही नको. मागे ‘व्हॉट्‌सॲप’वर एक संदेश सारखा फिरत होता, तो म्हणजे ‘एक पिढी आम्हाला सोडून जाते आहे’. आपल्यातील प्रत्येकाला कुठेतरी भावनाविवश करील असा तो संदेश होता. त्या जुन्या पिढीतील कुठलीही जवळची अथवा दूरची व्यकती जर आपल्याला भेटली तर त्यांचा पहिला प्रश्‍न हाच असेल की ‘घरी मुलं-बाळं कशी आहेत?’ त्यातून त्यांचा एकच संदेश असेल, की तुम्ही कितीही कार्यमग्न राहा, पण स्वतःच्या मुलांना जपा व त्यांच्यासाठी वेळ काढा.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dr. anil pardeshi article on guardianship