गुडघेदुखी आणि संधिवात ! Knee Pain | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Knee Pain
गुडघेदुखी आणि संधिवात !

गुडघेदुखी आणि संधिवात !

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

- डॉ. पराग संचेती, (एम.एस., एम.सी.एच.) अस्थिरोगतज्ज्ञ (पुणे)

संधिवाताची प्रमुख लक्षणे म्हणजे गुडघेदुखी; खास करून चालताना, जिने चढता-उतरताना, बसताना वगैरे. ह्याचबरोबर गुडघ्यांची सूज, हालचालीला त्रास, गुडघे वाकडे दिसणे हीदेखील संधिवाताची लक्षणे आहेत. पण ह्याचबरोबर दुसरेदेखील वाताचे प्रकार आहेत, ज्यांमध्ये गुडघे खराब होऊ शकतात. आमवात हादेखील वाताचा एक प्रकार आहे, ज्यामध्ये कमी वयातच गुडघ्यांची वा इतर सांध्यांची झीज होते. पण हा कमी टक्के लोकांमध्ये होतो. दुसऱ्या वाताच्या प्रकारात मांडी आणि गुडघ्याची वाटी ह्यामधील सांध्याचे आवरण खराब होऊ शकते.

आपले गुडघे हे आपल्या शरीरातील अत्यंत महत्वाचे सांधे असतात. आपल्या दैनंदिन जीवनात आपण गुडघ्यांचा प्रचंड वापर करत असतो. गुडघे हे पायातले मधले सांधे असतात. याचाच अर्थ गुडघ्यांना होणारा त्रास हा शरीरातील दुसऱ्या भागांमुळे देखील होऊ शकतो. गुडघ्यांचा संधिवात अर्थात ऑस्टीओआर्थ्र्याटीस (Osteoarthritis) म्हणजेच गुडघ्यांची होणारी झीज. एका प्रकारे आपण ह्याला दोन पायांवर चालण्यामुळे माणसाला मिळालेली शिक्षाच म्हणू शकू. ह्यामध्ये गुडघ्याचे आवरण आणि वंगण कमी होऊ लागतं ज्यामुळे गुडघे ताठरतात आणि दुखू लागतात. संधिवात हा साधारणतः साठी नंतर चा त्रास मानला जातो. वाढतं वय, स्थूलता, रजोनिवृत्ती, चुकीची जीवनशैली, धूम्रपान, मद्यपान, गुडघ्याची दुखापत, उपडे बसणे अशा अनेक कारणांमुळे गुडघ्यांना संधिवात होऊ शकतो. ह्यामध्ये मांडी आणि पायामधील सांधा (गुडघा) खराब होतो. क्ष- किरणांनी (X- Ray Radiograph) हाडांच्या झालेल्या झिजेच निरीक्षण करून ह्याचं अचूक निदान करता येतं. डेक्सा स्कॅनच्या मदतीने सुद्धा हाडांमधील कॅल्शिमची पातळी तपासून संधिवाताचे प्रमाण सांगता येते. संधीवाताची प्रमुख्याची लक्षणे म्हणजे गुडघेदुखी. खास करून चालतांना, जिने चढता-उतरतांना, बसतांना वगैरे. ह्याच बरोबर गुडघ्यांची सुझ, हालचालीला त्रास, गुडघे वाकडे दिसणे ही देखील संधीवाताची लक्षणे आहेत. पण ह्याचबरोबर दुसरेदेखील वाताचे प्रकार आहेत ज्यामध्ये गुडघे खराब होऊ शकतात. आमवात (Rheumatoid Arthritis) हा देखील वाताचा एक प्रकार आहे ज्यामध्ये कमी वयातच गुडघ्यांची वा इतर सांध्यांची झीज होते. पण हा कमी टक्के लोकांमध्ये होतो.

दुसऱ्या वाताच्या प्रकारात मांडी आणि गुडघ्याची वाटी ह्यामधील संध्याचे आवरण खराब होऊ शकत. ह्याला कॉनड्रोमलेशिया (Chondromalacia) म्हणतात. हा त्रास प्रामुख्याने २० – ३० ह्या वयोगटातील स्त्रियांमध्ये दिसतो. स्थूलता, चुकीचा जीवनशैली आणि व्यायामाचा आभाव ही ह्याची प्रमुख करणे आहेत. ह्याची प्रमुख लक्षणे म्हणजे गुडघे दुखी, खास करून मांडी घालून अथवा उपडे बसल्यावर, पायऱ्या उतरतांना वाटी मध्ये दुखणे. परंतु लवकर निदान आणि योग्य उपचारामुळे हा वात १००% बरा होतो. गुडघेदुखीची इतर करणे जाणून घेणेही गरजेचे आहे. ह्यामुळे योग्य निदान आणि उपचारांना मदत मिळते. गुडघ्यात इतर त्रासदेखील दिसू शकतात. गुडघ्यांच्या गादी चा त्रास (Meniscal Injuries), उशांना सुझ (Bursitis), अथवा तंतूंची दुखापत (Ligament Injuries) ह्यामुळे देखील गुडघे दुखू शकतात आणि त्यांची कार्यक्षमता कमी होऊ शकते. ह्याचबरोबर, खुबा, मांडी आणि पायातील स्नायूंची कमजोरी, पावलांचा विकार (उदा: तळपाय सपाट असणे, टाचेचे वाढलेले हाड, इ.) यामुळे देखील गुडघ्यांचा त्रास होऊ शकतो. यासाठी गुडघ्यांची नियमितपणे काळजी व योग्य मार्गदर्शनाखाली व्यायाम हे आपल्यासाठी आवश्यक आहेत. संधीवाताच्या उपचाराचे उद्देश अगदी सरळ व सोपे आहेत.

गुडघेदुखी कमी करणे : गुडघेदुखी कमी होण्यासाठी आणि आवरण आणि वंगण वाढण्यासाठी सुरुवातीच्या काळात औषध फार उपयोगी असतात. यात गोळ्या व गुडघ्यात इंजेक्शन्स याच बरोबर फिजिओथेरपी मधील उपकरणे आणि गुडघ्याचे पट्टे (ब्रेस) देखील सुरुवातीच्या काळात उपयोगी असतात. ब्रेस बरोबरच मांडीच्या पुढील व मागील स्नायू ह्यांची ताकद वाढवणे महत्वाचे आहे. हे स्नायू गुडघ्यावर येणारा जोर स्वतः कडे घेऊन गुडघ्यांची झीज कमी करतात. स्थूलपणा मध्ये सुद्धा गुडघ्यांवर येणारा जोर खूप जास्त असतो. म्हणूनच वजन कमी करणेसुद्धा उपयोगी आहे.

जर गुडघ्यात बाक झाला असेल तर सरळ करणे : जर गुडघ्यात बाक आला असेल किव्वा संध्याची खूपच झीज झाली असेल तर यासाठी ऑपरेशन ची गरज आहे. ह्यात वाकडे झालेले पाय सरळ करता येतात किव्वा सांधा रोपण करून नवीन गुडघे बसवता येतात.

गुडघ्यांची कार्यक्षमता सुधारणे : गुडघे जपणे, त्यांचा आधार व हालचाल वाढवणे, सांध्यांच्या कार्याची जाणीव (Proprioception) आणि तोल वाढवणे ह्या सर्व गोष्टी गुडघ्यांच्या उत्तम कार्या साठी उपयोगी आहेत. यासाठी योग्य मार्गदर्शनाखाली व्यायाम खूप महत्वाचे आहेत. नी क्लब सारख्या कल्पनेतून रुग्णांना एकत्रितपणे आणि सामुहिकरित्या आपल्या गुडघ्यांची वेळीच योग्य काळजी घेता येते आणि पुढील त्रासापासून वाचता येते.

रुग्णाचे आयुर्मान सुधारणे : शारीरिक कार्यक्षमता वाढण्यासाठीचे व्यायाम (एरोबिक्स) आणि ताकद वाढण्यासाठीचे व्यायाम (अनएरोबिक्स) हे दोन्ही प्रकार महत्वाचे आहेत. याच बरोबर योग्य चपला/ बूट हे देखील गुडघ्याची काळजी घेण्यास उपयोगी आहेत. योग्य राहणीमान व जीवनशैली, उपयुक्त व्यायाम, सकस आहार, या सर्वच गोष्टी आपल्या आणि आपल्या गुडघ्यांच्या उत्तम आरोग्यासाठी महत्वाच्या आहेत. आपल्या गुडघ्यांची काळजी घेणं आणि त्यांचं आयुर्मान वाढवणे शेवटी आपल्याच हातात आहे, नाही का?

loading image
go to top