टेलिव्हिजनचं व्यसन

डॉ. श्रीकांत चोरघडे
Friday, 11 May 2018

मुलांना टेलिव्हिजनच्या दुष्परिणामांपासून दूर ठेवणं हे केवळ पालकांच्या हाती असतं. सध्या बाल्यावस्थेत असलेल्या मुलामुलींना टेलिव्हिजन व मोबाईल या गोष्टींपासून दूर ठेवणं ही काळाची गरज आहे.

नुकतीच एक बातमी वाचण्यात आली, टीव्हीवर पण बघायला मिळाली. त्या बातमीमध्ये केंद्र शासनाने कार्टून वाहिन्यांवरील जंकफुडच्या जाहिरातींवर बंदी घातल्याची माहिती होती. बातमी निविर्वादपणे सकारात्मक आहे. या प्रश्‍नाकडे शासनाचं लक्ष गेलं हे निश्‍चितच आनंदायक आहे. या प्रश्‍नाशी निगडित अनेक घटक आहेत, त्यामुळे या स्तुत्य उपक्रमाचा परिणाम कितपत होईल याबद्दल मी साशंक आहे.

पहिली गोष्ट म्हणजे मुलं केवळ कार्टुन नेटवर्क बघतात हे अर्धसत्य आहे. ज्या घरी काटेकोर नियम नसतील तिथे मुलं मोकळा वेळ असेल तेव्हा टीव्हीसमोर दिसतात. मुलं रिमोट वापरतात. याचा अभिमान वाटणारेही पालक असतात. मुळात तान्हं मूल टीव्ही बघायला शिकतं ते आईच्या मांडीवरून. आई बघत असते तेव्हा! या शिशुंना तीन-चार महिन्यांत नजर येते तेव्हा चमकणाऱ्या गोष्टी, रंगीत गोष्टी बघायला त्यांना आवडतात. टीव्हीचा पडदा तर घडोघडी रंग बदलणारा असतो. त्यासोबतच या वयात कर्णोद्रियंसुद्धा आवाज ऐकायला आसुसलेली असतात. त्यामुळे या दोन्ही गोष्टी तान्ह्या मुलाचं लक्ष वेधून घेतात. हळूहळू टीव्ही बघणं त्याला आवडायला लागतं. मूल टीव्ही बघतं याचा आईवडिलांना अभिमान वाटतो; पण हा वृथा अभिमान असतो. मूल एका अभासी जगाच्या आधीन होऊ लागलं आहे हे त्यांच्या लक्षात येत नसतं. त्यांचं मनोरंजनाचं जग केवळ टीव्हीच्या पडद्याच्या आकाराइतकं आकसतं आहे हेही पालकांच्या लक्षात येत नाही.

मूल थोडं मोठं होतं तेव्हा खूप चंचल असतं. त्याला खेळायला आवडतं, मस्ती करायला आवडतं. या काळात जर आईला घरात कामं असली तर बाळाला टीव्हीसमोर बसवते व आपले कामं करते. ती बदलती चित्र, इंद्रधनुष्यासारखे रंग व टीव्हीमधून येणारा आवाज त्यातला अर्थ कळला नाही तरी या गोष्टी या वयातील बालकांना खिळवून ठेवतात. काही आया तर मुलाला टीव्हीसमोर बसवून त्याला अन्न भरवतात, काही वेळा रिमोट पण मुलांच्या हाती दिला जातो.

यानंतर वय येतं आकलनशक्ती वाढण्याचं. या काळात लहान लहान वाक्‍यं, शब्द बोलायला, ऐकायला, पाठ करायला बालकांना आवडू लागतं. ताल व सूर ऐकायला आवडतात, त्यामुळे जाहिराती बघायला, ऐकायला आवडतात. त्या पुन्हा पुन्हा लागत असल्याने जर तालबद्ध, सुस्वर असतील, तर पाठ होतात व पुन्हा पुन्हा पाहायला आवडतात. त्यामुळे काही जाहिराती पाठ पण होतात. आईवडील कौतुक करीत पुन्हा म्हणायला लावतात. पाच-सहा वर्षांच्या पुढे मालिकांच्या अर्थ कळत नाही; पण जाहिराती कळतात. शक्ती वाढविणारी औषधं व खाण्यापिण्याचे पदार्थ. लोकांनी पदार्थ विकत घ्यावे हा उद्देश जाहिरातकर्त्यांना असतोच, त्यासाठी त्या आकर्षक बनविल्या जातात. नावाजलेले खेळाडू वा चित्रपटातील नटनट्यांना पुढे केलं जातं. अन्नघटकांनी समृद्ध असलेले काही पदार्थ व शक्तीवर्धक यांच्या जाहिरातीसोबतच आरोग्याला घातक असे पदार्थ व पेये यांच्या जाहिरातींचीसुद्धा रेलचेल असते. शाळेतील काही मुलांकडून गप्पागप्पांमध्ये नावं पुन्हा पुन्हा कानावर पडतात, त्यांच्या नादाने पदार्थासाठी हट्ट केला जातो व आरोग्याला घातक असलेले पदार्थ मुलांच्या हट्टापोटी घरी येऊ लागतात.

हे सर्व सविस्तर देण्याचा उद्देश, मुलामुलींच्या पालकांना या समस्येचं गांभीर्य कळावं हा आहे. आठ-दहा वर्षांपर्यंत व्यसनासारखी टीव्हीची सवय काही मुलामुलींना झालेली असते. आहाराच्या चुकीच्या सवयी अंगवळणी पडत असतात. दहा वर्ष वयानंतर मित्रमंडळींच्या नादाने या सवयींचा अतिरेक होऊ लागतो व काही मुलामुलींमध्ये दुष्परिणामही दिसतात. लठ्ठपणा हा एक प्रतिकूल परिणाम वारंवार पोट बिघडणं, आजारपण येणं हा आरोग्यावर होणारा परिणाम असतो. टीव्हीच्या नादामुळे अभ्यासाकडे दुर्लक्ष, अभ्यासाव्यतिरिक्त खेळ आणि छंद यापासूनही अशी मुलं दूर राहतात. कार्टुन वारंवार बघणारी मुलंमुली त्यातील पात्रांप्रमाणे ओरडून बोलतात. चुकीचं बोलतातच; पण त्या पात्रांप्रमाणे वागायला बघतात. त्या पात्रांचं अनुकरण करता करता त्यांच्या वागण्या-बोलण्यातही चुकीच्या सवयी लागतात. मुलंमुली ओरडून बोलतात, उलट बोलतात, दांडगाई करतात, हात उगारतात, मारतात अशा तक्रारींना काही अंशी अशा प्रकारचे कार्यक्रम  कारणीभूत असतात.

माझ्या मते टीव्ही बघणं हा संस्काराचा भाग आहे. या चुकीच्या संस्कारांनी मुलं व्यसनाधीन होऊ शकतात. त्यांच्यात वर्तन समस्या होऊ शकतात. मुलामुलींना लागलेली टीव्हीची सवय ही पुढे व्यसनासारखी व्यक्तिमत्त्वाचा भाग होते व पुढे त्याचे दुष्परिणाम दिसतात. यासाठी पालकांनी वेळीच सावध व्हायला हवं.

माझ्याकडे कुठल्याही तक्रारीसाठी आलेल्या बालकांच्या आईवडिलांना ताकीद देत असतो, की याला किंवा हिला टीव्हीपासून दूर ठेवा. अगदी सहा महिन्यांचं मूल असलं तरी मी पालकांना सतर्क करीत असतो. यासाठी कदाचित काही पालकांना आपल्या सवयी बदलाव्या लागतील. सहाव्या महिन्यापासून पुस्तकांची सवय लावण्याचा सल्ला देतो. हल्ली विविध आकाराची सर्व वयामधील मुलामुलींसाठी सचित्र पुस्तकं मिळतात. रोज ठराविक वेळ बालकाला मांडीवर घेऊन पुस्तकं, त्यातली चित्रं दाखवायची, मजकूर वाचून दाखवायचा, अशी सवय लावली तर मुलांना ती आपोआप लागेल. त्यांना पुस्तकाबद्दल प्रेम वाढेल. पुढे त्यातूनच गाणी, कविता वाचून-गाऊन ऐकवता येतील. थोड्या मोठ्या वयात हातात पेन किंवा पेन्सिल घेऊन कागदावर रेघोट्या भारायला आवडतं. ही सवय जोपासायची. पुढे चित्र असलेली पुस्तकं रंगवायला कांड्या वा पेन्सिल आणून दिल्या जाव्यात. वही, पेन्सिल, पेन, रंगाच्या कांड्या, पुस्तकं या गोष्टींची आवड असलेली मुलं पुढे अभ्यासात रुची घ्यायला नक्कीच शिकतील. ठराविक वेळी जर या गोष्टींची रोज सवय केली गेली, तर पुढे ही अभ्यासाची वेळ आपोआप ठरेल.

ज्यांच्या घरी तान्ह्या वयातली मुलंमुली आहेत, त्यांच्यासाठी माझा वरील सल्ला असतो. घरी टीव्हीचा वापर शक्‍यतो बालकांच्या अपरोक्ष असावा. ज्या घरी टीव्ही लावणं अपरिहार्य असेल तिथे निदान बैठकीच्या खोलीत टीव्ही नसावा. आजी-आजोबा असले तर त्यांच्या खोलीत किंवा आईबाबांच्या खोलीत ठेवला जावा.

टीव्हीच्या चौकोनाची सवय न लावता बाहेरच्या जगात मुलामुलींना नेलं जावं. रस्त्यावरची वाहनं, येणारे-जाणारे लोक, मुलामुलींचं लहान वयात मनोरंजन करू शकतात. बागेत नेऊन पानं, फुलं, पक्षी दाखवता येतील. नदी किंवा तलावावर नेता येईल. यासाठी आई-वडील, आजीआजोबा कुणाला तरी वेळ देता येईल. जवळपास खेळाचं मैदान असेल तर खेळ बघायला मुलं घेऊन जावे. याबाबतीत विसाव्या शतकातील जॉन बोर्ग या वर्षानुवर्षे टेनिसचे अजिंक्‍य पद जिंकलेल्या खेळाडूंच्या आईचा अनुभव लक्षात घेण्यासारखा आहे. तिला विचारलं होतं, की तुमचा मुलगा टेनिसपटू व्हावा यासाठी तुम्ही काही वेगळं केलं होतं का? त्यावर तिनं सांगितलं, की मी मुद्दाम केलं नाही; पण अनायसं घडलं. मी जॉनला रोज सकाळी तो तान्हा असल्यापासून बाबागाडीत बसवून फिरायला नेत असे. घराजवळच टेनिसकोर्ट होतं. तिथं त्या वेळी खेळाडू खेळत असत. तेव्हा येणारा चेंडूचा तालबद्ध आवाज जॉनला आवडताना दिसला. त्या तिथे जायला आवडू लागलं असं लक्षात आलं. मोठा होत होता तसा तो खेळ बघायला स्वतःहून जावू लागला आणि पुढे टेनिस खेळायचा हट्ट धरल्यामुळे त्याचं नाव आम्ही प्रशिक्षणासाठी टाकलं. त्यातून पुढे जे काही घडलं ते त्याची चिकाटी, जिद्द, आत्मविश्‍वास व सराव यातून घडलं.

आईवडिलांना मुलांना बाहेर नेणं शक्‍य नसेल तेव्हा घरच्या घरी बैठ्या खेळाचा परिचय करून देता येईल. पत्ते, बुद्धिबळ, कॅरम, चायनीज चेकर्स असे खेळ मुलांना शिकविता येतील. पाचव्या वर्षापर्यंत लागलेल्या या सवयी कुठलाही संघर्ष न होता मुलांना टीव्हीपासून दूर ठेवू शकतील. त्यानंतर वेळ बांधून, मुलांच्या हाती रिमोट न देता पालकांच्या देखरेखीखाली मुलंमुली टीव्ही बघू शकतील.

यावरून असे लक्षात येई, की मुलांना टेलिव्हिजनच्या दुष्परिणामांपासून दूर ठेवणं हे केवळ पालकांच्या हाती असतं. सध्या बाल्यावस्थेत असलेल्या मुलामुलींना टेलिव्हिजन व मोबाईल या गोष्टींपासून दूर ठेवणं ही काळाची गरज आहे. संगणकाचा परिचयसुद्धा मुलामुलींना वाचन अभ्यास, खेळ आवांतर छंद यांची गोडी लागल्यानंतर करून दिल्या जावा, या गोष्टींचा वापर पालकांच्या देखरेखीखाली व्हावा. टेलिव्हिजन या रिमोट, संगणकाचा पासवर्ड व मोबाईल फोन मुलांपासून दूर ठेवला जावा. ज्या घरी मुलांसमोर आईवडील मोबाईलचा सतत मुक्तपणे वापर करीत असतात. टीव्ही बघत असतात किंवा कॉम्प्युटरमध्ये डोकं खुपसून बसलेले असतात, असे पालक आपल्या मुलामुलींना अनुकरणातून चुकीच्या सवयी लावत असतात, असं माझं मत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Family doctor 750 issue Television addiction