फायदा हेमंताचा

फायदा हेमंताचा

थंडीने अंगावर काटा येतो. त्वचा कोरडी होणे, त्वचा खरखरीत होणे, ओठ व गाल फाटणे, पायाला भेगा पडणे असे त्रास उष्ण प्रकृतीच्या लोकांना होतात, तसेच हे त्रास थंडीमध्ये अनेक लोकांना होतात. एखाद्या वेळी पुरेसा पाऊस पडला नाही की जमीन कोरडी पडते, तिला भेगा पडतात, पिके जळून जातात, झाडे जळून जातात, पिण्याच्या पाण्यासाठी गावोगाव फिरावे लागते, गुरे सोडून द्यावी लागतात. 
थंडीच्या काळात शरीराच्या आत सुद्धा हीच अवस्था उत्पन्न झालेली असते. 

या ऋतूत त्वचा कोरडी पडणे, त्वचा खरखरीत होणे, शरीरातील एकूण रसधातू कमी होणे वगैरे गोष्टींकडे मनुष्य लक्ष देत नाही. लक्ष दिले तर इलाज म्हणून एखादे क्रीम आणून तात्पुरता उपाय करण्याचा प्रयत्न केला जातो. आपल्याला नेहमी वाटते की, पाण्यामुळे वस्तू मऊ व ओली होते. पण पाणी तेथे कायम राहू शकत नाही, पाणी उडून गेले की वस्तू अधिकच कडक व कोरडी होते. तसेच क्रीममधे असलेले पाणी उडून गेले की त्या ठिकाणी अधिक खरखरीतपणा येऊ शकतो.

पावसाळा संपला, त्यानंतरचा शरद ऋतू संपून हेमंत व शिशिर ऋतूचे आगमन झाले की, सुरू झालेल्या गार वाऱ्यांमुळे शरीरातील मूत्रपिंडांनाही वातावरण अनुकूल नसते. या ऋतूंमध्ये शरीरातील रसधातू कमी झाल्यामुळे त्वचा रुक्ष होऊ लागते. त्वचा कोरडी पडल्यास बाह्योपचार करण्याआधी खाण्या-पिण्यात बदल करणे आवश्‍यक असते, उष्ण व वातूळ गोष्टी खाताना जपावे लागते. थंड हवेला प्रतिकार म्हणून गरम गुणांच्या अहळिवाचे लाडू खाल्ले तरी त्यात खोबरे घातलेले असावे लागते. 

या दिवसांमध्ये जास्त काळजी घ्यावी लागते ती वातदोषाची. खरे पाहता, थंडीचा गार वाराच त्वचेला अधिक कोरडे करतो, ज्यामुळे त्वचेवर भेगा पडतात. वात कमी करायला तेलाच्या अभ्यंगाशिवाय दुसरा अधिक चांगला उपाय नाही. त्वचेवर टिकून राहणारे थोडेसे मेण असलेले द्रव्य वापरणे इष्ट असते म्हणून काशाच्या वाटीने पादाभ्यंग केल्यानंतर कोकम तेल, तूप अशा गोष्टी त्वचेवर अवश्‍य लावाव्या. योग्य कपडे घालणे, कानाला तसेच गळ्याला थंड वारा लागू न देणे हेही त्वचासंवर्धनाच्या दृष्टीने आवश्‍यक असते. अंतर्स्नेहनासाठी तुपाचा किंवा डिंकासारख्या वस्तूचा वापर अवश्‍य करावा. वातप्रकृती असणाऱ्यांना जसा पावसाळ्यात वात वाढल्यानंतर त्रास होतो तसाच त्रास थंडीतही होऊ शकतो. त्यांनी वातदोष वाढू नये अशी काळजी घेणे आवश्‍यक ठरते. अशा व्यक्‍तींनी वातदोष वाढवणाऱ्या वस्तू खाऊ नयेत, शरीराच्या त्वचेला, स्नायूंना, मांसधातूला पुष्टी मिळेल असा शालिषष्ठी अभ्यंग करावा. चेहऱ्यावर रुक्षपणा आला तर काळपटपणा येऊ शकतो या दृष्टीने चेहऱ्याला रोझ ब्युटी तेलासारखे तेल लावावे, तसेच चेहऱ्यातील जलांश टिकून राहण्याच्या दृष्टीने थोड्याशा व्हॅसेलिनबरोबर रोझ ब्युटी तेल लावूनच बाहेर पडावे.  

आधुनिक काळात सौंदर्याला अधिक महत्त्व दिलेले दिसते आणि त्या दृष्टीने चेहऱ्यावरची त्वचा, ओठ हे फाटलेले असणे व त्यामुळे ते काळपट दिसणे इष्ट नाही. स्नानापूर्वी वातदोष कमी करणारा एखादा फेसपॅक दुधाच्या सायीत मिसळून लावावा किंवा नुसती साय चेहऱ्यावर लावून ठेवावी. ज्या साबणात खोबरेल किंवा कुठलेतरी तेल निश्‍चित आहे असाच साबण वापरावा.

तसे पाहता, या ऋतुमधे आयुर्वेदाने सुचविलेली रसायने, पौष्टिक अन्नपदार्थ तसेच रंग कांती उजळवण्यासाठी सुचवलेली आयुर्वेदिक औषधे सेवन करणे आवश्‍यक असते. तेजस्वी त्वचा हे यशासाठी आवश्‍यक अंग असते. 

पंचामृत, चैतन्य कल्प, च्यवनप्राश, आत्मप्राश, धात्री रसायन अशी कोणती तरी रसायने अवश्‍य सेवन करावीत. या थंडीच्या दिवसात केवळ आवडणारे अन्न न खाता पौष्टिक आहार अवश्‍य घ्यावा. एरवीही जेवणानंतर गरम पाणी पिणेच चांगले असते, पण थंडीच्या दिवसात कायम गरम पाणी पिणे हितकर असते. या दिवसांत आईस्क्रीम, शीतपेये यासारखे पदार्थ सायंकाळी किंवा रात्री निश्‍चित टाळावेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com