esakal | आयुर्वेद : ‘फॅमिली डॉक्टर हवाच’
sakal

बोलून बातमी शोधा

Ayurved

आयुर्वेद : ‘फॅमिली डॉक्टर हवाच’

sakal_logo
By
श्रीगुरु डॉ. बालाजी तांबे

साध्या साध्या गोष्टी न कळल्यामुळे माणसाची भीती वाढत राहते. बाहेर झाडावर सळसळले तरी काय आहे, अशा भीतीने अर्धा तास झोप लागत नाही. मनुष्याला कशाचीही माहिती पूर्ण मिळाली व त्याचे ज्ञान झाले तर त्याची भीती कमी होते. लोकांना रोगाचे ज्ञान होणे आवश्यक आहे, त्याहीपेक्षा रोगी व्यक्तीचे ज्ञान होणे आवश्यक आहे.

- श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे

बऱ्याच दिवसांनी पुन्हा एकदा ‘फॅमिली डॉक्टर’चा अंक सर्व वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा संकल्प केलेला आहे. आता कळलेले आहे की, ‘फॅमिली डॉक्टर’शिवाय जीवन सोपे नाही. फॅमिली डॉक्टर हे नेहमीच्या जीवनाचे एक अंग असावेच. अशा महामारीच्या वेळी व्यक्तीची प्रकृती, व्यक्तीची अवस्था पाहून तसेच बाहेरची परिस्थिती व अफवा हे सर्व पाहून फॅमिली डॉक्टर सल्ला देतात, मार्गदर्शन करतात. आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून मार्गदर्शन केले की तनाचे, मनाचे व आत्म्याचे आरोग्य सांभाळले जाते. त्यामुळे कुठल्याही बाजूने रोगाला प्रवेश करायला जागा मिळत नाही. साध्या साध्या गोष्टी न कळल्यामुळे माणसाची भीती वाढत राहते. बाहेर झाडावर सळसळले तरी काय आहे, अशा भीतीने अर्धा तास झोप लागत नाही. मनुष्याला कशाचीही माहिती पूर्ण मिळाली व त्याचे ज्ञान झाले तर त्याची भीती कमी होते. लोकांना रोगाचे ज्ञान होणे आवश्यक आहे, त्याहीपेक्षा रोगी व्यक्तीचे ज्ञान होणे आवश्यक आहे.

कोरोनाच्या बाबतीतही हेच झाले आहे. कोरोना, कोविडचे तंत्र काय आहे, हेच पूर्णपणे लक्षात येत नाही. सध्याचा कोरोनाचा विषाणू माणसाच्या फुप्फुसांमध्ये जाऊन (इन्फेक्शन होऊन) त्यांची कार्यक्षमता बंद करण्याचा प्रयत्न करतो. असा प्रयत्न झाला रे झाला की सूज येते, तसेच शरीरात उत्पन्न झालेला कफ तेथून हालत नाही, साठून राहतो. आपल्याला चव व वास येण्यासाठी आवश्यक असणाऱ्या गंधवाहिन्याही बंद होतात. म्हणून कोरोना झाला की वास येत नाही, चव लागत नाही असे म्हटले जाते. असा माणूस इतरांच्या सहवासात आलेल्यालाही रोग होण्याची शक्यता उत्पन्न करतो. श्र्वासाच्या संबंधित रोग असलेल्या व्यक्तीकडून बाहेर टाकलेल्या उच्छ्वासात जंतू असल्यामुळे इतरांना बाधा व्हायची शक्यता वाढते. त्यात पहिली लाट, दुसरी लाट, तिसरी लाट म्हणजे काय, हे न कळल्याने अधिकच गोंधळ निर्माण होतो.

कोरोनाशी युद्ध, कोरोना वॉरियर्स, हे युद्ध आपण जिंकणार... अशा संज्ञा अनेक वेळा ऐकण्यात येतात. युद्धाशी तुलनाच करायची तर ती उपमा घेऊनही विचार करावा लागेल. शत्रूने आक्रमण केल्यास सैन्याच्या कमांडरांमध्ये चर्चा होते. आपल्याकडे दहा हजार सैनिक आहेत. समोरून चालून आलेल्या २५ हजारांच्या सैन्यावर आपल्या दहा हजार सैनिकांनी हल्ला केला तर उपयोग होईल का, याचा विचार केला जातो. युद्ध होत असताना पूर्वीच्या काळी काठ्या, लाठ्या, तलवारी, बंदूक वगैरे शस्त्रे उपयोगात आणली जात. ही शस्त्रे आपल्याकडे किती आहेत तसेच त्यांना लागणारा दारूगोळा आपल्याकडे आहे की नाही, याचा विचार केला जातो. शत्रूचे आक्रमण कधी होईल हे सांगता येत नसल्यामुळे शस्त्रास्त्रांचा साठा करून ठेवावा लागतो. समोर उभ्या असलेल्या मनुष्याने तलवार उगारलेली आहे व तो कुठल्याही क्षणी वार करणार आहे, अशा वेळी जर तलवारीला धार करायला घेतली तर जगायची आशा करण्यात अर्थ नाही.

आपल्याजवळ सैन्य नाही, कुठली तयारी नाही, आधी लक्ष दिले नाही अशा वेळी विषाणूचे आगमन झाल्यास हाहाकार उडणे स्वाभाविक असते. आश्र्चर्याची गोष्ट ही की संपूर्ण जगात आज २०० वर्षे चाललेली औषधाची जी पद्धत रूढ आहे, त्यांनी असे काही झाल्यास काय करावे लागेल, असा विचारही केलेला नसावा. कसले संशोधन केले, कुठली औषधे केली हा प्रश्र्न लोकांच्या मनात आला तर नवल नाही. संशोधन केले असे सांगून एखादे औषध बाजारात आणणे, दोन वर्षांनी पुन्हा बाजारातून काढून घेणे यामुळेही लोकांचा विश्र्वास कमी होतो. तरीही संसर्ग झाल्यास इस्पितळात औषधे व उपचार दिले जातात व घ्यावे लागतात.

एकूण काय तर आलेल्या परिस्थितीला सामोरे जायची तयारी नाही, तेवढे बळ नाही अशी स्थिती आली असता काय करावे? शत्रूशी लढताना इतर योजनांचा विचार करावा लागतो. यातील एक महत्त्वाची योजना म्हणजे ज्या जागेत व परिस्थितीत शत्रू आहे त्यांचे अन्नपाणी बंद करणे. कोरोना शरीरात येणाऱ्या अन्नातील ग्लुकोजवर वाढतो, तेव्हा शक्यतो ताज्या हिरव्या भाज्या वापराव्या, प्रोटिनयुक्त आहार घ्यावा व ग्लुकोज असलेला आहार टाळावा. ग्लुकोजच्या अभावात कोरोना आपोआप मरतो. असे झाल्यास युद्धाच्या प्रसंगापर्यंत यावेच लागत नाही. तसेच सैनिकांचे मनोबल खच्ची करणे हाही एक मार्ग आहे. आक्रमण करणारा मनुष्य ओरडतो कशासाठी, सरळ आक्रमण का करत नाही असा प्रश्र्न मला नेहमी पडत असतो. परंतु ओरडण्याने समोरचा हतबल होतो, समोरच्याच्या शरीरात ओरडण्याची कंपने गेली की त्याच्या मनात भीती उत्पन्न होते, मनोबल खाली जाते, मनोबल खाली गेले की शत्रूला हरवणे सोपे होते.

शत्रू किती सामर्थ्यवान आहे व त्याला कसा मारायचा याचा विचार करण्याआधी आपण आपला विचार करणे आवश्यक आहे. यासाठी आपल्याला आपल्या सवयी बदलणे गरजेचे आहे. बाहेर रांगेत उभे राहणे, गर्दी न करणे, मास्क लावणे असे साधे साधे नियम पाळले जात नसतील तर भ्रष्टाचाराच्या चर्चा करण्यात काही अर्थ नाही. तसे पाहिले तर प्रत्येक जण भ्रष्टाचार करत असतो. पैसे कमावणे आवश्यक असतेच, परंतु आज प्रत्येक जण अडचणीत असताना पैशाच्या मागे लागून चुकीचे व्यवहार करण्यापर्यंत मनुष्याचे वागणे खालच्या थराला गेलेले आहे. आज मनुष्य हा मनुष्यप्राणी राहिला नसून तो फक्त प्राणी या संज्ञेला प्राप्त झालेला आहे. आपल्याला पुन्हा दोन पायांवर उभे राहणारा मनुष्य होणे आवश्यक आहे. त्यासाठी आपल्याला आपल्यातील माणुसकी वाढवावी लागेल.

शत्रूने आक्रमण केल्यास खंबीर राहून लढण्याची व नियोजन करण्याची आवश्यकता असते. भीतीमुळे मनुष्य हतबल झाला तर तो हरणार हे नक्की. त्यामुळे भीतीला हद्दपार करून आपल्याला शत्रूला हरवायचे आहे हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे. त्यासाठी आवश्यक असणारे मनोबल तयार करणेही महत्वाचे असते. मनोबल तयार करण्यासाठी काही नियम असतात. अटेंशन म्हटले की जसे सैन्य अटेंशनमध्ये उभे राहते, मार्च म्हटले की मार्च करायला लागते. तसे म्हटले तर सैन्याला रोजच्या रोज लढाईला जायचे नसते, पण त्याची सवय राहावी या हेतूने रोज मैदानात जाऊन मार्च, लेफ्ट टर्न, राईट टर्न वगैरे आज्ञावली ऐकण्याची गरज असते.

युद्ध सुरू झाले असले वा नसले तरी सैनिक ड्रेस घालून उभा असतो तसे आपल्याला तयारीत राहायला पाहिजे. शत्रूने हल्ला केल्यावर काढा घ्यायला सुरुवात करण्यापेक्षा ही आधीच करायची गोष्ट आहे. मी शत्रूला जरा जास्त एक्स्पोज होतो आहे किंवा माझ्यावर शत्रूचे लक्ष पडले आहे असे वाटल्यास काळजी घ्यावीच लागेल. या कोरोनाच्या युद्धात सतत मास्क घालावा लागेल तसेच दोन व्यक्तींमध्ये योग्य अंतर ठेवूनच व्यवहार करावे लागतील. कोरोना या शत्रूने आक्रमण केल्यावर त्याची राहण्याची जागा (खंदक) नाकाच्या पोकळीमध्ये आहे. खंदकात धूर सोडला तर शत्रू बाहेर येतो तसे खंदकात, नाकाच्या पोकळीत वाफाऱ्याची वाफ गेली की किंवा नस्याचे औषध गेले की शत्रू बाहेर येऊन मरणार आहे हे निश्र्चित. आयुर्वेदिक तुपाच्या नस्याने डोळ्यांनाही फायदा होतो. काही कोरोनावरील उपचारांमधील औषधांमुळे डोळ्यांना विशिष्ट रोग होण्याची शक्यता असते, त्याला थांबविण्यासाठीही नस्याचा फायदा होऊ शकेल.

प्राणवायू वाढविण्यासाठी वनस्पती खूप मदतरूप होतात. दारात तुळशीचे रोप लावणे हे एक उदाहरण. सर्वसामान्य जनांनी स्वतः न घाबरता लढणाऱ्यांना मदत करावी लागते, तसेच आत्मविश्र्वास वाढवून आनंदाच्या व रसायनांच्या मदतीने प्रतिकारशक्ती वाढविता येईल. डॉक्टर, वैद्य यांच्या सल्ल्याने औषधे पण घ्यावी लागतील.