सारे उदास उदास

डॉ संजय जानवळे
Friday, 11 August 2017

सोबतचा मजकूर 'फॅमिली डॉक्टर'च्या 28 जुलै 2017 अंकात प्रसिद्ध झालेला आहे.

पौगंडावस्थेतल्या मुलांत असलेले नैराश्‍य हा एक गंभीर प्रकारचा मानसिक आजार आहे. त्याचा त्यांच्या विचारांवर, भावनेवर व वर्तणुकीवर विपरित परिणाम होतो व त्यामुळे अनेक भावनिक, शारीरिक समस्या उद्‌भवतात. पौगंड या अस्थिर अवस्थेतल्या मुलात अनेक शारीरिक, भावनिक, मानसिक व सामाजिक बदल घडत असतात. त्यांच्या स्वाभिमानाला ठेच देणाऱ्या स्थूलपणा, सवंगड्यातल्या समस्या, दादागिरी, शैक्षणिक समस्या हे घटक नैराश्‍य बळावण्यास मदतच करतात. तुमच्या मुलांत जर या आजारांची लक्षणे आढळली तर त्यासाठी तत्काळ वैद्यकीय सल्ला घेणे हितावह ठरते.

नैराश्‍य किंवा कमालीची उदासीनता (डिप्रेशन) कुठल्याही वयोगटात आढळते. केवळ प्रौढ व्यक्तीनांच उदासीनता या मानसिक आजाराने पछाडलेले असते, असे नाही. पौगंडावस्थेतली मुले, लहान मुलेही या आजाराची शिकार बनलेली असतात. नैराश्‍य या मानसिक आजाराने घेरलेले मूल सतत किंवा बहुतांश दुःखी असते. त्याचा अनिष्ट परिणाम त्या मुलाच्या एकंदर कार्यक्षमतेवर होत असतो. त्यामुळे रोजच्या जगण्यातल्या अगदी साध्या-साध्या गोष्टीही साधणे या मुलाना दुरापास्त होते. शेवटी या मानसिक रोगाचे पर्यावसान आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलून जीवनयात्रा संपण्यात होते. सुदैवाने नैराश्‍यावर अत्यंत रामबाण इलाज उपलब्ध आहेत. त्यासाठी नैराश्‍य म्हणजे काय, ते कसे रोखायचे व त्यावरचे उपाय या नैराश्‍याच्या काही पैलूंबाबत आपल्याला माहिती असायला हवी. लहान मुलात आढळणारे नैराश्‍य हे त्या मुलाच्या आयुष्यात घडलेल्या एखाद्या घटनेमुळे असू शकते. मात्र प्रत्येक मुलाला त्यामुळेच नैराश्‍य येते, असे नव्हे. पौगंडावस्थेतल्या मुलांत असलेले नैराश्‍य हा एक गंभीर प्रकारचा मानसिक आजार आहे. त्याचा त्यांच्या विचारांवर, भावनेवर व वर्तणुकीवर विपरित परिणाम होतो व त्त्यामुळे अनेक भावनिक, शारीरिक समस्या उद्भवतात. पौगंड या अस्थिर अवस्थेतल्या मुलात अनेक शारीरिक, भावनिक, मानसिक व सामाजिक बदल घडत असतात. त्यांच्या स्वाभिमानाला ठेच देणाऱ्या स्थूलपणा, सवंगड्यातल्या समस्या, दादागिरी, शैक्षणिक समस्या हे घटक नैराश्‍य बळावण्यास मदतच करतात. तुमच्या मुलांत जर या आजारांची लक्षणे आढळली तर त्यासाठी तत्काळ वैद्यकीय सल्ला घेणे हितावह ठरते.

नैराश्‍य  म्हणजे काय ?
नैराश्‍य म्हणजे निराशेच्या व दुःखाच्या सतत येणाऱ्या मनातल्या भावना. मोठी माणसे काय अन्‌ लहान मुले काय, दोघांतही कधी तरी मनात उदासीनतेच्या भावना येणे वेगळे. पण जर तुमचे मूल नेहमीच उदास, दुःखी राहात असेल, रोजच्या कामांमध्ये किंवा खेळात मुलाचे मन रमत नसेल, त्याला झोपेच्या समस्या उद्भभवल्या असतील किंवा त्याची भूक मंदावली असेल तर त्याला नैराश्‍य या मानसिक आजाराने पछाडले आहे,असे समजावे.

लक्षणे
मनात उदासिनतेच्या, निराशेच्या भावना असतात. नैराश्‍य आलेल्या मुलात कधी-कधी दुःखाच्या भावनेपेक्षा अधिक चिडचिडेपणा अधिक असतो.
पूर्वी मजा करणाऱ्या मुलाचा रोजच्या कामातला रस कमी होणे. उदा. एरवी मित्रासोबत खेळणारे मूल आता एकांतात एकटे एकटे राहते.
काहीच कारण नसताना उगाचच मूल सारखे रडत राहते.
अशक्तपणा. मुलाला नेहमी थकल्यासारखे वाटत राहते.
मुलाचे अभ्यासात लक्ष लागत नाही. शाळेतला त्याचा परफॉर्मन्स ढासळतो.
खूप जास्त किंवा खूपच कमी झोप येते.
खूप जास्त किंवा खूप कमी खाणे, तसेच वजन घटते किंवा ते वाढतेही.
आपण निरूपयोगी व नालायक आहोत, असे सतत वाटत राहणे व त्यासोबत मनात उगाचच अपराधीपणाच्या भावना येत राहणे.
मुलाच्या मनात सतत मृत्यू व आत्महत्येचे विचार मनात येत असतात अन्‌ ते मूल त्याबद्दल सतत बोलत राहते.

नैराश्‍य कशामुळे येते?
नैराश्‍य हा आजार होण्याची अनेक कारणे आहेत. काही आनुवांशिक घटक, सामाजिक घटक अन्‌ आयुष्यात आलेले काही अनुभव, त्याचबरोबर मेंदूत होणारे जीवरासायनिक बदल, व्यक्तिमत्त्व आणि ताणतणाव ही हा आजार होण्याची काही कारणे होत.
नैराश्‍य या आजारामुळे होणाऱ्या संभाव्य गुंतागुंतीही विचारात घ्यायला हव्यात. नैराश्‍याला बळी पडलेली पौगंडावस्थेली मुले आत्महत्या करण्याची भीती अधिक असते. जर एखाद्या मुलाच्या मनात आत्महत्या करण्याचे विचार येत असतील, तर त्वरीत वैद्यकीय सल्ला घेणे श्रेयस्कर ठरते. खास करुन नैराश्‍य या आजारावर नीट उपचार केले नाहीत तर आजार बळावत राहतो. त्याचा विपरित परिणाम त्या मुलाच्या आयुष्यावर, कामावर, कुटुंबावर व नातेसंबंधावर होत असतो.

मुलात नैराश्‍य येण्याचा धोका कशामुळे?
लहान मुलातील या आजाराचे प्रमाण २.५ टक्के एवढे आहे. पौगंडावस्थेतील मुलांमध्ये हेच प्रमाण आठ टक्के आहे. पौगंडावस्थेतील मुलांपेक्षा मुलींमध्ये नैराश्‍याचे प्रमाण अधिक असते. व्यसनाधीन झालेल्या, चिंतारोग, वर्तणुकीतले आजार यासारखे मानसिक आजार असलेल्या मुलांना, त्याचबरोबर शिकण्यात बाधा आणणाऱ्या ‘लर्निंग डिस्ऑर्डर’ असणाऱ्या मुलांनाही नैराश्‍य ग्रासते. आई-वडिलांना, कुटुंबातील इतर सदस्यांना जर नैराश्‍याचा आजार असेल तर, त्या कुटुंबातल्या मुलाना नैराश्‍य हा आजार होण्याची शक्‍यता अधिक असते.

उपचार कसे?
उदासीनतेच्या या आजारावर इलाजाचे तीन प्रकार आहेत.
१) औषधोपचार,
२) शॉक ट्रिटमेंट व
३) मानसिक उपचार.

मानसिक उपचार पद्धतीत कॉग्नेटिव्ह बिहेवियर थेरपी किंवा शिक्षणवर्तनशास्र उपचार पद्धत, सायको थेरपी (चर्चा पद्धत) व समुपदेशन यांचा वापर केला जातो.
यासाठी बालमनोविकारतज्ज्ञांचा सल्ला घेणें श्रेयस्कर ठरते.

मूल ज्यावेळी उदास झालेले असेल तेव्हा ज्या कारणांमुळे आपण उदास झालो ते फक्त आपल्याच बाबतीत घडते का? याचा विचार मुलांनी करायला हवा. त्या गोष्टीला आपल्या आयुष्यात किती स्थान आहे अन्‌ आपल्याला कुठल्या गोष्टींचा त्याग करणे, त्या सोडून देणे गरजेचे बनले आहे, आपण त्या सोडून द्यायच्या गोष्टीना चिकटून न बसता त्या सोडून दिल्या तर काय होईल, आपण सोडून द्यायच्या गोष्टीना चिकटून न बसता त्या सोडून दिल्या तर काय होईल, याचाही विचार करायला मुलांना शिकवले पाहिजे. 

पालकांनी आपल्या पाल्याला नैराश्‍याच्या समस्येशी लढण्यासाठी सर्वोतोपरी मदत करायला हवी. नैराश्‍य हा एक मानसिक आजार आहे, ही बाब पालकांनी ध्यानात ठेवावी. मुलांशी मनमोकळेपणाने संवाद साधावा. नैराश्‍य आले म्हणजे मोठे आभाळ कोसळले असे नाही. त्यातून मूल सहज बाहेर पडू शकते, हा आत्मविश्वास मुलांच्या मनात रुजवणे, हे पालकांचेच एक काम आहे. नैराश्‍याच्या आजारात स्वत:त बदल करणे, आव्हान स्वीकारणे, मानसिक विकास करणे तसे  त्रासदायक असते. परंतु तो त्रास आपण घेतला तर पुढे लक्षात येते की, ज्या गोष्टीचा त्रास आजवर आपल्याला होत असे, तो त्रास पुन्हा परत आपल्याला होणार नाही.

सोबतचा मजकूर 'फॅमिली डॉक्टर'च्या 28 जुलै 2017 अंकात प्रसिद्ध झालेला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: family doctor depression