esakal | पॅनिक अटॅकवर करूया मात !
sakal

बोलून बातमी शोधा

Panic Attack

पॅनिक अटॅकवर करूया मात !

sakal_logo
By
डॉ. विद्याधर बापट, मानसोपचारतज्ज्ञ

पॅनिक अटॅकची लक्षणं मानसिक आणि शारीरिकसुद्धा असतात त्यामुळे साहजिकच व्यक्ती त्याला हृदयविकाराचा झटका असू शकेल असं मानते अन डॉक्टरांकडे त्यासाठी धाव घेते. सुरुवातीला हे योग्यच आहे. कारण खरोखर काही हृदयासंदर्भातलं दुखणं नाहीना ही खात्री करून घेणं आवश्यक असतं.

हल्लीच्या धकाधकीच्या जीवनात बऱ्याचजणांना पॅनिक अटॅक चा त्रास आढळत असल्याचे निदर्शनास आले आहे. कधी कधी असा त्रास एकदाच होतो किंवा अनेकवेळा होतो. विशिष्ट प्रसंगाला तोंड द्यायची वेळ आली तरी हा अटॅक येण्याची शक्यता काही जणांच्या बाबतीत असते. उदा. भूतकाळातले त्रासदायक प्रसंग जिथे घडलेत अशा जागी जायचं असेल तर, मोठया समुदायापुढे बोलायचा प्रसंग येणार असेल तर, कुणाच्या मृत्यूची बातमी ऐकली किंवा तसा विचार आला तर, तसं आपल्या बाबतीत तर होणार नाही नं असं विचार मनात डोकावला तर वगैरे. कधीकधी पॅनिक डिसॉर्डर ही दुसऱ्या एखाद्या आजाराबरोबर असू शकते उदा. नैराश्याचा आजार, सोशल फोबिया इत्यादी.

पॅनिक अटॅक ची लक्षणं साधारणपणे दहा मिनिटे तीव्रपणे टिकतात. क़्वचित तासाभारापर्यंत. नंतर ती ओसरायला लागतात. व सगळं पूर्ववत होतं. साधारण पुढील लक्षणं जाणवतात. - १. श्वास घ्यायला त्रास होणं, विलक्षण घुसमट होणं २. छातीत धडधड ३. छातीत दुखणं ४. हातपाय कापणं ५. आजूबाजूच्या वातावरणापासून आपण तुटतोय असं वाटणं ६. भरपूर घाम येणं ७. मळमळणे, उलटी होणे, पोट अचानक बिघडणे, चक्कर येणे ८. शरीर बधीर झाल्यासारखं वाटणं, बेशुद्ध होतोय असं वाटणं ९. आणि मुख्य म्हणजे मृत्यूची भीती वाटणं. जे होतंय ते आपल्याला मृत्यूकडे घेण चाललंय अशी भीती वाटणं. १०. जेंव्हा व्यक्ती स्वस्थ असते तेंव्हाही मनाच्या कोपऱ्यात, पुन्हा कधीतरी असंच होईल ह्याची भीती वाटत रहाणं.

पॅनिक अटॅकची लक्षणं मानसिक आणि शारीरिकसुद्धा असतात. त्यामुळे साहजिकच व्यक्ती त्याला हृदयविकाराचा झटका असू शकेल असं मानते अन डॉक्टरांकडे त्यासाठी धाव घेते. सुरुवातीला हे योग्यच आहे. कारण खरोखर काही हृदयासंदर्भातलं दुखणं नाहीना ही खात्री करून घेणं आवश्यक असतं. काही शारिरीक व्याधींमुळे अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण होऊ शकते. उदा. हृदयाच्या संदर्भातला प्रॉब्लेम, थायरॉईड ग्रंथीच्या समस्या, रक्तातील साखर एकदम कमी होणे, उत्तेजकाची सवय, अचानक काही औषधे बंद करणे वगैरे. परंतु एकदा तज्ञ डॉक्टरांनी निर्वाळा दिला की कुठलाही शारीरिक आजार नाहीय व हे अस्वस्थतेच्या आजारामुळे होतंय की त्याच्यावर विश्वास ठेवून त्या विषयातल्या तज्ञांकडे जाणे महत्वाचे आहे. पण बऱ्याचदा ही डिसॉर्डर असलेल्या व्यक्तींना एका डॉक्टर कडून दुसऱ्या डॉक्टरकडे जाणे, पुन्हा पुन्हा महागडया तपासण्या करत रहाणे ह्याची सवय असते. कारणे - मेंदूतील रासायनिक बदल, अनुवंशिकता, दुर्बल व्यक्तिमत्व अशा अनेक गोष्टींमुळे पॅनिक डिसॉर्डर निर्माण होऊ शकते . ज्यांना सोशल फोबिया किंवा इतर डिसॉर्डर्स आहेत त्यांच्या बाबतीत हे निर्माण होण्याची शक्यता जास्त असते.

तसेच भूतकाळातील, लहानपणातील भीतीदायक दुर्घटना, जवळच्या किंवा ओळखीच्या लोकांच्या बाबतीत घडलेले अपघात, त्यांच्याकडे वस्तुनिष्ठ दृष्टीकोनातून न पाहता येणे आणि त्यातून निर्माण झालेली असुरक्षितता ही कारणे देखील असू शकतात. उपचार - ह्या डिसॉर्डरमधे औषधोपचाराबरोबरच भरपूर नियमित चल पद्धतीचा शारीरिक व्यायाम ज्यायोगे नैसर्गिकरित्या सेरोटोनीन स्त्रवेल, योगासने, सायकोथेरपीज, रिलॅक्सेशन थेरपीज, माइंडफुलनेस थेरपीज, माइंडफुलनेस बेस्ड सी.बी.टी चा उपयोग होतो.

एक्सपोजर थेरपी, भीतीच्या निर्बलीकरणाचे तंत्र ह्या थेरपी मध्ये डिसॉर्डर ग्रस्त व्यक्तीला टप्प्याटप्प्याने भीतीचा सामना करायला शिकवलं जातं. त्या दरम्यान श्वसनावर लक्ष केंद्रित करणं, मनात सकारात्मक प्रतिमा आणणे, वर्तमान क्षणात रहाण्याचा प्रयत्न करणं अशा अनेक तंत्रांचा वापर करायला तज्ञ शिकवतात. स्वस्थतेच्या अनेक तंत्रांपैकी आपल्या मानसिक मेकअपला, स्थितीला अनुकूल अशा तंत्राचा वापर करणे, श्वासाच्या तंत्रांचा वापर करणे इत्यादी गोष्टी केल्या जातात. तसेच जोडीला सकारात्मक व्हिज्युअलायझेशन तंत्राचा वापर आणि इतर थेरपीजच्या सहाय्याने मृत्युच्या भीतीवर मात करायला, भीतीतला फोलपणा जाणवून घ्यायला शिकवलं जातं. अस्वस्थतेवर मात करायला शिकवलं जातं. मॉडेलिंग थेरपीज - ह्यामध्ये ज्या लोकांनी वेगवेगळ्या भीतीवर मात केली त्यांचे सकारात्मक प्रेरणादायी अनुभव, व्हीडीओज दाखवून प्रोत्साहन दिलं जातं. तसं करायला प्रवृत्त केलं जातं. कॉग्निटिव्ह बिहेवियर थेरपी मधे व्यक्तीला त्याचं नकारात्मक विचारचक्र, विचार पद्धती आणि त्यातून घडणारी नकारात्मक वर्तणूक बदलायला शिकवलं जातं. सकारात्मक विचारपद्धती आणि सकारात्मक वर्तणूक पद्धती रुजवायची कशी हे शिकवलं जातं.

बऱ्याचवेळा ह्या उपचार पद्धती जोडीनं वापरल्यास उपयुक्त ठरतात. ज्यावेळी पॅनिक अटॅक येतो त्याक्षणी कुठले विचार मनात आणायचे ह्याचं प्रशिक्षण महत्वाचं ठरतं. उदा. मला आता जो त्रास होतोय तो मेंदूतील जैविक रसायनांच्या असंतुलनामुळे होतोय. जरी धडधडणे, श्वास न पुरणे इत्यादी गोष्टी होत असल्या तरी त्याचा हृदयविकाराशी संबंध नाही. ती केवळ माझ्या मानसिकदृष्ट्या अस्वथ असण्याच्या स्थितीला शरीरानं दिलेली प्रतिक्रिया आहे. मला कुठलाही धोका नाही, माझ्या जीवाला धोका नाही त्यामुळे मी लक्षणांकडे दुर्लक्ष करायला हवं. साक्षी भावानं मी ही लक्षणे पाहून सोडून द्यायला हवी व माझं लक्ष दुसरीकडे वाळवायला हवं. ह्या पद्धतीचे विचार करण्याचं प्रशिक्षण द्यायला हवं. प्रत्यक्ष अटॅकच्या वेळी हे विचार सुचणे, ते टिकून राहणे आणि भीतीवर मात करायला मदत होणे ह्यासाठी काही तंत्र शिकून घ्यावी लागतात. स्वत:ला सतत प्रोत्साहित करावं लागतं. योग्य पद्धतीने वेळीच पद्धतशीर उपचार केले आणि स्व-मदत केली तर ह्या डिसॉर्डरवर मात करणे शक्य होतं . नव्यानं मोकळ्या स्वस्थ आयुष्याला सुरवात करता येते.

loading image
go to top