जादूगाराच्या पेटाऱ्यात दडलंय काय?

संतोष शेणई
Friday, 29 June 2018

आपल्या पचनसंस्थेला म्हणतात, ‘पॅंडोराज बॉक्‍स’ किंवा ‘जादूगाराचा पेटारा’. या पेटाऱ्यात काय काय दडलंय हे समजून घेणे जेवढे मजेशीर, तेवढेच एकदा का पोटदुखी सुरू झाली की, नेमके कशामुळे ही दुखी उद्भवली असेल याचे निदान करणे डॉक्‍टरांनाही कधी कधी अवघड होऊन बसते. या रहस्यमयी पोटाविषयी, पचनसंस्थेविषयी जाणून घ्यायचे असेल तर हे पुस्तक वाचायलाच हवे.

‘आपलं पोट आपल्या हातात’ (पचनसंस्थेचे आजार ः ओळख, उपाय आणि उपचार) हे डॉ. नितीन जोशी यांचे पुस्तक डॉ. अमित मायदेव व डॉ. डी. नागेश्‍वर रेड्डी या विख्यात पोटविकारतज्ज्ञांनी गौरवलेले आहे, एवढे सांगितले तरी या पुस्तकाचे महत्त्व स्पष्ट होईल. ‘उदर भरण नोहे जाणिजे यज्ञकर्म’ असे आपण म्हणतो. ‘पोटापुरता पसा पाहिजे नको पिकाया पोळी’ असे आपण गातो. पण खाताना हे सारे विसरतो. आपण पोटापुरते खात नाही, तर जिभेखातर खात सुटतो. जीभ नादावते आणि आपण पोटाचा विचार न करता खातो. पोट बिघडत नाही, आपण पोट बिघडवतो. शिवाय अन्नसेवन हा विषय पोटापुरता मर्यादित नसतो. तर माणसांच्या भावभावना, मनोव्यापार आणि चीडचीड याकडेही जाणारे मार्ग पोटातूनच जातात. अनेक आजारांचे उगमस्थानही पोट हेच असते. या सगळ्याचा केवढा थेट संबंध पोटाशी असतो, त्याची मीमांसा डॉ. जोशी यांनी या पुस्तकात केली आहे. 

पोटाचा आणि आपल्या अस्तित्त्वाचा थेट संबंध आहे. जगात दोन प्रकारचे लोक असतात ः मिळत नाही म्हणून काहीही खावे लागणारे आणि काय खाऊ व काय नको याचा निर्णय घेणे न जमल्याने काहीही खाण्याची चूक सतत करणारे. हे दोन्ही लोक पोटाच्या विकाराला बळी पडतात. साहेब, बाकी काहीपण करा-पण पोटावर पाय देऊ नका, मी अमूक केलं तर तुझ्या पोटात का दुखतंय? पापी पेट का सवाल है, कशासाठी? पोटासाठी, अशा अनेक वाक्‍प्रचारांचा संभाषणात वापर करणारे आपण आपल्या रोजच्या जीवनात मात्र पोटाविषयी जागरूक नसतो. ही जागृती करण्यासाठीच डॉ. जोशी यांचे पुस्तक आहे. ‘पचनसंस्थेची रचना व पचनसंस्थेचे कार्य’ या पहिल्या ज्ञानमूलक, पण सोप्या शैलीमधून साकारलेल्या प्रकरणांपासूनच हे पुस्तक पकड घेते. पुस्तकातील सर्व महत्त्वाची माहिती सोप्या, सहज भाषाशैलीत दिली जाते. छोटे-छोटे लेख आणि त्या सर्व लेखांना पूरक छायाचित्रे, पूरक तक्ते देत डॉक्‍टरांनी संपूर्ण पोटाचे यंत्रच समजून सांगितले आहे. एरवी मेंदू, हृदय, किडनी आणि फुफ्फुसाच्या तुलनेत पोट आणि पचनसंस्थेशी संबंधित अवयवांना दुय्यम दर्जा दिला जातो. हे पुस्तक वाचल्यानंतर मेंदू, हृदयासारख्या अतिमहत्त्वाच्या अवयवाचे कार्य व्यवस्थित अव्याहतपणे चालू ठेवण्याचा मार्ग पोटातूनच जातो हे लक्षात येईल. आपल्या पचनसंस्थेला जपल्यास पोटाचे विकार आपल्याला होणार नाहीत, हे उमगेल.  पोटाच्या विकारांची यादी ॲसिडिटी, अपचन यासारख्या समस्येपासून सुरू होऊन पचनसंस्थेशी संबंधित कोणत्याही अवयवाच्या कर्करोगापाशी थांबते. या पोटाच्या आजारांची नीट ओळख या पुस्तकातून दिली जाते. त्या आजारांच्या संबंधात कोणत्या तपासण्या केल्या जातात, उपाय काय, कोणता आजार झाल्यावर काय खावें आणि काय खाऊ नये याची माहिती देणाऱ्या अशा एखाद्या पुस्तकाची गरज होतीच, ती हे पुस्तक पुरी करते. 

पाणी उकळून प्या, हा मंत्र प्रत्येकच डॉक्‍टर सांगत असतात. पाणी म्हणजे जीवन. पण पाण्याबद्दल आपण किती जागरूक असतो? पोटाच्या आजारांमध्ये मुख्यतः पाणीच कारणीभूत असते. आत ढकललेले अन्न आणि आत घेतलेले पाणी याबद्दलचा निष्काळजीपणा आजारांशी सख्य वाढवितो. हे सगळे अत्यंत सुगम पद्धतीने. कधी चित्रे, कधी तक्ते देत संक्षिप्त विश्‍लेषण करीत डॉ. जोशी यांनी सांगितले आहे.

वैद्यकीय क्षेत्रात तंत्रज्ञानाचा विकास हा आता प्रत्येक ‘स्पेशालिटी’मध्ये झाला आहे. तसा तो पचनसंस्थेशी संबंधीत विषयातही झाला आहे. पचनसंस्थेची दुर्बिणीद्वारे तपासणी आणि ती करत असतानाच आवश्‍यकता भासल्यास लगेच शस्त्रक्रिया या तंत्रज्ञानाने क्रांती घडवली आहे. पोटाच्या आजाराशी संबंधित निदान आणि उपचार करताना जे बदल झाले आहेत याची माहिती सर्वांना समजेल अशा भाषेत पोचवण्याचे काम हे पुस्तक करते. अपचन, ॲसिडिटी, लठ्ठपणा या विषयाबद्दलची माहिती लक्षात ठेवण्याजोगी आहे. पिवळया काविळीबद्दलचा लेख या आजाराविषयीचे सर्व गैरसमज दूर करणारा आहे. अस्वस्थ मनाचा पचनसंस्थेवर विपरीत परिणाम होऊन ‘इर्रिटेबल बॉवेल सिन्ड्रोम’च्या दुष्टचक्रात माणूस कसा अडकतो याचे डॉ. जोशी यांनी केलेले विवेचन उत्तम आहे. आहार आणि आहाराचे नियम किंवा आहार आणि व्यायामांचा जमाखर्च हे तक्ते घरातील सर्वांसमोर कायम राहतील असे डकवून ठेवायला हवेत. डॉक्‍टरांच्या रोजच्या वैद्यकीय अनुभवांतून तसेच प्रात्यक्षिकांतून हे पुस्तक सिद्ध झाले आहे, त्यामुळे ‘पोट छान तर दुनिया छान’ हा कानमंत्र आपल्यालाही पटतो. आयुर्वेदाने, साधुसंतांनी जे सांगितले, तेच पुन्हा डॉक्‍टर जोशी सांगत आहेत, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. एकपट खाणे, दुप्पट पाणी पिणे आणि तिप्पट चालणे हे रोजच्या जीवनात ऐकले तर आपले आरोग्य नीट सांभाळले जाईल.  

नयन बाराहाते यांनी अर्थपूर्ण असें मुखपृष्ठ केलें आहे, मुखपृष्ठावर पचनसंस्था म्हणजे एक कारखाना असे प्रतीक दाखवले आहे. ‘खाना’ नीट असेल तर ‘कारखाना’ नीट चालेल. हा पोटातील कारखाना न बिघडता अनेक वर्षे चालू राहावा असें वाटत असेल तर त्यासाठीचें इंधनरूपी अन्न तोंडात टाकतानाच सावधानता बाळगावी लागेल, असे हे मुखपृष्ठ सुचवते. मनाचा, तनाचा व अन्नाचा विचार सतत करायला हवा, हा संदेश हे पुस्तक देते.  अनेक गोष्टी आपल्या पोटात लपवून ठेवायच्या असतात, पण ‘हे पुस्तक वाचा आणि अमलात आणा’ हा संदेश मात्र पोटात अजिबात ठेवू नका, भेटणाऱ्या प्रत्येकासमोर तो ओठात येऊ द्या!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dr. nitin joshi book stomach & digestive system