आरोग्याचा संस्कार

डॉ. श्री बालाजी तांबे  www.balajitambe.com
Friday, 9 March 2018

दोष दूर करून गुण वाढवायचे काम संस्काराच्या माध्यमातून घडत असते. म्हणून आहार असो, औषध असो किंवा आपले आरोग्य असो, ते उत्तम प्रतीचे हवे असेल तर त्यावर संस्कार व्हायला हवेत. 

गर्भावस्थेपासून ते शेवटच्या क्षणापर्यंत आपल्यावर अन्नाचा, हवामानाचा, समाजाचा, शिक्षणाचा, एवढेच नाही तर आपल्या वागणुकीचा व आचार-विचारांचाही कळत-नकळत संस्कार होत असतो. संस्कार हे चांगले असतातच, तसेच वाईटही असू शकतात. उदा. सुसंगतीचे संस्कार चांगले, तर कुसंगतीचे संस्कार वाईट.

मात्र आयुर्वेद असो किंवा इतर कोणतेही प्राचीन भारतीय शास्त्र असो, संस्कार हे शुद्धीसाठी, उन्नतीसाठी, काहीतरी चांगले घडण्यासाठीच केलेले दिसतात. आयुर्वेदात संस्काराची व्याख्या अशी केलेली आहे, 

संस्कारो हि गुणान्तराधानाम्‌ ।
....चरक विमानस्थान

गुणात बदल करणे, वाईट गुण घालवून चांगले गुण प्रस्थापित होणे यासाठी संस्कार करायचे असतात. 

संस्कार समजावताना ग्रंथकारांनी ‘दोषापनयनम्‌’ हा शब्दसुद्धा वापरलेला आहे. दोष दूर करून गुण वाढवायचे कामसुद्धा संस्काराच्या माध्यमातून घडत असते. म्हणून आहार असो, औषध असो किंवा आपले आरोग्य असो, ते उत्तम प्रतीचे हवे असेल तर त्यावर संस्कार व्हायला हवेत. 

आहारावर संस्कार स्वयंपाकाच्या रूपाने करायचे असतात, औषधावर काय संस्कार करायचे ते औषधशास्त्रात समजावलेले असते. तसेच आरोग्याचा संस्कार निरोगी जीवनशैली, अनुशासन, पंचकर्म यांच्या माध्यमातून होत असतो. मुळात ज्या संस्कारामुळे अशुद्धी, वाईट गोष्टी दूर होत राहतात आणि चांगल्याची अभिवृद्धी होते ते सर्व संस्कार होत. 

‘पिंड-ब्रह्मांड’ न्यायानुसार विश्वातील प्रत्येक गोष्टीचा, घडणाऱ्या प्रत्येक घटनेचा आपल्या शरीरावर परिणाम होत असतो. सध्या निसर्गात जे अघटित घडते आहे त्याचा परिणाम आपल्या शरीरावर झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे निसर्गाची जपणूक करणे, निसर्गनियमांना न डावलणे, ज्या भूमी, हवा, पाणी, झाडे, पशू, पक्षी यांच्या आधाराने आपण राहतो, जगतो आहोत त्यांची आपल्या परीने काळजी घेणे, त्यांच्यात दोष उत्पन्न होईल असे न वागणे हे तरी आपल्या हातात आहे. या दृष्टीने कचऱ्याची विल्हेवाट नीट लावणे, प्लॅस्टिकचा वापर कमीत कमी करणे, शक्‍य तेथे नैसर्गिक द्रव्यांचा वापर करणे, जमिनीत, पाण्यात केमिकल द्रव्ये जाणार नाहीत यासाठी आपल्या सवयी बदलणे हे आरोग्य संस्कारांच्या दृष्टीने महत्त्वाचे. 

आहारयोजना करताना मुळातील अन्न म्हणजे भाज्या, धान्य वगैरे गोष्टी सेंद्रिय गोष्टी असण्यावर, तसेच दूध, पाणी शुद्ध असण्यावर भर देणे महत्त्वाचे असते. अन्यथा नंतर स्वयंपाक करताना कितीही चांगले संस्कार केले तरी मुळातच आलेल्या दोषाचा पुढे भुर्दंड भोगावा लागू शकतो. दूध उकळून पिणे, पाणी उकळी फुटल्यावर वीस मिनिटांसाठी मंद आचेवर उकळू देणे, नंतर गाळून घेऊन पिणे, पाणी उकळताना त्यात जलसंतुलन मिश्रण टाकणे हे सर्व संस्कार आरोग्याला कारणीभूत असतात. भाज्या निवडणे, धुणे व नंतर कापणे किंवा धान्याचे पीठ करण्यापूर्वी ते थोडेसे भाजून घेणे, भात बनविण्यापूर्वी तांदूळ तुपावर थोडेसे परतून घेणे, तुरीचे वरण शिजवताना त्यात थोडे जास्ती पाणी टाकून नंतर ते पाणी टाकून देणे, प्रेशर कुकरऐवजी शक्‍यतो नेहमीच्या भांड्यात, कढईत वगैरे स्वयंपाक करणे हे सर्व आहारावरचे संस्कार होत. याशिवाय अन्न कोणत्या धातूच्या भांड्यात बनवले आहे, स्वयंपाक करणाऱ्या व्यक्‍तीची मानसिकता कशी होती, शिजविलेले अन्न किती वेळाने खाल्ले, कोणत्या ताट-वाटीतून खाल्ले, अन्न खाताना मनःस्थिती कशी होती, या सर्वांतून अन्नावर संस्कार होत असतात. आयुर्वेदात यासाठी अग्निसंस्कार, शौचसंस्कार, वासनसंस्कार, पोषणसंस्कार, मंथनसंस्कार वगैरे शब्द वापरले आहेत. 

औषधांवरील संस्काराचे हेतू
औषधांवर संस्कार करण्यामागे मुख्य पाच हेतू असतात. 
१. औषध अधिक प्रभावी बनविणे.
२. सहजतेने घेता यावे, कमी मात्रेतही गुणकारी ठरावे.
३. त्याचे कोणतेही दुष्परिणाम नसावेत.
४. शरीरात प्रवेशित झाले की ते अपेक्षित ठिकाणी पोचू शकावे. 
५. औषध दीर्घकाळासाठी खराब न व्हावे.

आयुर्वेदिक औषधशास्त्र या उद्दिष्टांना पूर्ण करू शकते, ते केवळ संस्कारांच्या मदतीने. उदा. औषध अधिक प्रभावी बनण्यासाठी त्याला भावना दिल्या जातात म्हणजे पाचक औषधाला लिंबू किंवा महाळुंगाच्या रसाच्या भावना दिल्या की ते अनेक पटींनी प्रभावी बनते. सुवर्ण, अभ्रक, रौप्य वगैरे धातू उत्तम रसायन गुणांनी युक्‍त असतात, मात्र ते तसेच्या तसे सेवन करणे अशक्‍य असते. त्यामुळे त्यांचे भस्म बनविले की ते सहज घेताही येते, शिवाय अगदी कमी मात्रेतही उत्तम गुणकारी ठरते. लसूण, हिंग वगैरे गोष्टी रक्‍ताभिसरण व पचनासाठी उत्तम असतात, मात्र तीक्ष्ण व उष्ण असल्याने प्रत्येकाला सोसवतील अशा नसतात. म्हणून औषधात वापरण्यापूर्वी त्यांची शुद्धी करून घेता येते. गुंज, धोतरा, वत्सनाभ यासारखी विषारी द्रव्येसुद्धा अगोदर शुद्धी करून वापरली की त्यांच्यातील दोष निघून जातात, गुणाची मात्र वृद्धी होते. तुपाबरोबर संस्कारित केलेले औषध सहसा अस्थी, मज्जा, शुक्र वगैरे धातूंपर्यंत पोचविण्याच्या क्षमतेचे बनते. आसवारिष्टाच्या रूपात घेतलेले औषध ताबडतोब रक्‍तापर्यंत पोचण्यास सक्षम असते. काढा काही तासातच घ्यावा लागतो, मात्र त्याच काढ्याचे सिरप किंवा आसव बनविले तर दीर्घकाळ टिकते. आवळ्याचा पल्प फार तर दोन-तीन दिवस टिकू शकतो, पण तोच आवळा साखरेत मुरवला तर वर्षभरही टिकतो. आवळ्यापासून बनविलेले च्यवनप्राशसारखे रसायन गुणाने संपन्न बनते, शिवाय दीर्घकाळ टिकतेही. 

सद्‌वृत्त अंगिकारावे
पाकशास्त्र, औषधशास्त्र यांत संस्कार महत्त्वाचे असतात, तसेच जीवन जगण्याच्या शास्त्रातही संस्कार मोलाचे असतात. यासाठी आयुर्वेदशास्त्रात तसेच इतरही सर्व भारतीय शास्त्रांत उत्तम मार्गदर्शन केलेले आहे. ‘सद्‌वृत्त‘ हा आयुर्वेदातील भाग याच अनुषंगाने आलेला आहे. आयुर्वेदातील सद्‌वृत्त नीट समजून घेतले आणि त्याचा आपल्या जीवनात अंगीकार केला तर शरीराचे तसेच मनाचे आरोग्य उत्तम राहू शकते, संपूर्ण समाजव्यवस्था संतुलनात राहू शकते. ज्या समाजात किंवा ज्या देशात सर्व जण आपापल्या वाट्याचे सद्‌वृत्त सांभाळतील तेथे वैयक्‍तिक, सामाजिक, मानसिक, बौद्धिक, कौटुंबिक वगैरे सर्वच स्तरांवर आरोग्य उत्तम राहील हे नक्की, सद्‌वृत्ताचा विषय खूप मोठा आहे, पण उदाहरणादाखल त्यातील काही मोजक्‍या गोष्टी या ठिकाणी मांडत आहोत. 

  वैयक्‍तिक आरोग्यासाठी - दिवसातून दोन वेळा स्नान करणे, हात-पाय व सर्व मलमार्ग नेहमी निर्मळ ठेवणे, पंधरा दिवसांतून तीन वेळा नखे कापणे, मळलेले कपडे धुवूनच वापरणे, स्नानानंतर आधीचेच कपडे न घालणे, ज्या वस्त्राने अंग पुसले असे त्याच वस्त्राने डोके न पुसणे वगैरे.

  सामाजिक आरोग्यासाठी - बिघडलेल्या रथातून (सध्याच्या काळात गाडीतून) प्रवास न करणे, गरजू व्यक्‍तींना आपल्या परीने मदत करणे, अतिथींची नीट देखभाल करणे, दुसऱ्याच्या उत्कर्षाची ईर्ष्या न करणे, तोंड झाकल्याशिवाय जांभई, शिंक किंवा हसणे टाळणे. रागावलेल्या व्यक्‍तीला शांत करण्याचा, भ्यायलेल्या व्यक्‍तीला धीर देण्याचा प्रयत्न करणे. आसपासच्या लोकांशी सलोख्याने वागण्याचा प्रयत्न करणे वगैरे.

  मानसिक आरोग्यासाठी - शांत वृत्तीने वागणे, सत्याचा पक्ष स्वीकारणे, घरातून निघताना प्रसन्न मनाने निघणे, कपटी मनुष्याशी संगत न ठेवणे, कठीण प्रसंगातही धीर न सोडणे, सदा सर्वकाळ चिंतातूर न राहणे, शोकग्रस्त प्रसंग आला तरी दीर्घकाळ शोकाला थारा न देणे वगैरे. 

  कौटुंबिक आरोग्यासाठी - आपल्या बांधवांचा अपमान न करणे, स्वतःच्या लोकांवर अविश्वास न दाखवणे, एकट्याने सुख भोगण्याची इच्छा न ठेवणे, स्वतःचा आचार, स्वभाव किंवा वागणूक घरातील इतरांसाठी तापदायक नसणे वगैरे.

आरोग्य टिकण्यासाठी तत्पर राहणे, रोग झाला तर तो बरा करण्यासाठी आवश्‍यक ते प्रयत्न करणे, स्वतःची प्रकृती माहिती करून घेऊन त्यानुसार आहार-आचरणाचे नियोजन करणे, ऋतुचर्या सांभाळणे, वयानुसार वेळोवेळी पंचकर्म करून शरीरशुद्धी करून घेणे, रसायन सेवनाने शरीरशक्‍ती चांगली ठेवणे, नियमित चालणे, योग, व्यायाम यांच्या मदतीने एकंदर आरोग्य, स्फूर्ती कायम ठेवणे हेसुद्धा आरोग्य संस्कारच असतात.

थोडक्‍यात जीवनाच्या परीक्षेत चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण व्हायचे असेल तर संस्कारांची शिदोरी जवळ असायलाच हवी. आपल्या भारतीय संस्कृतीने, भारतीय शास्त्रांनी ही शिदोरी भरभरून दिलेली आहे, तिचा स्वीकार करण्याची तयारी असली तर आरोग्य, यश, समृद्धी, समाधान या सर्वच गोष्टी मिळतील हे नक्की.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: family doctor dr balaji tambe health article