मधुमेह पथ्यापथ्य

डॉ. श्री बालाजी तांबे  www.balajitambe.com
Friday, 20 October 2017

मधुमेहाचा प्रतिकार करायचा असेल, तर त्याला पथ्याचे पाठबळ हवेच; पण पथ्य म्हणजे नेमके काय हेसुद्धा नीट माहिती हवे. पथ्य-अपथ्य नीट समजून घेतले, तर आहारात नेमका बदल करता येतो.

मधुमेहाचे निदान झाले, की पहिला विचार मनात येतो तो आहारात कराव्या लागणाऱ्या बदलाचा. बरीच मंडळी डॉक्‍टरांनी सांगितलेले नसले तरी साखर न खाणे, भात बंद करणे यासारखी पथ्ये पाळू लागतात. कधी कधी तर मधुमेह होऊ नये म्हणूनसुद्धा खाण्यावर निर्बंध टाकले जातात. मधुमेहाशी लढायचे असेल, मधुमेहाचा प्रतिकार करायचा असेल, तर त्याला पथ्याचे पाठबळ हवेच; पण पथ्य म्हणजे नेमके काय हेसुद्धा नीट माहिती हवे. 

प्रमेह होण्याची जी कारणे सांगितली त्यात ज्या ज्या गोष्टींचा समावेश आहे, त्या सर्व प्रमेहांत अपथ्यकर समजाव्या लागतात. यात दही, पाण्यातील प्राण्याचे मांस, पाणी अधिक असलेल्या ठिकाणी राहणाऱ्या उदा. डुक्कर वगैरे प्राण्यांचे मांस, गुळापासून बनविलेल्या मिठाया, एक वर्षाच्या आतील धान्य यांचा समावेश आहे. दूध अधिक प्रमाणात पिणे हेसुद्धा प्रमेहाचे एक कारण सांगितलेले आहे. तेव्हा या सर्व गोष्टी प्रमेहात टाळणे आवश्‍यक होय. बरोबरीने प्रमेहात, विशेषतः कफाधिक्‍य असणाऱ्या प्रमेहात, काय खावे हे चरकाचार्यांनी पुढीलप्रमाणे सांगितलेले आहे, 

मुगाच्या कढणाबरोबर एक वर्ष जुन्या तांदळाचा भात सेवन करावा.
कडू चवीच्या भाज्यांबरोबर उदा. मेथीची भाजी, कारल्याची भाजी, कर्टोली, पडवळ वगैरेंची भाजी यांच्या बरोबर जुन्या तांदळाचा भात सेवन करावा.
कढण किंवा भाजी वगैरे बनविण्यासाठी जवसाचे तेल किंवा मोहरीचे तेल वापरावे.
साठेसाळीचे तांदूळ, विविध प्रकारची तृणधान्ये म्हणजे वरई, कोद्रव, सांवे, नाचणी यासारखी रुक्ष धान्ये, जव यांच्यापासून बनविलेले पदार्थ मध मिसळून खावेत. 
जव हे कफज प्रमेहामध्ये अतिशय पथ्यकर सांगितलेले आहेत. 
य श्‍लेष्ममेहे विहिताः 
कषायास्तैर्भावितानां च पृथक्‌ यवानाम्‌ ।
सक्‍तुन्‌ अपूपान्‌ सगुडान्‌ सधानान्‌
 भक्ष्यांस्तथा अन्यान्‌ विविधांश्‍च खादेत्‌ ।।
...चरक चिकित्सास्थान

कफशामक द्रव्यांच्या काढ्यात जव रात्रभर भिजत घालावेत, नंतर त्यांना वाळवून त्याचे पीठ तयार करावे किंवा जवाच्या लाह्या बनवून त्यापासून विविध खाद्यपदार्थ बनवून ते जुन्या गुळाबरोबर सेवन करावेत. 

प्रमेहामध्ये प्यायचे पाणीसुद्धा विशिष्ट औषधांनी संस्कारित करून घ्यायला सांगितले आहे. 

खदिरसार किंवा विजयसार यांच्यापासून षडंगोदक पद्धतीने (म्हणजे द्रव्याच्या चौसष्ट पट पाणी घेऊन ते निम्मे शिल्लक राहीपर्यंत उकळणे) संस्कारित केलेले पाणी प्यायला द्यावे. 
मध मिसळलेले पाणी
त्रिफळ्याचा काढा किंवा रस मिसळलेले पाणी
    कुश नावाच्या गवताचा संस्कार केलेले पाणी
भृष्टान्‌ यवान्‌ भक्ष्यतः प्रयोगान्‌ शुष्कान्‌ सक्‍तून्‌ भवन्ति  मेहाः ।
......चरक चिकित्सास्थान

भाजून घेतलेल्या जवापासून बनविलेले विविध खाद्यपदार्थ किंवा भाजून घेतलेल्या जवाचे पीठ बनवून त्यापासून बनविलेले पदार्थ प्रमेहात पथ्यकर असतात. 

मधुमेहामध्ये जेवणानंतर त्रयोदशी विडा (तंबाखू विरहित) खाणे, श्रीवर्धनची सुपारी खाणे हेसुद्धा हितकर असते. भाजून घेतलेल्या तांदळाचा भात, ज्वारीची भाकरी, कुळथाची उसळ, मूग, मसूर, तूर यांचे कढण किंवा आमटी, आले-लसूण टाकून केलेली साधी फळभाजी असा आहार मधुमेहात योजता येतो. 

मधुमेहात पथ्य - 
जव, बांबूचे तांदूळ, कोद्रव, सांवे, वरई, कुळीथ, जुने तांदूळ, मूग, तूर, चणे, तीळ, साळीच्या लाह्या, ताक, शेवग्याच्या शेंगा, परवर, कारले, कर्टोली, लसूण, कवठ, खारीक, काथ, कडू भाज्या, मध, गरम पाणी, तमालपत्र, लवंग, वेलची, गोमूत्र वगैरे. 

मधुमेहात अपथ्य - 
नवे तांदूळ, मका, उडीद, चवळी, वाल, मासे, आंबा, चिकू, कोहळा, ताडगोळा, दही, चीज, श्रीखंड, थंड पाणी, उसाचा रस, नवा गूळ, साबुदाणा, मिठाया वगैरे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: family doctor Diabetic Pathology