अग्निदुष्टीकर भाव 

डॉ. श्री बालाजी तांबे 
Friday, 21 April 2017

अग्नीला संतुलित ठेवण्यासाठी, त्याची कार्यक्षमता कायम राहण्यासाठी आपण प्रयत्न करू शकतो. पण बिघडलेल्या अग्नीला पूर्वपदावर आणणे नेहमी शक्‍य होतेच असे नाही. त्यामुळे अग्निदुष्टीपासून दूर राहणेच हितकर असते. 

आयुर्वेदात अग्नीला ईश्वराची उपाधी दिलेली आहे, कारण ज्याप्रमाणे ईश्वराची कृपा निरंतर राहावी म्हणून आपण फक्‍त त्याची उपासना करू शकतो, सत्कृत्य करू शकतो, त्याप्रमाणे अग्नीला संतुलित ठेवण्यासाठी, त्याची कार्यक्षमता कायम राहण्यासाठी आपण प्रयत्न करू शकतो.

रागावलेल्या देवाला शांत करणे जसे आपल्या हातात नसते, तसेच बिघडलेल्या अग्नीला पूर्वपदावर आणणे नेहमी शक्‍य होतेच असे नाही म्हणून अग्निदुष्टीची कारणे माहिती करून घेणे आणि त्यापासून दूर राहणे हे गरजेचे होय. आतापर्यंत आपण अग्निदुष्टीची अनेक कारणे पाहिली, त्यातील उर्वरित कारणे याप्रमाणे होत. 

देश वैषम्य - देश म्हणजे आपण राहतो ते स्थान किंवा तो प्रदेश. देशात विषमता येणे म्हणजे बिघाड होणे. कडाक्‍याचा दुष्काळ पडणे, वारंवार भूकंप होणे, उल्कापात होणे, रोगराईचे आक्रमण होणे वगैरे देश बिघडल्याची लक्षणे असतात. अशा अपायकारक प्रदेशात राहण्याचा अग्नीवर दुष्परिणाम होतो म्हणून असा देश बदलणे, निदान काही काळासाठी स्थलांतर करणे हितावह असते. काश्‍यप संहितेत एका ठिकाणी म्हटले आहे, की वारंवार अपचन (अन्नविदाह) होत असेल तर देशांतरी जावे. अन्न अंगी लागत नसेल, एखाद्या मोठ्या आजारपणातून बरे झाल्यावर पुन्हा शरीराला उभारी आणायची असेल तर शुद्ध हवेच्या ठिकाणी काही दिवसांसाठी जाण्याची पद्धत असल्याची दिसते. 

ऋतुवैषम्य - म्हणजे ऋतूंमध्ये बिघाड होणे. यात ऋतूचा अतियोग, अयोग व मिथ्यायोग असे तीन प्रकार असतात. उदा. पावसाळ्यात पूर येईल इतका पाऊस पडणे हा अतियोग, दुष्काळ पडणे हा अयोग आणि पावसाळ्यात पावसाऐवजी थंडी किंवा उन्हाळ्यासारखे रखरखते ऊन पडणे हा मिथ्यायोग. असे बदल उन्हाळ्यात किंवा हिवाळ्यात झाले तर ते सुद्धा अग्नी बिघडण्यास पर्यायाने अनारोग्यास कारणीभूत असतात. 

वेगधारण - मल, मूत्र, भूक, तहान, हसू, अश्रू वगैरे एकूण तेरा नैसर्गिक वेग असतात. या वेगांना बळेच धरून ठेवणे हे अग्नीची कार्यक्षमता मंदावण्यास कारणीभूत असते. उदा. मलप्रवृत्तीचा किंवा अपानवायू सरण्याचा वेग आलेला असताना बळेच जेवण्याने किंवा काहीही खाल्ल्याने समानवायू अपानवृत होऊन अग्नी बिघडू शकतो. उलटी बळेच थांबवल्याने अग्नी मंदावतो किंवा सातत्याने जागरण करण्यानेही अग्नीची कार्यक्षमता कमी होते. 

अति जलपान - पाणी हे योग्य प्रमाणात व योग्य संस्कार करून प्यायले तर औषधाप्रमाणे हितकर असते. पाणी पिण्यापूर्वी त्यावर अग्निसंस्कार होणे आवश्‍यक असते. 

अनभिष्यन्दि लघु च तोयं क्वथितं शीतलम्‌ ।...अष्टांगहृदय सूत्रस्थान 
उकळलेले पाणी पचण्यास सोपे असते आणि शरीरात अतिरिक्‍त ओलावा तयार करत नाही. म्हणजे असे पाणी पिण्याने वजन वाढणे, अंगावर किंवा पायावर सूज येणे वगैरे त्रास होण्यास प्रतिबंध होतो. विशेषतः दोष असंतुलित असले, एखादा व्याधी झाला असला, ताकद कमी झालेली असली तर कच्चे पाणी मुळीच प्यायचे नसते. ज्याप्रमाणे निसर्गात आग लागली की ती विझविण्यासाठी पाणी वापरले जाते म्हणजेच अग्नी आणि पाणी परस्परविरुद्ध असतात, त्याप्रमाणे शरीरस्थ अग्नीची कार्यक्षमता कमी होऊ द्यायची नसेल, तर पाणी उकळून घेतलेले असणे श्रेयस्कर असते. 

बऱ्याचदा मनात प्रश्न येतो की उकळलेले गरम पाणी पिण्याने शरीरात उष्णता तर वाढणार नाही ना? मात्र गरम पाणी प्यायले तरी त्याचे एका मर्यादेतच उष्ण गुणाचे कार्य होत असते. मुळात पाण्याचा धर्म शीत असतो. 
पाके स्वादु हिमं वीर्ये तदुष्णमपि योजितम्‌ ।....अष्टांग संग्रह सूत्रस्थान 
उष्ण जलाचाही विपाक मधुर आणि वीर्य थंडच असते. 

पाण्याचे प्रमाणसुद्धा हवामान, कामाचे स्वरूप, प्रकृती वगैरेंच्या अनुषंगाने ठरत असते. तसेच तहान लागेल त्या प्रमाणात पाणी पिणे आवश्‍यक असते. दर वेळेला घटाघटा पाणी प्यायची सवय अग्नीला मंद करणारी होय. यातून शरीरात आम साठू लागतो. तहान अजून अजून लागते, झोप अति प्रमाणात येते, गॅसेस होणे, अंग जड होणे, खोकला, गळून गेल्यासारखे वाटणे, मळमळणे, सर्दी वगैरे अनेक त्रासांचे मूळ रोवले जाते. म्हणून पाणी योग्य प्रमाणात आणि तहान लागेल तेव्हा पिणे हेच श्रेयस्कर होय. 

जेवायला सुरवात करण्यापूर्वी पाणी पिणे हेसुद्धा अग्नी दूषित करणारे असते. घोटभर पाणी प्यायला किंवा आचमन करायला हरकत नाही, मात्र जेवणापूर्वी एकदम ग्लासभर पाणी पिण्याने भूक मरते आणि नंतर खाल्लेले अन्न नीट पचू शकत नाही. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: family doctor health