ट्रायजेमिनल न्यूराल्जिया ! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

trigeminal neuralgia

७ ऑक्टोबर हा ‘जागतिक ट्रायजेमिनल न्यूराल्जिया दिवस’ असतो. या आजाराबद्दलचे अज्ञान सर्वत्र आढळते. या आजारात उमटणारी वेदना अत्यंत तीव्र असल्याने या आजाराला ‘आत्महत्या प्रेरक’ आजार असंही नाव पडलं आहे.

ट्रायजेमिनल न्यूराल्जिया !

७ ऑक्टोबर हा ‘जागतिक ट्रायजेमिनल न्यूराल्जिया दिवस’ असतो. या आजाराबद्दलचे अज्ञान सर्वत्र आढळते. या आजारात उमटणारी वेदना अत्यंत तीव्र असल्याने या आजाराला ‘आत्महत्या प्रेरक’ आजार असंही नाव पडलं आहे. कुठलाही जागतिक दिवस हा त्या आजारासंबंधी जनजागृती करण्यासाठी असतो.गेली अठरा वर्ष पुण्यामध्ये या विषयावरच्या संशोधन आणि उपचार केंद्रात आलेल्या अनुभवांच्या आधारावर ७ ऑक्टोबरच्या निमित्ताने या लेखन प्रपंच ! प्रश्न उत्तरांच्या माध्यमातून याविषयी माहिती घेऊया!

या आजाराला ट्रायजेमिनल न्यूराल्जिया असं का म्हणतात?

आपल्या चेहऱ्याच्या प्रत्येक बाजूच्या संवेदना मेंदूपर्यंत नेण्यासाठी डावी व उजवी अशा दोन नसा असतात. त्यांना ट्रायजेमिनल नसा म्हणतात. या नसे पासून उत्पन्न होणारे होणारी वेदना म्हणजेच ट्रायजेमिनल न्युराल्जिया होय.

ट्रायजेमिनल न्यूराल्जियाची लक्षणे काय?

ही वेदना अत्यंत तीव्र असते. ती अचानक एखाद्या करंट सारखी येते आणि काही सेकंद ते काही मिनिटं टिकते. ट्रायजेमिनल नसेच्या विभागात म्हणजेच एका बाजूचं कपाळ गाल व हनुवटी यापैकी एक किंवा अधिक भागात ती विजेसारखी पसरते. वरची किंवा खालची हिरडी, दात, नाक,गाल, कानाच्या पुढचा गालाचा भाग, कपाळ, डोळा, ओठ या भागांपासून सामान्यतः या कळेची सुरुवात होऊन ती चेहऱ्याच्या इतर भागात अत्यंत तीव्र वीज प्रवाहा सारखी पसरते. चेहऱ्याच्या त्या भागातील काही विशिष्ट जागा या वेदने चे "ट्रिगर पॉईंट" असतात. म्हणजे या विशिष्ट जागांना स्पर्श झाला, गार हवेचा झोत लागला, दात घासताना अथवा घास त्या बाजूनी चावताना अन्नाचा स्पर्श झाला, दाढी करताना रेझरचा स्पर्श झाला, तोंड पुसताना टॉवेल लागला, बोलण्यासाठी तोंड उघडण्याची हालचाल झाली किंवा नाकपुडीला बोटाचा जरी स्पर्श झाला तरीही असह्य वेदना सुरू होते.

या आजारात सामान्य सामान्यपणे दिसणारे ट्रिगर पॉइंट कोणते?

डावी किंवा उजवी नाकपुडी, वरचा ओठ, कानाच्या पुढचा उंचवटा, वरची किंवा खालची हिरडी, डोळ्याच्या खालचा गालाचा भाग हे ट्रिगर पॉईंट आहेत. असं असलं तरी चेहऱ्याच्या अथवा हिरडी च्या कोणत्याही भागातून या वेदनेची सुरुवात होऊ शकते.

रुग्ण या वेदनेचे वर्णन कसे करतात?

अचानक तीव्र इलेक्ट्रिक करंट प्रमाणे.-चेहऱ्याच्या एका बाजूला चारशे वोल्ट चा शॉक बसल्याप्रमाणे, चेहऱ्याच्या त्या भागात एखादी धारदार सुरी खुपसल्या प्रमाणे, असंख्य अणकुचीदार सुया त्या भागात एकाच वेळी टोचल्याप्रमाणे याचे वर्णन केले जाते. या आजाराबद्दल समाजात कमी माहिती असल्यामुळे रुग्णाचे नातेवाईक पूर्णपणे गोंधळून जातात.ही वेदना अचानक सुरू होताच रुग्ण अचानक स्तब्ध होतो.त्याचा चेहरा अत्यंत तीव्र दुखण्याने पिळवटलेला दिसतो. दुखणारा भाग रुग्ण हाताने किंवा कपड्याने झाकून घेतो.चेहऱ्याची कुठलीही हालचाल किंवा बोलणं अजिबात होणार नाही याची काळजी घेतो. कधीकधी या वेदनेमुळे अत्यंत दुःखाने विव्हळण्याचा सुद्धा आवाज रुग्ण करतो. कळ जशी ओसरेल तसा रुग्ण चेहरा पुन्हा रिलॅक्स करतो व हळूहळू बोलू लागतो. या वेदनेची तीव्रता इतकी असते की बघणाऱ्याच्या सुद्धा डोळ्यात पाणी येतं.

ट्रायजेमिनल न्यूराल्जियाने त्रस्त असलेल्या रुग्णांच्या व्यक्तिमत्त्वात व सामाजिक वर्तणुकीत कसे बदल होत जातात?

वेदना सुरू असताना अत्यंत तीव्र दुःख सहन केल्यामुळे विव्हळणे वगळता, या रुग्णांच्या व्यक्तिमत्वात व वागण्यात सुद्धा बदल होत जातात. रुग्ण थंड हवेत पंख्याखाली किंवा एअर कंडिशन च्या झोतात बसणं टाळतात. चेहऱ्यावर गार हवा लागू नये म्हणून प्रवास करताना खिडकीजवळ बसणं टाळतात. सामाजिक समारंभ भाषण सार्वजनिक भोजनाचे प्रसंग अशा गोष्टी हे रुग्ण टाळायला लागतात. रोजच्या रोज तोंड धुणे, दात घासणे, दाढी करणे या गोष्टीसुद्धा टाळायला लागतात कारण या सर्वांमुळे तीव्र वेदनेची सुरुवात होते हे त्यांना माहीत असतं.

आजाराचं कारण आणि हा आजार मुळापासून व कायमचा बरा करता येण्याची क्षमता असलेला उपाय कोणता?

या आजारावर आत्तापर्यंत अनेक प्रकारचे उपाय करण्यात आलेले आहेत. नसा आणि मेंदू बधिर करणार्‍या औषधांपासून ते लाल मिरचीची पावडर चेहऱ्याला चोळणे, दुखणाऱ्या बाजूला चेहऱ्यावर डाग घेणे, दुखणाऱ्या नसेचा भाग रेडिओ फ्रिक्वेन्सी किंवा रेडिएशन देऊन जाळणे अशा अनेक प्रकारच्या उपाय योजना पूर्वी आणि आताही यावर केल्या जातात. हे उपचार आजाराच्या मूळ कारणावर उपचार करत नाहीत.

हा आजार मुळापासून दूर करायचा असेल आणि या तात्पुरत्या उपाययोजनांच्या चक्रातून बाहेर पडायचं असेल तर काय?

या रुग्णांमध्ये ट्रायजेमिनल नसे जवळ जी रक्तवाहिनी असते, तिच्या विशिष्ट रचनेमुळे ती या नसेमध्ये खोलवर रुतत जाते. जसे दिवस जातील तशी या रक्तवाहिनी ची लांबी वाढत गेल्यामुळे ही रक्तवाहिनी दुमडून अधिकच खोलवर नसेमध्ये घुसते. या रक्तवाहिनीच्या स्पंदना मुळे या कळा येऊ लागतात.त्यामुळे हळूहळू या आजाराची तीव्रता वाढत जाते. औषधांची मात्रा वाढत जाते. विस्मरण, तोल जाणे, ग्लानी येणे, डोकं बधीर होणे अशा प्रकारचे औषधांचे दुष्परिणाम वाढत जातात. एका बाजूला वेदना तर दुसऱ्या बाजूला औषधांचे दुष्परिणाम यात रुग्ण सापडतो.MVD अर्थात -मायक्रो व्हॅस्क्यूलर डीकॉम्प्रेशन या शस्त्रक्रियेत हा आजार मुळापासून बरा करण्याची क्षमता आहे. या शस्त्रक्रियेत न्यूरो मायक्रोस्कोपच्या प्रखर झोतात आणि न्यूरोएंडोस्कोप च्या मदतीने ही रक्तवाहिनी मेंदू व नसे पासून नाजूकपणे दूर करण्यात येते. रक्तवाहिनी व नसेमध्ये आम्ही टेफ्लोन स्पंज अशा रीतीने ठेवतो की रक्तवाहिनी पुन्हा त्या नसे मध्ये घुसणार नाही आणि रक्तवाहिनी ची स्पंदनं नसेवर परत आपटणार नाहीत.

टॅग्स :Family Doctorhealth