आयुर्वेदातील अग्निसंकल्पना

डॉ. श्री बालाजी तांबे (www.balajitambe.com)
Friday, 6 January 2017

सध्या वजन वाढेल या भीतीपोटी तेल-तूप संपूर्णतः वर्ज्य करण्याची फॅशन रूढ झालेली दिसते. पण अशा निःस्नेह, कोरड्या अन्नामुळे खाल्लेल्या अन्नाचे पचन नीट झाले नाही, तर वजन कमी होणे अवघड असते. स्नेहयुक्‍त अन्नामुळे संपूर्ण पचनसंस्थेला मार्दवता येते. वंगण दिलेले चाक किंवा दार जसे करकर आवाज न करता उघडते व दीर्घकाळपर्यंत टिकते, तसेच योग्य प्रमाणात स्नेहाचे सेवन करण्याने पचनशक्‍ती, आतड्यांची शोषणशक्‍ती, मलाशयाची मलविसर्जनाची शक्‍ती उत्तम राहण्यास मदत मिळते. भारतीय परंपरेत आपण जेवण सुरू करण्यापूर्वी अन्नशुद्धीसाठी चमचाभर तूप घेतो. सध्याचे प्रकृतिमान, पचनशक्‍ती, जीवनपद्धतीचा विचार करता प्रत्येकाने कमीत कमी चार-पाच चमचे साजूक तूप आहाराबरोबर सेवन करणे श्रेयस्कर होय.

आहार पचनाला जबाबदार असणाऱ्या सहा भावांपैकी उष्मा, वायू, क्‍लेद या तीन भावांची माहिती आपण घेतली. यानंतर येतात स्नेह, काळ आणि समयोग.
स्नेह - म्हणजे स्निग्धता. अन्नाचे योग्य प्रकारे पचन होण्यासाठी अन्नात योग्य प्रकारची आणि योग्य प्रमाणात स्निग्धता असावी लागते. अग्नीला प्रज्वलित करण्यासाठी वायूची जशी आवश्‍यकता असते, तशीच योग्य प्रमाणात स्निग्धतेचीही आवश्‍यकता असते. म्हणून यज्ञ करताना अग्नीला चेतविण्यासाठी मध्ये मध्ये तुपाची आहुती देण्याची प्रथा असते. तसेच, इतर समिधा द्रव्यांनाही थोडेसे तूप लावले जाते, तिळाचीही आहुती दिली जाते. याचप्रमाणे आहारातही योग्य प्रमाणात तेल-तूप समाविष्ट करणे पचनास सहायक असते. सध्या वजन वाढेल या भीतीपोटी तेल-तूप संपूर्णतः वर्ज्य करण्याची फॅशन रूढ झालेली दिसते; पण अशा निःस्नेह, कोरड्या अन्नामुळे खाल्लेल्या अन्नाचे पचन नीट झाले नाही, तर वजन कमी होणे अवघड असते. आहाराबरोबर स्नेह सेवन केला तर पोटात अन्नाचे चर्वण सहजतेने होते, अन्नाचा संघात मृदू होतो, यामुळे अन्न पोटातून लहान आतड्यात, लहान आतड्यातून मोठ्या आतड्यात, मलाशयात वगैरे पुढे पुढे सरकणे व सरतेशेवटी तयार झालेला मलभाग सहजतेने विसर्जित होण्यासाठी मदत मिळते. स्नेहयुक्‍त अन्नामुळे संपूर्ण पचनसंस्थेला मार्दवता येते. वंगण दिलेले चाक किंवा दार जसे करकर आवाज न करता उघडते व दीर्घकाळपर्यंत टिकते, तसेच योग्य प्रमाणात स्नेहाचे सेवन करण्याने पचनशक्‍ती, आतड्यांची शोषणशक्‍ती, मलाशयाची मलविसर्जनाची शक्‍ती उत्तम राहण्यास मदत मिळते.

तेल, तूप, चीज, मांसातून मिळणारी चरबी असे स्नेहाचे अनेक स्रोत असले, तरी यात तूप, तेसुद्धा पारंपरिक पद्धतीने म्हणजे दूध गरम केल्यानंतर वर आलेल्या मलईला विरजण लावून तयार झालेले दही घुसळून निघालेले लोणी कढवून तयार झालेले तूप, सर्वोत्तम असते. कारण ते एका बाजूने अन्नाला, पचनसंस्थेला इतकेच नाही तर संपूर्ण शरीराला स्निग्धता तर देतेच; पण दुसऱ्या बाजूने अग्नीला चेतविण्याचेही काम करते. काही प्रमाणात तेलसुद्धा वापरता येते; मात्र अति प्रमाणात तेल, चीज, मांसाहारी पदार्थ वगैरे पचायला जड असल्याने ते अग्नीला तुपाप्रमाणे सहायक ठरत नाहीत.

म्हणून भारतीय परंपरेत आपण जेवण सुरू करण्यापूर्वी अन्नशुद्धीसाठी चमचाभर तूप घेतो. सध्याचे प्रकृतिमान, पचनशक्‍ती, जीवनपद्धतीचा विचार करता प्रत्येकाने कमीत कमी चार-पाच चमचे साजूक तूप आहाराबरोबर सेवन करणे श्रेयस्कर होय.
काळ - म्हणजे पचनासाठी लागणारा वेळ. ज्याप्रमाणे अन्न शिजविण्यासाठी अमुक वेळ द्यावाच लागतो, वेळ कमी द्यायचा म्हटले तर पदार्थ नीट शिजत नाही किंवा रुचकर बनत नाही, त्याप्रमाणे अन्न सेवन केले, की त्याचे पचन व्यवस्थित होण्यासाठी पर्याप्त वेळ द्यायला हवा. सर्वसाधारणतः अन्नपचन पूर्ण होण्यासाठी तीन-साडेतीन तासांचा अवधी लागणे स्वाभाविक असते. मात्र, एखाद्याची पचनशक्‍ती मंदावलेली असली तर त्याला याहून अधिक वेळ लागू शकतो. म्हणून एकदा काही खाल्ले की, उदा. सकाळचा नाश्‍ता झाला किंवा दुपारचे जेवण झाले, की ते पचेपर्यंत किंवा साधारणतः तीन-साडेतीन तासांपर्यंत काही खाऊ नये असे सांगितले जाते. आधीचे खाल्लेले अन्न पचण्यापूर्वी जर पुन्हा खाल्ले तर त्याला "अध्यशन' असे म्हटले जाते आणि ते अपचनाचे आणि पर्यायाने अनेक रोगांचे कारण असते, असे सांगितले जाते. याच कारणामुळे दिवसातून तीन-चार वेळा थोडे थोडे खाणे आणि मधल्या वेळात अबरचबर न खाणे हे पचन नीट होण्यासाठी महत्त्वाचे असते.
समयोग - म्हणजे सर्व बाजूंनी सारासार विचार करून अनुकूल प्रकारचे अन्न सेवन करणे. अन्नाची प्रकृती, व्यक्‍तीची प्रकृती, अग्नी, दोष, देश, ऋतू, अन्नसेवनाचे नियम, मनाची अनुकूलता, जेवणाची वेळ, जेवणाचे प्रमाण, पाकसंस्कार, शुद्धता अशा अनेक बाजूंनी हितकर आहार घेणे याला समयोग असे म्हणतात. आहाराचे पचन व्यवस्थित होण्यासाठी या सर्व गोष्टी सांभाळणे महत्त्वाचे असते.
समयोग अधिक विस्ताराने समजावण्यासाठी आयुर्वेदात अष्ट आहारविधी विशेषायतन, तसेच आहारविधिविधान या दोन संकल्पना मांडलेल्या आहेत. याविषयीची माहिती आपण पुढच्या वेळी पाहू.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: family doctor ayurveda