प्राणायामे विनियोगः । | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pranayam

प्राण शरीरात येतो कसा व जातो कसा हे गूढ आपल्याला आजपर्यंत कळू शकलेले नाही. त्यावर काम करणारा प्राणयामासारखा रामबाण उपाय आपल्यासाठी फार महत्वाचा आहे.

प्राणायामे विनियोगः ।

- डॉ. मालविका तांबे

प्राण शरीरात येतो कसा व जातो कसा हे गूढ आपल्याला आजपर्यंत कळू शकलेले नाही. त्यावर काम करणारा प्राणयामासारखा रामबाण उपाय आपल्यासाठी फार महत्वाचा आहे. प्राणायामाचे अनेक प्रकार आहेत. त्यांचे शरीरावर वेगवगेळ परिणाम होताना दिसतात. त्यामुळे कुठला प्राणायाम करावा, कुठल्या प्राणायामाचा काय फायदा होईल हे जाणून घेऊनच प्राणायाम सुरू करणे गरजेचे आहे.

‘प्राण’ शब्दाचे व्यवहारात जीवन, श्र्वास, चैतन्य, जोम, आत्मा असे किती तरी अर्थ आपल्या डोळ्यांसमोर येतात. आध्यात्मिक जगतात श्रीहनुमंत म्हणजे प्राण. हनुमंतांची प्रचंड शक्ती, संकटकाळी सगळ्यांना मदत करण्याची त्यांची प्रवृत्ती आपल्याला माहिती आहे, पण तेच हनुमंत रागावले तर झालेला लंकेचा विध्वंसही आपल्याला माहिती आहे. प्रकृतीतील प्राण म्हणजे वारा, मंजुळ असला तर वाहवा, झंझावाताचे स्वरूप घेतले तर नाश ठरलेला. आयुर्वेदशास्त्रात प्राणाचे बरेच अर्थ दिलेले आहेत. त्यातील सगळ्यांत महत्त्वाचा म्हणजे वायू किंवा वातदोष. वायूची शक्ती तर प्रचंड असतेच आणि कफ व पित्तदोषही वायूच्या अधीन असतात असे आयुर्वेदात सांगितलेले आहे. जीवन नीट जगायचे असले तर या प्राणाला जपणे, त्याचे संतुलन करणे आवश्यकच. प्राणाला वश करतो तो प्राणायाम. त्यामुळे योगशास्त्रात तसेच आयुर्वेदशास्त्रात प्राणायामाला खूप महत्त्व दिलेले आहे. प्राणायाम उचित स्वरूपात झाला तर शारीरिक व मानसिक या दोन्ही स्तरांवर स्वास्थ्य जपायला मदत होते.

प्राणायामामुळे श्र्वसनमार्गाची शुद्धी होते, हृदयाची व फुप्फुसांची ताकद वाढते, ताण- तणाव कमी होतात, शांत झोप लागते, वजन कमी म्हायला मदत मिळते, एकाग्रता व स्मरणशक्ती वाढते, रक्तदाब, सर्दी-खोकला, डोकेदुखी तसेच इतर दीर्घ आजार असल्यास नियमितपण प्राणायाम केल्यास शारीराला प्राणवायूचा पुरवठा अधिक प्रमाणात होऊन आजार कमी व्हायला मिळते. प्राणायाम करताना काही चूक झाल्यास मात्र त्यापासून त्रास होताना दिसतो. कारण चुकीच्या पद्धतीने प्राणायाम केला गेल्यास वाताची गती बदलते, पर्यायाने डोकेदुखी, थकवा, वैचारिक अस्थिरता, नैराश्य, अपचन, पोट साफ न होणे, तोंड व घसा सुकणे, अकारण घाम येणे, श्र्वास घ्यायला त्रास होणे वगैरे अनेक त्रास होऊ शकतात. प्राणायाम योगाभ्यासातील एक महत्त्वाचा टप्पा होय, जो यम-नियम-आसन हे तीन टप्पे पार केल्यावर करायला सांगितलेला आहे. सध्या मात्र अनेक जण योगाभ्यास करायचा असे म्हणून एकदम प्राणायामालाच सुरुवात करतात. आधी जीवनात शिस्त आणून, व्यायाम-आसने करायला सुरुवात करून थोडी ताकद वाढल्यावर प्राणायाम सुरू करणे इष्ट ठरते. सुरुवातीला दीर्घश्र्वसन करणे, म्हणजे हळुवारपणे श्र्वास आत घेणे व तितक्याच हळूवारपणे श्र्वास बाहेर सोडणे, आवश्यक असते. दीर्घश्र्वसन करण्यामुळे हळू हळू श्र्वासावर नियंत्रण आल्याने प्राणायामाचे पुढचे टप्पे गाठणे सोपे जाते.

प्राणायामाची वेळ व जागा

नेहमी रिकाम्या पोटी सकाळी प्राणायाम करावा. सकाळची वेळ वाताची वेळ असल्यामुळे सकाळी प्राणायाम करणे अधिक लाभदायक ठरते. सकाळच्या वेळी चहा, कॉफी असे काही घेतले असेल तर त्यानंतर कमीत कमी वीस मिनिटे थांबून मग प्राणायाम करावा.

स्नानानंतर प्राणायाम केल्यास अधिक फायदे मिळू शकतात.

प्राणायाम नेहमी मोकळ्या जागेत करावा. प्राणायाम घरात करायचा असल्यास खोलीच्या खिडक्या उघड्या ठेवाव्या, खोलीत उजेड असावा, खोलीत खेळती हवा असावी. आजूबाजूला त्रास देणारा आवाज, गोंगाट नसलेलाच बरा, जेणेकरून प्राणायाम करणे सोपे होत. प्राणायाम करताना सुखासनात किंवा पद्मासनात बसणे उत्तम. पाठीचा कणा, मान, चेहरा ताठ व सरळ असावा. गुडघेदुखीचा त्रास असल्यास खुर्चीवर बसले तरी चालू शकते. एखाद्या दिवशी ताण असला, मूड खराब असला तर त्या दिवशी प्राणायाम न करणेच ठीक असते. अशा वेळी दीर्घश्र्वसन करणे चांगले. भूक, तहान लागली असल्यास प्राणायाम करणे टाळावे.

प्राणायाम कसा करावा?

अनुलोम-विलोम म्हणजे श्र्वास आत घेणे व बाहेर सोडणे हे अगदी संथ गतीने करणे आवश्यक असते, हे करताना कुठलीही घाई-गडबड करून चालत नाही. घाई-गडबडीत प्राणायाम उरकल्यास त्रास वाढताना दिसतो. प्राणायामाचा नीट सराव झाल्यावरच कुंभक करणे सुरू करणे इष्ठ ठरते. सुरुवातीच्या काळात अनुलोम-विलोम करणे अधिक श्रेयस्कर. याच्या विस्तृत माहितीसाठी श्रीगुरु डॉ. बालाजी तांबे यांचे संतुलन क्रियायोग हे पुस्तक पाहावे. प्राणायामाचे प्रमाण अमृत कितीही चांगले असले तरी त्याचे प्रमाणाबाहेर सेवन करणे त्रासदायक ठरू शकते त्याचप्रमाणे प्राणायामाला वेळ-मर्यादाही असते. सुरुवातीला ५ मिनिटे प्राणायाम करावा व सराव होईल तसतशी १५ मिनिटांपर्यंत वेळ वाढवावी. काही लोक ४०-५० मिनिटे प्राणायाम करतात पण त्याचा त्यांना नंतर त्रास होताना दिसतो. प्राणायाम कसा करावा हे प्रशिक्षकाकडून शिकून घेणे उत्तम. काही आजार असल्यास प्रशिक्षकाकडून प्राणायामातील बारकावे नीट समजून घ्यावे, जेणेकरून आजार कमी व्हायला मदत होऊ शकेल. प्राणायाम झाल्यानंतर काही वेळ शांत बसून राहावे. शक्य असल्यास काही प्रार्थना करावी, श्र्लोक म्हणावे. असे करण्यामुळे अधिक फायदा होताना दिसतो. प्राणायाम झाल्या झाल्या लगेच कामाला जुंपून घेणे, धावपळ करणे हे त्रासदायक ठरू शकते.

प्राणायामाचे अनेक प्रकार आहेत. त्यांचे शरीरावर वेगवगेळ परिणाम होताना दिसतात. त्यामुळे कुठला प्राणायाम करावा, कुठल्या प्राणायामाचा काय फायदा होईल हे जाणून घेऊनच प्राणायाम सुरू करावा. कपालभातीसारखा प्राणायाम सध्या खूप लोकप्रिय झालेला आहे, पण यामध्ये जोरात श्र्वास घेतल्याने प्राणवायूचा अधिक पुरवठा झाल्यामुळे तेवढ्यापुरते बरे वाटले तरी काही लोकांना त्रासही होऊ शकतो. प्राण शरीरात येतो कसा व जातो कसा हे गूढ आपल्याला आजपर्यंत कळू शकलेले नाही. त्यामुळे त्यावर काम करणारा प्राणयामासारखा रामबाण उपाय योग्य प्रकारे वापरणे श्रेयस्कर ठरते.

Web Title: Dr Malvika Tambe Writes Pranayam Health

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top