तुम्हीही असू शकता स्थूल!

तुम्हीही असू शकता स्थूल!

आपण काही स्थूल नाही, असे आपणच ठरवतो. त्यासाठी दुसऱ्याशी तुलना करतो. पण हे काही खरे नसते. आपली स्थूलता दुसऱ्याशी तुलना करून ठरत नसते. ती स्थूलत्व मोजून ठरवायची असते. आपले स्थूलत्व मोजा, कदाचित आपणही असू शकता स्थूल.

लठ्ठपणा म्हणजे शरीरात अतिप्रमाणात चरबीचा साठा होणे. अतिलठ्ठपणा (ओबेसिटी) हा वैद्यकीयशास्त्राने अत्यंत गंभीर आजार म्हणून घोषित केलेला आहे. दुर्दैवाने तरीसुद्धा या विषयाकडे फारसे गांभीर्याने बघितले जात नाही. आजच्या स्पर्धात्मक युगात शारीरिक व मानसिक फिटनेस ही अत्यावश्यक बाब बनलेली आहे. हा नियम स्त्री-पुरुषांमध्ये समान पद्धतीने लागू आहे. वैयत्तिक, व्यावसायिक व सामाजिक पातळीवर काम करीत असताना जाडजूड असणे किंवा बेढब असणे याचा थेट संबंध त्यांच्या कार्यक्षमतेशी जोडला जातो.  

अतिवजन हे केवळ शरीराच्या वजनाचे ओझे नसते, तो एक ॲक्टिव्ह एंडोक्रिन ऑर्गन आहे. त्यातून विविध हार्मोन्स, एन्झायम्स यांचा असमतोल निर्माण होतो. लठ्ठपणामुळे शरीरात शंभरपेक्षा जास्त गंभीर आजार होऊ शकतात, हे आपल्याला माहित आहे का? आज प्रत्येक तीन व्यक्तींमागे एकजण लठ्ठ आढळतो. चाळीसपेक्षा कमी वयोगटामध्ये हृदयविकार असणाऱ्या लठ्ठ व्यक्ती भारतामध्ये सर्वाधिक प्रमाणात आढळतात. 

जागतिक आरोग्य संघटनेच्या सर्वेक्षणानुसार लठ्ठपणा व मधुमेह यामुळे निर्माण होणाऱ्या परिणामांचा सर्वात जास्त धोका असणाऱ्या देशांमध्ये भारताचा क्रमांक अतिशय वरचा लागतो. भारतात संसर्गजन्य रोगांमुळे होणाऱ्या मृत्यूपेक्षा असंसर्गजन्य रोगांमुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण जास्त आहे. मृत्यूच्या कारणांमुळे साठ टक्क्यांपेक्षा जास्त वाटा मधुमेह व इतर असंसर्गजन्य आजारांचा आहे आणि स्थूलत्व ही असंसर्गजन्य आजारांची जननी आहे.

लठ्ठपणा कसा मोजावा? 
आपण सडपातळ आहोत की स्थूल आहोत? स्थूल, लठ्ठ की अतिलठ्ठ आहोत? जर लठ्ठ किंवा अतिलठ्ठ असलो तर आपण आरशात पाहिल्यावरही ते नजरेस भरेल. पण एखादी व्यक्ती वरवर पाहता सडपातळ वाटली, तिचा आहार आपल्याला बेताचा वाटला तरी प्रत्यक्षात ती स्थूलही असू शकते. त्यामुळे नजरेने पाहून प्रत्येक वेळी स्थूलता निश्चित करता येत नाही. त्यासाठी आवश्यक मोजमापे घेणेच योग्य होईल. लठ्ठपणा मोजण्यासाठी विविध पद्धती उपलब्ध आहेत. 

१. बॉडी मास इंडेक्स (बीएमआय) 
लठ्ठपणा मोजण्याचे सर्वात सोपे एकक हे आहे.
बीएमआय = वजन (किलोमध्ये) / उंचीचा वर्ग (मीटरमध्ये) 
२. कंबरेचा घेर - 
पुरुषांमध्ये ९० सेंटिमीटरपेक्षा जास्त आणि स्त्रियांमध्ये ८० सेंटिमीटरपेक्षा जास्त कंबरेचा घेर असेल तर त्या व्यक्तीस लठ्ठपणाचा आजार आहे असे समजावे. त्यानुसार इतर आजारांसाठी तपासणी केली जावी. 

लठ्ठपणाचे वर्गीकरण- 
जागतिक आरोग्य संघटनेने आशियाई व भारतीय लोकांसाठी बीएमआयनुसार लठ्ठपणाचे वर्गीकरण पुढीलप्रमाणे केलेले आहे  -
बीएमआय     <     18.5 = आवश्यकतेहून कमी वजन 
                      18.5 – 22.9 = सर्वसाधारण वजन
                      23 – 24.9 = आवश्यकतेहून अधिक वजन 

              >     25 – 27.5 = प्रथम श्रेणीतील लठ्ठपणा   
                    27.5 – 32.5 = द्वितीय श्रेणीतील लठ्ठपणा   
                    32.5 – 37.5 = तृतीय श्रेणीतील लठ्ठपणा   

              >     37.5 = अत्यंत गंभीर स्वरूपातील लठ्ठपणा

जसजसा लठ्ठपणाचा दर्जा किंवा प्रमाण वाढत जाते, तसतशी शरीराची तंदुरुस्ती कमी होते. बोजा वाढतो व कार्यक्षमता, प्रतिकारकशक्ती वेगाने ढासळत जाते. त्यामुळे लठ्ठपणा आपल्यासोबत अपंगत्व घेऊन येते.
 
लठ्ठपणामुळे होणाऱ्या व्याधी 
यात प्रामुख्याने दोन गोष्टी समाविष्ट होतात. 
१. यांत्रिकी पद्धतीचे (मेकॅनिकल) आजार - शरीराच्या अतिवजनाचा भार अवयवांवर पडतो आणि त्याचे दुष्परिणाम होतात.
  अवेळी किंवा कमी वयात सांध्याची झीज होणे, अतिवजनामुळे गुडघेदुखी, पायामधे अत्यंत वेदना होणे. 
  पाठीच्या मणक्यावर येणारा ताण व पाठीचा मणका वेडावाकडा होणे. 
  व्हेरिकोज व्हेन्सचा त्रास. म्हणजे पायावरच्या शिरा फुगणे किंवा हिरव्या निळ्या होणे. 
  वाढत्या पोटाच्या दाबामुळे विविध प्रकारचे हॅर्निया तयार होणे. 
  वाढलेल्या पोटामुळे श्वसनाला अडथळा होणे, हलक्या श्रमानेसुद्धा दम लागणे, बसल्या जागी दम लागणे. 
  वाढत्या पोटामुळे लघवीचे नियंत्रण निघून जाणे, मळमळ होणे, ॲसिडिटी, झोपल्यानंतर अन्न वर येणे, घोरण्याचा आजार, शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होऊन श्वास बंद पडण्याचा धोका असतो.
  वाढत्या वजनाचा हृदयावर अतिरिक्त ताण निर्माण होऊन हृदयविकार होण्याचे प्रमाण लठ्ठ लोकांमध्ये १५ ते २०टक्के जास्त दिसून येते.

२. चयापचयाचे (मेटाबोलिक आजार)  - चरवीमधून बाहेर पडणाऱ्या रासायनिक द्रव्यांमुळे शरीरात काही आजार निर्माण होतात. 
  उच्च रक्तदाब 
  टाइप २  मधुमेह 
  कोलेस्टेरॉलचे आजार 
  रक्तवाहिन्या आतून जाड होणे, अरुंद होणे. पायात रक्तवाहिन्यांमध्ये गुठळ्या होणे व विविध अवयवांचा बंद पडण्याचा धोका असतो. यातूनच हृदयविकार, मूत्रपिंड निकामी होण्याचा धोका, नपुंसकत्व होणे, वंध्यत्व येणे असे विविध आजार होऊ शकतात. 
  शरीरातील सेक्स हार्मोन्सचे प्रमाण विषम किंवा असंतुलित झाल्यामुळे प्रजनन क्षमता नष्ट होणे, नपुंसकत्व येणे ही गोष्ट स्त्री-पुरुषांमध्ये दिसून येते. शुक्रजंतूंची वाढ न होणे, शुक्रजंतूंच्या हालचाली मंदावणे, मुलांच्या छातीचा आकार मोठा होणे तर, मुलींमध्ये पाळी अनियमित होणे, दाढी-मिशा येणे इत्यादि प्राथमिक लक्षणे दिसतात. 
  थायरॉईडसारखे आजार लठ्ठपणामुळे उद्भवू शकतात.

पौगंडावस्थेतील लठ्ठपणा  
ही एक गंभीर व वाढत चाललेली समस्या आहे. भारताचा त्यात अव्वल क्रमांक लागतो. भारतात आजारांवर होणाऱ्या खर्चातील साठ टक्क्यांहून जास्त खर्च हा लठ्ठपणावर व त्यातून निर्माण होणाऱ्या शेकडो आजारांवर खर्च होत आहे. स्थूलत्व ही फक्त बदलत्या जीवनशैलीशी निगडित समस्या नाही व फक्त ‘साइझ व शेप’ या पलीकडे जाऊन त्याचा विचार करण्याची गरज आहे. कारण वाढत्या लठ्ठपणामुळे अनेक व्याधी व अकाली मृत्यू ओढवले जातात हे एक वैज्ञानिक सत्य आहे.  

सर्वसाधारणपणे जी मुले वयाच्या पाच-दहा वर्षांमध्ये लठ्ठ होतात, ती पुढे कुमारवयात आणि पौगंडावस्थेमध्येही लठ्ठच राहतात. गुबगुबीत मान, गुबगुबीत गाल, सुटलेले पोट, सहजासहजी खाली वाकता न येणे, दिवसेंदिवस वाढत जाणारा पोटाचा घेर ही या आजाराची बाह्य लक्षणे आहेत. ज्या घरामध्ये आई-वडील किंवा पालक लठ्ठ असतात, त्या घरांमध्ये हे प्रमाण लक्षणीयरीत्या जास्त आढळते. यामध्ये आनुवंशिकतेचा काहीसा भाग असला, तरी प्रामुख्याने खाण्यापिण्याच्या सर्वसाधारण सवयी हा एक मोठा घटक कारणीभूत असतो. 

  अवास्तव भूक लागणे.
  सतत खा-खा होणे. 
  मांडीवर, जांघेत, मानेवर काळपटपण येणे. 
  चिडचिडेपणा वाढणे. 
  चामखीळ नव्याने येण्यास सुरुवात होणे.


ही काही सर्वसाधारण लक्षणे ग्रंथींमध्ये काहीतरी बिघाड झाला आहे हे दाखवतात. लठ्ठ मुलींमध्ये वयाच्या आधीच अगदी नवव्या-दहाव्या वर्षी पाळी सुरू होणे, नको त्या ठिकाणी अनावश्यक केसांची वाढ होणे, पाळी अनियमित येणे, योग्य बीजांडे निर्माण न होणे ही लक्षणे दिसतात. 

या वयोगटातील मुलांमधील संप्रेरकांचे (हार्मोन्स) संतुलन बिघडते. मुलांच्या पोषणावर (न्युट्रीशन) परिणाम होतो व चयापचय (मेटॅबोलिसम)सुद्धा बिघडते. तपासणीच्या वेळी हे आजार आढळून येतात. या आजारांना ‘ओबेसिटी कॉम्प्लेक्स’ म्हणून ओळखले जाते. 

अशा वेळी फक्त आहार व व्यायाम याद्वारे केलेल्या उपचारांचा उपयोग होत नाही किंवा काही उपयोग होतांना सुरूवातीचे काही दिवसे दिसले तरी त्याचा परिणाम टिकत नाही. अशा वेळी काही औषोधोपचार व काही शस्त्रक्रिया करून आपण रुग्णाला या अनेक आजरांपासून बाहेर काढू शकतो किंवा आजार संपूर्ण टाळू शकतो. 

योग्य वेळी योग्य उपचार करणे याला आरोग्यामध्ये असाधारण महत्त्व आहे. स्वादुपिंडावरील इन्सुलिन तयार करण्याच्या क्षमतेवरचा ताण व सेक्स ऑर्गन्सवर या वयामध्ये पडणारा ताण हे जर दूर केले नाहीत तर तरुणपणीच या मुलांना आरोग्याच्या अनेक प्रश्नांना तोंड द्यावे लागते. तसेच आत्मविश्वास गमावण्याची भीती असते. त्यामुळे योग्य वेळेत योग्य तज्ज्ञांकडून उपचार करून घेणे महत्त्वाचे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com