पावसाळ्याचा आनंद !

डॉ. श्री बालाजी तांबे www.balajitambe.com
Friday, 6 July 2018

भिजायला गेल्यावर भजी, चहा घेण्यास हरकत नाही, पण पिण्यासाठी बरोबर थर्मासमध्ये उकळलेले पाणी नक्की न्यावे. वयाला अनुकूल गोष्टी अवश्‍य कराव्यात, पण त्यामुळे नंतर आरोग्य बिघडू नये, शाळेच्या सुरवातीलाच सुटी घ्यायला लागू नये, हे पाहणे तितकेच आवश्‍यक असते. पावसाची सर अंगावर घेताना बरे वाटते, पण नंतर वारा लागला वा नीट अंग पुसण्याची काळजी घेतली नाही, तर आरोग्याच्या दृष्टीने बाधक ठरते. अर्थात, रोजच पावसात भिजणे आरोग्यासाठी चांगले नाही, तेव्हा तेही तारतम्य बाळगणे आवश्‍यक असते.

पावसाळा सुरू होण्यापूर्वी दर वर्षी हवामान खाते पावसाचे आगमन लवकर होणार, उशिरा होणार, सरासरीपेक्षा कमी येणार, जास्ती येणार असे नाना तऱ्हेचे अंदाज वर्तवीत राहते. हे अंदाज कधी बरोबर असतात, कधी चुकतात. पण या सर्वांतून दरवर्षी पावसाळा येतो हे मात्र नक्की आणि पावसाळा यावा असे सर्वांनाच वाटत असते, लहान-थोर सर्वच वरुणराजाची वाट पाहत असतात. पहिल्या पावसात भिजण्याची मजा तर काही औरच असते. लहान मुले तर अंगणात गोल गोल फिरून अंगावर पाऊस झेलतात. गोल फिरल्यामुळे पाऊस आणखीनच जोराने अंगावर आल्याचा भास होतो.

तरुणांसाठी सुद्धा पावसाळा हा पर्वणीचा काळ. लोणावळा, खंडाळासारख्या ठिकाणी जाऊन तेथील डोंगर-दऱ्यांत भटकताना पावसात मनसोक्‍त भिजण्यात काही वेगळाच आनंद असतो. पूर्वी पाऊस जास्त असणाऱ्या महाबळेश्वरसारख्या ठिकाणी पावसाळ्यात सामसूम असे. पण अलीकडे चहू अंगांनी पावसाळ्यात प्रकट होणाऱ्या निसर्गाची मजा लुटण्यासाठी व पावसात भिजण्यासाठी अशा ठिकाणी येणाऱ्यांची झुंबड उडालेली दिसते. हिवाळ्यात पृथ्वी व जलतत्त्वांच्या संयोगातून निर्माण होणाऱ्या धुक्‍यामुळे काही दिसत नाही आणि थंडीमुळे कुडकुडायला होते, तर उन्हाळ्यात सूर्य त्याच्या अग्नितत्त्वाने भाजून काढतो. पावसाळ्यात मात्र पृथ्वी व आकाश ही दोन्ही तत्त्वे कार्यान्वित असतात. आकाशातून पडते पावसाचे पाणी आणि पृथ्वीतून येतात वर अंकुर. त्यामुळे पुढे पृथ्वीला हिरव्यागार रंगाचा शालू नेसून नटता येते. उन्हाळ्यात भाजणाऱ्या उन्हाने सर्व काही जळून गेले आहे असे वाटले तरी वर्षा ऋतूत सगळीकडेच हिरवेगार होते. म्हणून वर्षाऋतूचे आकर्षण नसणारा विरळाच. पावसाळा सर्वांच्याच उत्साहाला उधाण आणणारा असतो. 

पावसाळ्यात लोणावळा, खंडाळ्याला भटकायला जाण्यात, तेथे ओलेचिंब होण्यात, वाटेतल्या एखाद्या टपरीवर गरमागरम भजी खाण्यात व चहा पिण्यात काही एक वेगळाच आनंद असतो. अर्थात, या ठिकाणच्या तलाव वा नदी-धरणांच्या खोलीची माहिती नसल्याने, वा तेथील जमिनीचा चिकटपणा, भुसभुशीतपणा माहीत नसल्याने काही अपघात होणार नाही, याकडे लक्ष ठेवावे लागते. पावसात भिजल्यानंतर गार वारा लागल्यावर सर्दी होणे, कफ वाढणे साहजिक असते पण त्याला घाबरून जायचे नसते. पावसाळ्यापूर्वीच प्रकृतीनुरूप इलाज करून घेतल्यास त्रास वाचू शकतो. भिजण्याचा आनंद उपभोगल्यावर शरीराला थंडी बाधू नये, यादृष्टीने भिजल्यानंतर डोके व्यवस्थित पुसून घेणे आवश्‍यक असते, त्यानंतर आले व गवती चहा घालून केलेला गरम चहा, जमल्यास आलेपाक वा गूळ-सुंठीची गोळी घेणे आवश्‍यक असते.  

वातावरणातील प्रदूषण, धूलिकण पावसाबरोबर खाली येत असल्याने व जमिनीवर साठलेला कचरा पाण्याबरोबर वाहून येत असल्याने पावसाळ्याच्या सुरवातीला नदी-नाल्यांचे पाणी पिऊ नये असे शास्त्र आहे. त्यामुळे उकळलेले गरम पाणी पिणे हे पावसाळ्यातील सर्वांत मोठे पथ्य आहे. म्हणून भिजायला गेल्यावर भजी, चहा घेण्यास हरकत नाही पण पिण्यासाठी बरोबर थर्मासमध्ये उकळलेले पाणी नक्की न्यावे. वयाला अनुकूल गोष्टी अवश्‍य कराव्यात पण त्यामुळे नंतर आरोग्य बिघडू नये, शाळेच्या सुरवातीलाच सुटी घ्यायला लागू नये हे पाहणे तितकेच आवश्‍यक असते. पोहताना पाण्यात असेपर्यंत बरे वाटते, पण बाहेर आल्यावर गार वारा लागतो किंवा डोक्‍यावर सूर्य असला तर एकदम शरीर तापते. तसेच पावसात भिजण्याचेही आहे. पावसाची सर अंगावर घेताना बरे वाटते, पण नंतर वारा लागला वा नीट अंग पुसण्याची काळजी घेतली नाही तर आरोग्याच्या दृष्टीने बाधक ठरते. अर्थात, रोजच पावसात भिजणे आरोग्यासाठी चांगले नाही, तेव्हा तेही तारतम्य बाळगणे आवश्‍यक असते. 

एकूणच पावसाळा सुरू होईल व जसजसा आपले खरे स्वरूप प्रकट करायला लागेल तसतसा शरीरात वात वाढू लागतो व वात येऊ लागतो. उन्हाळा संपून पावसाळा कधी येईल याची ज्याप्रमाणे माणूस वाट राहतो त्याचप्रमाणे पावसाळा केव्हा संपेल याची वाट बघणे सुरू होते. पावसाळ्यात रोगराई बळावते, वात वाढल्यामुळे सर्व प्रकारच्या आजारी माणसांना पावसाळी हवामान चांगले नसतेच. शरदाचे चांदणे केव्हा येईल याची चातकासारखी वाट पाहणे सुरू होते. त्रिदोषांचे असंतुलन करणारा पावसाळा नकोसा वाटणे साहजिक आहे. 

तेव्हा पावसाचा आनंद भरपूर घ्यावा, पण या काळात काही मर्यादा ठेवली व काळजी घेतली तरच आरोग्य उत्तम राहील.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: enjoy monsoon