रक्तदाबावर नियंत्रण... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Blood Pressure
रक्तदाबावर नियंत्रण...

रक्तदाबावर नियंत्रण...

- डॉ. मालविका तांबे

जीवनशैली व आरोग्य या एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. गेल्या काही दशकांमध्ये बदललेल्या जीवनशैलीमुळे एकंदर आरोग्याची पातळी खालावत आहे, असे मोठ्या प्रमाणावर निदर्शनास येत आहे. जीवनशैलीतील चुकांमुळे अग्नीचे विकार – मेटाबॉलिक डिसऑर्डर – शरीरातील चयापचय क्रियेमध्ये बिघाड होण्याचे प्रमाण वाढलेले दिसते. सध्या उच्च रक्तदाब हा आजार तर फारच बळावलेला आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अंदाजानुसार २०२५पर्यंत एकूण लोकसंख्येच्या ३० टक्के लोक या आजाराने ग्रासलेले असतील. आधीच्या काळात वयाच्या पन्नाशी-साठीनंतर उद्भवणारा हा त्रास आज पंचविशी-तिशीत आढळत आहे. खरे म्हणजे उच्च रक्तदाब हा आजार नसून इतर बऱ्याच आजारांचे मूळ वा कारण आहे असे म्हणायला हरकत नाही. आयुर्वेदाच्या ग्रंथांमध्ये या संकल्पनेशी जुळणारा व्याधी आपल्याला सापडत नाही. पण तरी आयुर्वेदाच्या दृष्टीने विचार केला तर रक्तदाब हा वातप्रधान त्रिदोषज आजार आहे. रक्तदाब हा विकार व्यानवायू, प्राणवायू, हृदय, रसधातू, रक्तधातू, रक्तवाहिन्या, प्राणवहस्रोतस, उदकवहस्रोतस इत्यादी अनेक दोष- धातू-स्रोतसांशी संबंधित असल्यामुळे यातून अनेक प्रकारचे त्रास उद्भवताना दिसतात. शिवाय, वातव्याधीचा मनाशी जवळचा संबंध असतोच. उच्च रक्तदाब हा कायिक- मनोविकार (सायकोसोमॅटिक) असतो. आधुनिक शास्त्राने उच्च रक्तदाब हा विकार हृदय, मस्तक, वृक्क यांच्यासाठी खूप धोकादायक सांगितलेला आहे.

उच्च रक्तदाबामुळे हृदयावर येणारा ताण कमी करण्याच्या दृष्टीने बरीच औषधे आज उपलब्ध आहेत. केवळ औषधे घेऊन रक्तदाब उतरवल्यास त्यातून अन्य विविध त्रास सुरू होतात असे पाहण्यात येते. या औषधांचे दुष्परिणामही होताना दिसतात. त्यामुळे उच्च रक्तदाब या विकारावर उपचार करत असताना सर्वांगीण उपचार पद्धतीचा (होलिस्टिक ट्रीटमेंटचा) विचार करणे अत्यंत आवश्यक आहे. पचनशक्तीचा विचार न करता अति प्रमाणात खाणे, अति प्रमाणात मीठ खाणे, पचायला जड पदार्थांचे सेवन, तळलेल्या पदार्थांचे अति प्रमाणात सेवन, जंक फूडचे अति सेवन, जेवणाच्या वेळा न पाळणे, दिनचर्येचे नियम न पाळणे, दुपारी झोपणे, बैठी जीवनशैली, कामाचा वा एकूण जीवनात ताण असणे, असलेला ताण कमी करण्याच्या निमित्ताने मद्यपान वा धूम्रपान ही कारणे उच्च रक्तदाबाला आमंत्रित करण्यात महत्त्वाची ठरतात. उच्च रक्तदाबापासून लांब राहायचे असेल तर ही सर्व कारणे टाळणेच योग्य ठरते. वारंवार डोके जड होणे-दुखणे, डोळे जड होणे, चक्कर आल्यासारखे वाटणे, अकारण चिडचिड होणे, झोप न लागणे, चालताना किंवा जिने चढताना दम लागणे, छातीत धडधड होणे, कानामध्ये सुन्नपणा जाणवणे वगैरे लक्षणे रक्तदाब वाढला की दिसायला लागतात. अशी लक्षणे दिसू लागल्यास घरच्या घरी वेळोवेळी रक्तदाब तपासून त्याची नोंद ठेवणे योग्य ठरते. अशा प्रकारे नोंद ठेवल्यास उपचाराची कितपत गरज आहे हे कळू शकते. उपरोक्त लक्षणे दिसत असली वा रक्तदाबाचा त्रास भविष्यात होऊ नये म्हणून दिनचर्येतील काही गोष्टी कटाक्षाने पाळणे श्रेयस्कर ठरते.

 • रोज नियमाने आपल्या प्रकृतीनुसार ७-८ तास झोप नक्की घ्यावी. सकाळी सहा- साडेसहाला उठून प्राणायाम करावा, त्यामुळे श्र्वासाच्या गतीवर नियंत्रण यायला मदत होते.

 • आठवड्यातून किमान २-३ वेळा संतुलन अभ्यंग तीळ सिद्ध तेलासारख्या तेलाने संपूर्ण शरीराला मसाज करावा. यामुळे शरीरात आलेले काठिण्य कमी होऊन, रक्तदाब तसेच ताण-तणाव कमी व्हायला मदत मिळते.

 • रोज रात्री झोपताना छातीवर संतुलन अभ्यंग तीळ सिद्ध तेलासारखे तेल लावावे.

 • रोज रात्री झोपताना नाकात नस्यसॅन घृत किंवा साजूक तुपाचे ३-४ थेंब टाकावे.

 • झोपण्याआधी श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे यांचे स्वास्थ्यसंगीत ऐकावे, योगनिद्रा संगीत ऐकावे.

 • रोज कमीत कमी ३० मिनिटे चालायला जावे.

 • पोहणे, सायकल चालवणे, जॉगिंग करणे वगैरे व्यायामप्रकार करण्याचीही मदत होऊ शकते.

 • ‘संतुलन क्रियायोगा’चा सराव करावा.

 • होता होईल तो मांसाहार टाळावा.

 • तळलेले पदार्थ खाणे, जेवताना वरून मीठ टाकणे या गोष्टी कटाक्षाने टाळाव्यात.

 • धूम्रपान, मद्यपान आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करावा.

 • रोज पोट साफ होण्याकडे लक्ष द्यावे.

 • ताण असल्यास तो कमी करण्याकरता प्रयत्न करावा, यासाठी एखादा छंद जोपासावा, मित्रमंडळींशी गप्पा माराव्या, सतत मोबाइल वा संगणकावर काम करण्याऐवजी थोडा वेळ मोकळ्या हवेत फिरायला जावे, गच्चीवर बसून आवडत्या संगीताचा आनंद घ्यावा.

 • दिनक्रमात ध्यानाचा समावेश करणे उत्तम.

 • हृदयाच्या कार्याला व रक्ताभिसरणाला मदत होण्यासाठी आत्मप्राश, सुहृदप्राशसारखे एखादे रसायन घेणे योग्य ठरते.

 • हृद्य वनस्पतीचा क्षीरपाक घेणे उत्तम. आयुर्वेदात अर्जुन या वनस्पतीचा क्षीरपाक घेण्यास सुचविले आहे.

 • घराण्यात उच्च रक्तदाबाचा इतिहास असल्यास किंवा उच्च रक्तदाबाची स्वतःला चाहूल लागल्यास शास्त्रोक्त पंचकर्म करून घेण्याचा तसेच त्यानंतर हृदबस्ती सारखा विशेष उपचार करून घेण्याचा उपयोग होतो असा अनेकांचा अनुभव आहे.

थोडक्यात, उच्च रक्तदाब या विकारापासून लांब राहायचे असले तर किंवा त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी संतुलित जीवनशैली, योग्य आहार, दिनचर्या, योगासने, चालणे, प्राणायाम, स्वास्थसंगीत ऐकणे, पंचकर्म या सर्वांचे जमेल तसे पालन करण्याचा निश्र्चय या १७ मे रोजी जागतिक रक्तदाब दिनाच्या निमित्ताने करू या.

Web Title: Dr Malvika Tambe Writes Control On Blood Pressure

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top