आयुर्वेदातला आहारविधी

डॉ. श्री बालाजी तांबे
Thursday, 23 March 2017

शरीराला ऊर्जा मिळावी म्हणून आहार घेणे आवश्‍यक असते. पण हा आहार कधी, कसा व किती घ्यावा याचेही नियम आहेत. आरोग्यस्वास्थ्यासाठी आयुर्वेदाने सांगितलेला आहारविधी सांभाळणे आवश्‍यक आहे.

शरीराला ऊर्जा मिळावी म्हणून आहार घेणे आवश्‍यक असते. पण हा आहार कधी, कसा व किती घ्यावा याचेही नियम आहेत. आरोग्यस्वास्थ्यासाठी आयुर्वेदाने सांगितलेला आहारविधी सांभाळणे आवश्‍यक आहे. 

आहार प्रकृतीनुरूप, तसेच आपण राहतो त्या प्रदेशाला अनुकूल, चालू असलेल्या ऋतूला अनुकूल, वय, जीवनशैली वगैरेंचा विचार करून योजणे जितके महत्त्वाचे असते, तितकेच महत्त्व आहार कसा, कुठे, कशा मनःस्थितीत सेवन केला यालाही असते. यालाच आयुर्वेदात 'आहारविधी' असे म्हटलेले आहे. या संबंधात सुश्रुतसंहितेत सांगितलेले आहे, की जेवणापूर्वी स्नान केलेले असावे. सर्वप्रथम पितर, देव, गुरू, अतिथी, लहान मुले यांची तृप्ती करावी. घरातील गाय व इतर जनावरांना चारा वगैरे घालून हात, पाय व तोंड धुऊन मगच जेवायला बसावे. सुरवातीस प्रार्थना म्हणून जेवायला सुरवात करावी. जेवताना विविध चवीच्या खाद्यपदार्थांचा क्रम असा ठेवावा. 
बुभुक्षितेन पुरुषेण वातपित्तप्रशमनाय प्रथमं रसः ग्राह्यः स पक्वाशयगतं वायुं जयति । अम्ललवणौ मध्यभोजनस्थौ पित्ताशयेऽग्निदीप्तिं कुरुतः । अन्ते कफनाशनाय कट्‌वादयः। 
...सुश्रुत सूत्रस्थान 

भूक लागलेल्या व्यक्‍तीने सर्वप्रथम वात-पित्ताचे शमन होण्यासाठी गोड चवीचे पदार्थ सेवन करावेत. याने आतड्यातील वायू सरायलाही मदत होते. जेवणाच्या मध्यात आंबट व खारट पदार्थ खावेत म्हणजे अग्नी प्रदीप्त होण्यास मदत होते. तर शेवटी कफ जिंकण्यासाठी तिखट, कडू व तुरट रसाचे सेवन करावे. 

या क्रमाचे पालन केल्यास जेवणानंतर सुस्ती वा आळस येणे, छातीत वा घशात जळजळणे व पोटास वायू धरणे या तक्रारी कमी व्हायला निश्‍चित मदत होते. याखेरीज जेवण कुटुंबीय, इष्ट मित्रांसह एकांत स्थानी करणे, उघड्यावर किंवा अनेक लोकांच्या समोर जेवणे, जेवण वाढणाऱ्या व्यक्‍तीने स्वच्छतेचे भान राखणे, जेवण वाढणारी व्यक्‍ती प्रेमळ व आपुलकीने वाढणारी असणे, जेवताना बोलणे किंवा हसणे शक्‍यतो टाळणे, इतर विषयांत न गुंतता जेवणाकडे लक्ष ठेवून जेवणे, अन्नाविषयी वाईट शब्द न उच्चारणे, फार हळूहळू किंवा फार घाईने न जेवणे हे सुद्धा सांभाळायला हवे. 
जेवणाची वेळसुद्धा फार महत्त्वाची होय. 
अतीतकाले भुञ्जानो वायुनोपहतेऽलने । कृच्छ्रद्विपच्यते भुक्‍तं द्वितीयं च न कांक्षति ।।..सुश्रुत सूत्रस्थान 

जेवणाची वेळ टळून गेली तर वाताचा प्रकोप होतो, अग्नी मंदावतो आणि मग जे अन्न खाल्ले जाते ते फार कष्टाने पचते, शिवाय पुन्हा खायची इच्छा होत नाही. तसेच रोजच्या जेवणाच्या वेळेपूर्वी जेवायला बसले तर भूक लागलेली नसते, अग्नी प्रदीप्त झालेला नसतो, अर्थातच अशा स्थितीत खाल्लेले अन्न नाना प्रकारचे रोग उत्पन्न करते. म्हणून जेवण नियमित वेळेवर करणे व ते निसर्गचक्राला धरून म्हणजे मध्यान्ही अकरा ते एकच्या दरम्यान करणे आरोग्याच्या दृष्टीने उत्तम असते. 
आहार सेवनाविषयी चरकसंहितेमध्ये 'आहारविधिविधान' या शीर्षकान्तर्गत काही नियम दिलेले आहेत, 
उष्णं, स्निग्धं, मात्रावत्‌, जीर्णे, वीर्याविरुद्धम्‌, इष्टे देशे इष्टसर्वोपकरणं, नातिद्रुतं, नातिविलम्बितम्‌, अजल्पन्‌, अहसन्‌, तन्मना भुञ्जीत, आत्मानमभिसमीक्ष्य सम्यक्‌ ।...चरक विमानस्थान 

अन्न उष्ण (गरम व ताजे) असावे, त्यात योग्य प्रमाणात स्निग्धता असावी, मात्रापूर्वक खावे, अगोदर खाल्लेले अन्न पचल्यावर खावे, वीर्याने परस्परांशी विरुद्ध नसावे, मनाला अनुकूल स्थानी, अनुकूल सामग्रीच्या मदतीने सेवन करावे. जेवण फार घाईघाईने करू नये किंवा फार सावकाशही करून नये, न बोलता, न हसता आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे स्वतःच्या प्रकृतीचा व स्वभावाचा विचार करून मनापासून सेवन करावे. हे सर्व नियम पाळण्याचे फायदे काय असतात याची माहिती आपण पुढच्या वेळी घेऊया. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Family Doctor by Dr. Shri Balaji Tambe