मधुमेह आहे? पावसाळ्यात जपा!

डॉ. रोशनी गाडगे
Friday, 29 June 2018

मधुमेह हा वर्षभरच काळजी घेण्याची आवश्‍यकता असलेला आजार आहे. पण पावसाळ्यात मधुमेहींनी विशेष काळजी घ्यावी लागते. 

मधुमेहामुळे कित्येकदा वेगळ्याच आजाराला सामोरे जावे लागते. ते टाळण्यासाठी मधुमेहींना वर्षभरच काळजी घेण्याची आवश्‍यकता असते. पण पावसाळ्यात मधुमेहींना विशेष काळजी घ्यावी लागते.

काय घ्याल काळजी?
पावसाळ्यात रस्त्यावरील खाद्यपदार्थ खाऊ नयेत, कारण ते तयार करण्याच्या प्रक्रियेतील स्वच्छतेची हमी देता येत नाही किंवा ते तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे पाणी किती शुद्ध आहे,  हे माहीत नसते.
फळे आणि भाज्या खाण्याआधी धुवून घ्याव्यात. तुम्ही बराच मोठा कालावधी बाहेर राहणार असाल तर तुमच्यासोबत घरचा अल्पोपहार घ्या.
तुमच्या आहारात लसूण, काळी मिरी, आले, हळद, जिऱ्याची पूड आणि कोथिंबीर यांचा वापर करा. कारण त्यामुळे अपचनाची समस्या उद्भवत नाही आणि तुमची प्रतिकारक यंत्रणा सुधारते.
पावसाळ्यात मधुमेहींनी आपल्या पायांची विशेष काळजी घ्यावी आणि अनवाणी चालू नये. कारण पावसाळ्यात माती हे सर्व प्रकारच्या जंतूंचे माहेरघर असते.
सामान्यपणे पावसाळ्यात वापरण्यात येणारी कठीण प्लास्टिकची पादत्राणे वापरू नयेत. 

पावसाळ्यात डबक्‍यातून किंवा गढूळ पाण्यातून चालू नका. घरी आल्यावर आंघोळ करा. तुमच्या पायाच्या बोटांमधील खोबणी/ जागा स्वच्छ धुवा.

मधुमेहींना संसर्ग लगेच होतो. त्याचप्रमाणे त्यांचे पाय बधीर होतात आणि संसर्गामुळे पायाला झालेल्या इजेमुळे होणारी वेदना त्यांना जाणवत नाही. पावसाळ्यात बूट वारंवार ओले होणे, मोजे दीर्घ कालावधीसाठी घालावे लागणे, यामुळे संसर्ग होण्याची जोखीम वाढते. जेव्हा तुम्ही तुमचे ओले पाय पुसता तेव्हा पायाच्या बोटांमधील जागा कोरड्या टॉवेलने स्वच्छ पुसल्या जातील, याची खातरजमा करा.

पावसातून घरी आल्यावर तुमचे पाय साबणाने स्वच्छ धुवा.

पावसाळ्यात खरचटणे, जखमा, ठेच लागणे, घट्टे पडणे आणि भोवरी होण्याची शक्‍यता वाढते. पावसाळ्यात पाय सूजणे आणि लालसर होण्याही प्रकार घडतात. त्यामुळे अशा काही लक्षणांवर बारकाईने लक्ष ठेवा. अशा प्रकारचे कोणतेही खाज येण्याचे, त्वचा शुष्क होण्याचे आणि खपल्या आल्याचे प्रकार घडले तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. अशी लक्षणे दिसली तर पेडिॲट्रिस्टची भेट घ्या.

पावसाळ्यात व्यायाम थांबवू नका. तुमच्या रक्तातील शर्करा नियंत्रणात ठेवण्यासाठी  दररोज किमान तीस मिनिटांचा व्यायाम आवश्‍यक आहे.

पावसाळ्यात पाण्यावाटे संसर्ग होण्याची खूप शक्‍यता असते. मळमळणे, उलटी होणे, अतिसार हे पाण्यावाटे होणारे विकार आहे. त्यामुळे भूक मंदावते. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते. त्यामुळे डिहायड्रेशन होऊन कमी कॅलरी असलेला आहार घेतला जातो. अशा परिस्थितीत जर मधुमेहाच्या औषधांचा डोस सुरू ठेवला तर हायपोग्लायसेमिया होऊ शकतो. वरीलपैकी कोणतीही लक्षणे आढळली तर तुमच्या डॉक्‍टरचा सल्ला घ्या.

सुटसुटीत सूती कपडे परिधान करा. फंगल इन्फेक्‍शन होण्याची शक्‍यता असलेल्या जागी अँटि फंगल टॅल्कम पावडर लावा.

दीर्घकाळापासून मधुमेह असलेल्या व्यक्तींना किंवा ज्यांच्या रक्तातील शर्करेच्या प्रमाणात चढ- उतार होत असतात, त्यांना संसर्ग होण्याची अधिक शक्‍यता असते. त्यामुळे तुमच्या आहाराच्या वेळापत्रक सोबत व्यायाम काटेकोरपणे सुरू ठेवा. त्याच बरोबर रक्तातील शर्करेचे प्रमाण नियमितपणे तपासून घ्या.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dr. roshani ghadge article Diabetes