आयुर्वेदातील अन्य संस्कार 

डॉ. श्री बालाजी तांबे (www.balajitambe.com)
Friday, 3 February 2017

स्वयंपाकात अन्न रुचकर व अधिकाधिक प्रभावी कसे होईल, याचा अभ्यास केलेला असतो, तर औषधीकरणात विविध वनस्पती, औषधी द्रव्ये शरीरासाठी अनुकूल व हितावह कशी ठरतील, याचे शास्त्र समजावलेले असते. या दोघांमध्ये महत्त्वाचे असतात ते संस्कार. 

स्वयंपाक आणि औषधीकरण या एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात. स्वयंपाकात अन्न रुचकर व अधिकाधिक प्रभावी कसे होईल, याचा अभ्यास केलेला असतो, तर औषधीकरणात विविध वनस्पती, औषधी द्रव्ये शरीरासाठी अनुकूल व हितावह कशी ठरतील याचे शास्त्र समजावलेले असते. या दोघांमध्ये महत्त्वाचे असतात ते संस्कार. आत्तापर्यंत आपण अग्निसंस्कार, पाण्याच्या मदतीने केलेले संस्कार यांची माहिती घेतली, आता त्यापुढचे संस्कार पाहू या. 

मंथन संस्कार - म्हणजे घुसळणे. दह्याचे ताक करण्यासाठी आणि लोणी काढण्यासाठी मंथन संस्कार केला जातो. दही स्वभावतः गुरू म्हणजे पचण्यास जड, उष्णता वाढविणारे आणि शरीरात अतिरिक्‍त ओलावा तयार करून सूज वाढविणारे असते. या उलट ताक मात्र पचायला हलके, पित्तदोष न वाढविणारे व सूज कमी करण्यासाठी औषध म्हणून कामाला येते. दह्यातील आणि ताकातील हा फरक मंथन संस्कारामुळे प्रत्ययाला येत असतो. आयुर्वेदिक औषधांमध्येही "मंथ' नावाचा प्रकार समजावलेला असतो. यात पाण्यात विशिष्ट औषधी द्रव्ये भिजत घालून नंतर घुसळून सर्व मिश्रण एकजीव झाले की गाळून घेतलेले पाणी औषध म्हणून वापरायचे असते. 

देश संस्कार - देश म्हणजे ठिकाण. ज्या ठिकाणी जे द्रव्य उगवते तेथील जमिनीचा, पाण्याचा, एकंदर वातावरणाचा त्या द्रव्यावर परिणाम होत असतो. द्रव्याचा जो गुण त्याला मिळत्याजुळत्या गुणाचा जर प्रदेश असेल तर ते द्रव्य अधिक प्रभावी बनते. उदा. दक्षिण भारत हा उष्ण प्रदेश असल्याने त्या ठिकाणी मसाल्याचे पदार्थ अधिक वीर्यवान तयार होतात. तर उत्तर भारतात थंडी अधिक असल्याने तेथे उगवणारी रसायन औषधे अधिक प्रभावी असतात. काही औषधे तयार करताना ती अमुक काळासाठी जमिनीच्या आत गाडून ठेवायची असतात. वमनासाठी वापरली जाणारी मदनफळे धान्याच्या ढिगात ठेवून मऊ झाली की मग औषध म्हणून वापरली जातात. हा सुद्धा एक प्रकारचा संस्कार असतो. 

वासन संस्कार - म्हणजे सुगंधित करणे. सुगंध मनाला आल्हाद देणारा असतो, पित्त शमन करणारा असतो तसेच द्रव्याचे गुणवर्धन करणारा असतो. जलावर सुगंधाचा संस्कार करण्यासाठी चंदन, वाळा, अनंतमूळ वगैरे सुगंधी द्रव्ये वापरली जातात. द्रव्यांचे अर्क काढताना सुद्धा कमळाच्या फुलांनी, मोगऱ्याच्या फुलांनी सुगंधित करण्याची पद्धत असते. शरद तसेच ग्रीष्म ऋतूत पित्ताला शांत करण्यासाठी सुगंधी फुले अंगावर घालायला सुचवलेले असते.

 काल संस्कार - काळ सातत्याने सर्व गोष्टींवर संस्कार करत असतो. एखादी गोष्ट नुसती ठेवून दिली तरी त्यावर काळाचा संस्कार होतच असतो. उदा. तांदूळ वर्षभर ठेवून दिले आणि नंतर आहारात वापरले तर ते पचायला सोपे होतात. पिंपळी, गूळ, वावडिंग वगैरे द्रव्ये एक वर्षानंतर वापरायची असतात कारण त्यांचा काल संस्काराने गुणोत्कर्ष होत असतो. आसव-अरिष्ट जितकी जुनी असतील, भस्मे जितकी जुनी असतील तितकी अधिक प्रभावी होत जातात. तूप, जे सर्व संस्कार नीट करून तयार केलेले असते, त्यावर शंभर वर्षांचा काल संस्कार झाला तर मानसिक रोगांवर अद्भुत कार्य करणारे असते. कालसंस्काराची या प्रमाणे असंख्य उदाहरणे असतात. दिसत नसला तरी काळ सर्व प्राणिमात्रांवर सातत्याने संस्कार करत असतो. 

भावना संस्कार - आयुर्वेदाची औषधे बनविताना भावना संस्कार अनेकदा वापरला जातो. 
भावनया च स्वरसादिकृतया स्थितस्यैवामलकादेर्गुणोत्कर्षो भवति ।...चरक विमानस्थान चक्रपाणी स्वरस किंवा काढा वगैरेंच्या मदतीने भावना दिली की आवळा वगैरे द्रव्यांमध्ये आधीपासून स्थित असलेल्या गुणांचा उत्कर्ष होतो. 

भावना देणे म्हणजे द्रव्याचे चूर्ण, भस्म किंवा विशिष्ट औषधांचे मिश्रण घेऊन त्यात त्या द्रव्याला पूरक अशा वनस्पतींचा रस किंवा काढा मिसळून ते सर्व मिश्रण द्रवभाग आत शोषला जाईपर्यंत बराच वेळासाठी खलात घोटणे. भावना संस्कार देण्याने मूळ द्रव्याचे वीर्य वाढते, गुणोत्कर्ष होतो. उदा. आवळ्याच्या चूर्णाला आवळ्याच्या रसाच्या किंवा काढ्याच्या भावना दिल्या तर मूळचे चूर्ण अधिक गुणकारी होते, जेणेकरून थोड्याही मात्रेत उत्तम काम करू शकते. संतुलन अन्नयोग गोळ्या बनविताना मूळ मिश्रणाला लिंबाच्या रसाच्या भावना दिल्या जातात यामुळे गोळ्या अनेक पटींनी प्रभावी बनतात. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: family doctor ayurveda