वनस्पती आणि आरोग्य ! Plants and health | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Tulas
वनस्पती आणि आरोग्य !

वनस्पती आणि आरोग्य !

- डॉ. मालविका तांबे

आयुर्वेदात वनस्पतींचे आणि विशेषतः तुळशीचे महत्त्व मोठ्या प्रमाणात आहे. तुळस ही अतिशय सहज उपलब्ध होणारी वनस्पती. आजच्या लेखात आपण याच तुळशीचे महत्त्व आणि गुणधर्म जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत.

आयुर्वेदशास्त्र हे सर्वांगीणशास्त्र आहे. या शास्त्रात केवळ आजारांचाच नाही तर स्वास्थ्य नीट राहण्यासाठी व्यक्तीची दिनचर्या, आहार, रसायनसेवन, शरीरात दोष उत्पन्न झालेच, तर ते पंचकर्माद्वारे घालवून आजारातून कसे बाहेर कसे पडावे हे तर सांगतिलेले आहेत, बरोबरीने मनुष्य व निसर्ग यांच्यातील संतुलन टिकवण्याबद्दलही मार्गदर्शन केलेले आहे. आज वाढत्या प्रदूषणामुळे पर्यावरणाचा विचार केला जाऊ लागल्याचे दिसते. परंतु निसर्ग व पर्यावरणाचे आपल्या आयुष्यात असलेले महत्त्व तसेच आपले आरोग्य निसर्गातील वनस्पतींवर अवलंबून असल्याने वनस्पतींचीचे महत्त्व आयुर्वेदाने हजारो वर्षांपूर्वीच सांगून ठेवलेले आहे. अशा अनेक वनस्पती आहेत, ज्यांचा आपण आपल्या दैनंदिन जीवनात समावेश केल्यास चयापचयामध्ये येऊ शकणारे दोष कमी करण्यासाठी मदत होते. हळद, हिंग, गवती चहा, काळी मिरी, आले वगैरे अनेक वनस्पती स्वयंपाकघरात वापरल्या जातात.

वनस्पतींमधील सगळ्यात महत्त्वाची, सुलभपणे मिळणारी सर्व वनस्पतींची राणी म्हणता येईल अशी आहे तुळशी. औषधांमध्ये तुळशीचे महत्त्व निर्विवाद आहेच, तुळशीला आध्यात्मिक महत्त्वही दिले गेलेले आहे. आपल्या भारतीय परंपरेत काही सांस्कृतिक व आध्यात्मिक प्रथा असतात, त्यांचा उपयोग आपल्या स्वास्थ्यासाठीच होत असतो. तुळशी शारीरिक, मानसिक व आत्मिक अशा तिन्ही स्तरांवर संतुलन आणण्यास मदत करते असे आयुर्वेदात सांगितलेले आहे. तुळशीची पाने चवीने कडू व उष्ण गुणांची असतात. तुळशीमुळे शरीरातील कफ व वातदोष संतुलित होण्यास मदत मिळते. रोज तुळशीची काही पाने खाण्याची सवय ठेवल्यास स्वास्थ्य ठीक राहण्यास तसेच आयुष्यवृद्धी होण्यास मदत मिळते; सांप्रतच्या काळात मोठ्या प्रमाणावर अनुभवाला येणारा, आजार प्रवृत्त करण्यास कारणीभूत असणारा मानसिक ताण कमी व्हायला मदत मिळते; कांती सुधारते, आवाज सुधारतो, शरीराची ताकद वाढते, मन शांत व्हायला मदत मिळते; सर्दी, खोकला, ताप, जुलाब अशा त्रासांसाठी तुळस वापरली जाते. तुळशी अँटिमायक्रोबियल आहे म्हणजे ती बॅक्टेरिया, व्हायरस, फंगस, प्रोटोझूआ वगैरेंचे इन्फेक्शन होण्यास प्रतिबंध करते असे आधुनिक संशोधनातून समोर आले आहे. तसेच तुळशीमुळे जुलाब बंद होण्यास, शरीरातील सूज कमी होण्यास मदत मिळते. तुळशी यकृत व चेतासंस्थेची कार्यक्षमता वाढवते. अँटिऑक्सिडंट हा तुळशीचा आणखी एक गुणधर्म. या गुणधर्मामुळे सध्या तुळशीचे महत्त्व अधिक वाढलेले आहे. तुळशी हृदयाला पोषक ठरते.

मधुमेह, वजन वाढणे, रक्तदाब वगैरे जीवनशैली निगडित असलेल्या तक्रारींवरही तुळशी उपयोगी ठरते. सध्याच्या काळात आपल्या पोटात आहारातून अनैसर्गिक केमिकल्स जातात, तुळशी अशा प्रकारची हानिकारक केमिकल्स शरीराबाहेर काढून टाकण्यास उपयोगी ठरते. पेस्टिसाइड, विविध कारखान्यांतून निघणारी केमिकल्स यांचा शरीरावर होणारा दुष्परिणाम कमी करण्यासाठी तुळशी उपयोगी ठरू शकते. घरासमोरच्या बागेत, ते शक्य नसल्यास बाल्कनीत, गच्चीत, तुळस नक्की लावावी, तिची देखरेख करावी. रोज तुळशीची ३-४, आवडत असल्यास ५-६ पाने सकाळी नाश्त्याच्यावेळी चावून खावीत. हे शक्य नसल्यास रोजचा चहा करताना तुळशीची ताजी वा वाळवलेली पाने टाकावी. चहा करताना त्यात तुळशीची पाने टाकणे स्वास्थ्याच्या दृष्टीने हितकर ठरते. सर्दी-खोकला कमी होण्यासाठी पुदिना, आले, मिरी, तुळस यांपासून केलेला हर्बल टी घेण्याचा सल्ला दिला जातो. घसा खराब झाला असल्यास तुळशीची पाने पाण्यात उकळून त्या पाण्याने गुळण्या करण्यामुळे सूज कमी होऊन घसा बरा व्हायला मदत मिळते. सर्दी-खोकला-दम लागणे वगैरे त्रासांमध्ये तुळशीची पाने व आले पाण्यात उकळून केलेला काढा (थोडा मध मिसळून) घेण्याचा फायदा होतो. त्वचेची आग, जळजळ होत असल्यात तुळशीच्या पाने कुढीन केलेली कल्क लावल्यास उपयोग होतो. तोंडात अल्सर वगैरे असल्यात तुळशीची २-३ पाने तोंडात धरून ठेवल्याचा उपयोग होतो.

डोक्यात कोंडा, खाज सुटणे या त्रासांमध्ये तुळस, लाल जास्वंद, कडुनिंबाची पाने कुटून केलेला कल्क केसांना लावल्याचा फायदा होतो. स्वयंपाकघरातील रोजच्या मसाल्यांमध्ये तुळशीच्या वाळलेल्या पानांच्या चूर्णाचा समावेश करता येतो. निसर्गाचे महत्त्व पटवून देण्यासाठी म्हणा, किंवा निसर्गाला धन्यवाद देण्यासाठी म्हणा, दिवाळीनंतर तुळशीविवाह व आवळीपूजन, आवळीभोजन यांची योजना भारतीय संस्कृतीत केलेली दिसते.

आयुर्वेदिक औषधनिर्माणप्रक्रियेत वनस्पतींचा मोठा सहभाग असतो. त्यामुळे आत्मसंतुलन येथे दरवर्षी आवळीपूजन करण्याची परंपरा आहे. ‘कुठलीही औषधनिर्माणप्रक्रिया सुरू करण्याआधी त्यात वापरण्यात येणाऱ्या वनस्पतींना नमस्कार करावा, या औषधामुळे रोग बरे व्हावेत अशी प्रार्थना करावी’ असा श्रीगुरु डॉ. बालाजी तांबे यांचा नेहमी आग्रह असे. नवीन पिढीमध्ये निसर्गाबद्दल जागरुकता व गोडी निर्माण होण्याकरता घरच्या मोठ्यांना पुढाकार घेऊन, घरातील लहान मुलांना हाताशी घेऊन तुळस, गवती चहा, जास्वंद, कोरफड, आपल्याला उपयोगी असणाऱ्या वनस्पती आपल्या बागेत जोपासल्या, त्यांच्याबद्दल माहिती दिली तर त्यांना निसर्गाचे आपल्या आयुष्यात असलेले महत्त्व लक्षात येईल, निसर्गाबरोबर जुळायला मदत मिळू शकेल, आजच्या काळाची ही गरज आहे, असे मला वाटते.

loading image
go to top