अम्लपित्त-पथ्यापथ्य

अम्लपित्त-पथ्यापथ्य

अम्लपित्तामध्ये पोटात मळमळ होत असेल, उलटी होईल असे वाटत असेल, तर कोरड्या साळीच्या लाह्या थोड्या थोड्या चावून खाण्याने लगेच बरे वाटते. छाती, पोटात जळजळ होत असेल किंवा जेवणानंतर घशात जळजळत असेल, तर मूठभर काळ्या मनुका चावून खाण्याने आराम मिळतो. अम्लपित्ताचा त्रास असणाऱ्या व्यक्‍तींनी साळीच्या लाह्या आणि काळ्या मनुका कायम जवळ ठेवणे, आणि त्रास होईल असे वाटले, की लगेच चावून खाणे हितावह असते.

‘ॲसिडिटी’ हा शब्द सर्वांच्या परिचयाचा असतो. छाती, पोटात जळजळ, अपचन, ढेकर येणे, भूक न लागणे अशा कितीतरी लक्षणांसाठी ‘मला ॲसिडिटीचा त्रास होतो’ असे सांगणारे अनेक जण असतात. त्यामुळे ‘ॲसिडिटी’ होते म्हणजे नेमके काय होते हे विचारून घ्यावे लागते. छाती-पोटात जळजळ होणे, घशाशी आंबट येणे, डोके दुखून उलट्या होणे किंवा जुलाब होणे ही लक्षणे सर्वसाधारण अम्लपित्ताची असतात.

अम्लपित्तामध्ये आहाराची योजना नीट केली तर ती औषधाप्रमाणे हितावह असते. 

अम्लगुणाने पित्त ज्यात वाढते ते अम्लपित्त. ज्याप्रमाणे स्वयंपाक करताना आंबट किंवा खारट चवीचे प्रमाण जास्ती झाले तर ते कमी करण्यासाठी साखर किंवा गूळ मिसळला जातो, त्याप्रमाणे पित्ताची अम्लता कमी करण्यासाठी मधुर व कडू रस औषधाप्रमाणे कामाला येतात. 

तिक्‍तभूयिष्ठमाहारं पानञ्चापि प्रकल्पयेत्‌ ।
....भैषज्य रत्नाकर 

कडू चवीने युक्‍त अन्नपानाची योजना अम्लपित्तामध्ये हितावह असते. यादृष्टीने कारल्याची भाजी, कर्टोलीची भाजी, गुळवेल भिजवून ठेवलेले पाणी, मेथ्यांचे पीठ मिसळून केलेली भाकरी याप्रमाणे आहारयोजना करता येते. 

यवगोधूमिकृतीस्तीक्ष्णसंस्कारवर्जिताः ।
.... भैषज्य रत्नाकर 

जव आणि गहू धान्ये वापरून केलेले पण मिरी, तेल, लसूण यासारखी तीक्ष्ण द्रव्ये न वापरता तयार केलेले खाद्यपदार्थ अम्लपित्तामध्ये हितकर असतात. 

यथास्वं लाजशक्‍तुत्वा सितामधुयुतान्‌ पिबेत्‌ ।
.... भैषज्य रत्नाकर

साळीच्या लाह्यांच्या पिठात खडीसाखर व मध मिसळून तयार झालेले मिश्रण खाणे हे सुद्धा अम्लपित्तामध्ये हितकर असते. 
अम्लपित्तामध्ये पोटात मळमळ होत असेल, उलटी होईल असे वाटत असेल तर कोरड्या साळीच्या लाह्या थोड्या थोड्या चावून खाण्याने लगेच बरे वाटते. छाती, पोटात जळजळ होत असेल किंवा जेवणानंतर घशात जळजळत असेल तर मूठभर काळ्या मनुका चावून खाण्याने आराम मिळतो. अम्लपित्ताचा त्रास असणाऱ्या व्यक्‍तींनी साळीच्या लाह्या आणि काळ्या मनुका कायम जवळ ठेवणे, आणि त्रास होईल असे वाटले की लगेच चावून खाणे हितावह असते. यामुळे पुढच्या समस्या कमी होतात.

अम्लपित्तामध्ये मुगाचे सूप उत्तम असते. जेवणात कायम मुगाचा समावेश करणे, विशेषतः आमटी किंवा वरण करण्यासाठी तुरीऐवजी मूग वापरणे चांगले असते. पुढील सूत्रात मुगाचे सूप या पदार्थांची अशी प्रशंसा केली आहे, 

अपनयति अम्लपित्तं यदि भुक्‍तं मुद्‌गयूषेण ।
....भैषज्य रत्नाकर 

भोजनात मुगाच्या सूपाची कायम अंतर्भाव करण्याने अम्लपित्त नष्ट होते. धान्यांपैकी जव हे अम्लपित्तात हितकर असतात. 

निस्तुषयवधात्रीक्वाथ सुगन्धिमधुयुतः पीतः ।
....भैषज्य रत्नाकर 

वरचे टरफल काढलेले जव, अडुळशाची फुले किंवा पाने आणि आवळा याचा काढा करावा. काढा तयार झाला की त्यात दालचिनी, तमालपत्र, वेलचीचे थोडे चूर्ण टाकून तो सुगंधी झाला की प्यायला द्यावा. 

अम्लपित्तामध्ये दुधीची भाजी, कोहळ्याची भाजी पथ्यकर असते. तुपामध्ये जिरे-धणे टाकून फोडणी केली, तिखटाऐवजी किसलेले आले टाकले तर छान चविष्ट भाजी तयार होते आणि पित्तही वाढत नाही. मुगाच्या कढणात दुधी-पडवळाची भाजी टाकून तयार केलेले सूपसुद्धा अम्लपित्तासाठी चांगले असते. अम्लपित्तामध्ये कोठ्यात पित्त साठून राहणार नाही याची दक्षता घेणे आवश्‍यक असते. त्या दृष्टीने दर आठ-दहा दिवसांनी काळ्या मनुका, सुके अंजीर, गुलाबाच्या पाकळ्या, सोनामुखीची पाने यांच्यापासून तयार केलेले विरेचन चूर्ण घेऊन पोट साफ करून घेणे चांगले असते.

नारळाच्या वड्या, मुगाचा लाडू, साळीच्या लाह्यांचा तूप-हळद आणि थोडेसे मीठ-साखर घालून केलेला चिवडा, राजगिऱ्याची चिक्की या गोष्टी मधल्या वेळेत खाणे आणि भूक लागली असली तर पटकन खाण्यासाठी हाताशी असणे अम्लपित्तामध्ये हितकर असते. मोरावळा, गुलकंद या गोष्टीही पथ्यकर असतात. 

अम्लपित्तामध्ये पथ्य - साठेसाळीचा तांदूळ, जव, ज्वारी, नाचणी, गहू, मूग, तापवून थंड केलेले पाणी, साखर, कारले, कोहळा, केळीची फुले, कवठ, डाळिंब, आवळा, दुधी, पडवळ, घोसाळी, केळफूल, नारळ, अंजीर, मनुका, दूध, तूप, लोणी, आले, बडीशेप, धणे, जिरे, वेलची वगैरे.

अम्लपित्तामध्ये अपथ्य - पालेभाजी, शेवगा, अंबाडी, कुळीथ, उडीद, चिंच, टोमॅटो, अननस, दही, आंबट ताक, चीज, लसूण, कांदा, गरम पाणी, अति प्रमाणात चहा-कॉफी, तळलेले पदार्थ, मीठ वगैरे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com