हिवाळ्यात त्वचेची काळजी घरच्या घरी, उटणे आणि अभ्यंगाचे खास उपाय

त्वचा हा आरोग्याचा तसेच सौंदर्याचा आरसा असतो असे म्हटले जाते. तेजस्वी व नितळ त्वचा ही व्यक्तिमत्वातही महत्त्वाचे योगदान देत असते.
Skin Care
Skin CareSakal
Summary

त्वचा हा आरोग्याचा तसेच सौंदर्याचा आरसा असतो असे म्हटले जाते. तेजस्वी व नितळ त्वचा ही व्यक्तिमत्वातही महत्त्वाचे योगदान देत असते.

- डॉ. भाग्यश्री झोपे

त्वचा हा आरोग्याचा तसेच सौंदर्याचा आरसा असतो असे म्हटले जाते. तेजस्वी व नितळ त्वचा ही व्यक्तिमत्वातही महत्त्वाचे योगदान देत असते. त्वचा संवेदनशील असते म्हणूनच अचूक स्पर्शज्ञान करून देणारी असते. मात्र हवामानाचा, वातावरणाचा इतकेच नाही तर मानसिकतेचाही परिणाम त्वचेवर होत असतो. "शिशिरः शीतलोऽतीव रुक्षः वाताग्निवर्धनः।' शिशिर ऋतूत हवा फार थंड व कोरडी होते, त्यामुळे वातदोष वाढतो, अग्नी सुद्धा प्रदीप्त होतो. शिवाय हवेतील गारव्यामुळे घाम येण्याचे प्रमाण कमी होते, त्यामुळे त्वचा फुटणे, कोरडी पडणे, खरखरीत होणे ही लक्षणे दिसू लागतात. म्हणून हिवाळ्यात त्वचेची विशेष काळजी घेणे गरजेचे असते. सप्तधातूंपैकी रसधातूचा त्वचेवर मोठा प्रभाव असतो. रसरशीत त्वचा आकर्षक ठरते ती संपन्न रसधातूमुळे. निरोगी, नितळ व सतेज कांतीसाठी रक्तधातू शुद्ध असणे गरजेचे असते आणि त्वचा घट्ट राहावी, अकाली सुरकुत्या पडू नयेत यासाठी मांसधातू जबाबदार असतो. त्यामुळे त्वचेची काळजी घेण्यासाठी रस, रक्त व मांस या तिन्ही धातूंच्या पोषणासाठी प्रयत्न करावे लागतात.

यासाठी सर्वोत्तम व घरच्याघरी करता येणारा उपाय म्हणजे अभ्यंग. रोज रात्री झोपण्यापूर्वी पाच मिनिटे वेळ काढून संपूर्ण अंगाला अभ्यंग तेलासारखे त्वचेला स्निग्धता देणारे, शिवाय त्वचेमार्फत आत जिरून रस, रक्त, मांस या धातूंपर्यंत काम करणारे तेल लावले तर त्वचेला आतून-बाहेरून आवश्‍यक ते सर्व पोषण मिळते, नियमित अभ्यंगाइतकाच दुसरा प्रभावी उपाय म्हणजे उटण्याचा वापर. उटण्यामध्ये अनंतमूळ, ज्येष्ठमध, वाळा, हळद, दारुहळद अशा अनेक उत्तमोत्तम वनस्पतींचे मिश्रण असते, ज्या त्वचेला स्वच्छ तर करतातच, पण त्वचेवरील दोष दूर करण्यासही समर्थ असतात. उटण्याचा अजून एक फायदा म्हणजे यामुळे त्वचेला उचित स्निग्धता मिळते, वातावरणातील कोरडेपणामुळे त्वचा कोरडी होण्यास प्रतिबंध होतो. सॅन मसाज पावडरसारखे उटणे या दृष्टीने उत्तम होय. दीपावलीपासून जर नियमाने अभ्यंग-उटण्याचा वापर चालू ठेवला तर हिवाळ्यात त्वचा अभंग व तेजःपुंज राहते. स्नानानंतर चेहऱ्याला संतुलनचे क्रेम रोझ हे क्रीम लावण्याचाही चांगला उपयोग होतो.

हिवाळ्यात वाढणारा वातदोष संतुलनात येण्यासाठी आहाराचे नियोजन सुद्धा महत्त्वाचे असते. आयुर्वेदानुसार हिवाळ्यात मधुर अर्थातच गोड चवीचे तसेच स्निग्ध गुणाचे अन्न सेवन करण्यावर भर द्यायचा असतो. हिवाळ्यातील थंडीमुळे प्रदीप्त झालेल्या अग्नीला पुरेसे इंधन मिळणे आवश्‍यक असते, त्या दृष्टीनेही आहारात मधुर, स्निग्ध, पौष्टिक पदार्थांचा समावेश असावा लागतो. त्वचेशी संबंधित रसधातू, मांसधातू यांचे पोषण यातून होते. पर्यायाने त्वचाही निरोगी, स्निग्ध राहते. कोरड्या त्वचेमुळे होऊ शकणाऱ्या त्रासांना प्रतिबंध होतो. हिवाळ्यात दूध, लोणी, साजूक तूप, खोबऱ्याची वडी, डिंकाचा लाडू, दुधी हलवा वगैरे पदार्थ आहारात असणे चांगले. हिवाळ्यामध्ये तळपाय विशेषतः टाचांना भेगा पडणे, शरीरात अतिरुक्षता वाढल्याने भेगांमधून रक्त येणे या सुद्धा तक्रारी आढळतात. यावर नियमित पादाभ्यंग उत्तम असतो. त्यातही पादाभ्यंगासाठी शतधौतघृत किंवा औषधांनी युक्त संतुलन पादाभ्यंग घृतासारखे शतधौत घृत वापरण्याचा अजून चांगला गुण येताना दिसतो. तळपायांना कोकमाचे तेल लावणे, फरशीच्या थंडपणापासून संरक्षण करण्याच्या हेतूने पायात मोजे घालणे किंवा घरातही पादत्राणे घालणे हे सुद्धा उपयोगी ठरते. तळपायाच्या तुलनेत तळहाताला भेगा पडण्याचे प्रमाण कमी असते. मात्र, हे सर्व उपाय तळहातालाही करता येतात.

हिवाळ्याचा परिणाम ओठांवरही होतो. ओठ फुटणे, दोन ओठ कडेला मिळतात त्या ठिकाणी बारीकशी चीर जाणे असे त्रास हिवाळ्यात होताना दिसतात. ओठ फुटू नये यासाठी ओठांवर दुधावरची साय लावणे उत्तम असते. ओठांच्या कडेला चीर पडणे हा प्रकार खूप वेदनामय असू शकतो. बोलताना, खाता-पिताना ओठाची हालचाल झाली की त्या ठिकाणी वेदना होतात. यावर घरचे ताजे लोणी किंवा घरचे साजूक तूप लावून ठेवण्याचा फायदा होतो. रात्री झोपण्यापूर्वी नाभीवर २-३ थेंब तूप लावण्यानेही ओठांना चीर जाण्याची प्रवृत्ती कमी होते असा अनुभव आहे. एकंदर त्वचा कोरडी झाली तर त्याचा परिणाम गुदाच्या आसपासच्या त्वचेवरही होतो.

विशेषतः फिशर म्हणजे गुदाला भेगा पडून शौचाच्या वेळेला आग होणे, वेदना होणे असा त्रास होऊ शकतो. यावर गुदभागी व्रणरोपण तेल किंवा सॅन हील मलम सारखे औषधी तुपापासून बनविलेले मलम लावण्याचा उपयोग होतो. हिवाळ्याची सुरुवात झाल्यावर लगेचच रोज रात्री झोपण्यापू्‌र्वी गुदभागी दोन थेंब एरंडेल तेल लावण्यानेही या प्रकारचा त्रास होण्यास प्रतिबंध होतो. हिवाळा हा शरीरशक्ती कमावण्याचा ऋतू असतो. हिवाळ्यात या प्रकारे त्वचेची आतून व बाहेरून काळजी घेतली तर संपूर्ण वर्षभर त्वचा उत्तम राहायला मदत मिळू शकते. सुरकुत्या, निबरता, निस्तेजता ही सर्व म्हातारपणाची लक्षणे समजली जातात, पण आयुर्वेदाप्रमाणे त्वचेची काळजी घेतली तर वाढत्या वयातही त्वचा तरुण व निरोगी राहू शकते. श्रीगुरु डॉ. बालाजी तांबे म्हणतात त्याप्रमाणे तेजस्वी त्वचा हे यशासाठी आवश्यक अंग असते, त्यामुळे आरोग्य आणि सौंदर्याचा आरसा असणाऱ्या त्वचेची हिवाळ्यात निगा राखली तर जीवनाचा आनंद अनुभवता येईल, यशाच्या वाटचालीतील एक पैलू साध्य करता येईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com