वैद्यकीय शोधांचा रुग्णलाभ

डॉ. पद्माकर पंडित
Friday, 11 May 2018

वैद्यकीय संशोधनाच्या क्षेत्रात गेल्या काही वर्षांत मोठी प्रगती झाली आहे. साहजिकच रुग्णांना त्याचा मोठा लाभ मिळत आहे. आयुष्य दीर्घ व सुखकर होते आहे.

वैद्यकातील संशोधनाचे क्षेत्र अक्षरशः अफाट आहे. शिवाय ते फक्त वैद्यकशास्त्रांशीच संबंधित नसून इतरही विषयांत पसरलेले आहे. उदा. कला, मानव्य, वाणिज्य, भौतिक, रसायन, जीव इत्यादी शास्त्रे आणि अगदी गणितसुद्धा. एखाद्या नव्या औषधाचे नाव भाषेतून येते. एखाद्या साथीविरुद्धचे धोरण ठरवायला मानव्य शाखांचे तज्ज्ञ सहकार्य करतात. रुग्णोपचाराचे आणि आरोग्यविम्याचे वेगळे अर्थशास्त्र आहे. 

चाचण्यांना आवश्‍यक तसेच नवीन औषधी द्रव्ये रसायन वा जैवतंत्रज्ञ निर्मितात. क्ष-किरणासारखी नैदानिक प्रतिमांकने भौतिकशास्त्राची देणगी आहेत. वैद्यकीय संशोधनाचे निष्कर्ष संख्याशास्त्राच्या आधारे सिद्ध होतात. सारांश, वैद्यकीय संशोधन हे बहु तसेच आंतरशाखीय स्वरुपाचे असते. वैद्यक क्षेत्रातील शोधांचा आवाका प्रचंड आहे. शेकडो विषयांवरील हजारो नियतकालिकांमध्ये लाखो शोधनिबंध दरवर्षी प्रकाशित होतात. त्यातील सर्वच लगेच मान्य होण्यासारखे किंवा अगदी उद्याच रुग्णोपयोगी ठरणारे नसतात. कारण एखादी कल्पना वा मुद्दा ध्यानात आल्यापासून ते त्याचा प्रत्यक्ष स्वास्थ्यसेवेत वापर होण्यासाठी शेकडो माणसे कित्येक वर्षे राबतात, तसेच अक्षरशः अब्जावधीचा खर्च होतो. प्रारंभ होतो तो एखाद्या प्रश्नाला उत्तर म्हणून सुचलेल्या कल्पनेपासून. सर्वप्रथम त्या कल्पनेसंबंधीचे किमान आवश्‍यक वाचन व त्याची रास्त समीक्षा करायची. यापूर्वी सदर बाबत जगभरात कुणी काय काम केले आहे त्याचा आढावा घ्यायचा. कारण त्याशिवाय प्रकल्पात नेटकेपण येत नाही. त्यानंतर करावयाच्या संशोधनाची ठोस योजना मांडावी लागते. सक्षम तज्ज्ञ व समित्यांसमोर सादर करून तिला मंजुरी घ्यावी लागते. प्रकल्पांसाठी खर्चाची व्यवस्था करावी लागते. तज्ज्ञ समित्या वास्तव, शक्‍यता व लाभ-हानीचा अभ्यास करुन, जरूर ते बदल सुचवून प्रकल्प (आवश्‍यकता असल्यास सुधारणा/ बदलांसह) मंजूर वा रद्द करतात. शिवाय यावर संबंधित सरकारी संस्थांचेही नियंत्रण असते. अधिकृत परवानगी खेरीज वैद्यकीय संशोधन करता येत नाही.

लोकांच्या मनात वैद्यकीय संशोधनात रुग्णांना लघुवराहा(गिनी पिग)प्रमाणे वागवले व वापरले जाते, असा एक गैरसमज सर्रास आढळतो. असंतुलित पूर्वग्रहदूषित प्रचाराने तो फोफावला आहे. वैद्यकीय संशोधनात माणसांचीच काय पण प्रयोगप्राण्यांचीही विशेष काळजी घेतली जाते. यासंबंधीची मार्गदर्शक तत्त्वे, नियम व कायदे कठोर आहेत. म्हणजे संशोधनात वावगे असे काही घडतच नाही असे नव्हे. पण गंभीर काही घडण्याची शक्‍यता दुर्मिळ असते. आणि तुलनेत संशोधनाचे लाभ कित्येक पटींनी जास्त असतात. वैद्यक संशोधनांचे लाभ जगजाहीर आहेत. मृतदेह विच्छेदनातून मानवी शरीर रचना ज्ञात होते. शरीरक्रिया व जीवरसायनाने त्याच्या कार्य प्रक्रियांचा छडा लागतो. विकृतीशास्त्र रोगांचे मूळ व वृद्धी वर्णिते. सूक्ष्मजीवशास्त्र संसर्ग व प्रतिशक्ती संबंध विषद करते. औषधशास्त्र उपचारावर लक्ष केंद्रित करते. तर समाज वैद्यक एकूणच समाजस्वास्थ्यासाठी कार्यरत असते. तर न्यायवैद्यकात दोन्ही क्षेत्रांच्या आंतरसंबंधांवर प्रकाश टाकलेला असतो. हे आठ विषय चिकित्सापूर्व व पराचिकित्सात्मक होत. म्हणजे त्यात नेहेमी थेट रुग्णसेवा नसली तरी ती मूलभूत शास्त्रे असून त्यांच्या भरभक्कम पायावर आधुनिक वैद्यकशास्त्र डौलात उभे आहे.

या विषयांतील बरेच संशोधन प्रयोग शाळेत, प्राणी/ऊती/ पेशीं, मृतदेह यावर केले जाते. त्याने पुढे करायच्या रुग्णांवरील (चिकित्सक) अभ्यासाचा नेमका अंदाज घेतला जातो. त्यातून निर्माण होणारे नवे शोध किती उपयुक्त व त्रासदायक असतील, याचा सैंद्धांतिक हिशेब मांडला जातो. तो स्पष्टपणे मानवी जीवनाच्या हिताचा असेल तरच माणसावर ते संशोधन आजमावले जाते. त्याचे सुप्रभाव व अपप्रभाव, विश्वासार्हता, संवेदकता, अचूकता आदी आवश्‍यक मापदंड वारंवार मोजले जातात. हे जितक्‍या काटेकोरपणे केले जाईल त्यावर संशोधनाचा दर्जा ठरतो. नव्या शोधाचे प्रभाव, उपयोग, त्रास अप्रत्यक्षरीत्या सिद्ध होत असतील तर तसेच केले जाते. स्वयंसेवक वा रुग्ण सहभाग असणारे अभ्यास अगदी कमी असतात. त्यातही फार जोखीम असणारे संशोधन जीवनावश्‍यक असेल अशा अपवादात्मक बाबींसाठीच केले जाते. कारण ते करणे आवश्‍यकच असते. वैद्यकीय संशोधनाची ध्येयदिशा सुस्पष्ट असल्याने कारणपरत्वे त्याचा वेग वाढवता येतो. उदा. विषाणू संसर्ग संहारक औषधांची वा प्रतिबंधक लसींची निर्मिती करण्याची तंत्रे उत्तम विकसित झाल्याने अचानक उद्भवणाऱ्या नवीन विषाणू संसर्गांवर लवकर मात करणे शक्‍य होऊ शकते. उदा. एड्‌स नियंत्रक उपचार शोधण्यास जेवढा काळ लागला, त्याहून बराच कमी स्वाईन फ्ल्यू रोधी लस  निर्मितीला लागला.

वैद्यक संशोधनाच्या काही प्रचलित यशस्वी पद्धती आहेत. उदा. एखाद्या रोगावरील उपलब्ध औषधाच्या रेणू रचनेत विशिष्ट बदल करून त्याचा सुप्रभाव वाढवणे वा दुष्परिणाम कमी करणे शक्‍य होते. अशा प्रकारे कितीतरी जुन्या औषधांपासून अधिक प्रभावी व/वा सुरक्षित औषधे निर्माण केली व वापरात आली आहेत. केवळ उपचारच नव्हे, तर रोगनिदान पद्धतीतही सोप्या जलद प्रक्रियांचा मागोवा घेता येतो. उदा. रुग्ण आता स्वत: घरीच बोटाला सुई टोचून बाहेर येणाऱ्या रक्तथेंबावर छोटी विशेष रसायनयुक्त पट्टी ठेवून एका यंत्रांच्या सहाय्याने आपली रक्तशर्करा सहज मोजू शकतो. वैद्यक यंत्रसामुग्री व उपकरणातही विस्मयकारी क्रांती म्हणावी असे संशोधन झाले आहे. शिरेतून थेंबथेंब द्यावयाच्या द्रवणाचे नेमके प्रमाण व गती निश्‍चित करण्यापासून ते रुग्णाला नेमके हवे तेवढे कृत्रिम श्वसन देणाऱ्या यंत्रांपर्यंत ही मजल  गेली आहे. 

शस्त्रक्रियांच्या वा तत्सम उपचार क्रियांच्या तंत्रातही अभूतपूर्व नावीन्य आले आहे. विविध दुर्बिणींनी आतील बऱ्याच भागात लीलया पोचत शरीराची कापाकापी व शिवणाची गरज अगदी मर्यादित करून टाकली आहे. आता यंत्रमानवामार्फत उपचार होण्याचे युग अवतरते आहे. पूर्वी भक्षक गणलेले अनेक आजार आज आटोक्‍यात आहेत, आयुष्याची दीर्घता व दर्जा वाढला आहे. काही रोग हद्दपार झाले तर कित्येकांचे दमन केले गेले आहे. सर्वसामान्य माणसाचे स्वास्थ्य सुधारले व सुधारते आहे. अद्याप ज्या दुर्धर रोगांवर हवा तसा विजय मिळाला नाही, त्या क्षय, हिवतापादि संसर्गांना काबूत आणण्याचे प्रयत्न जारी आहेत. बहुतांश व्याधीपीडा व मृत्यूंना कारणीभूत हृद्विकार, मधुमेहादि आयुष्यभरचे, कधीच बरे न होणारे विकार व तद्‌जन्य गुंतागुंतींना आळा घालण्याचे उपाय शोधाले जात आहेत. संगणक, आंतरजाल व कृत्रिम बुद्धी यांच्या माध्यमातून आधुनिक चिकित्सा अधिकाधिक गरजूंपर्यंत पोचविण्याची तजवीज होत आहे. नवनव्या निदानोपचारांचे प्रत्यक्ष लाभ समाजात पोचतात, त्या वैद्यकीय शिक्षण व आरोग्य सेवांचे सातत्याने मूल्यांकन व आधुनिकीकरण होत आहे.

१०४४ कोटी डॉलर - सर्वांत मोठ्या वैद्यकीय उत्पादन कंपनीची उलाढाल (२०१७)
22 लाख- वैद्यकीय संशोधक म्हणून नव्या नोकऱ्या (२०१७)

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Family doctor 750 issue Medical benefits of medical research