पथ्यापथ्य दमा

डॉ. श्री बालाजी तांबे www.balajitambe.com
शुक्रवार, 8 सप्टेंबर 2017

दमा बऱ्याच वर्षांपासून असला तर हळूहळू फुप्फुसांची कार्यक्षमता कमी होत जाते. यावर तांदूळ व तीळ एकत्र शिजवून तयार केलेली खिचडी तूप घालून खाण्याने फायदा होतो. जेवणानंतर विड्याचे पान, त्यात ज्येष्ठमध, लवंग, वेलची, दालचिनी, जायपत्री वगैरे मसाल्याचे पदार्थ टाकून घेण्यानेही फुप्फुसांना शक्‍ती मिळण्यास मदत होते. 
 

पावसाळ्याचे दिवस अनेक रोगांना आमंत्रण देत असतात. यातीलच एक म्हणजे दमा. दम्याचा अटॅक आला तर औषधोपचार घेण्याशिवाय दुसरा पर्यायच नसतो, मात्र असे होऊ नये, भल्या पहाटे किंवा रात्री अपरात्री दवाखान्याची वाट धरण्याची पाळी येऊ नये यासाठी आहारयोजना करता येते. 

दमा बऱ्याच वर्षांपासून असला तर हळूहळू फुप्फुसांची कार्यक्षमता कमी होत जाते. यावर तांदूळ व तीळ एकत्र शिजवून तयार केलेली खिचडी तूप घालून खाण्याने फायदा होतो. जेवणानंतर विड्याचे पान, त्यात ज्येष्ठमध, लवंग, वेलची, दालचिनी, जायपत्री वगैरे मसाल्याचे पदार्थ टाकून घेण्यानेही फुप्फुसांना शक्‍ती मिळण्यास मदत होते. 
 

पावसाळ्याचे दिवस अनेक रोगांना आमंत्रण देत असतात. यातीलच एक म्हणजे दमा. दम्याचा अटॅक आला तर औषधोपचार घेण्याशिवाय दुसरा पर्यायच नसतो, मात्र असे होऊ नये, भल्या पहाटे किंवा रात्री अपरात्री दवाखान्याची वाट धरण्याची पाळी येऊ नये यासाठी आहारयोजना करता येते. 

दम्यावर कुळीथ हे कडधान्य औषधाप्रमाणे असते. कोकणात कुळीथ उगवतात. अख्ख्या कुळथाची उसळ करता येते किंवा कुळीथ भाजून त्याचे पीठ तयार केले तर त्यापासून पिठले किंवा सूप करता येते. चरकसंहितेत निदिग्धिकादि यूष सांगितले आहे, जे कुळीथ आणि दम्यावर काम करणाऱ्या औषधी द्रव्यांपासून बनवायचे असते.
निदिग्धिकां बिल्वमध्यं कर्कटाख्यां दुरालभाम्‌ ।
त्रिकण्टकं गुडूचीं च कुलत्थांश्‍च सचित्रकान्‌ ।।
जले पक्‍त्वा रसः पूतः पिप्पलीघृतभर्जितः ।
सनागरः सलवणः स्यात्‌ यूषो भोजने हितः ।।
....चरक चिकित्सास्थान
कंटकारी, बेलाचा गर, काकडशिंगी, धमासा, गोक्षुर, गुळवेल, चित्रक या द्रव्यांचे षडंग पद्धतीने औषधी जल तयार करावे व त्याच्यात कुळथाचे पीठ किंवा कुळथाची डाळ टाकून सूप तयार करावे. सूप तयार झाले की त्याला तुपाची फोडणी द्यावी तसेच चवीनुसार सैंधव मीठ, पिंपळी व सुंठ टाकून प्यायला द्यावे. 

दम्यामध्ये मुगाच्या डाळीपासून सुद्धा सूप बनविण्यास सांगितले आहे. 
रास्नां बलां पञ्चमूलं ऱ्हस्वं मुद्‌गान्‌ सचित्रकान्‌ ।
पक्‍त्वाऽम्भसि रसे तस्मिन्‌ यूषः साध्याश्‍च पूर्ववत्‌ ।।
....चरक चिकित्सास्थान
रास्ना, बला, लघुपंचमूळ (सालवण, पिठवण, रिंगणी, डोरली, गोक्षुर), चित्रक यांचे षडंग पद्धतीने औषधी जल तयार करून त्यात मूग शिजवून तयार केलेले सूप घेणे दम्याच्या रुग्णासाठी हितकर असते. तयार सुपाला वरीलप्रमाणे तुपाची फोडणी व चवीनुसार सैंधव मीठ, पिंपळी व सुंठ टाकून प्यायला द्यावे. 

महाळुंग म्हणून लिंबाच्या जातीतील आंबट फळ असते. याची पाने दम्यावर उपयोगी असतात. पुढील सूप महाळुंगाची पाने व मुगाची डाळ यांच्यापासून तयार करायचे आहे,
पल्लवान्मातुलुस्य निम्बस्य कुलकस्य चा ।
पक्‍त्वा मुद्गांश्‍च सव्योषान्‌ क्षारयूषं विपाचयेत्‌ ।।
....चरक चिकित्सास्थान
महाळुंगाची कोवळी पाने, कडुनिंबाची तसेच पडवळाची कोवळी पाने समभाग घेऊन षडंग पद्धतीने औषधी जल तयार करावे. यात मुगाची डाळ शिजवून सूप तयार करावे, तयार सुपात सुंठ, मिरी, पिंपळी आणि यवक्षार मिसळून प्यावे. 

साधे मुगाचे सूप बनवून त्यात औषधी द्रव्ये मिसळून घ्यायचाही योग चरकसंहितेत दिला आहे, 
दग्ध्वा सलवणं क्षारं शिग्रूणि मरिचानि च ।
युक्‍त्या संसाधितो यूषो हिक्काश्वासनिकारनुत्‌ ।।
....चरक चिकित्सास्थान
मुगाचे यूष बनवून त्यात सैंधव, यवक्षार, शेवग्याच्या शेंगा व मिरी चूर्ण मिसळून घेण्याने दम्याचा, तसेच उचकी लागण्याचा त्रास बरा होतो. 
फक्‍त शेवग्याच्या शेंगांपासून बनविलेले सूप तसेच सुकविलेल्या मुळ्यापासून बनविलेले सूपसुद्धा दम्याच्या रुग्णांसाठी हितकर असते. 
शालिषष्टिकगोधूम-यवान्नान्यनवानि ।
....चरक चिकित्सास्थान
एक वर्ष जुने साठेसाळीचे तांदूळ, गहू व जव ही धान्ये दम्याच्या रुग्णासाठी हितकर असतात. दम्याच्या रुग्णाने तहान लागली असता साधे पाणी पिण्याऐवजी औषधांनी संस्कारित पाणी (गरम) पिणे हितकर असते. यासाठी दशमुळे किंवा देवदार वृक्षाची साल वापरली जाते. 

दम्यामध्ये छातीत कफ दाटून राहिला असला तर आल्याचा रस व मध हे मिश्रण थोडे थोडे चाटण्याने बरे वाटते. मूग-तांदळाच्या खिचडीमध्ये हिंग, सैंधव, जिरे, आल्याचा रस, मिरी पूड टाकून सेवन करणे दम्याच्या रुग्णासाठी हितकर असते. दमा बऱ्याच वर्षांपासून असला तर हळूहळू फुप्फुसांची कार्यक्षमता कमी होत जाते. यावर तांदूळ व तीळ एकत्र शिजवून तयार केलेली खिचडी तूप घालून खाण्याने फायदा होतो. जेवणानंतर विड्याचे पान, त्यात ज्येष्ठमध, लवंग, वेलची, दालचिनी, जायपत्री वगैरे मसाल्याचे पदार्थ टाकून घेण्यानेही फुप्फुसांना शक्‍ती मिळण्यास मदत होते.

दम्यामध्ये पथ्य 
तांदूळ, गहू, जव, कुळीथ, मूग, मसूर, तूर, तोंडली, पडवळ, मुळा, वांगे, लसूण, तांदुळजा, मनुका, वेलची, सुंठ, मिरी, पिंपळी, महाळुंग, बकरीचे दूध-तूप, गाईचे तूप, मध, गरम पाणी, गोमूत्र वगैरे.

दम्यामध्ये अपथ्य  
तळलेले पदार्थ, कंद मुळे, मासे, कोरडे अन्न, पचायला जड गोष्टी, थंड गोष्टी, दही, चिंच, जांभूळ, मेंढीचे दूध वगैरे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: family doctor asthma