व्यायामाचे महत्त्व...

सिक्स पॅक्स ॲब, घामाने निथळेपर्यंत जिम, हठयोगाच्या जागी हॉट योगा, मिनी वर्क आउट्स, एरोबिक्स, वेलनेस इन्थुझियास्ट, हे शब्द आजच्या जगात सर्रासपण वापरले जाताना दिसतात.
Exercise
ExerciseSakal
Summary

सिक्स पॅक्स ॲब, घामाने निथळेपर्यंत जिम, हठयोगाच्या जागी हॉट योगा, मिनी वर्क आउट्स, एरोबिक्स, वेलनेस इन्थुझियास्ट, हे शब्द आजच्या जगात सर्रासपण वापरले जाताना दिसतात.

- डॉ. मालविका तांबे

सिक्स पॅक्स ॲब, घामाने निथळेपर्यंत जिम, हठयोगाच्या जागी हॉट योगा, मिनी वर्क आउट्स, एरोबिक्स, वेलनेस इन्थुझियास्ट, हे शब्द आजच्या जगात सर्रासपण वापरले जाताना दिसतात. नवीन वर्षाच्या सुरुवीला तर फिटनेस गोल्सचा जणू उतच येतो. मॅराथॉनचे पर्व पण वर्षभर चालूच असते. व्यायाम करणे स्वाथ्याच्या दृष्टीने खूप गरजेचे असते असे आयुर्वेदाचे मत आहे. व्यायामाने पचन सुधारते, शरीराची ताकद वाढते, चपळपणा येतो, आळस दूर होतो, सहनशक्ती वाढते, व्याधिक्षमत्व वाढते, स्थौल्य कमी होते, व्यायाम करणाऱ्याला, थंडी, गरमी, तहान, थकवा आदींचा त्रास होत नाही. व्यायामाचा परिभाषा करताना आयुर्वेदात असा श्र्लोक आहे, ‘शरीरचेष्टा या चेष्टा स्थैर्यार्था बलवर्धिनी । देहव्यायामसंख्याता मात्रया तां समाचरेत् ।।’ शरीराला स्थैर्य मिळण्याकरता, बलवर्धन होण्याकरता जे प्रयत्न केले जातात त्याला व्यायाम म्हटले जाते. व्यायाम नेहमीच योग्य प्रमाणात करायला पाहिजे. व्यायामाने कफदोष कमी होतो तसेच वातदोष वाढतो. सकाळचा काळ कफाचा, दुपारचा पित्ताचा तर संध्याकाळचा वाताचा असतो. कफाच्या काळात केलेला व्यायाम योग्य ठरतो, पित्ताच्या काळात केलेला व्यायाम पित्त वाढवतो आणि वाताच्या काळात केलेला व्यायाम वातवृद्धीस कारण ठरतो. वाताचे असंतुलन बऱ्याच वेळा व्याधींना आमंत्रण देणारे ठरते. वातामुळे आपण संध्याकाळी ॲक्टिव्ह असतो, त्यामुळे अनेक जण संध्याकाळी व्यायाम वा जिम करतात, परंतु असे करणे शरीराच्या चयापचयक्रियेच्या विरुद्ध असते हे वेगळे सांगायची गरज नाही.

व्यायामाचे प्रमाण व्यायाम किती प्रमाणात करावा यालाही महत्त्व दिलेले आढळते. व्यायामाचे प्रमाण व्यक्तीचे शारीरिक, मानसिक प्रकृती, शारीरिक बल, ऋतू, वय, कामाचा प्रकार, झोपेच्या वेळा, आयुष्यात असलेले ताण-तणाव वगैरे अनेक गोष्टींवर अवलंबून असते. व्यायामाचे प्रमाण खरे तर महत्त्वाचा भाग आहे, परंतु ते ठरविणे अवघड असते. म्हणून आयुर्वेदाने सोप्या शब्दांत सांगितलेले आहे, व्यायाम नेहमी अर्धशक्ती करावा. अर्धशक्ती कशी ओळखावी? व्यायाम करताना जेव्हा श्र्वास छातीतून घ्यावा लागतो आहे असे जाणवते तेव्हा अर्धशक्ती व्यायाम झाला आहे असे समजून थांबणे योग्य ठरते. याचाच अर्थ पूर्ण थकेपर्यंत व्यायाम करायचा नसतो. सध्याची तरुण पिढी बायसेप्स, सिक्स पॅक्सच्या मागे पळताना स्वतःकडून अवाजवी अपेक्षा ठेवताना दिसते. क्लिनिकमध्ये वातप्रकृतीचा बारीक, सडसडीत शरीरयष्टीचा पंचविशीचा तरुण येतो व म्हणतो जिममध्ये व्यायाम केल्यावर मला फार थकायला होते, पण मला देहयष्टी चांगली हवी आहे.

मला ताकद, वजन व मसल्स वाढण्यासाठी औषधे द्या डॉक्टर. अशा वेळी त्याला कोणत्या शब्दांत समजवावे हे कळत नाही. कारण औषधे घेऊन तब्येतीत सुधारणा करू शकतो, परंतु मूळची प्रकृती पूर्णपणे बदलता येत नाही, असे सांगणे त्यांना मान्य होत नाही. त्यामुळे अनेकदा रासायनिक पूरकद्रव्ये चालू करण्यात येतात असे दिसते. अशी पूरकद्रव्ये की कधी तरी शरीराकडून स्वीकारली जात नाहीत, त्यांचे पचन होत नाही व त्यामुळे त्रासही होताना दिसतो. शाकाहारी व्यक्तीला जिमची आवड लागली की त्याला ८ - १० अंडी रोज खाण्याचा सल्ला दिला जातो. ज्याच्या आतड्यांना मांसाहार पचविण्याची सवय नसते त्याने अचानक असा मांसाहार सुरू केल्यास पचन व पित्ताच्या तक्रारी उद्भवतात. अशा तक्रारी घेऊन बऱ्याच व्यक्ती कार्ल्याच्या दवाखान्यात येतात. व्यायाम करताना आपण जे श्रम करणार आहोत ते आपल्याला झेपणार आहेत का याचाही विचार करणे आवश्यक असते. क्षमतेच्या बाहेर जाऊन काहीही काम केल्यास नुकसानच होते असे आपल्या शास्त्रांमध्ये सांगितलेले आहे, ते कायम लक्षात ठेवायलाच पाहिजे. चाळिशीच्या जवळपास असणाऱ्या फिटनेस इंथुझियास्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मंडळींना कार्डियाक अरेस्ट आल्याच्या बातम्या ऐकण्यात येतात. आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये हृदयरोगाचे कारणांमध्ये प्रथम उल्लेख अतिव्यायाम असा दिलेला आहे. तेव्हा अकाली कार्डियाक अरेस्ट आलेल्यांमध्ये असे कारण असण्याची शक्यता आहे का हे पडताळून पाहणे आवश्यक ठरते. व्यायाम करणे स्वास्थ्यासाठी खूप गरजेचे असले तरी व्यायाम कसा, कधी, कोणता व किती प्रमाणात करावा याकडेही लक्ष देणे तेवढेच आवश्यक असते. व्यायामाच्या प्रकारांतील योगासन व प्राणायामाला प्राथमिकता देणे चांगले. बाकीचे प्रकार आपली प्रकृती, वय वगैरेंचा विचार करून ठरवावे.

व्यायामाचे नियम पुढीलप्रमाणे

१. व्यायाम सकाळच्या वेळीच केला पाहिजे.

२. रिकाम्या पोटी व्यायाम करणे उत्तम.

३. खाल्ल्यानंतर लगेच व्यायाम करू नये.

४. उन्हाळ्यात व्यायामाचे प्रमाण कमी असावे, तर थंडीमध्ये व्यायामाचे प्रमाण वाढवलेले चालते.

५. व्यायाम करण्याआधी शरीराला तेल लावणे उत्तम.

६. झोप झाली नसल्यास, थकवा वाटत असल्यास, आजारी असल्यास, दीर्घ आजारानंतर लगेच, रक्तस्राव वा मूत्रदोषाचा त्रास होत असल्यास, श्र्वसनाला त्रास होत असल्यास, अंग दुखत असल्यास व्यायाम टाळणे उत्तम ठरते.

थोडक्यात सांगायचे तर, कुठलीही गोष्ट चांगली असली तरी तिचा अतिरेक करून चालत नाही, विवेकबुद्धीनेच विचार करणे आवश्यक ठरते. त्यामुळे स्वास्थ्याबद्दल जागरूक असणाऱ्यांनी स्वतःची प्रकृती, वातावरण यांचा विचार करून आपली जीवनशैली, आहार व व्यायाम यांचे योग्य नियोजन करण्याचा उपयोग होऊ शकेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com