तंत्र उपचारांचे : युद्धाची तयारी कोरोनाशी...

कोरोनाचे युद्ध नक्कीच जिंकता येईल. सध्या जगात तिसऱ्या महायुद्धाचीही चर्चा सुरू झाली आहे.
Yoga
YogaSakal

निसर्गच आपल्याला सर्व काही देतो. सर्व संपत्ती वनसंपदेतूनच मिळते. वनसंपदेचा अधिपती कुबेर आहे, असे समजले जाते. एका बाजूने संपत्ती मिळावी, या हेतूने कुबेराची पूजा करायची आणि दुसऱ्या बाजूने वनसंपदेचा नाश करायचा, हे योग्य नाही.

- श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे

कोरोनाचे युद्ध नक्कीच जिंकता येईल. सध्या जगात तिसऱ्या महायुद्धाचीही चर्चा सुरू झाली आहे. तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वगैरे वापर न होता रासायनिक शस्त्रांचा वापर होईल, होतो आहे, अशीही चर्चा सुरू झालेली आहे. ही सुरुवात कोणी केली, का केली, कशी केली हा विषय महत्त्वाचा नाही, तरी सुद्धा ज्या गोष्टी घडायच्या असतात त्यांना कोणीतरी निमित्त लागतेच. मनुष्याचे वागणे दिवसेंदिवस अत्यंत हीन पातळीवर जाऊन पशुतुल्य व्यवहार होऊ लागला आहे.

एखाद्या कुटुंबात भाऊ-भाऊ भांडतात किंवा कमवती मुले आपल्या आई-वडिलांना सोडून निघून जातात, म्हाताऱ्या आई-वडिलांना वृद्धाश्रमात जाऊन राहावे लागते, ज्यांनी आयुष्यभर आपल्या कुटुंबीयांसाठी जिवाचे रान केले त्यांना त्यांच्या उतारवयात विस्मृती झालेल्या अवस्थेत दवाखान्याच्या एका कोपऱ्यात पडून राहावे लागते, हे आचरण पशुतुल्यच आहे.

यापेक्षा वाईट गोष्ट म्हणजे आज पैशासाठी माणसे वाटेल ते करायला तयार होतात. याचाच अर्थ जीवनाची जी दोन मुख्य अंगे, भौतिक व आध्यात्मिक, त्यातल्या फक्त भौतिक अंगाकडे प्रत्येक जण धावत सुटलेला आहे. मन, आत्मा यांचा विचार केला नाही की एखादे श्र्वापद जसे सावजावर तुटून पडते तसा मनुष्य मनुष्यावर तुटून पडताना दिसतो. गाडी चालवताना उगाच आपली गाडी पुढे पुढे नेण्याचा प्रयत्न करण्यामागे आपण काही जिंकले आहे ही भावना असते. हरिण जोरात वेडेवाकडे पळत सुटते तेव्हा त्याला मागे लागलेल्या वाघापासून वाचायचे असते परंतु लोक आपली गाडी डावी-उजवी करत का पळवत असावेत? अशा बेदरकार गाडी चालवण्यातून होणाऱ्या अपघातामुळे काही संसार उध्वस्त होऊ शकतात याचा विचार केलेला दिसत नाही.

जगन्माता, आदिशक्ती व सर्व जगाचे निमित्त असलेली स्त्री भारतीय संस्कृतीत आदरणीय समजली गेलेली आहे. स्त्री जे प्रेम देते त्या प्रेमावरच मनुष्य वाढतो, संसार वाढतो, प्रेरणा मिळते. असा प्रेमाचा स्रोत असलेल्या स्त्रीवर किती अत्याचार होत आहेत याला मर्यादा उरलेली नाही. बलात्कारांची संख्या वेगाने वाढते आहे.बलात्कार झाल्यावर त्याचे कायद्याकडून विश्लेषण होतानाचा प्रसंग ऐकण्यासारखा नसतोच. सरकारने केलेले कायदे कुठल्यातरी कलमात अडकतात, समाजात बलात्कार होतच राहतात. स्त्रियांना दुय्यम लेखणे, त्यांच्या गळ्यातील साखळी ओढणे, त्यांना गुलामासारखे वागवणे हेही बलात्काराचेच प्रकार होत. निसर्गच आपल्याला सर्व काही देतो. सर्व संपत्ती वनसंपदेतूनच मिळते. वनसंपदेचा अधिपती कुबेर आहे असे समजले जाते. एका बाजूने संपत्ती मिळावी या हेतूने कुबेराची पूजा करायची आणि दुसऱ्या बाजूने वनसंपदेचा नाश करायचा हे योग्य नाही. नदी-नाल्यांमध्ये, रस्त्यावर, जंगलात, जेवढा कचरा केला जाईल तेवढे निसर्गाचे पावित्र्य खराब होते. असे झाल्यास निसर्ग उलट्या बाजूने प्रहार करतो असे भारतीय शास्त्रांत, आयुर्वेदातही सांगितलेले आहे.

याला आयुर्वेदात जनपदोध्वंस म्हटलेले आहे. राजापासून रंकापर्यंत सर्वांकडून केला जाणारा भ्रष्टाचार, समाजाने सोडलेली माणुसकी हे याचे कारण आहे. वादळे, भूकंप, समुद्रात त्सुनामी वगैरे येणे, आगी लागणे, अपघात होणे, एकूण मालमत्तेची हानी होणे हे प्रकार निसर्गात होतात. हे प्रकार पाहून मनुष्याचे डोळे उघडावे, आपले काहीतरी चुकते आहे हे त्याच्या लक्षात यावे, आपण पशुत्वाकडे जात आहोत हे त्याला उमगावे हे अपेक्षित आहे. त्याचा माणुसकीकडे प्रवास सुरू होणे अपेक्षित आहे. परंतु नुसती अशी कल्पना करून भागत नाही, त्यासाठी लागते कर्म, त्यासाठी माणसाला आपले आचरण सुधारावे लागते. पण आज असे करायची कोणाचीही तयारी नाही, कारण माणूस आज सुखसोयींना चटावलेला आहे. यंत्रांची मदत घेतली की काम सोपे होईल व मनुष्याला वेळ मिळेल हे समीकरण फोल ठरले, उलट आज माणसाकडे कशालाच वेळ उरलेला नाही. शेतात पीक अधिक मिळावे या अपेक्षेने जे संशोधन केले गेले त्याचा परिणाम आज मनुष्याला भोगावा लागतो आहे. या संशोधनामुळे माणसाला विषयुक्त अन्न खावे लागले पर्यायाने रोगराईला तोंड द्यायची वेळ आली. निसर्गावर इतके अत्याचार केले तर तो का नाही रागावणार? या कोपलेल्या निसर्गाला शांत करण्यासाठी मनुष्याला पुन्हा माणुसकीकडे जाणे आवश्यक आहे. कोरोनाची दुसरी लाट, तिसरी लाट या सगळ्यांशी युद्ध करून जिंकायचे असले तर काही विशेष गोष्टी कराव्या लागतील.

प्रकृतीनुसार औषधोपचार करणे, लस टोचून घेणे, मास्क बांधणे, शारीरिक स्तरावर सोशल डिस्टन्सिंग पाळणे, हात-पाय स्वच्छ धुणे आवश्यक आहेच पण त्याहीपेक्षा आवश्यक आहे मानसिक स्तरावर जवळ येणे. आत्ताच्या काळात निसर्गाबरोबर राहून प्राणशक्तीला, परमशक्तीला आवाहन केल्याशिवाय प्रतिकारशक्ती वाढणार नाही याची लोकांना जाण येणे आवश्यक आहे. लोकांची श्रद्धा जेवढी बळकट असेल, मग ती कशावर का असेना, तेवढी त्यांची भीती निघून जाईल. श्रद्धा वाढण्यासाठी आवश्यक असणारी साधने सरकारने मोकळी करणे आवश्यक आहे, तरच या कोरोनाला तोंड देता येईल.

अन्यथा दुसऱ्या लाटेनंतर तिसरी, तिसऱ्या लाटेनंतर चौथी याला अंत नाही. असे न होता सगळ्यांना आनंदाने व सुखाने जगायचे असेल, कोरोनाला हरवायचे असेल तर मुख्य म्हणजे सरकारनेच प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. भारतीयांच्या गुणसूत्रात मंदिर-देव या संकल्पना प्राचीन परंपरेतून आलेल्या आहेत. भीती घालवून श्रद्धा वाढविण्यासाठी त्यांचा उपयोग होऊ शकेल. त्याचे नियमन करणे फार अवघड नाही. येथे आत जाण्यासाठी विशिष्ट वेळ नक्की करता येईल, पास देता येईल, मास्क बंधनकारक असेल, दोन व्यक्तींमध्ये योग्य अंतर ठेवावे लागेल, वॉचमन ठेवता येतील वगैरे. मुख्य म्हणजे बाहेरच्या द्वारात प्रत्येक व्यक्तीला देवाची शपथ देऊनच आत सोडावे लागेल.

प्रतिकारशक्ती ज्या एका गोष्टीने वाढते ती गोष्ट आहे आनंद. आनंद हे परमेश्र्वराचे स्वरूप आहे. परमेश्र्वर प्राणशक्तीच्या रूपाने आपल्याला शक्ती देतो. आनंद टिकवला तरच प्रतिकारशक्ती वाढते. प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी जीवनसत्त्व (व्हिटॅमिन्स), मिनरल्स तसेच च्यवनप्राश हे सहायक ठरतात परंतु नुसते जीवनसत्त्व, च्यवनप्राश सेवन केल्याने प्रतिकारशक्ती वाढत नाही. पतंग उडवायला गच्चीवर जायचे असेल तर शिडी आवश्यक असतेच, परंतु गच्चीवर गेल्यावर पतंग उडवण्याचा आनंद घेणे महत्त्वाचे. हसण्यामुळे किंवा आनंदाच्या भावनेने मेंदूत विशिष्ट रसायन तयार होते व त्यामुळे प्रतिकारशक्ती वाढते. समाजात आनंद देण्याचा, मिळविण्याचा कुठल्याही प्रकारे कोणीही प्रयत्न केला नाही. प्रसारमाध्यमे रात्रंदिवस त्याच त्या बातम्या सांगून लोकांच्या मनात भीती उत्पन्न करत होती. चित्रपटवाल्यांनी हॉरर सिनेमा दाखवून उच्छाद मांडला. पतीला पत्नीवर शंका, पत्नीला पतीवर शंका अशा तऱ्हेची कथानके असलेले चित्रपट व सिरियल्स दाखवून जनमानसात भीती वाढविण्याचे काम होत होते. निखळ करमणूक कोण करत होते, इतरांना आनंद मिळावा यासाठी कोण प्रयत्न करत होते?

जशी मास्क लावण्याची जबाबदारी वैयक्तिक आहे, तसे आनंद कसा वाढवावा हे आपल्यावर अवलंबून आहे. ही कला प्रत्येकाने शिकायला पाहिजे. ज्याला जीवनाचा आनंद लुटायचा आहे त्याला प्रथम आनंद निर्माण करता आला पाहिजे. कुठल्याही गोष्टीचा, कशाचाही आनंद घेता आला पाहिजे. त्या दृष्टीने घरात चर्चा करणे, गोष्टी सांगणे, कॅरम वगैरे सोपे खेळ खेळणे, घरातल्या घरात छोटा कार्यक्रम करणे, ज्योतिध्यान करणे वगैरे गोष्टी करता येतील. असे केले तर प्रतिकारशक्ती वाढेल. हा प्रयोग करणे आवश्यक होते, अजूनही करता येईल. आज भीती परमावधीला पोहोचलेली आहे. भीती घालवायला आपल्याजवळ साधन नाही. तेव्हा हे करून पाहायला काय हरकत आहे? (पूर्वार्ध)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com