esakal | म्युकरमायकोसीस (कोविड नंतरचा आजार)
sakal

बोलून बातमी शोधा

Mucormycosis

म्युकरमायकोसीस (कोविड नंतरचा आजार)

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सोप्या शद्बात सांगायचे तर म्युकरमायकोसीस हे दुर्मिळ इन्फेक्शन आहे. ही बुरशी जमिनीवर, झाडावर, कुजलेल्या फळावर व सडलेल्या भाजीवर सापडते. जेव्हा आपण श्वास घेतो तेव्हा या बुरशीचे कण सर्वांच्याच नाकात जातात. पण प्रकृतीने स्वस्थ असलेल्या माणसामध्ये तिचे अस्तित्व आपणास जाणवत नाही.

आज आपण टी.व्ही., न्युजपेपर, सोशल मीडियावर कोविड नंतर होणाऱ्या एका आजाराची चर्चा पाहतो तो म्हणजे म्युकरमायकोसीस. याला काळी बुरशी असेही म्हटले जाते, पण ही बुरशी काळ्या रंगाची नसते पण बुरशीमुळे कुजलेल्या अवयवाच्या काही भाग काळा होतो, म्हणून त्याला काळी बुरशी म्हणतात. जरी कोविड नंतर म्युकरमायकोसीस होतो हे आपणाला आता ज्ञात झालेले असेल तरी कान-नाक-घसा तज्ञ यांना हा रोग नवीन नाही. कोविडआधी हा रोग अनियंत्रित मधुमेह व एच.आय.व्ही. सारख्या रोग असणार्‍या व्यक्तींना व्हायचा. म्हणजे ज्याची प्रतिकार शक्ती अगदी कमी आहे त्यांनाच हा म्युकरमायकोसीसचा रोग व्हायचा. सोप्या शद्बात सांगायचे तर म्युकरमायकोसीस हे दुर्मिळ इन्फेक्शन आहे. ही बुरशी जमिनीवर, झाडावर, कुजलेल्या फळावर व सडलेल्या भाजीवर सापडते. जेव्हा आपण श्वास घेतो तेव्हा या बुरशीचे कण सर्वांच्याच नाकात जातात. पण प्रकृतीने स्वस्थ असलेल्या माणसामध्ये तिचे अस्तित्व आपणास जाणवत नाही कारण त्यांची प्रतिकारशक्ती दांडगी असते. आता प्रश्‍न हा पडतो की कोविडच्या पेशंटनाच हा रोग एवढ्या मोठ्या प्रमाणावर का होतो याचे उत्तर आपण पाहूया. याबाबत दोन महत्त्वाच्या गोष्टी कोविड पेशंटमध्ये आढळतात. पहिली म्हणजे कोविडमध्ये कमी होणारी प्रतिकारशक्ती आणि काही कोविड रुग्णांमध्ये आजारी असताना किंवा कोविड नंतर वाढणारा अनियंत्रित मधुमेह.

पुढील कोविड रुग्णांना म्युकरमायकोसीस आजाराची भीती असते.

 • अनियमित मधुमेह

 • स्टेरॉईडमुळे कमी होणारी प्रतिकारशक्ती

 • कोविडमध्ये देण्यात येणारे इन्जेक्शन टोस्लीझुमाब

 • जास्त दिवस अतिदक्षता विभागात राहणे.

 • जास्त दिवस नाकात नळी घालून ऑक्सिजन देणे.

 • कर्करोग किंवा ट्रान्सप्लान्ट सर्जरी

 • बरेच दिवस लागणारे प्रतिजैवके (अ‍ॅन्टीबायोटीक)

म्युकरमायकोसीस शरीरात एवढ्या वेगाने का पसरतो ?

मुळात हा रोग नाकाद्वारे (श्वसनाद्वारे) आपण जी हवा घेतो त्यात म्युकरमायकोसीस ही बुरशी सर्वसाधारणपणे वातावरणात असते. ज्या व्यक्तीला मधुमेह असतो आणि प्रतिकारशक्ती कमी झालेली असते त्या कोविड पेशंटच्या नाकात बुरशी जाते तेव्हा ती बुरशी वाढते ती नेमकी का वाढते? त्याचे मूळ अनियंत्रित मधुमेह किंवा कोविडच्या आजाराच्या काळात कोविडमुळे किंवा स्टेरॉइड थेरपीमुळे अचानक वाढलेली रक्तशर्करा (शुगर) यात दडले आहे. शरीरातील साखर वाढते (अचानक) तेव्हा रक्तपेशीमधून आयर्न (लोह) बाहेर पडते. तेच बुरशीचे खाद्य असते. हे म्युकरमायकॉसीस नाकातल्या रक्तवाहिन्यांमध्ये शिरते, सुरवातीला ते नाकाच्या आतल्या मांसल भागामध्ये जाते. अगदी सुरवातीला नाकामध्ये खपली येते ही खपली म्हणजेच म्युकरमायकोसीसची सुरवात. त्यानंतरही या स्टेजला उपचार नाही झाले तर ती नाकातून कवटीच्या पोकळ्यामधून (सायनस) पसरते, त्यानंतर ती रक्तवाहीन्याद्वारे डोळ्याकडे आणि शेवटी मेंदूकडे पसरते. परंतु यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की बुरशी रक्तवाहिन्यांमधून पसरत असताना रक्तवाहिन्यांना सूज येऊन परिणामी रक्तवाहिन्या बंद होतात आणि त्या भागाचा रक्तपुरवठा बंद होतो. रक्तपुरवठा न झाल्याने तो भाग कुजतो आणि हा नाकाचा अथवा डोळ्याचा भाग काळा होतो.

हे आपण कसे थांबवू शकतो?

 • वरील लक्षणे असणाऱ्यांनी नियमीतपणे कान, नाक, घसा तपासणी करावी.

 • साखर नियंत्रित ठेवावी.

 • साखर वेळच्यावेळी मॉनिटर करावी.

 • काही लक्षणे आढळल्यास त्वरीत डॉक्टरांना भेटावे.

याची लक्षणे काय आहेत?

 • नाकातून सतत पाणी येणे.

 • नाकातून रक्तस्त्रव होणे.

 • डोके दुखणे

 • डोळे दुखणे

 • एका बाजूचा चेहरा दुखणे किंवा बधीर होणे.

 • दात हालणे किंवा दुखणे

 • जेवण चावून खाताना त्रास होणे.

 • हिरड्यांना सूज येणे.

 • डोळ्यावर सूज येणे.

 • दोन-दोन गोष्टी दिसणे किंवा अंधुक दिसणे.

तपासणी -

सर्वात प्रथम नाकाची एन्डोस्कोपी करणे गरजेचे आहे. त्यानंतर नाकाचा व डोळ्याचा एमआरआय काढणे, जर म्युकरमायकोसीस हे निदान झाले तर त्चरीत उपचार घेणे आवश्यक आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तातडीने अ‍ॅन्टी फन्गल असणारे अम्फोटेरीसिन-बी हे प्रभावी औषध डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावे लागते. कारण या औषधाचा दबाव किडणीवर पडण्याची शक्यता असते, त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला न घेता परस्पर औषध घेणे हानिकारक ठरू शकते. जर हा रोग प्राथमिक अवस्थेत असेल तर कुठलीही शस्त्रक्रिया करायची गरज नसते. परंतु हा आजार नाकातून सायनस व डोळ्यापर्यंत पोचला असेल तर बुरशी बरोबर मृत झालेल्या पेशीचा सर्व भाग संपूर्णपणे काढावा लागतो. त्याशिवाय हे औषध प्रभावीपणे लागू होत नाही. पण यामुळे कोणीही घाबरू नये, हा रोग आपल्याला पूर्णपणे टाळता येतो किंवा प्राथमिक स्वरुपात असताना ऑपरेशनविना औषधाने बराही करता येतो. गरज आहे ती सजग राहण्याची. या प्रकारची कुठलीही लक्षणे जाणवली तर तुम्ही जिथे असाल तिथल्या वैद्यकीय तज्ञांचा सल्ला तातडीने घ्या आणि उपचारांसोबतच सकारात्मक विचार ठेवून यातून बाहेर पडा.

- डॉ. राहुल कुलकर्णी (ठाणे) कान-नाक-घसा तज्ञ