अग्र्यसंग्रह (श्रेष्ठत्व)

डॉ. श्री बालाजी तांबे  www.balajitambe.com
Friday, 6 July 2018

प्रकृतीला जे मानवते, सवयीचे असते ते सात्म्य. कायम प्रकृतीचा विचार करून नीट खाणे-पिणे ठेवले, तर ते आरोग्याला कारक असते. या उलट, प्रकृतीचा विचार न करता फक्‍त चवीचा किंवा आवडीचा विचार केला, तर ते हानीकारक ठरते.

मागच्या अंकात आपण अग्नी प्रदीप्त व कार्यक्षम राहण्यासाठी भुकेनुसार अन्न सेवन करणे सर्वश्रेष्ठ असते हे पाहिले. आता पुढची माहिती घेऊ या. 

यथासात्म्यं चेष्टाभ्यवहाख्यै सेव्यानाम्‌ ।
कर्मामध्ये स्वतःला (स्वतःच्या प्रकृतीला) सात्म्य (अनुकूल) आहार आचरण करणे श्रेष्ठ होय. 

प्रकृतीला जे मानवते, सवयीचे असते त्याला सात्म्य असे म्हणतात. व्यवहारातही हा अनुभव येतो की अमुक गोष्ट खाल्ली तर हमखास त्रास होतो; आणि काही गोष्टी अशा असतात की त्या खाण्याने बरे वाटते, त्रास होत नाही. या अनुकूल गोष्टी म्हणजेच पथ्य. तेव्हा कायम प्रकृतीचा विचार करून नीट खाणे-पिणे ठेवले तर ते आरोग्याला कारक असते. या उलट, प्रकृतीचा विचार न करता फक्‍त चवीचा किंवा आवडीचा विचार केला तर असे खाणे आज ना उद्या प्रकृतीला हानिकारक ठरते.

अन्नाप्रमाणेच जीवनशैली किंवा कामाचे स्वरूपही प्रकृतीला अनुकूल असावे लागते. वाताच्या प्रकृतीला बैठे काम हवे तर कफाच्या प्रकृतीला धावपळीचे काम हवे. हेच उलटे झाले तर वातप्रकृतीला वाताची दुखणी पटकन होतील आणि कफप्रकृतीचा कफदोष वाढतच जाईल. 

जीवन जगण्यासाठी कर्म करत राहणे अपरिहार्य असते. ‘कर्म वाङ्‌मनःशरीरप्रवृत्तिः’ वाचा, मन व शरीराच्या प्रवृत्तीला कर्म असे म्हणतात. सात्म्य कर्म म्हणजेच कर्माचा समयोग हा आरोग्याला कारणीभूत ठरतो, तर कर्माचा अतियोग, अयोग, किंवा मिथ्यायोग रोग उत्पन्न करू शकतात. 

वाचेचा अतियोग म्हणजे सतत बोलणे, यामुळे वात वाढू शकतो, ताकद कमी होऊ शकते; अयोग म्हणजे अजिबात न बोलणे हेही रोगाला कारण ठरू शकते. चहाडी करणे, खोटे बोलणे, प्रसंगाचे भान न ठेवता बोलणे, एखाद्याचे मन दुखवेल असे कटू बोलणे, असंबद्ध बडबड करणे, एखाद्याला अकारण विरोध करणे, भांडणे, वाद घालणे, कठोर बोलणे वगैरे वाचेचे मिथ्यायोग होत.

नुसते बोलण्याने काय बिघडणार आहे असे बऱ्याचदा वाटते. चुकीच्या शारीरिक वा मानसिक वागणुकीचे परिणाम लगेच वा कालांतराने बहुधा जाणवतात. चुकीच्या बोलण्याचा आरोग्यावर झालेला दुष्परिणाम लगेच समजत नसला तरी तो होत असतो हे निश्‍चित. म्हणूनच ‘वाचाशुद्धी’ ही आयुर्वेद व इतर जीवनोपयोगी भारतीय शास्त्रांनी सांगितलेली एक महत्त्वाची गोष्ट आहे.

अतिप्रमाणात शारीरिक कार्य करणे हा शरीराचा अतियोग झाला तर शरीराचा अजिबात वापर न करणे हा अयोग झाला. याखेरीज मल-मूत्र, भूक, तहान वगैरे नैसर्गिक प्रवृत्ती जबरदस्तीने थोपविणे किंवा बळजबरीने प्रवृत्त करणे; चालताना किंवा प्रवास करताना योग्य काळजी न घेतल्याने अपघात होणे; अविचारी साहस करणे; दूषित गोष्टींच्या सान्निध्यात येणे; वेड्यावाकड्या अनैसर्गिक हालचाली करणे; दीर्घकाळपर्यंत श्वास रोखून धरणे; शरीरशक्‍ती कमी करणारी व्रते, उपवास वगैरे करणे; अतिप्रमाणात मद्यसेवन करणे; दीर्घकाळ पाण्यात राहणे; कुठल्याही व्यसनाच्या आहारी जाणे हे सर्व शरीराचे मिथ्यायोग होत व यामुळे अनेक लहान मोठे, साधे तसेच गंभीर विकार होऊ शकतात.

अतिप्रमाणात विचार करणे, सातत्याने चिंतामग्न राहणे हा मनाचा अतियोग समजला जातो, तर अजिबात विचार न करणे हा मनाचा अयोग होय. याखेरीज मनोविकारांच्या आधीन होणे म्हणजे भीती, शोक, राग, लोभ, मोह, अहंकार, ईर्षा यांना वश होणे, जी घटना, जी गोष्ट जशी आहे तशी न बघता विपरीत दृष्टीने बघणे, अर्थाचा अनर्थ करणे, अविचारी निर्णय घेणे याला मनाचा मिथ्यायोग असे म्हणतात.

अमली पदार्थांच्या आहारी जाणे, वेडेवाकडे अंगविक्षेप करत नाचणे, हस्तमैथुनादी चुकीच्या सवयींच्या आहारी जाणे, वाक्‍यावाक्‍यात खोटे बोलणे, फसवणे, दिल्या शब्दाला न जागणे वगैरे सर्व गोष्टींचाही आजच्या काळात मिथ्यायोगात समावेश करता येतो. हे सर्व टाळणे आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे होय.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: family doctor article Diet Conduct