बाळदातांचे आरोग्य

डॉ. मानसी पावसकर
Friday, 17 November 2017

दातांची काळजी बालवयातच घेतली पाहिजे. मजबूत व निरोगी हिरड्या दातच नव्हे, तर बाळाचे संपूर्ण आयुष्यच मजबूत करीत असतात. 

निसर्गाने मनुष्याला दोन वेळा दंतपंक्ती बहाल केल्यात, एकदा बाल्यावस्थेत आणि दुसऱ्यांदा कुमार वयात. योग्य वेळी या दातांची निगा न राखल्यास दुसऱ्या दातांचा दणका जवळपास प्रत्येक व्यक्तीने अनुभवलेला असतोच. दातांची योग्य काळजी न घेतल्याने आजकाल काही वेळा पन्नाशीच्या आतच दातांची कवळी बसविण्याची वेळ येते.

दात का किडतात? कसे किडतात?
जेव्हा तुम्ही खूप साखरेचे किंवा ताजे अन्न खाता किंवा पिता, तेव्हा आपण फक्त स्वतःलाच नाही, तर तोंडातल्या जीवाणूंनाही अन्न देत आहोत, हे लक्षात घ्यायला हवे. हे जीवाणू आपल्या दातांवर आवरण तयार करतात. चिकट जीवाणूंचे व अन्य पदार्थांचे पातळ अदृश्‍य आवरण आपले सर्व दात वेढते. जेव्हा हे आवरण शर्करेच्या संपर्कात येते, तेव्हा जीवाणूंसाठी ते खाद्य बनते. ते आवरण खात असतानाच जीवाणू दातांवर आम्ल सोडतात. या आम्लाचा दातांला त्रास होऊ लागतो. हे जीवाणू दात किडण्याची प्रवृत्ती निर्माण करतात. यातील काही जीवाणू हिरड्या, हाडे आणि दातांच्या इतर आधारभूत संरचना नष्ट करतात.

आजकालचे पोटॅटो वेफर्स, कॅंडीज, ब्रेड, शीतपेय हे दात किडण्यास कारणीभूत होतात. म्हणून दातांची काळजी ही अगदी कोवळ्या वयापासून घेणे फायदेशीर ठरते.

छोट्यांच्या दातांची निगा कशी राखाल?
१) बाळाचे पहिले दात येण्याअगोदरपासूनच आईने बाळाच्या दातांची काळजी घेणे जरुरीचे आहे. जसे की, प्रत्येक वेळी बाळाचे दूध पिऊन झाल्यानंतर बाळाच्या हिरड्या, उकळून ठेवलेल्या पाण्यात भिजवून स्वच्छ फडक्‍याने साफ केल्या पाहिजेत. त्यामुळे दुधातील शर्करेचा बाळाच्या येऊ घातलेल्या कोवळ्या दातांवर परिणाम होणार नाही.

२) सर्वसाधारणपणे बाळाच्या सहाव्या महिन्यानंतर बारीक दात दिसू लागताच दंत वैद्यकीय सल्ला घेणे जरुरीचे असते. त्यामुळे येणाऱ्या दातांची जडणघडण आणि इतर गोष्टींचा अंदाज घेता येतो.

३) बाळाच्या खिमटीत अथवा इतर बेबीफूड्‌समध्ये साखर व मीठ न घालता नैसर्गिक चवीची सवय लावावी. कारण साखरेचा कोवळ्या दातांवर परिणाम लवकर होऊन दात किडण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. तसेच गाई, म्हशीचे दूध बिनसाखरेचे पाजणे अधिक हितावह. यामुळे केवळ दात किडण्याचे थांबवले जात नाहीत, तर भविष्यकाळातील मधुमेह व उच्च रक्तदाब यांसारख्या होऊ घालणाऱ्या रोगावरही प्रतिबंध पडते.

४) स्ट्रेप्ट, म्युटन्स नावाचे जीवाणू दात किडण्यास कारणीभूत असतात. म्हणून बाळाला उष्टे खाणे देणे, बाळाच्या तोंडाचा मुका घेणे टाळावे.

५) लहानपणीच मुलांच्या दातांमधील खळगे भरल्यास दात निरोगी राहतीलच, पण त्या मधील फ्लूराइइड्‌सचा उपयोग इतर दात कीडू नयेत म्हणून होतो.

६) दातांच्या बळकटीसाठी फ्लूराईड्‌स जेलचा वापर फार उपयोगी ठरू शकतो.

७) दातांच्या मजबुतीसाठी काही अन्नपदार्थांचा सेवन करणे उपयोगी ठरू शकतो.

अ) कॅल्शियमयुक्त पदार्थ- चीज, दूध, योगर्ट इत्यादी.
ब) हिरव्या पालेभाज्या, ब्रोकोली.
क) बदाम, ब्राझील नट्‌स, ब्राऊन राइस, कडधान्ये.
ड) तसेच जास्त प्रमाणात फायबर (चोथा) असणारी ताजी फळे, अंजीर, खजूर, कडक सफरचंदे, केळी इत्यादी.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dr. Mansi pawaskar article on Baby's teeth Health