
मनुष्याच्या आयुष्यात निद्रेला प्रचंड महत्त्व आहे. परंतु लॉकडाउनच्या काळात अनेकांचे दैनंदिन चक्र बदलले, झोपेच्या वेळा आणि सवयी बदलल्या.
निद्रा देहं सखायुषा।
- डॉ. अश्विनी राऊत, ( BAMS स्त्रीरोगतज्ज्ञ) अकलूज
मनुष्याच्या आयुष्यात निद्रेला प्रचंड महत्त्व आहे. परंतु लॉकडाउनच्या काळात अनेकांचे दैनंदिन चक्र बदलले, झोपेच्या वेळा आणि सवयी बदलल्या. त्यामुळे त्यांना अनेक शारीरिक आणि मानसिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्या अनुषंगाने आजच्या लेखात आपण निद्रेविषयी माहिती घेऊया.
सर्व सजीव प्राणिमात्रांच्या आयुष्यातील , दैनंदिन जीवनातील अत्यंत महत्वाची, तितकीच आवडीची गोष्ट म्हणजे झोप, निद्रा. जेव्हा मन आणि इंद्रिये आपापल्या कामापासून निवृत्त होतात, तेव्हा आपण झोपतो. निरोगी आरोग्यासाठी आणि रोजची कामे उत्तम करण्यासाठी पुरेशी, आरामदायी झोप घेणे आवश्यक आहे. लहान बाळ वा नवजात शिशू सुमारे दहा ते बारा तास झोपतात. जसे वय वाढत जाते तसे झोपेचे तास कमी होत जातात. तरुणांपासून ते वृद्धांपर्यंत किमान सहा ते आठ तासांची झोप घेणे गरजेचे आहे. " आहार: स्वप्नो ब्रह्मचर्यमिति।" आहार, स्वप्न( निद्रा) आणि ब्रह्मचर्य हे जीवनाचे तीन उपस्तंभ चारकांनी सांगितले आहेत. या तीन उपस्तंभाचे योग्य पालन केल्याने आरोग्यदायी आयुष्य जगता येते. यातील निद्रा या अत्यंत महत्वाच्या उपस्तंभाबद्दल जाणून घेऊया.
निद्रा लाभ - ‘ निद्रायत्तं सुखं दुःखं पुष्टि: कार्श्यँ बलाबलम्।
वृषता क्लीबता ज्ञानमज्ञानं जीवितं न च।।’ च. सु २१
योग्य मात्रेत, योग्य वेळेत नियमित झोप घेतल्याने शारीरिक आणि मानसिक सुख, स्वास्थ्य लाभते.
शरीराचे योग्य पोषण होते.
शरीर मनाचे बळ वाढते.
इंद्रियांची कार्यक्षमता वाढते.
अभ्यासातील, कामातील एकाग्रता वाढते.
दीर्घायुष्याची प्राप्ती होते.
शारीरिक आणि मानसिक ताणतणाव कमी होतो.
आहार पचन क्रिया सुधारते.
प्रतिकारशक्ती वाढते.
मानसिक आजारांवर नियंत्रण मिळवता येते.
रोज नित्य नियमाने रात्रीची झोप घेणे आवश्यक आहे. कारण जागरण आणि दिवास्वापाने ( दिवसाची झोप ) शरीर विविध आजारांनी वेढले जाते. दिवास्वाप करण्यास अपवाद व्यक्तींनी दिवसा झोपावे. जसे की, रात्री जागरण झाल्यास, वृद्ध, बालक, दुर्बल व्यक्तींनी दिवसा थोडा वेळ झोपण्यास हरकत नाही. शिवाय आदान काळात , ग्रीष्म ऋतूंत शरीरातील रुक्षता वाढल्याने, तसेच या काळात रात्र लहान असल्याने ग्रीष्मात दिवास्वाप सांगितला आहे. ग्रीष्म ऋतुव्यतिरिक्त इतर ऋतूंत दिवास्वाप वर्ज्य मानले आहे. दिवसा झोपल्याने- शरीरात जडत्व येते. पाचकाग्नि मंदावते. शरीरातील कफ वाढतो. अरुची, मळमळ, डोकेदुखी अशा समस्या नित्य दिवास्वाप केल्याने निर्माण होतात.
दिवास्वाप अयोग्य : स्थौल्य व्यक्ती, कफप्रकृतीच्या व्यक्ती, कफज व्याधींनी पीडित व्यक्ती अशा व्यक्तींनी दिवास्वाप करू नये.
वामकुक्षी : रात्रीच्या जागरणाने शरीरात रुक्षता, कृशता येते. दिवसा झोपल्याने शरीरात कफवृद्धी होते आणि बसून घेतलेल्या दहा- पंधरा मिनिटांच्या वामकुक्षीने शरीरात न रुक्षता येते ना स्निग्धता. त्यामुळे दुपारी जेवण झाल्यानंतर बैठ्या अवस्थेत वामकुक्षी घेण्यास हरकत नाही.
नियमित आरोग्यदायी झोपेसाठी पुढील गोष्टींची काळजी घ्या
दिवसा झोपणे टाळा. म्हणजे रात्री वेळेवर आणि लवकर झोप येईल.
रात्री उशिरापर्यंत आणि झोपेच्या वेळेआधी तासभर टीव्ही, मोबाईल अशी उपकरणे वापरणे बंद करा.
रात्री हलका आहार घ्यावा. जेवल्यानंतर लगेच झोपू नये.
नियमित शतपावली करावी.
रोज झोपेची वेळ एकच ठेवावी.
झोपण्यापूर्वी डोक्याला आणि पायांच्या तळव्यांना तेलाने मालिश करा. यामुळे झोप शांत लागते. शिवाय डोळ्यांचे आरोग्य सुधारते.
अनिद्रा या विकारांत रोज रात्री झोपताना तेलाने अभ्यंग आणि अंघोळ केल्याने फायदा होतो.
शक्यतो झोपण्यापूर्वी अंघोळ करावी. त्यामुळे दिवसभराचा थकवा दूर होऊन शांत झोप येते.
झोपण्याआधी नेहमी सकारात्मक विचार करावा.
झोपेचे आरोग्य सुधारले तर अनेक व्याधींपासून शरीर दूर राहते आणि उपस्तंभाचे निरोगी शरीराचे कार्य सफल होते.
Web Title: Dr Ashwini Raut Writes Sleep Health
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..