वंध्यत्व आणि शुक्रदोष! | Spermatogenesis | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

spermatogenesis
वंध्यत्व आणि शुक्रदोष!

वंध्यत्व आणि शुक्रदोष!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

- डॉ. मालविका तांबे

सध्या जगभरात वंध्यत्वाचे प्रमाण वाढताना दिसत आहे, तसेच मोठ्या प्रमाणावर शुक्रदोष वाढल्याचे दिसते. पण आश्र्चर्याची गोष्ट अशी की... प्रयोगशाळा मात्र उत्तम शुक्राच्या पातळ्या कमी कमी करत आहेत. उत्तम शुक्रात शुक्राणूंची मोटॅलिटी ६० टक्के असावी, असे पूर्वी मानले जात होते, ही पातळी सध्या ४० टक्क्यांवर आणली आहे.

सगळ्याच दांपत्यांना निरोगी, स्वस्थ व सर्वगुणसंपन्न बालकाची इच्छा असते. गर्भधारणा होण्याकरता व गर्भाची व्यवस्थित वाढ होण्याकरता बऱ्याच गोष्टी महत्त्वाच्या असतात. शुद्ध शुक्र व शुद्ध आर्तव म्हणजे पुरुषबीज व स्त्रीबीज यांनाआयुर्वेदात खूप महत्त्व दिलेले आहे. बाळाचे संपूर्ण आयुष्य आणि त्याच्या आरोग्याचा पाया हा त्याच्या आई-वडिलांकडून येणाऱ्या या बीजांत म्हणजेच गुणसूत्रांत असतो. हा पाया भक्कम नसला तर गर्भाला नंतर कितीही पोषण करण्याचा प्रयत्न केला तरी गर्भाची वाढ व्यवस्थित होईलच किंवा त्याचे पुढचे आयुष्य स्वस्थ असेलच याची शाश्र्वती नसते. गर्भधारणा होत नाही अशी दांपत्ये संतुलनच्या क्लिनिकला येतात तेव्हा स्त्रीने केलेल्या तपासण्यांची फाइल जाडजूड असते परंतु पुरुषाच्या चाचणीचा एखादा पेपर असतो, तेही क्वचितच. आयुर्वेदाच्या मदतीने तपासण्या केल्या असता दोष स्त्रीमध्ये नव्हे तर पुरुषात असल्याने गर्भधारणा होत नसल्याचे आढळून येते. यालाच आयुर्वेदात शुक्रदोष असे म्हटलेले आहे. त्यामुळे वंध्यत्वासाठी स्त्रीदोषाबरोबरच पुरुषात असलेला दोषही जबाबदार असतो असे आयुर्वेदाने म्हटलेले आहे.

शुद्धे शुक्रार्तवे सत्त्वः स्वकर्मरक्लेशचोदितः ।

गर्भः सम्पद्यते युक्तिवशादग्निरिवारणौ ।।

....चरक शरीरस्थान

स्त्रीबीज स्वास्थ्याबरोबरच पुरुषबीजाच्या स्वास्थ्यालाही महत्त्व देणे महत्त्वाचे. गर्भधारणेकरता व एकूण स्वतःच्या स्वास्थ्याकरता योग्य शुक्राची लक्षणे आयुर्वेदात याप्रमाणे सांगितलेली आहेत...

शुक्रं शुक्लं गुरु स्निग्धं मधुरं बहलं बहु ।

घृतमाक्षिकतैलाभं सद्‌गर्भाय.....।। ....शारंगधर

जे शुक्र पांढरे, गुरू, स्निग्ध, मधुर, भरपूर प्रमाणात, घट्ट व मध, तूप वा तिळतेल यांच्यासारखे असते, ते गर्भधारणेकरता उत्तम असते.

शुक्र दूषित होण्याची कारणे...

  • जन्मतः आईवडिलांकडून येणारा शुक्रधातू दोषयुक्त असू शकतो. शुक्र दूषित असण्याची कारणे बऱ्याच वेळा कळत नाही, त्यामुळे दांपत्याने गर्भधारणेपूर्वी शास्त्रोक्त पंचकर्म करून घेण्यास आयुर्वेदाने सुचवलेले आहे, जेणेकरून अशा प्रकारचे दोष पुढच्या पिढीत जायला प्रतिबंध होऊ शकतो.

  • अति मैथुन, अवेळी किंवा अनैसर्गिक मैथुन, स्वतःची किंवा स्त्रीची इच्छा नसताना मैथुन करणे

  • अत्याधिक मानसिक ताण, अति प्रवास, अति शारीरिक श्रम, क्रोध, चिंता, शोक, मोठा आजार, मलमूत्रशुक्रादी वेग अडवण्याची प्रवृत्ती.

  • अति प्रमाणात फास्ट फूड, कोरडे अन्न, असा सत्त्वहीन आहार; आहारात कडू, तुरट, आंबट, खारट चवींचे प्रमाण अधिक असणे.

वातादिकुणपग्रन्थिपूयक्षीणमलाह्वयम् ।

बीजासमर्थं रेतोस्रं...अष्टांगसंग्रह

शुक्रदोषाचा ऱ्हास झाल्यास, शुक्रधातू कुपित झाल्यास वीर्याचा रंग बदलणे, दुर्गंधी येणे, वीर्यात गाठी असणे, प्रमाण कमी होणे, वीर्य मलमूत्राने युक्त असणे, वीर्याला मलमूत्राचा वास येणे वगैरे लक्षणे दिसतात. अशा प्रकारच्या शुक्राने गर्भधारणा होत नाही, झालीच तर गर्भपात होण्याची शक्यता वाढते. स्पर्म काउंट, मोटॅलिटी, घनता (व्हिस्कॉसिटी), रंग अशा चाचण्यांमध्ये कळू शकते. उत्तम शुक्रात नॉर्मल शुक्राणूंची संख्या ८० टक्के असावी असे पूर्वी मानले जात होते, आज ही पातळी चार टक्क्यांवर आणलेली आहे. कागदांवर काहीही संख्या लिहिलेल्या असल्या तरी निसर्ग आपले नियम बदलत नाही हे आपण विसरलो आहोत. मांजर दूध पिताना डोळे झाकते, तिला वाटते आपल्याला कोणी बघत नाही. पण बघणारे तिला बघतातच. तसेच शुक्रदोष लक्षात न घेतल्यामुळे IUI, IVF वगैरेंसारखे आधुनिक उपचार करूनही गर्भधारणा होत नाही अशी तक्रार घेऊन संतुलनमध्ये अनेक जोडपी आलेली आहेत. आयुर्वेदात शुक्रदोषाची इतरही लक्षणे, सांगितलेली आहेत. उदा. उत्साह नसणे, चेहऱ्यावरची तेजस्विता कमी असणे, शरीरातील चयापचयाची क्रिया नीट न होणे, संबंधाची इच्छा नसणे, संबंध आला तर त्यानंतर थकवा वाटणे, पाय-पाठीत ओढण्याची भावना प्रतीत होणे, शीघ्रपतन वगैरे. शुक्रदोष इतरही आजारांना जन्म देऊ शकतो असेही आयुर्वेदात सांगितलेले आहे. त्यामुळे शुक्रदोषाची कुठलीही लक्षणे आढळल्यास तज्ज्ञांचा सल्ला त्वरित घेणे आवश्यक असते.

शुक्रपोषणासाठी संतुलन चैतन्य कल्प, अमृतशर्करा टाकून रोज गाईचे नैसर्गिक दूध, लोणी-खडीसाखर, उडदाचे वडे, उडदाची खीर वगैरेंचा आहारात समावेश असावा. तसेही आपल्याकडे तांदळाची खीर, गव्हल्याची खीर घेण्याची पद्धत आहे. लग्नात मुलीला माहेराहून रुखवतात गव्हले देण्याची पद्धत ही शुक्रपोषणाचा संकेत असावा. मऊ भात व तूप, गव्हाचे सत्त्व यांचाही शुक्रपोषणासाठी फायदा होतो. आंबा, डाळिंब, आवळा, द्राक्षे, सफरचंद, अंजीर खजूर, मनुका वगैरे फळे; कोहळा, दुधी वगैरे फळभाज्या; जायफळ-जायपत्री-केशर-बडिशेपयुक्त विडा यांचाही शुक्रपोषणासाठी उपयोग होता. शुक्रदोष कमी होण्यासाठी आयुर्वेदात सांगितलेली वाजीकरण चिकित्सा तज्ज्ञांकडून करून घ्यावी. शुक्रदोष कमी होण्यासाठी चंद्रप्रभा वटी, कवचबीज चूर्ण, संतुलन प्रशांत चूर्ण, मॅरोसॅन, संतुलन आत्मप्राश, संतुलन पुरुषम् सिद्ध तेल वगैरेंचा उपयोग होताना दिसतो. संतुलनचे शास्त्रोक्त पंचकर्म करण्याचा शुक्रदोष कमी होण्यासाठी उपयोग होतो. एका रुग्णामध्ये शुक्राणूंचे प्रमाण कमी असल्याने त्यांच्या पत्नीला दिवस राहत नव्हते. IUI, IVF वगैरे सगळे करूनही फायदा झाला नाही. संतुलनमध्ये आल्यावर आयुर्वेदिक निदान झाल्यावर त्यांना आहार, आचरणात बदल व संतुलन पंचकर्म करून घेण्यास सांगितले. ५-६ महिन्यांत त्यांच्यात फरक पडला व त्यांच्या पत्नीला दिवस राहिले. बाळाच्या जन्मानंतर त्याला घेऊन ते भेटायला आले तेव्हा म्हणाले की मला वडील झाल्याचा आनंद तर आहेच, पण त्यामुळे माझा आत्मविश्र्वास वाढला आहे. पुरुषत्व नसल्याची भावना मनात असल्यामुळे माझ्या व्यवसायावर परिणाम होऊ लागला होता. आज माझा व्यवसायही उत्तम चालला आहे, तर शुक्रदोष हा शारीरिक, मानसिक, सामाजिक व व्यक्तिगत पातळीवरही परिणाम आणू शकतो हे लक्षात घ्यायला हरकत नाही. योग्य वेळी योग्य मार्गदर्शन व योग्य उपाय मिळाले तर आयुष्य सुधारू शकते.

loading image
go to top