२१व्या शतकात सर्वांत लोकप्रिय आयुर्वेद शास्त्र

डॉ. श्री बालाजी तांबे  www.balajitambe.com
Friday, 11 May 2018

आयुर्वेद हे केवळ वैद्यकशास्त्र नाही तर जीवन जगण्याचे, जीवन सुखी करण्याचे, जीवनाचा आनंद घेण्याचे शास्त्र आहे. यातील तत्त्वे शाश्वत आहेत, त्यांना स्थळ-काळाचे बंधन नाही, जातिधर्मांचे तर नाहीच नाही, तेव्हा आपल्या शास्त्राचा आपण स्वीकार केला, त्याचे महत्त्व समजून त्याचा रोजच्या दिनक्रमात अंतर्भाव केला तर निरोगी दीर्घायुष्याचा लाभ नक्की मिळेल.

आपल्या भारत देशाला अनेक गोष्टींचा समृद्ध वारसा मिळालेला आहे, यातीलच एक म्हणजे आयुर्वेद शास्त्र. फक्‍त आरोग्याचेच नाही तर जीवन जगण्याचे परिपूर्ण शास्त्र म्हणजे आयुर्वेद. आयुर्वेदातील विज्ञान असे आहे की त्याला देशाची, काळाची, बदलत्या जीवनाची मर्यादा नाही. याला कारण आहे आयुर्वेदातील मूळ, भरभक्कम व कधीही न बदलणाऱ्या संकल्पना. ‘फॅमिली डॉक्‍टर’च्या ७५० अंकांच्या या प्रवासात आपण यातील कितीतरी महत्त्वाच्या संकल्पना समजून घेतल्या आहेत, पुढेही घेत राहणारच आहोत. आजच्या या दहाव्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने काही मुख्य विषयांना अधोरेखित करूया. आयुर्वेदाच्या चिरनिरंतर तत्त्वांना समजून घेऊन त्यांचा प्रत्यक्ष जीवनात अवलंब करण्याचा निश्‍चय करूया. 

मुळाच आजारपण येऊच नये हे आयुर्वेदाचे मुख्य उद्दिष्ट, काही कारणाने रोग झालाच तर त्यावर उपचार तर करायला हवेत, मात्र तो उपचार काळजीपूर्वक निवडायला हवा. आदर्श उपचार कोणता? दोन ओळींच्या या श्‍लोकात आयुर्वेदाने उत्तर दिलेले आहे, 

प्रयोगः शमयेत्‌ व्याधिः योऽन्यमन्यमुदीरयेत्‌ ।
नासौ विशुद्धः शुद्धस्तु शमयेद्यो न कोपयेत्‌ ।।
....अष्टांग हृदय सूत्रस्थान 

ज्या उपचाराने एक रोग बरा होते, परंतु दुसरा उत्पन्न होतो, तो शुद्ध उपचार नव्हे. जो दुसरा विकार उत्पन्न न करता झालेला विकार शांत करतो, तोच खरा सशास्त्र उपचार होय. 

रोग फक्‍त आटोक्‍यात ठेवणे, फक्‍त रोगाचे लक्षण, रोगामुळे होणारा त्रास कमी करणे हे उद्दिष्ट ठेवले तर त्यामुळे रोग बरा होण्यासाठी प्रयत्न होत नाहीत, उलट रोग दबविण्याचा प्रयत्न झाला की त्यातून अनेक इतर विकार उद्‌भवू शकतात. या उलट, रोग बरा करण्यासाठी रोगाच्या मुळावर काम करत राहिले की इतर विकार उद्‌भवणार नाहीतच, शिवाय मूळ विकार शांत होईल, रोगामुळे होणारा त्रासही आपोआपच कमी होईल. मात्र हे सर्व घडण्यासाठी उपचाराचे माध्यम म्हणजे औषध हे सुद्धा शुद्ध, संपन्न आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे शरीराकडून स्वीकारले जाईल असे असणे ही प्राथमिकता असते. आयुर्वेदाची औषधे पाठानुसार व स्वच्छता, शुद्धतेची काळजी घेऊन बनविलेली असतील तर ती या सर्व कसोट्यांना १०० टक्के उतरणारी असतात. आहार असो वा औषध असो, ते सेवन करण्यापूर्वी त्यावर आवश्‍यक ते संस्कार करण्याला आयुर्वेदाने खूप महत्त्व दिले आहे. ज्या प्रक्रियेमुळे द्रव्यातील अशुद्धी, वाईट गोष्टी नष्ट होतात व चांगल्याची अभिवृद्धी होतो ते सर्व संस्कार होत. औषधावर संस्कार करण्यामागे मुख्य पाच हेतू असतात. औषध अधिक प्रभावी बनविणे, सहजतेने घेता यावे, कमी मात्रेतही गुणकारी ठरावे, त्याचे कोणतेही दुष्परिणाम नसावेत, शरीरात प्रवेशित झाले की ते अपेक्षित ठिकाणी पोचू शकावे, औषध दीर्घकाळासाठी खराब न व्हावे.

अर्थात, अशा संस्कारांतून तयार झालेल्या औषधाचे दुष्परिणाम होत नाहीत. आयुर्वेदाची औषधे मुख्यत्वे वनस्पतींपासून बनविलेली असतात. धातू, खनिजांचा वापर करतानाही वनस्पतींच्या योगे अगोदर शुद्धी केलेली असते, भस्म किंवा रसौषधी बनविताना वनस्पतींचे संस्कार मोठ्या प्रमाणावर केलेले असतात. शिवाय या सर्व वनस्पती लागवड करून किंवा जंगलातून आणाव्या लागतात, हे करतानाही वेळेचे, ऋतुमानाचे बंधन पाळावे लागते, कधी कुठले औषध बनवायला घ्यायचे याचे काही मापदंड असतात, ते पाळले तरच औषधाचा सर्वोत्तम गुण येऊ शकतो. एकूणच आयुर्वेदिक औषध बनविणे हे एखाद्या हस्त उद्योगासारखे, कलात्मक पद्धतीचे काम असते. अर्थात यासाठी मनुष्यबळ, वेळ, नियोजन या सर्व गोष्टींची अधिक गरज असते. रासायनिक औषध बनविणे त्या मानाने सोपे असते. एकदा का अमुक एक रासायनिक संयुग तयार झाले आणि त्याची गोळी करण्याची किंवा कॅपसूल भरण्याची यंत्रणा उभारली की कमीत कमी मनुष्यबळाच्या योगे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेता येते. आयुर्वेदिक औषध मात्र प्रत्येक वेळी निरीक्षण करून, व्यक्‍तीची प्रकृती, ताकद पाहून, ऋतुमानाचा विचार करून आणि अजूनही बऱ्याच गोष्टींचा विचार करून योजावे लागते. एकच औषध सरसकट सर्वांना त्याच पद्धतीने लागू पडेल असे नसते. प्रसंगी एका व्यक्‍तीसाठी विशेष औषध तयार करावे लागते. या सर्वांमुळे रासायनिक औषधांच्या तुलनेत आयुर्वेदिक औषधे महाग वाटली तरी नंतर त्यांचे अनिष्ट व दूरगामी परिणाम नसतात हे लक्षात घेणे हिताचे असते.

ही सर्व योजना करण्यासाठी अनुभवी व तज्ज्ञ वैद्य असावा लागतो, त्याच्या मार्गदर्शनाखाली प्रत्यक्ष उपचार करणारा परिचारकही महत्त्वाचा असतो. उपचारांचे माध्यम म्हणजे औषध संस्कारपूर्ण असावे लागते आणि ज्याच्यावर उपचार करायचे ती व्यक्‍ती शास्त्राप्रती, वैद्याप्रती निष्ठ असणेही आवश्‍यक असते. उपचारांचे हे चार आधारस्तंभ (चिकित्साचतुष्पाद) जितके भरभक्कम असतील, तितके यश सर्वोत्तम मिळते. 

उपचार नियोजनपूर्वक करणे हे त्याच्या यशस्वितेचे गमक असते. औषधयोजना करताना ती कोणत्या मार्गाने करायची, कशाबरोबर करायची, कोणत्या काळी करायची याचा विचार करावा लागतो. गोळ्या, काढे वगैरे औषधे मुखावाटे घेता येतात, मात्र एखाद्या ठिकाणी वेदना व सूज कमी करायची असेल तर बाहेरून लेप लावावा लागतो. थेट आतड्यात औषध पोचवायचे असेल तर ते बस्तीमार्फत दिले जाते किंवा मेंदूवर काम करायचे असेल तर नस्याची योजना करावी लागते. धातुपोषणासाठी घ्यायचे औषध दूध-साखर किंवा तूप-साखरेबरोबर घ्यावे लागते, रक्‍ताभिसरण संस्था, श्वसनसंस्था यावर काम करणारे औषध मधाबरोबर घ्यावे लागते, शरीरशक्‍ती वाढविणारे औषध सकाळी नाश्‍त्याच्या आधी घेणे सर्वांत प्रभावी असते, तर पचनावर काम करणारे औषध जेवणाच्या आधी किंवा नंतर घ्यावे लागते. अशा प्रकारे ‘थेंबे थेंबे तळे साचे’ या न्यायानुसार छोट्या छोट्या गोष्टी विचारात घेऊन औषधयोजना केली तर त्याचा अप्रतिम गुण येतो. 

आहारयोजनासुद्धा आयुर्वेदाचे वरदान होय. औषधाला जोड म्हणून तर आहारयोजनेला पर्याय नसतोच, पण प्रसंगी औषधाला पर्याय म्हणूनही आहाराची योजना करता येते. अन्नयोजना करताना केवळ चवीचा विचार न करता प्रकृतीला अनुकूल काय, प्रतिकूल काय हे समजून घेणे, अन्नावरचे संस्कार समजूून घेऊन ते यथासांग, कोणताही शॉर्टकट न घेता स्वयंपाकात समाविष्ट करणे आणि असे संस्कारित अन्न निसर्गचक्राला धरून योग्य वेळी सेवन करणे आरोग्यासाठी गरजेचे होय. अमृत जरी असले तरी त्याचे भलत्याच वेळी सेवन केले वा अजीर्ण झाले तर नुकसान होऊ शकते. तेव्हा सूर्याच्या अनुषंगाने जीवनशैली आखली म्हणजे सकाळी लवकर उठणे, कफकाळ सुरू होण्यापूर्वी म्हणजे सूर्य वर येण्यापूर्वी  मलमूत्रविसर्जन करून घेणे, कफाच्या काळात म्हणजे सूर्योदयानंतर सकाळी व्यायाम, प्राणायामादी क्रिया करणे, न्याहारी अशा वेळी व अशा प्रमाणात करणे की दुपारी एक-दीडच्या सुमारास जेव्हा सूर्य सर्वांत प्रखर असतो, त्या वेळी जेवणासाठी छान भूक लागेल, सूर्यास्तानंतर लवकरात लवकर संध्याकाळचे जेवण जेवणे, रात्री साडेअकरा-बाराच्या आत झोपणे असा दिनक्रम ठेवला तर ते आरोग्याला पूरक असते.

रोजच्या दिनक्रमात व्यायामासाठी थोडा वेळ काढणे हे सुद्धा एकंदर आरोग्यासाठी, शरीराच्या दृढतेसाठी, सांध्यांच्या लवचिकतेसाठी आवश्‍यक असते. अनुलोम-विलोम, दीर्घश्वसन, शुद्ध हवेत चालायला जाणे या गोष्टी अनेक रोगांना दूर ठेवू शकतात. व्यायामातही सूर्यनमस्कार, पोहायला जाणे, योगासनांचा सराव करणे अधिक श्रेयस्कर असते. 

पंचमहाभूतांची शुद्धी, पंचमहाभूतांचे संतुलन ही आरोग्याची जणू गुरुकिल्ली होय. यातील पृथ्वी आणि जल या महाभूतांवर आहार, औषधांच्या मदतीने काम करणे त्यामानाने सोपे असते, मात्र अग्निमहाभूताच्या संतुलनासाठी ज्योतिध्यान, उपासना; वायू व आकाश महाभूतावर काम करण्यासाठी ॐकार जप, प्राणायाम, ध्यान वगैरे गोष्टी आवश्‍यक असतात. म्हणूनच बहुतेक सर्व मानसरोगांत, बुद्धी-स्मृतीशी संबंधित रोगांत आयुर्वेदाने ध्यानाचा उल्लेख केलेला आढळतो. मुळात असे रोग होऊच नयेत, आत्मा, इंद्रिय, मन यांना प्रसन्नता अनुभवता यावी यासाठी ध्यानाचा समावेश रोजच्या दिनक्रमात करणे उत्तमच असते. थोडक्‍यात, आयुर्वेद हे केवळ वैद्यकशास्त्र नाही तर जीवन जगण्याचे, जीवन सुखी करण्याचे, जीवनाचा आनंद घेण्याचे शास्त्र आहे. यातील तत्त्वे शाश्वत आहेत, त्यांना स्थळ-काळाचे बंधन नाही, जातिधर्माचे तर नाहीच नाही, तेव्हा आपल्या शास्त्राचा आपण स्वीकार केला, त्याचे महत्त्व समजून त्याचा रोजच्या दिनक्रमात अंतर्भाव केला तर निरोगी दीर्घायुष्याचा लाभ नक्की मिळेल.

या सगळ्याचा विचार करून ऋषिमुनींनी सांगितल्यानुसार आयुर्वेदाचे पालन करणे ही ‘संतुलन’ची विशेषता. मसाज, शिरोधारा, विरेचन वगैरे पाच कर्मे  करून पंचकर्म होत नसते. शरीरातील सर्व पेशी व आतील व्यवस्था यांचे शुद्धीकरण हे ‘संतुलन पंचकर्म थेरपी’चे वैशिष्ट्य. औषधे तयार करताना वापरलेल्या वस्तूचे रस, गुण, वीर्य समजून घेणे हे सर्व कटाक्षाने पाळले जाते. म्हणून वरील सर्व गोष्टींचा ऊहापोह व माहिती ‘फॅमिली डॉक्‍टर’द्वारा सर्वांपर्यंत पोचवली जाते, तीही अत्यंत सोप्या भाषेत. महाराष्ट्रातच नव्हे तर ज्या ज्या ठिकाणी मराठी जाणणारी कुटुंबे आहेत त्या सर्व ठिकाणी ‘फॅमिली डॉक्‍टर’ला अतोनात प्रेम मिळाले व त्यामुळेच ७५१व्या अंकाकडे वाटचाल करणे सोपे झाले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Family doctor 750th issue most popular Ayurveda in the 21st Century