esakal | कोविडमध्ये मोनोक्लोनल अँटीबॉडीजची उपयुक्तता
sakal

बोलून बातमी शोधा

Monoclonal Antibodies

कोविडमध्ये मोनोक्लोनल अँटीबॉडीजची उपयुक्तता

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या संशोधनानुसार त्याच्या चाचण्यांमध्ये असे आढळले आहे की ज्या गंभीर रुग्णांनी स्वतःची नैसर्गिक प्रतिपिंडे तयार केली नाहीत, अशा रुग्णांसाठी मोनोक्लोनल अँटीबॉडीजचे मिश्रण उपयोगी आहे. मोनोक्लोनल अँटीबॉडीज उपचाराने मृत्यूदर निश्चितपणे कमी होतो असेही मत ऑक्सफर्ड विद्यापीठाने मत व्यक्त केले आहे.

ब्रिटनमधील चाचण्यांमध्ये गंभीर स्थितीत असलेल्या कोविड-१९च्या काही रूग्णांमध्ये “मोनोक्लोनल अँटीबॉडीजचे” मिश्रण प्रभावी असल्याचे आढळले आहे. मोनोक्लोनल अँटीबॉडी मिश्रण रेगेन-सीओव्ही 2, कोविड-१९ च्या गंभीर रूग्णांवर जीवनरक्षक उपचार असल्याचे आढळले आहे. हे निष्कर्ष भारतातील कोविड-१९ च्या व्यवस्थापनासाठी किती महत्त्वाचे आहेत याचा उहापोह आपण खालील लेखात करणार आहोत.

मोनोक्लोनल अँटीबॉडीज (प्रतिपिंडे) म्हणजे काय?

विषाणूजन्य संसर्गाविरूद्ध लढण्यासाठी, आपले शरीर प्रथिने तयार करतात त्याला प्रतिपिंडे (अँटीबॉडीज) असे म्हणतात. मोनोक्लोनल अँटीबॉडीज ही कृत्रिम प्रतिपिंडे असून ते आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक यंत्रणेची प्रतिकृती असतात. ही प्रतिपिंडे एका प्रक्रियेद्वारे तयार केली जातात, यामध्ये मानवी रक्तातील विशिष्ट प्रतिपिंडे काढणे आणि त्यानंतर क्लोनिंग करणे हे समाविष्ट असते. या मोनोक्लोनल अँटीबॉडीज विषाणू किंवा विषाणूच्या विशिष्ट भागाला लक्ष्य करण्यासाठी तयार केलेले असतात. उदाहरणार्थ, रेगेन-सीओव्ही 2 एसएआरएस- कोव्ही-2 स्पाइक प्रोटीनला लक्ष्य करण्यासाठी विकसित केलेल्या दोन मोनोक्लोनल अँटीबॉडीजचे मिश्रण आहे. मोनोक्लोनल अँटीबॉडीज, कोविड-१९ या विषाणूच्या स्पाइक प्रोटीनच्या विशिष्ट भागाशी बांधल्या जातात, त्यामुळे कोविड-१९ या विषाणूची निरोगी पेशी संक्रमित करण्याची क्षमता अवरोधित होते. कोविड-१९ च्या व्यतिरिक्त या मोनोक्लोनल अँटीबॉडीज कॅन्सर तसेच “एबोला” आणि “एचआयव्ही” च्या उपचारांमध्ये वापरल्या जातात.

मोनोक्लोनल अँटीबॉडीज हा कोविड-१९ मधील उपचारांचा एक महत्त्वपूर्ण आणि आशादायक भाग असताना, वापरात देखील मर्यादा आहेत. आतापर्यंत या उपचारांनी उच्च जोखमीच्या सौम्य ते मध्यम कोविड -१९ त्यांच्या लक्षणे असणाऱ्या गटांमध्ये सर्वाधिक यश मिळविले आहे. गंभीर कोविड -१९ आजारासह रूग्णालयात दाखल झालेल्यांना आणि ज्यांना ऑक्सिजनची आवश्यकता आहे अशा रुग्णांच्या उपचारासाठी मोनोक्लोनल अँटीबॉडीजचा जास्त उपयोग होत नाही, असेही संशोधनाअंती आढळून आले आहे.

मोनोक्लोनल अँटीबॉडीजबद्दल नवीन अभ्यास :

ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या संशोधनानुसार त्याच्या चाचण्यांमध्ये असे आढळले आहे की ज्या गंभीर रुग्णांनी स्वतःची नैसर्गिक प्रतिपिंडे तयार केली नाहीत, अशा रुग्णांसाठी मोनोक्लोनल अँटीबॉडीजचे मिश्रण उपयोगी आहे. मोनोक्लोनल अँटीबॉडीज उपचाराने मृत्यूदर निश्चितपणे कमी होतो. त्याप्रमाणे मोनोक्लोनल अँटीबॉडीजमुळे ज्या रुग्णांमध्ये स्वतःची प्रतिपिंडे तयार झाली नाहीत, अशा रुग्णांचा रुग्णालयातील मुक्काम सुमारे ५ दिवसांनी कमी झाला. त्याचप्रमाणे अशा रुग्णांमध्ये व्हेंटीलेटरची गरज देखील कमी झाली. परंतु ज्या रुग्णांमध्ये नैसर्गिक प्रतिपिंडे तयार झाली आहेत, त्यांना या मोनोक्लोनल अँटीबॉडीजचा फायदा कमी होतो, असेही मत संशोधनाअंती वैज्ञानिकांनी व्यक्त केले आहे. या निष्कर्षांमुळे असे लक्षात येते की, मोनोक्लोनल अँटीबॉडीजचे मिश्रण अशा रुग्णांमध्ये फायदेशीर ठरते की ज्या रुग्णांमध्ये नैसर्गिक रित्या प्रतिपिंडे विकसित झालेली नाहीत, अश्या रुग्णांना गंभीर लक्षणे असली किंवा ते रुग्णालयात दाखल झालेले असले तरी त्यांच्या उपचारांमध्ये या मिश्रणाचा उपयोग केल्यास त्यांना त्याचा फायदा होतो. ही उपचार पद्धती कोविड सौम्य व मध्यम लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी मंजूर केली गेली आहे. ही उपचार पद्धती भारतात उपलब्ध आहे.कोविड -१९ च्या सौम्य व मध्यम लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी, ज्यांना ऑक्सिजनची आवश्यकता नसते आणि ज्यांना गंभीर आजार होण्याचा उच्च धोका असतो अशा रुग्णांमध्ये हे मोनोक्लोनल अँटीबॉडीजचे मिश्रण वापरण्यासाठी एक उत्कृष्ट उपचार पद्धती आहे, असा निष्कर्ष बहुसंख्य वैज्ञानिकांनी मान्य केला आहे. ही उपचार पद्धती महाग आहे. मोनोक्लोनल अँटीबॉडीजच्या दर पॅकचा किंमत सुमारे 1.20 लाख रुपये आहे. एका पॅकमध्ये दोन रूग्णांवर उपचार करता येतात. एका डोसची किंमत रु. ५९,७५०/- एवढी आहे.

मोनोक्लोनल अँटीबॉडीज आणि प्लाझ्मा थेरपी यांची तुलना :

गेल्या महिन्यापासून कोविड -१९ उपचारांच्या मार्गदर्शनातून प्लाझ्मा थेरपीचा वापर बंद केला. गेल्या आठ महिन्यातील चाचण्यांच्या निष्कर्षामधून व संशोधनांमधून असे दिसून आले आहे की प्लाझ्मा थेरपीचा रुग्णांची लक्षणे सुधारण्यामध्ये कोणताही फायदा शक्य नाही. शास्त्रज्ञांनी प्लाझ्मा थेरपीच्या तुलनेत मोनोक्लोनल अँटीबॉडीजच्या उपचार पद्धतीवर अधिक विश्वास व्यक्त केला आहे. प्लाझ्मा थेरपी उपचार पद्धतीमध्ये कोविड -१९ झालेल्या रुग्णांचा प्लाझ्मा काढून दुसऱ्या रुग्णाला त्याची प्रतिपिंडे (अँटीबॉडीज) प्रदान करणे अभिप्रेत आहे. याचा अर्थ असा आहे की कोविड -१९ मधून ही बरे झालेल्या रुग्णाच्या प्लाझ्मामध्ये जी नैसर्गिक प्रतिपिंडे तयार झालेली असतात ती सर्व प्रतिपिंडे दुसऱ्या रुग्णाला देता येतात. परंतु मोनोक्लोनल अँटीबॉडीज म्हणजे एका विशिष्ट प्रतिपिंडाचे उत्पादन प्रतिपिंडे मिश्रणासाठी (अँटीबॉडी कॉकटेलसाठी) वैज्ञानिक अशा दोन किंवा त्यापेक्षा जास्त प्रतिपिंडाचे एकत्रीकरण करतात.

मोनोक्लोनल अँटीबॉडीज याचे उत्पादन प्रयोगशाळेमध्ये केल्यामुळे, त्यांच्या गुणामुळे त्या अत्यंत शुद्ध असतात. कॉन्व्हॅलेसेंट प्लाझ्मा मध्ये अँटीबॉडीज व्यतिरिक्त इतरही गोष्टी असतात, ज्यामुळे एलर्जी आणि इतर दुष्परिणाम होऊ शकतात. कृत्रिम प्रतिपिंडे कोविड-१९ च्या उपचारांचा महत्वाचा भाग आहे. भारतामध्ये ही कृत्रिम प्रतिपिंडे उपलब्ध झालेली असून पुणे, मुंबई, हैद्राबाद, नवी दिल्ली, बेंगलोर, कलकत्ता इ. ठिकाणी यशस्वी वापर झाला आहे. त्याचप्रमाणे अशा रुग्णांचा रुग्णालयात दाखल होण्याचा कालावधी कमी होऊ शकेल आणि त्यांना ऑक्सिजन व रेमडेसिव्हर सारखी औषधे देण्याची जरुरी लागणार नाही. अशा रुग्णांचा मृत्युदर कमी होण्यास या प्रतिपिंडांचा निश्चित उपयोग होईल असे संशोधनाअंती सिद्ध झाले आहे. सर्वसामान्यां साठी मोनोक्लोनल अँटीबॉडीज यांचा वापर झाल्यास देशातील सर्वात मोठी चिंता दूर होईल असे वाटते.

- प्रा. डॉ. गजानन रमाकांत एकबोटे, पुणे M.S., M.N.A.M.S.

loading image