esakal | विशेष : सुलभ स्तनपान
sakal

बोलून बातमी शोधा

Easy Breastfeeding

विशेष : सुलभ स्तनपान

sakal_logo
By
डॉ. मंगला वाणी

स्तनपान हा फार न बोलला जाणारा पण अत्यंत महत्वाचा असणारा विषय. स्तनपानाचे महत्व अधोरेखित करून जनजागृती व्हावी, जेणेकरून स्तनपानाचे प्रमाण वाढायला मदत होईल यासाठी ऑगस्ट महिन्याचा पहिला आठवडा हा ‘जागतिक स्तनपान सप्ताह’ म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने आज आपण स्तनपानाबद्दल माहिती घेणार आहोत.

बाळाच्या जन्माबरोबरच एका आईचाही जन्म होतो. बाळ जन्मले की स्तनपानाचे वेध लागतात. पहिल्या दिवसापासूनच कुटुंब व समाजाकडून अपेक्षा केली जाते की बाळाच्या पालन-पोषणासाठीचे सर्व कौशल्य आईकडे असलेच पाहिजे. उदा. बाळाला आपले दूध कसे पाजायचे, रडणाऱ्या बाळाला कसे शांत करायचे, इत्यादी. पण तुम्हीच सांगा जर त्या आईला हे सर्व शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये शिकवले गेले नाही, आपण समाजामध्ये जाहीरपणे स्तनपानाबाबत चर्चा केली नाही तर या नुकत्याच आई झालेल्या स्त्रीला याचे ज्ञान कसे असेल? अलीकडे तर विभक्त कुटुंब पद्धतीमुळे पुष्कळशा स्त्रियांनी दुसऱ्या स्त्रीला आपल्या बाळाला स्वतःचे दूध पाजताना पाहिलेले सुद्धा नसते.

सुलभ स्तनपानासाठी आपल्याला गर्भावस्थेपासूनच त्याची तयारी करायला हवी. साधारण सहाव्या किंवा सातव्या महिन्यामध्ये स्तनपान चर्चासत्रांमध्ये गरोदर मातेने भाग घ्यावा. आपल्या बरोबर पती व सासु किंवा आई यांनाही बरोबर घेऊन जावे.

समाजामध्ये स्तनपानाबाबतच्या काहीतरी चुकीच्या कल्पना किंवा गैरसमज असल्यामुळे स्तनपानात बाधा येऊ शकते हे आपण लक्षात घेतले पाहिजे. कुटुंबीयांना शास्त्रीयदृष्ट्या ज्ञान प्राप्त झाले म्हणजे ते स्तनदा आईला योग्य तऱ्हेने आधार देऊ शकतील. मैत्रिणींनो बाळ जन्मल्यानंतर तीन गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. प्रसूतीनंतर बाळाचा व आईचा स्किन टू स्किन कॉन्टॅक्ट होऊन एका तासाच्या आत बाळाला स्तनपान देणे जरुरीचे आहे. सिझेरियन प्रसूतीनंतर सुद्धा हे शक्य आहे. बाळाला आईच्या दुधाशिवाय मध साखरेचे पाणी, वरचे दूध असे काहीही देऊ नये, बाळाला ते हानी पोहोचवू शकते. परवाच एक सासुबाई म्हणत होत्या, ‘मधाचे चाटण दिले की मुलीचा आवाज गोड होतो !’ असे बरेच गैरसमज समाजामध्ये आहेत. आधुनिक शास्त्रात सिद्ध झाले आहे की बाळाला सुरुवातीचे पिवळसर घट्ट दूध मिळणे अत्यंत आवश्यक आहे. त्यातून मिळणाऱ्या प्रतिकार शक्ती मुळे बाळाचे संसर्ग रोगापासून रक्षण होते. आईच्या दुधात ८० टक्क्यांहून अधिक पाणी असते, त्यामुळे बाळाला वेगळे पाणी देण्याची सुद्धा गरज नाही.

यशस्वी स्तनपानासाठी दोन गोष्टी महत्त्वाच्या! पहिली म्हणजे स्तनपानासाठी बाळाला पकडण्याची योग्य पद्धत. बाळाने पूर्ण ‘आ’वासला पाहिजे. बाळाचा खालचा ओठ बाहेर मुडपलेला पाहिजे, तसेच हनुवटी स्तनाला चिकटलेली पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे स्तनपानासाठीची बाळाची योग्य स्थिती. म्हणजे बाळाला आईने पूर्णपणे आपल्याकडे वळवून घ्यावे व बाळाची मान, पाठ व बुढ याला आईने आधार द्यावा. सुरुवातीला स्तनातून जे दूध येते, ते पातळसर असून त्यात साखरेचे प्रमाण जास्त असते. नंतर चे दूध हे घट्टसर असून स्निग्ध पदार्थ त्यात जास्त असल्याने बाळाचे वजन तसेच मेंदूची वाढ व्हायला मदत होते. सुरुवातीच्या काळामध्ये आईने स्तनपान तज्ञ किंवा लॅक्टेशन कन्सल्टंट च्या सहाय्याने बाळाची लॅच सुधारून घ्यावी. त्याने पुढे येणाऱ्या कितीतरी समस्या टळू शकतात. आईने बसूनच स्तनपान दिले पाहिजे असे नाही तर आडवे पडून सुद्धा ती बाळाला दूध पाजू शकते. बसून पाजताना तिने मागे व्यवस्थित टेकून बसावे म्हणजे नंतर पाठ दुखीचा त्रास होत नाही. बाळाला वारंवार म्हणजे निदान दिवसातून आठ ते दहा वेळेला स्तनपान देणे आवश्यक आहे. सुरुवातीच्या काळात बाळ तीन तासापेक्षा जास्त झोपले तर त्याला जागे करून दूध पाजावे.

कधीकधी आईला शंका येते की बाळाला माझे दूध पुरते की नाही? यासाठी दोन सोप्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात. बाळ चोवीस तासांमध्ये कमीत कमी सहा ते सात वेळा लघवी करत असेल व त्याचे वजन महिन्याला निदान 500 ग्रॅम वाढत असेल तर समजावे की बाळासाठी माझे दूध पुरेसे आहे. स्तनावर बाळासाठी उपयुक्त असे जिवाणू असतात त्यामुळे स्तनपानाच्या आधी किंवा नंतर ते धुण्याची गरज नाही. ज्यांना काही महिन्यातच आपल्या कामावर रुजू व्हावे लागते अशा माता स्तनपान चालू ठेवू शकतात. त्यासाठी गरोदर असल्यापासूनच मानसिक तयारी ठेवली पाहिजे. एखाद्या मातेचे दूध काही कारणाने कमी किंवा पूर्णपणे बंद झाले तरी तिची इच्छा असल्यास तज्ञांच्या मार्गदर्शनाद्वारे तिला परत दूध येऊ शकते. स्तनपान म्हणजे बाळाला फक्त अन्नपाणी देणे एवढाच त्याचा अर्थ नसून ते पालन, पोषण व संस्काराचे पुणे पॅकेज आहे. त्यामुळे बाळाची शारीरिक बौद्धिक व भावनिक वाढ चांगली होते. बाळाच्या आयुष्याचा पाया भक्कम होतो. पहिले सहा महिने फक्त आईचे दूध व त्यानंतर योग्य पूरक आहाराबरोबर बाळ निदान दोन वर्षाचे होईपर्यंत स्तनपान देणे आवश्यक आहे. गर्भवती स्त्रियांनी व स्तनदा मातांनी सजग होऊन स्तनपानाबद्दल अधिक माहिती करून घ्यावी. स्तनपान तज्ञांची सुरुवातीपासून मदत घ्यावी. त्यासाठी लागणारी कौशल्ये आत्मसात करून सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा, त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढून सुलभ स्तनपानासाठी त्या नक्कीच सक्षम होतील.

loading image
go to top