स्थूलता: शरीरस्थ महारिपु !

अकरा ऑक्टोबर हा जागतिक स्थूलता अथवा लठ्ठपणा प्रबोधन दिन म्हणून साजरा केला जाणार आहे. त्या अनुषंगाने स्थूलता अर्थात लठ्ठपणा याविषयी थोडीशी माहिती करून घेणे सयुक्तिक ठरेल.
Obesity
ObesitySakal

- डॉ. सुरेश शिंदे (पुणे), MD, MNAMS, FISE, FICN, FASc

स्थूलतेचे मूळ कारण आहे अति-आहार. शरीराच्या गरजेपेक्षा जास्त खाणे, जास्त वेळा खाणे, गोड व पिष्टमय पदार्थ जास्त खाणे व व्यायाम न करणे यांमुळे स्थूलता निर्माण होते आणि आपली वाटचाल अनारोग्य आणि आजाराच्या दिशेने सुरू होते. म्हणूनच स्थूलता असल्यास तिचे निवारण करून पुन्हा निरोगी होणे यासाठी कसून प्रयत्न करणे अत्यावश्यक आहे.

अकरा ऑक्टोबर हा जागतिक स्थूलता अथवा लठ्ठपणा प्रबोधन दिन म्हणून साजरा केला जाणार आहे. त्या अनुषंगाने स्थूलता अर्थात लठ्ठपणा याविषयी थोडीशी माहिती करून घेणे सयुक्तिक ठरेल. लोकांना लठ्ठपणाबद्दल जागरूक करणे, हा या दिवसाचा उद्देश आहे. लठ्ठपणा आपल्या आरोग्यासाठी खूप हानिकारक आहे. लठ्ठपणामुळे उच्चरक्तदाब, मधुमेह, अर्धांगवायू, गुडघेदुखी, हृदयविकार यासारख्या गंभीर आजारांचा धोका वाढतो. देशातील पन्नास दशलक्षाहूनही अधिक लोक लठ्ठपणामुळे ग्रस्त आहेत. लठ्ठपणाचे मुख्य कारण म्हणजे जास्त प्रमाणात खाणे. कोणत्याही प्रकारचा व्यायाम न करणे आणि शारीरिक हालचालींमध्ये जास्त भाग न घेणे, हे देखील मुख्य कारण असू शकते. याशिवाय हार्मोन्समध्ये बदलाव, औषधे आणि आपल्या बदलत्या जीवनशैलीमुळे देखील ही समस्या उदभवू शकते. आपण जे अन्न खातो, त्यापासून आपल्याला शक्ती म्हणजे ऊर्जा मिळत असते.

आपल्या अन्नात कर्बोदके, प्रथिने आणि स्निग्ध पदार्थ यांचा समावेश असतो. आपण खाल्लेल्या अन्नामधील कर्बोदकांपासून ग्लुकोज निर्माण होते. हे ग्लुकोज आपल्या शरीरात ऊर्जा निर्माण करण्यास मदत करते. या ऊर्जेचा उपयोग करून आपल्या शरीराच्या जीवनावश्यक गरजा भागविल्या जातात. आहारामधील प्रथिनांपासून शरीरातील मांसपेशी व इतर पेशी तयार होतात व शरीराची वाढ होते. स्निग्ध पदार्थ कर्बोदकांच्या तुलनेने दुप्पट ऊर्जा निर्माण करू शकतात. शरीरामध्ये ग्लुकोज कमी पडल्यास स्निग्ध पदार्थ ऊर्जा पुरवू शकतात. शरीरामध्ये गरजेपेक्षा जास्त ग्लुकोज उपलब्ध असल्यास त्याचे रूपांतर स्निग्ध पदार्थामध्ये होते व ही अतिरिक्त ऊर्जा साठविली जाते, जिला आपण शरीरातील चरबी असे म्हणतो. म्हणजेच शरीराच्या गरजेपेक्षा जास्त अन्न सेवन केल्यास चरबी वाढते अर्थात स्थूलता निर्माण होते.

आपल्या शरीराची तुलना एखाद्या पेट्रोल आणि बॅटरी अशा दोन इंधनांवर चालणाऱ्या मोटारीशी करता येईल. मोटार चालू असताना पेट्रोलचा वापर करून बॅटरी चार्ज केली जाते आणि जेंव्हा पेट्रोल कमी असते किंवा जेंव्हा मोटारीला जास्त शक्तीची गरज असते तेंव्हा बॅटरीच्या अतिरिक्त ऊर्जेचा उपयोग केला जातो. म्हणजेच शरीरातील चरबीचा उपयोग अन्न उपलब्ध नसल्यास, अधिक शारीरिक श्रम व व्यायाम अथवा उपवास केल्यास केला जातो. सध्याच्या जीवनशैलीमध्ये आहाराची उपलब्धता मुबलक असल्याने, एकदा स्थूलता निर्माण झाली कि ती शरीरात कायमचीच ठाण मांडून रहाते. सतत वाढत जाणाऱ्या स्थूलतेचे रूपांतर आजारामध्ये होईपर्यंत ती काही ठरावीक अवस्थांमधून जाते. आहारातील स्निग्ध पदार्थांचे माफक प्रमाणात सेवन केल्याने जी स्थूल अवस्था निर्माण होते तिला ‘सुस्थूलता’ (हेल्दी ओबेसिटी) म्हणता येईल, कारण अशी स्थूलता शरीराला योग्य अशी गोलाई, सुंदरता देते. ही चरबी कोणत्याही शारीरिक क्रियेमध्ये अडथळा निर्माण करीत नाही. कर्बोदके म्हणजेच आटा, मैदा, किंवा कोणत्याही पिठापासून बनलेले पदार्थ गरजेपेक्षा जास्त खाल्यामुळे या कर्बोदकांपासून शरीरामध्ये इन्शुलिनच्या मदतीने चरबी तयार केली जाते.

हि ‘शरीरनिर्मित चरबी’ शरीरामध्ये अनेक रासायनिक बदल घडविते. या चरबीमुळे रक्तातील चरबी, कोलेस्टेरॉल वाढते, रक्तदाब वाढतो आणि हृदयविकारासारखे मोठ्या रक्तवाहिन्यांचे आजार उद्भवतात. या स्थूलतेला ‘कु-स्थूलता’ अथवा ‘अनहेल्थी ओबेसिटी’ म्हणतात. स्थूलतेला अानुवंशिकता हे हि एक कारण असू शकते. काही कुटुंबांमध्ये लठ्ठपणा पिढीजातपणे आढळतो तो या कारणामुळेच! प्रत्येक व्यक्ती त्याच्या शरीरामध्ये किती चरबी साठवू शकेल हे हि अनुवंशिकतेने ठरविले जाते.

जेंव्हा शरीरामधील चरबीचा साठा या क्षमतेपेक्षा जास्त होतो तेंव्हा अशी अतिरिक्त चरबी यकृत, हृदय, स्वादुपिंड आणि स्नायू या पेशींमध्ये साचू लागते. पोटाचा घेरा वाढतो. ही आगंतुक चरबी शरीरातील इन्शुलिन कमी करते आणि रक्तातील साखर वाढवते. म्हणून स्थूलतेच्या या अवस्थेला ‘मधु - स्थूलता’ अथवा ‘डायबेसिटी’ असे म्हणतात. येथेच सुरु होतो मधुमेह अर्थात डायबेटिस ! रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण वाढल्यामुळे मधुमेह आणि लहान रक्तवाहिन्यांचे आजार उद्भवतात. प्रदीर्घ काळ मधुमेह अनियंत्रित राहिल्यास हृदय, मूत्रपिंड, डोळे, मेंदू आणि मज्जातंतूंचे आजार होतात. स्थूलतेचे मूळ कारण आहे अति- आहार. शरीराच्या गरजेपेक्षा जास्त खाणे, जास्त वेळा खाणे, गोड व पिष्टमय पदार्थ जास्त खाणे व व्यायाम न करणे यांमुळे स्थूलता निर्माण होते आणि आपली वाटचाल अनारोग्य आणि आजाराच्या दिशेने सुरु होते. म्हणूनच स्थूलता असल्यास तिचे निवारण करून पुन्हा निरोगी होणे यासाठी कसून प्रयत्न करणे अत्यावश्यक आहे.

स्थूलता येऊच नये यासाठी आरोग्यविषयक जागरूकता असणे आवश्यक आहे. प्रत्येकाने आपल्या दैनंदिन दिनचर्येनुसार संतुलित आणि समतोल आहार घेतला पाहिजे. काय खावे आणि किती खावे या विषयी आपल्या फॅमिली डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. आहारामध्ये पिष्टमय पदार्थ कमी करून प्रथिने व माफक प्रमाणामध्ये स्निग्ध पदार्थांचा समावेश असणे महत्वाचे आहे. दररोज अर्धा तास व्यायाम केल्यास ऊर्जा खर्च होते व रक्तवाहिन्यांचे आजार टाळता येतात. जेवण म्हणजे केवळ पोट भरणे नसून तो एक ‘अन्न-संस्कार’ असून त्या अन्नाचे महत्त्व श्री समर्थ रामदास स्वामी यांनी महाराष्ट्रातील घरोघरी पोहोचवले आहे. ‘जीवन करि जिवित्वा अन्न हे पूर्णब्रह्म । उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म ॥’

या उक्तीचा अर्थ स्थूलतेच्या नव्या संदर्भामध्ये लावणे आज जरुरीचे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com