आरोग्याचा कानमंत्र

डॉ. श्री बालाजी तांबे (www.balajitambe.com)
Friday, 6 January 2017

चारही पुरुषार्थ प्राप्त करण्यासाठी मुळात आरोग्याची नितांत आवश्‍यकता असते. शिक्षण, कामकाज किंवा धंदा, कुटुंबाचे पालन-पोषण, तसेच परमेश्वराची उपासना वगैरे सर्वच गोष्टी आरोग्याशिवाय मिळणे शक्‍य नाही. केवळ रोग नाही म्हणजे आरोग्य असते असे नाही, त्याखेरीजही काही गोष्टी आरोग्याच्या निदर्शक असतात. आरोग्यरक्षण हे आपणा सर्वांचे आद्य कर्तव्य आहे आणि त्यासाठी प्रयत्न करणे हेसुद्धा आपल्याच हातात आहे.

नवीन वर्ष नेहमीच नवीन उमेद घेऊन येत असते, पुन्हा एकदा उत्साहाने काही ना काही "पण' केले जातात. "पण' कोणताही असो, "ईप्सित' काहीही असो, ते मिळविण्यासाठी, पूर्ण करण्यासाठी आरोग्याचे पाठबळ लागतेच. आयुर्वेदातही सांगितलेले आहे,

धर्मार्थकाममोक्षाणां मूलं आरोग्यम्‌ । अर्थात चारही पुरुषार्थ प्राप्त करण्यासाठी मुळात आरोग्याची नितांत आवश्‍यकता असते. शिक्षण, कामकाज किंवा धंदा, कुटुंबाचे पालन-पोषण, तसेच परमेश्वराची उपासना वगैरे सर्वच गोष्टी आरोग्याशिवाय मिळणे शक्‍य नाही.

आरोग्य म्हणजे काय? केवळ रोग नाही म्हणजे आरोग्य असते असे नाही. काश्‍यपाचार्यांनी आपल्या संहितेत आरोग्याची नेमकी लक्षणे पुढीलप्रमाणे दिली आहेत.

सृष्टविण्मूत्रवातत्वं, शरीरस्य लाघवं, सुप्रसन्नेन्द्रियत्वं, सुखस्वप्नं, प्रबोधने, बलवर्णायुषां लाभः, सौमनस्यं, समाग्निता चेति ।
अर्थात वेळच्या वेळी भूक लागणे, खाल्लेले अन्न सहज पचणे, मल-मूत्र प्रवृत्ती सहज व वेळच्यावेळी होणे, शरीरास हलकेपणा जाणवणे, सर्व इंद्रिये आपापले कार्य कुशलतेने करत असणे, सहज झोप येणे व तितक्‍याच सहजतेने जाग येणे, जाग आल्यावर ताजेतवाने वाटणे, उत्तम बल, कांतीयुक्‍त वर्ण व दीर्घायुष्याचा लाभ होणे, मन आनंदी असणे व जाठराग्नी सम-संतुलित स्थितीत असणे ही लक्षणे उत्तम आरोग्याची निदर्शक आहेत.

आरोग्यरक्षण हे आपणा सर्वांचे आद्य कर्तव्य आहे आणि त्यासाठी प्रयत्न करणे हे सुद्धा आपल्याच हातात आहे. यासाठी प्रत्येकाला सहजतेने करता येतील अशा गोष्टी याप्रमाणे सांगता येतील.

* दिनचर्येत सांगितलेल्या गोष्टी, उदा. सकाळी लवकर उठणे, ध्यान, अभ्यास, रियाज वगैरे गोष्टी करणे, अभ्यंग, उद्वर्तन, स्नान वगैरे वेळच्यावेळी आणि यथासांग पद्धतीने, स्वतःचे किंवा पर्यावरणाची हानी होणार नाही अशा प्रकारे करणे.
* नियमित योगासने, प्राणायाम व व्यायाम करणे व तो वय, प्रकृती, ऋतू यांचा विचार करून योग्य प्रमाणात करणे.
* स्वतःची प्रकृती जाणून घेऊन त्यानुसार आहार निवडणे, बरोबरीने कोणता ऋतू आहे, त्या ऋतुनुसार काय खाणे चांगले, काय टाळणे आवश्‍यक याचा विचार करून जेवण करणे.
* जेवण वेळच्या वेळी करणे, तसेच ते प्रामुख्याने सात्त्विक, पचायला सोपे व पोषक आहे याकडे लक्ष ठेवणे, रात्रीचे जेवण हलके आणि कमी असणे प्रत्येकासाठीच चांगले असते.
* गृहस्थाश्रमी व्यक्‍तींनी स्वशक्‍तीचा विचार करून वैवाहिक सुख घेणे, होणारी संतती खऱ्या अर्थाने निरोगी, तसेच बुद्धिमान असण्यासाठी प्रत्येक स्त्री-पुरुषाने प्रयत्न करणे. गर्भधारणेपूर्वी काही विशिष्ट आयुर्वेदिक औषधे घेऊन मुळातील बीज निरोगी व शक्तिपूर्ण होण्यासाठी प्रयत्न करणे. तसेच गर्भारपणातही "गर्भसंस्कारां'च्या साह्याने बाळाचे आरोग्य व बुद्धिमत्ता उत्तम तयार होण्यासाठी प्रयत्न करणे हे स्वतःच्याच नाही तर भावी पिढीच्या आरोग्यासाठीसुद्धा उत्तम असते.
* प्रत्येकाने आपले वय व एकंदर राहणीमान पाहून प्रकृतीनुरूप रसायन औषधांचे सेवन करणे. दूध, तूप, बदाम, पंचामृत ही तर नित्य सेवनीय रसायने आहेतच. याखेरीजही लहान मुलांना लाह्यांचा लाडू; मुगाचा लाडू; दुधामध्ये गोक्षुर, अश्वगंधा, कवच बी वगैरे औषधांपासून तयार केलेला "चैतन्य" कल्पासारखा कल्प; आणि च्यवनप्राश देता येतो. तारुण्यावस्था जास्तीत जास्त टिकण्यासाठी च्यवनप्राश, मॅरोसॅन सारखी रसायने घेता येतात. ज्येष्ठ व्यक्‍तींना आवळा, द्राक्षे वगैरे पचावयास सोप्या, पण उत्कृष्ट वीर्यवान औषधांपासून तयार केलेली रसायने सेवन करता येतात. नियमित रसायनांच्या सेवनाने रोगप्रतिकारशक्‍ती, बल, ओज, तेज वाढते व निरोगी दीर्घायुष्याचा लाभ होतो.
स्त्रियांनी पाळी वेळेवर व व्यवस्थित येत आहे, अंगावरून पांढरे वगैरे जात नाही व हिमोग्लोबिन कमी होत नाही याकडे लक्ष ठेवणे. शतावरी कल्प वगैरे रसायने घेणे आरोग्यदायक असते.
* कामकाज, व्यवसायाचे स्वरूप समजून घेऊन काही साध्यासुध्या आयुर्वेदिक औषधांचे सेवन करणेही आरोग्यासाठी हितावह असते. उदा. कामानिमित्त रात्रीचे जागरण होत असल्यास, वाढणाऱ्या पित्ताला वेळीच संतुलित करण्यासाठी, अविपत्तिकर चूर्ण, सॅनकूल चूर्ण सेवन करणे. सतत प्रवास करणाऱ्या व्यक्‍तींनी अपचन होऊ नये म्हणून अन्नयोग, हिंग्वाष्टक चूर्णाचा वापर करणे. कॉम्प्युटरवर सतत काम करणाऱ्यांनी पाठीला कुंडलिनी तेलासारखे तेल लावणे. डोळ्यातील उष्णता कमी होण्यासाठी डोळ्यात अंजन, काजळ घालणे. रात्री झोपताना डोळ्यावर गुलाबपाण्याच्या घड्या ठेवणे हितावह असते.
खूप चालणे, सतत उभे राहणे, सायकलवर फार फिरणे वगैरे अधिक शारीरिक श्रम होत असल्यास वात वाढण्याची शक्‍यता असते. त्यामुळे अशा व्यक्‍तींनी वात कमी करणाऱ्या औषधी द्रव्यांपासून तयार केलेल्या तेलाचा अभ्यंग करणे, गोक्षुरादि चूर्ण, प्रशांत चूर्ण सेवन करणे आरोग्य रक्षण करणारे असते. व्यवसायात मानसिक ताण असणाऱ्या व्यक्‍तींनी ब्राह्मी, जटामांसी वगैरे वनस्पतींचे चूर्ण नियमित घेता येते, तसेच मानसिक ताण कमी होण्यासाठी मन शांत करणारे स्वास्थ्यसंगीत, योगनिद्रा, ध्यान वगैरे गोष्टींचा नियमित अभ्यास करतो येतो.
रोज बैठे काम असणाऱ्या व्यक्‍तींनी कफ वाढू नये यासाठी त्रिफळा, गुग्गुळ वगैरे औषधे तज्ज्ञ वैद्यांच्या सल्ल्याने सेवन करणे, तसेच रोज सूर्यनमस्कार, चालणे, पोहणे वगैरे व्यायाम करणे श्रेयस्कर असते.
* एकंदर आरोग्य राखण्यासाठी वयाच्या चाळिशीच्या सुमाराला शरीरशुद्धी करून घेणे उत्तम असते. यासाठी "पंचकर्म चिकित्सा' एक उत्तम प्रभावी चिकित्सा आहे. मात्र पंचकर्म शास्त्रीयरीत्या व सर्व प्रकारचे अनुशासन सांभाळून होत असल्याची खात्री असू द्यावी. पंचकर्माद्वारा शरीरशुद्धी झाल्यानंतर प्रकृतीनुरूप योग्य रसायनांचे सेवन करायचे असते.
* सिक आरोग्यासाठी नियमांचे पालन करणे, उदा. खरे बोलणे, वयाने मोठ्या व्यक्‍तींना व गुरुजनांना मान देणे, इंद्रिये व मनावर नियंत्रण असू देणे, मनात वेडेवाकडे विचार न आणणे, चुकीच्या वर्तनापासून मनाला परावृत्त करण्याचा प्रयत्न करणे वगैरे.
* आध्यात्मिक आरोग्यासाठी एखादे समाजसेवेचे व्रत घेऊन सतत दुसऱ्याला काहीतरी मदत करत राहणे; आपल्या ऐपतीप्रमाणे दानधर्म करणे; स्वतःच्या दोषांकडे लक्ष देऊन ते निवारण करण्याचा प्रयत्न करणे; परमेश्वरावर, निसर्गावर व मुख्यतः स्वतःवर श्रद्धा वाढेल असे ध्यान-धारणादी उपचार अध्यात्मिक आरोग्यासाठी करणेही एकंदर आरोग्याला हातभार लावणारे असते.
नवीन वर्षाचे स्वागत आपण उत्साहाने केलेले आहेच. हे वर्ष सुख, समृद्धीपूर्ण आणि आरोग्यपूर्ण असावे यासाठी हे "कानमंत्र' नक्की मदत करतील.

डॉ. श्री बालाजी तांबे, आत्मसंतुलन व्हिलेज, कार्ला 410 405

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: family doctor health