भीतीमुक्‍त संतुलन

Fearless-balance
Fearless-balance

मनुष्याला भीतीमुक्‍त, ताणमुक्‍त होण्याची गरज आहे. लवकरात लवकर ताण कसा जाईल आणि संतुलन तनाचे व मनाचे कसे साधता येईल याबाबत आयुर्वेदात उपचार असू शकतात. असे उपचार शिकून घेणे आवश्‍यक. निदान रोज डोळे मिटून वीस-पंचवीस मिनिटे बसावे व भीतीला बाजूला ठेवून समोर आलेल्या जीवनाचा आनंद घ्यावा, यामुळेच मनुष्याला सुख लाभणार आहे.

आरोग्याचे महत्त्व या विषयावर सध्या जनसामान्यांमध्ये खूप जागृती उत्पन्न झालेली आहे. व्यायामशाळेत जाणे, सकाळी उठून धावायला वा चालायला जाणे, खेळ खेळणे, अशा प्रकारे प्रयत्न केले जातात. योगाला तर अनन्यसाधारण महत्त्व आलेले आहे. त्याचप्रमाणे काय खावे, काय खाऊ नये या विषयाच्या चर्चा तरी खूप चालू असतात, प्रत्यक्ष आचरणात काय आणले जाते ही गोष्ट वेगळी. मात्र, एवढे करूनही लहानांपासून थोरांपर्यंत, गरिबांपासून श्रीमंतांपर्यंत, पूर्वेपासून पश्‍चिमेपर्यंत वेगवेगळी नावे घेऊन रोग पसरत आहेत. हे काय चाललेले आहे याविषयी जेवढी चर्चा करावी तेवढा मनात गोंधळ तयार होतो. एकूणच केवळ माणसाचेच शरीर वा मन रोगिष्ट होत आहे, म्हणजे मनुष्याच्या शरीरावर नवीन नवीन रोगांचे आक्रमण होत आहे असे नव्हे, तर निसर्गावर व वातावरणावरसुद्धा रोगांचे वाईट आक्रमण चालू आहे. थोडक्‍यात काय, सर्वच ठिकाणी अघटित असे काहीतरी घडत आहे. एकदा असे वाटते की, काही अघटित व्हावे अशी अपेक्षा माणसे ठेवत राहतात व काही अघटित व्हावे याप्रकारे त्यांचे विचार वातावरणात प्रसारित होत राहतात. या विचारांचे आधिक्‍य झाले की, बाहेर निसर्गातही काही अघटित घडायला वेळ लागत नाही. आज झाडांवर वेगवेगळ्या प्रकारच्या किडी आलेल्या दिसत आहेत, शेतीत तरारून आलेली पिके पावसाने झोडपल्यामुळे आडवी झालेली दिसत आहेत. पाऊस हवा असे म्हणणाऱ्या शेतकऱ्याला पावसानेच झोडपून काढावे याच्याएवढे दुसरे दुर्भाग्य किंवा अघटित काही नाही, असे म्हणावे लागेल. तसेच पिकावर बोंडअळीसारखे प्रकार आल्याने, द्राक्षे खराब झाल्याने, डाळिंबे खराब झाल्याने, कांद्याला भाव न मिळाल्याने एका बाजूने शेतकरी आत्महत्या करीत आहेत आणि दुसऱ्या बाजूने हे सगळे रासायनिक खते व रासायनिक कीटकनाशके वापरलेले अन्नपदार्थ खाल्ल्यामुळे त्रास होतो. या कारणामुळे हे खाऊ नका, ते खा या मार्गदर्शनांच्या मधून वाट काढत निघालेल्या मनुष्यमात्राला कुठल्याही वयात, कुणालाही, कुठेही रोग पकडत आहेत. 

एक गोष्ट निश्‍चित की मनुष्य मरतो एकदाच, पण ज्याच्या मनात भीती बसली आहे तो रोजच मरतो असे म्हटले जाते. तरीही आज चार पैशांच्या लोभापायी भीती दाखवून स्वतःचा व्यापार करणारे अनेक दिसतात. अगदी वरच्या टोकावर देवाची घातलेली भीती, रोगांची भीती, लाचलुचपतीची भीती, आक्रमणाची भीती अशा अनेकविध भीतींच्या विळख्यात मनुष्य त्रस्त होतो आणि तो करमणुकीच्या मागे लागतो. करमणुकीमध्ये आपल्या घरातील माणसांविषयी शंका येऊ लागेल अशा तऱ्हेच्या गोष्टी पाहिल्यामुळे गुंड आपल्या घरातील कोणाला उचलून नेणार नाहीत ना याबद्दलची भीती वाटू शकते. टीव्हीसारख्या करमणुकीच्या साधनांद्वारे दाखविल्या गेलेल्या बीभत्स गोष्टी घरातील लहान मुलांच्या पाहण्यात आल्यामुळे त्यांच्या मनावर काय परिणाम होईल याची भीती वाटत असतेच. हॉटेलमध्ये गेल्यावर मागविलेली पाण्याची बाटली खरोखर सीलबंद आहे की जुन्याच बाटलीत नळाचे पाणी भरून आणलेले आहे याची भीती, समजा बाटली सीलबंद असली तरी ती ज्या ठिकाणी भरली गेली तेथील पाणी चांगले आहे का, भरण्याआधी पाण्याचे परीक्षण झालेले आहे का याची भीती, समोर आलेले अन्नपदार्थ चांगले दिसत असले तरी त्यात काही रंग टाकलेले आहेत का याची भीती, अन्नपदार्थ तयार करताना कितपत स्वच्छता बाळगली गेलेली आहे याची भीती, मांसाहारी व शाकाहारी पदार्थ एकाच ठिकाणी शिजवले आहेत की वेगवेगळ्या ठिकाणी याची भीती अशा अनेक भीती पाठपुरावा सोडत नाहीत. एकूण भीतीला काही मर्यादा उरलेली नाही.

आजूबाजूला चांगले काही घडते आहे का या आशेने वर्तमानपत्र वा मासिक वाचताना, टीव्हीवर बातम्या पाहताना काय वाचायला-पाहायला मिळेल याची भीती. बातम्या पाहून किंवा ऐकून मनुष्याने काय शिकायचे असते? टीव्हीवर एका भावाने दुसऱ्या भावाला मारलेले पाहिले की, आपला भाऊ आपल्याला मारेल अशी भीती बाळगायची का? एखाद्या अपघातात घरचा कर्ता पुरुष गेल्यावर स्त्रीने घर कसे सांभाळले, धाडसाने घरातील मुलाबाळांना कसे मोठे केले अशी शौर्यगाथा दाखवली तर निदान लोकांना हुरूप येईल, परंतु इथपर्यंत बातम्या दाखवल्या जातच नाहीत. बातमी फक्‍त भीती वाढवण्यापुरतीच असावी का? 

सध्या नाना तऱ्हेच्या वस्तूंची, आयुर्वेदिक औषधांची, घरगुती उपचारांची रेलचेल आलेली दिसते. वृद्ध वैद्यांनी लिहिलेल्या काही डायऱ्यांमध्ये काही सोपे उपचार लिहिलेले आढळतात, परंतु तो उपचार केवळ लिहिलेला आहे की अनुभवजन्य आहे की नाही हे कळायला मार्ग नसतो. तेव्हा त्या उपचारांचा प्रयोग करून पाहणे आवश्‍यक असते. अमुक वनस्पती चांगली असे म्हटले तरी प्रत्येक वनस्पतीत काही चांगले-वाईट असतेच. त्यामुळे नुसती पाने खा अशा तऱ्हेचे उपचार अगदीच नगण्य प्रमाणात दिलेले आढळतात. कडुनिंब प्रकृतीला चांगला असे म्हटलेले असले तरी नुसती कडुनिंबाची पाने खाता येत नाहीत. म्हणून कडुनिंबाच्या पानांची चटणी करताना त्यात गूळ, चिंच, ओवा वगैरे गोष्टी टाकाव्या लागतात, तरच फायदा मिळू शकतो. नुसता कडुनिंबाचा पाला खाल्ला तर काय होऊ शकेल हे सांगता येत नाही. एखाद्या वनस्पतीच्या बिया वा मुळे बारा तास उकळून घेऊन नंतर वापरावी असे सांगण्यात त्यातील विषद्रव्य किंवा निरुपयोगी द्रव्ये दूर करणे असा आयुर्वेदाचा उद्देश असतो. एखादी वनस्पती उकळल्यास त्यातील उपयोगी द्रव्य उडून जात असल्याने ती भाजून घ्यावी, असा उल्लेख असतो. म्हणजे सर्व वनस्पती उपयोगाच्या असल्या तरी समोरच्याला गोंधळवून टाकणारे मार्गदर्शन करणे बरोबर नसते. सर्दीसाठी तुळशीचा किंवा अडुळशाचा रस घ्यायचा असल्यास तो मध टाकूनच घ्यावा लागतो. पण आपल्याला संपूर्ण माहिती नसलेला विषय अर्धवटरीत्या सांगितला गेला तर माहिती देत आहे की लोकांच्या मनात भीती वाढवत आहेत हे कळत नाही.

सर्व प्रकारची माहिती सर्वांना मिळणे तर आवश्‍यक आहे, पण मिळालेली माहिती सारासार विचार व विवेक करून आचरणात आणणे आवश्‍यक असते. आयुर्वेदात आठ प्रकारे परीक्षा करून व लक्षणे पाहून रोगनिश्‍चिती होते. साधे पोट दुखत असले तर पोटाचा कॅन्सर यावरची आगापीछा नसलेली माहिती वाचून घाबरून जाण्याचे कारण नसते. वर्तमानपत्रात अनेक गोष्टी छापून येतात, पण जे वाचायचे तेवढेच वाचून आवश्‍यक वाटल्यास काळजी घेता येते. पण सध्या मोबाईलवर येणारी सुटी माहिती वाचली जाते व नको ती भीती मनात घर करते. अथर्वशीर्षात ‘अशिष्याय न देयम्‌’ असे एक वचन आहे, म्हणजे गरज नसताना, योग्यता नसताना व मार्गदर्शनाशिवाय कोणास काही देऊ नये हेच खरे.      

मनुष्याला भीतीमुक्‍त, ताणमुक्‍त होण्याची गरज आहे. लवकरात लवकर ताण कसा जाईल आणि संतुलन तनाचे व मनाचे कसे साधता येईल याबाबत आयुर्वेदात उपचार असू शकतात. असे उपचार शिकून घेणे आवश्‍यक. निदान रोज डोळे मिटून वीस-पंचवीस मिनिटे बसावे व भीतीला बाजूला ठेवून समोर आलेल्या जीवनाचा आनंद घ्यावा, यामुळेच मनुष्याला सुख लाभणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com