योग्य आहारा घ्या! लठ्ठपणा हटवा!

डॉ. अर्चना जोशी, डॉ. हेमंत जोशी
Friday, 20 April 2018

अयोग्य पद्धतीने घेतलेला आहार आणि व्यायामाचा अभाव यामुळे लठ्ठपणा वाढत जातो. त्यामागून अन्य आजारही येतात.

समाजात स्थूलपणा वाढत चाललेला दिसतो. म्हणजे पोट सुटलेले दिसते. यातील बहुतेकांच्या रक्तातील साखर जास्त आहे, त्यांचा रक्तदाब जास्त आहे, असे दिसते.या पैकी बहुतेकांना मधुमेह जडण्याची शक्‍यता असते. आपण फार जाडे नाही, हे स्वतःच ठरवू नका. कमरेचा घेर मोजा. वजन करा. पोट सुटले का ते कळेल. उंचीच्या प्रमाणापेक्षा वजन जास्त आहे का ते कळेल. डॉक्‍टरांकडे जाऊन आपला रक्तदाब मोजा. रक्तदाब जास्त असेल तर डॉक्‍टरांचा सल्ला घ्या. आपल्याला मधुमेह नाही ना, याची खात्री करून घ्या.

मुलांमधील जाडेपणा हा तर मोठ्यांमधील जाडेपणापेक्षा वाईट आहे. मुंबईच्या शाळांमधील अभ्यास दाखवतो की, दर तिसरा-चौथा मुलगा व मुलगी जाड आहेत. मुलांमधील जाडेपणाचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. एक तज्ज्ञ म्हणतात की, जाड मुलांच्या आई-बाबांना दु:खी व्हायला लागेल. 

आपल्याकडे जाडेपणा का वाढत आहे? कारण आपल्याला ‘बसखामरा’ रोग झाला आहे. ‘बसखामरा’ म्हणजे ‘बसा, खा व मरा’.

आपले खाणे वाढले आहे. बसणे वाढले आहे. हालचाल कमी झाली आहे. बसून शरीरातील हॉर्मोन व आरोग्य बिघडते. आपण बसून टीव्ही बघतो. वाहनात बसून कामाला जातो. कामाच्या जागी बसतो. असे बसणे वाढले आहे. कष्टाची कामे करतांना, चालतांना जे उष्मांक (कॅलरी) जाळले जातात, ते आता जाळले जात नाहीत. त्या पासून चरबी बनते. वजन वाढते. आपल्याला चरबी रोग होतो. तो उच्च रक्त दाब, मधुमेह हृदयविकार, विसरणे, अपंगत्व आदि रोग भेट देतो. यकृत (लिव्हर), स्वादुपिंड (पॅन्क्रिया), स्नायू खराब होतात. आपण विकलांग होतो. जाड माणसाच्या वजनाच्या तिसरा हिस्सा वजन हे हानिकारक चरबीचे असत. म्हणजे ७५ किलो माणसाच्या अंगात अनावश्‍यक अशी २५ किलो चरबी असते. तिला कमी खाऊन, उपास करून व जलद हालचाली करून जाळले नाही तर ती आपल्याला मारते.

अमेरिकेतील अभ्यास दाखवतो की, सातव्या वर्षानंतर मुलांचे वजन वाढते व जाडेपणा वाढतो. काय कारण असेल? आपण मुलांना शाळेत घालतो. शाळेमध्ये मुलांना बसावे लागते. हालचाल कमी होते. मग मुले जाड होतात. शिवाय आपण मुलांना शिकवणी लावतो. पुन्हा मुले बसतात. मोबाईल, कॉम्प्युटर घेऊन बसतात. आपल्या सोबत जेवायला  बसतात. शाळा मुलांना जाडेपणा देतात. आजारी करतात. तो कमी व्हायला शाळांनी मुलांना रोज एक तास मैदानात खेळवलेच पाहिजे. शाळेत व्यायाम शाळा हवीच. रोज मुलांनी एक-दोन तास मैदानात खेळलेच पाहिजे. त्यांना शिकवणी लावायची तर ती खेळाचीच लावली पाहिजे. तरच ते शिकायला जगतील. मुलांनी शाळेत पायीच गेले पाहिजे. धावत गेले पाहिजे. सायकलने गेले पाहिजे. 

जगभर मधुमेहही वाढत आहे. तो जपानमध्ये सर्वात कमी आहे. ते लोक जेवताना ताटभर भाजी व वाटीभर भात खातात. जगात सर्वात जास्त मधुमेह भारतात आहे. भारत जगाची मधुमेहाची राजधानी आहे. आपण ताटभर भात-पोळी खातो व वाटीभरही भाजी खात नाही, हा फरक आहे. 

जलद हालचाली व व्यायाम यामुळे स्थूलपणा व मधुमेह यांच्यावर नियंत्रण मिळवता येईल. रोज तासभर जलद चालले, धावले तर दर आठवड्याला सरासरी  शंभर ग्रॅम वजन कमी होते. 

चरबी एक किलोने कमी होते. स्नायू बलदंड होतात. त्यांचे अर्धा किलो वजन वाढते. एक दिवस लग्न समारंभात जास्त जेवले की तीनशे ग्रॅम वजन वाढते. तर एक दिवस व्यायाम केला, उपास केला की वजन घटते. हे सर्व परिवाराने मनात घेऊन रोज करायला हवे. आहार कमी केला आणि व्यायाम केला तर फायदे खूपच जास्त होतात.

व्यायामाने मधुमेह टळतो. एकवीस हजार लोकांचा अभ्यास झाला. त्यात असे दिसले की, व्यायाम करणाऱ्यांमध्ये व्यायाम न करणाऱ्यांपेक्षा मधुमेह कमी होतो. म्हणून व्यायाम करा व मधुमेह टाळा.

मधुमेह झाल्यावरही व्यायामाने फायदा होतो. मधुमेह असेल व व्यायाम केला तर आपल्या औषधांची गरज कमी होऊ शकते. आहार व व्यायाम नीट केल्यास औषध खूपच कमी होऊ शकते.  

पार्वतीचे नाव अपर्णा कसे झाले? पार्वतीला शंकराला प्रसन्न करायचे होते. शंकर प्रसन्न होत नव्हते. पार्वतीने व्रत केले. तिने अन्न सोडले. फक्त पाने खाऊ लागली. पान म्हणजे पर्ण. तरी काम झाले नाही. तिने पाने खाणेही सोडले. मग शंकर प्रसन्न झाले. पार्वतीने पाने खाणे सोडले म्हणून तिचे नाव अपर्णा झाले. पाने खाऊन व नंतर तेपण सोडून ती बारीक झाली असेल. सुंदर झाली असेल. आपणही असे वजन कमी करुन सुंदर होऊ शकतो.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dr. archana joshi Dr. hemant joshi article on right diet & obesity