#FamilyDoctor मळमळ होई आत!

डॉ. ह. वि. सरदेसाई
Thursday, 13 September 2018

बहुतेक वेळा मळमळणे हे कोणत्याही गंभीर दुखण्याचे लक्षण नसते, सहसा मळमळण्याचे कारण समजणे कठीण नसते आणि बऱ्याच वेळा मळमळणे आपोआपच बरे होते. आतड्यातून येणाऱ्या संवेदना आणि मेंदूत घडणाऱ्या घटना (विचार, भावना, स्मृती) या मळमळ होण्यास प्रामुख्याने जबाबदार असतात. 

मळमळणे ही एक तक्रार प्रत्येकाला केव्हा ना केव्हा अनुभवण्यास आलेली असते. पोट फुगते, थोडे खाल्ले तरी पोट भरल्याची भावना जाणवते, उलटी येईल असे वाटते आणि ही भावना नकोशी वाटत राहते. अन्न घ्यावे असे वाटत नाही. भूक जाते. पचनसंस्थेत अथवा शरीरात इतरत्र झालेल्या विकाराचासुद्धा हा परिणाम असू शकतो. बहुतेक वेळा मळमळणे हे कोणत्याही गंभीर दुखण्याचे लक्षण नसते, सहसा मळमळण्याचे कारण समजणे कठीण नसते आणि बऱ्याच वेळा मळमळणे आपोआपच बरे होते. आतड्यातून येणाऱ्या संवेदना आणि मेंदूत घडणाऱ्या घटना (विचार, भावना, स्मृती) या मळमळ होण्यास प्रामुख्याने जबाबदार असतात. त्यातल्या त्यात जठराला दाह होणे ही घटना मळमळ होण्याला अनेकदा जबाबदार असते.

जठराच्या अस्तराला झालेल्या विकाराने उलटी होईल, अशी भावना दखलपात्र असते. जठराच्या अस्तराला दाह होण्याच्या कारणांत तळलेले, मसालेदार किंवा तिखट पदार्थांचे सेवन हे अग्रक्रमाने धरले जाते. त्याचबरोबर दारू पिणे आणि अनेक प्रकारच्या औषधांचे सेवन करणे या घटनादेखील मळमळ होण्यास जबाबदार असतात. बहुतेक वेदनाशामक औषधांचे सेवन हे कमी-जास्त प्रमाणात जठराच्या अस्तराचा दाह करतात. त्यात स्टेरॉईडस्‌ (प्रेडणिसोन), ॲस्पिरीन, नॉन स्टेरॉयडल अँटी इन्फ्लॅमेटरी ड्रग्स, आवेचा आजार अमीबायासिस यावर गुणकारी औषध मेट्रोनिडॅझॉल, एरिथ्रोमायसीन नावाचे प्रतिजैविक, अशा अनेक औषधांच्या सेवनाने मळमळ होऊ शकते. शिवाय जठराचे आणि शरीराचे कित्येक आजार मळमळ होण्यास कारणीभूत होऊ शकतात. पेप्टिक अल्सर डिसीझ (गॅस्ट्रिक म्हणजे जठराच्या अस्तराला झालेली जखम किंवा ड्युओडिनल म्हणजे लहान आतड्याच्या सुरवातीला असणाऱ्या भागाच्या अस्तराला झालेली जखम (अथतः सूज)), अन्ननलिकेत जठरातील स्राव उलटून परत येणे (रिप्लेक्‍स इसोफेजायटिस), हॅलिकोबॅक्‍टर पासालोराय जीवाणूंमुळे दाह होणे, विविध जीवाणू आणि विषाणूंमुळे जठराच्या अस्तराचा दाह होणे, एचआयव्ही (एड्‌सचा विषाणू)मुळे शरीरात संसर्ग होणे, कॅंडिडा या बुरशीमुळे अन्ननलिकेच्या अस्तराला दाह होणे या सर्व आजारांत रुग्णाला मळमळते. जठराच्या कॅन्सरची बहुतेक वेळा सुरवात अस्तरापासून होते. त्यामुळे जठराच्या कॅन्सरच्या सुरवातीच्या काळात (वेदना येण्यापूर्वी) किंवा लहान आतड्याच्या कॅन्सरची लागण झाल्यास मळमळ होणे हे प्रामुख्याने लक्षण असते.

जठर व आतडे यांच्यातील अन्न सतत पुढे ढकलले जाते. या हालचालीत झालेल्या विकाराला ‘मोटिलिटी डिसॉर्डर’ म्हणतात. या हालचालीच्या दोषात रुग्णाला मळमळ होणे ही प्रमुख व प्राथमिक तक्रार असते. मधुमेह या सर्वत्र आढळणाऱ्या आजारात ज्ञानतंतूच्या सिरांवर परिणाम होतो. परिणामी जठराची हालचाल मंदावते. एखादे वेळी जठराची हालचाल थांबते. परिणामी पोट फुगू लागते आणि रुग्णाला मळमळते आणि अन्नद्वेष होतो (भूक लागत नाही). मळमळ होणे ही तक्रार आतड्याच्या सुरवातीच्या भागातील आजारांमुळे होते हे सर्वप्रथम समजले जाते. विशेषतः जठराच्या विकारांत मळमळणे ही तक्रार सुरवातीला असते. आतड्याच्या हालचालीत अनेक कारणांनी दोष निर्माण होतो. शरीरात इतरत्र होणारे काही आजार आतड्यातसुद्धा होतात. स्केलोडर्मा या आजारात प्रामुख्याने त्वचा व कोलॅजन पेशीवर परिणाम होतो. त्यामुळे त्वचेचा मृदुपणा जातो व स्थिती-स्थापकत्व कमी-कमी होत जाते. त्वचा आकसू लागते. परिणामी सांधे हलणे कठीण होते. स्लेरोडर्माचा परिणाम अन्ननलिकेच्या अस्तरातील स्नायू व आतड्याच्या आतील स्थितिस्थापकत्वाला जबाबदार असणाऱ्या कोलॅजन पेशींवरही होतो. आपल्या शरीरातील प्रतिकारशक्तीचा एक महत्त्वाचा भाग प्रतिपिंडे निर्माण करणे हा असतो. याला इम्युनिटी म्हणतात. कोणताही परकीय रेणू अथवा व पेशी शरीरात आली तर त्या विरुद्ध प्रतिपिंडे तयार होऊ लागतात.

कधी कधी या इम्युनिटीच्या संस्थेत चूक होते व स्वतःच्या शरीरातील पेशींना चुकून परकीय मानले जाते. अशा वेळी स्वतःच्या शरीरातील पेशींविरुद्ध प्रतिपिंडे तयार होऊ लागतात. याला ‘ऑटो-इम्यून-डिसीज’ असे नाव आहे. आतड्याच्या अस्तरातील स्नायूंच्या विरुद्ध ऑटो-इम्यून डिसीज अनेकदा होतो. त्यामुळे तेथील पेशी अकार्यक्षम होऊ लागतात. पोटावर पूर्वी केलेल्या शस्त्रक्रियेमुळे कधी कधी आतडी चिकटता व आतड्यात अन्न पुढे जाण्यासाठी नवे मार्ग तयार होऊ शकतात. अशा वेळी आतड्याच्या काही भागांतून अन्न पुढे जात नाही. तेथे जीवाणू वाढतात व आतड्याचा दाह होतो. याला ब्लाइंड लुप सिंड्रोम असे म्हणतात. यात झालेल्या जीवाणूंच्या वाढीमुळे सतत मळमळ जाणवत राहते. मळमळ होत राहणाऱ्या रुग्णाला पूर्वी पोटावर (आतड्यावर) शस्त्रक्रिया झाली होती का, ही चौकशी महत्त्वाची असते. लहान आतड्याच्या व पचनसंस्थेच्या वेगवेगळ्या आजारांत रुग्णाला होणाऱ्या त्रासात मळमळणे हा त्रास बहुसंख्य आजारात होऊ शकतो. स्वादुपिंडाचे कार्य नीट न झाल्याने पाचक रसांचा स्राव कमी पडतो, त्याचप्रमाणे ट्रॉपिकल स्प्रू या आजारात अन्नाचे पचन करणारे स्राव ः विकरे (एन्झाइम्स) कमी पडतात. ट्रॉलिमल स्प्रूमध्ये फोलिक ॲसिड या जीवनसत्त्वाचा चांगला फायदा होतो. अशा अपचनाच्या आजारांतदेखील रुग्णाला सतत मळमळ होत असते. आतड्याच्या  इतर अनेक आजारांत मळमळ होते. कोणत्याही एका विशिष्ठ आजाराचे मळमळणे हे लक्षण नसते. आतड्याच्या अभ्रयावर पाणी साचू शकते. त्याला अनेक कारणे असू शकतात. (असायटिस). असे पाणी साचू लागले, की रुग्णाला मळमळू लागते. आतड्याला रक्ताचा पुरवठा पुरेसा न होणे हेदेखील मळमळण्याचे कारण असू शकते. यकृताच्या अनेक विकारांत असे घडू शकते. मळमळ होण्याची अनेक कारण लक्षात घेता, मळमळ टिकून राहिली तर सखोल तपासणीची आवश्‍यकता आहे. अनेक अन्नग्रंथींच्या स्रावातील दोषामुळे मळमळते. शिवाय मायग्रेन नावाच्या डोकेदुखीत मळमळ व उलटी येणे अनेकदा घडते. गर्भधारणेची शक्‍यता योग्य वयात नेहमीच मनात ठेवली पाहिजे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dr. H v sirdesai article