अंगदुखी

डॉ. श्री बालाजी तांबे  www.balajitambe.com
Friday, 11 August 2017

अनेकदा अंगदुखीने आपण अस्वस्थ होतो. अंगदुखी हा रोग नाही तर, ते एक लक्षण आहे. अंगदुखीची कारणे वेगवेगळी असतात आणि त्याचे प्रकारही निरनिराळे असतात. एक खरे की, अंगदुखी हे वातव्याधीचे पूर्वरूप असते.

काही लागलं, खुपलं तर त्यापाठोपाठ वेदना होणे स्वाभाविक असते, या वेदना सहसा स्थानिक असतात. मात्र जेव्हा आघात झालेला नसूनही संपूर्ण अंग दुखते, दैनंदिन काम सहजतेने करता येत नाही तेव्हा त्यावर उपचार करण्याची गरज असते. अंगदुखी हा रोग नाही तर, ते एक लक्षण आहे. आयुर्वेदात अंगदुखी हे वातदोष वाढल्याचे, वातदोष बिघडल्याचे एक लक्षण सांगितलेले आहे. वातव्याधीचे पूर्वरूप सांगताना अंगदुखीचा निर्देश केलेला आढळतो. 

भेदस्तोदोऽर्तिराक्षेपो मुहुश्‍चायास एव च ।।
....माधवनिदान

भेद म्हणजे अंग फुटल्याप्रमाणे वेदना होणे, तोद म्हणजे टोचल्याप्रमाणे वेदना होणे, एकंदर शरीर दुखणे, झटके येणे, कमालीचा थकवा येणे ही सर्व लक्षणे वातविकाराची नांदीरूप असतात. वेदना या वाताशिवाय नसतातच, त्यामुळे अंगदुखी म्हटली की शरीरात वात वाढला आहे, हे सहज समजू शकते. 

त्यामुळे खूप प्रवास झाला, झोप कमी पडली, सातत्याने खूप परिश्रम झाले, वेळेवर विश्रांती घेता आली नाही की शरीरात वातदोष वाढणे व त्यामुळे अंग दुखायला लागणे हे पाठोपाठ येते. अंगदुखी वेगवेगळ्या प्रकारची असू शकते. कधी कधी अंग असे दुखते की दाबून घेतले तर बरे वाटते, कधी कधी अंग ठणकल्यासारखे दुखते, कधी शरीरातील अमुक भाग पिळवटून निघाल्यासारखा दुखतो (याला आपण व्यवहारात पेटके येणे असे म्हणतो. सहसा पायाच्या पोटऱ्यांमध्ये पेटके येण्याचे प्रमाण जास्ती असते), कधी अंग अगदी आतून म्हणजे हाडांपासून दुखते असे जाणवते तर कधी अंग असे दुखते की साधा स्पर्शसुद्धा सहन होत नाही. दुखण्यातील हा फरक वातदोष कोणत्या धातूच्या आश्रयाने प्रकुपित झाला आहे यावरून होत असतो. उदा. 

- वायू त्वचा किंवा रसधातूच्या आश्रयाने प्रकुपित झाला तर बोटांच्या पेरांमध्ये वेदना होतात. 
- वायू रक्‍ताच्या आश्रयाने प्रकुपित झाला तर संपूर्ण शरीरात तीव्र वेदना होतात. बरोबरीने सर्वांगाचा दाह होतो, त्वचा अति संवेदनशील होते. 
- वायू मांस व मेदाच्या आश्रयाने प्रकुपित झाला तर शरीर जड होऊन दुखते, सुया टोचल्याप्रमाणे वेदना होतात, अतिशय थकवा जाणवतो. 
- वायू अस्थी व मज्जाधातूच्या आश्रयाने प्रकुपित झाला तर बोटाची पेरे आणि हाडांमध्ये तीव्र वेदना होतात, जणू हाड मोडल्याप्रमाणे वेदना होतात, सर्व सांध्यांमध्ये वेदना होतात. व्यक्‍ती झोपूसुद्धा शकत नाही अशा तीव्र व निरंतर वेदना होतात. 

अशा प्रकारे अंग दुखण्याच्या तीव्रतेवरून व स्वरूपावरून वातदोषाखेरीज अजून कुठल्या शरीरधातूवर उपचार करायचे आहेत हे समजू शकते. तापामध्ये, सर्दीमध्ये सुद्धा अंगदुखी असते. उलट्या-जुलाबांमुळे शरीरातील रसधातू कमी झाला, डिहायड्रेशन झाले तरी अंग दुखू शकते. रक्‍तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी झाले, कॅल्शियम कमी प्रमाणात मिळत असले तरी त्यामुळे अंगदुखी उद्‌भवू शकते. 

आयुर्वेदात अंगदुखीचे एकूण एक मुख्य कारण सांगितले ते म्हणजे शरीरात आमदोष तयार होणे. सेवन केलेले अन्न व्यवस्थित पचले नाही की आमदोषात रूपांतरित होते व त्यामुळे आळस, अपचन, तोंडाला चव नसणे, काम न करताही थकवा जाणवणे, गुंगी येणे या लक्षणांच्या बरोबरीने अंग दुखणे हे लक्षण उद्‌भवते. अर्थातच आमदोषामुळे अंग दुखत असले तर सर्वप्रथम पचन सुधारणे, आहारावर नियंत्रण ठेवणे हे महत्त्वाचे उपाय असतात. 

अतिमानसिक ताण असणे, मन कायम अस्वस्थ, अशांत राहणे हे सुद्धा वातप्रकोपाचे व पर्यायाने अंगदुखीचे कारण ठरू शकते. अंगात ताप मुरला असला, अंगात कसकस वाटत असली तरी त्यामुळे अंग दुखू शकते. स्त्रियांच्या बाबतीत अंगावरून पांढरे जात असले, पाळीमध्ये शरीरातील उपयुक्‍त धातू निघून जात असला तर त्यातूनही वातप्रकोप होऊन अंग दुखू शकते. थोडक्‍यात, अंगदुखीची कारणे अनेक असतात, त्यामुळे केवळ वेदनाशामक औषधाची मदत न घेता, अंग दुखण्यामागचे  नेमके कारण शोधून काढले व त्यानुसार नेमके उपचार केले तर त्रास पूर्णपणे बरा होऊ शकतो. अंगदुखी हा काही रोग नाही, तर शरीर अस्वास्थ्याचे सूचक लक्षण आहे. ज्याच्या माध्यमातून शरीर काहीतरी चुकत असल्याचे, आपल्याला सांगत असते. तेव्हा अंगदुखीकडे वेळीच लक्ष देणे चांगले होय. 

कोणत्याही वेदना वाताशिवाय नसतात आणि तेल हे वातावरचे श्रेष्ठ औषध असते. त्यामुळे अंगदुखीवर वातशामक द्रव्यांनी संस्कारित तिळतेलाचा अभ्यंग हा उत्तम उपाय असतो. विशेषतः प्रवास, कमी झोप, अतिपरिश्रम, अतिमैथुन वगैरे कारणांमुळे अंग दुखत असेल तर संपूर्ण शरीराला हलक्‍या हाताने अभ्यंग करणे उत्तम असते. यालाच स्वेदनाची जोड देता आली तर अधिक चांगला गुण येतो. आठवड्यातून दोन वेळा अगोदर तेल लावून नंतर बाष्पस्वेदन घेण्याने वातदोष संतुलित व्हायला आणि अंगदुखी कमी व्हायला मदत मिळते. स्नेहन-स्वेदनाला अपवाद असतो तो आमदोषाचा. अंगदुखीचा अपचनाशी, आमदोषाशी संबंध असला तर मात्र तेल लावण्याने बरे वाटत नाही. अशा वेळी लंघन, अग्नी प्रदीप्त करणारे उपचार योजावे लागतात. 

‘बस्ती’ हा आयुर्वेदातील उपचार सुद्धा अंगदुखीवर उत्तम असतो. दशमूळ, एरंड मूळ, रास्ना, अश्वगंधा वगैरे वातशामक द्रव्यांनी सिद्ध तेलाची बस्ती घेण्याने अंगदुखी क्रमाक्रमाने कमी होत जाते असा अनुभव आहे. प्रशिक्षित परिचारकाकडून अंग दाबून घेणे, मसाज करून घेणे हा सुद्धा अंगदुखीवरचा प्रभावी उपचार असतो. 

याखेरीज अनुभवाचे आणि घरच्या घरी सहजतेने करता येण्याजोगे काही उपाय याप्रमाणे सांगता येतील,

झोप न आल्यामुळे अंग दुखत असल्यास रात्री झोपण्यापूर्वी अर्धा चमचा अश्वगंधा चूर्ण पाण्याबरोबर घेता येते. यामुळे शांत झोप लागण्यास मदत मिळते तसेच अंग दुखणे, अंगात चमका येणे, उठणे-बसणे अवघड होणे वगैरे तक्रारी कमी होतात. 

सर्दी-तापामुळे अंग दुखत असले तर गवती चहाचा संपूर्ण अंगाला वाफारा घेण्याने घाम येतो व ताप उतरतो, पर्यायाने अंगदुखी कमी होते असे दिसते. 

शुद्ध केलेला गुग्गुळ, तूप व मध यांचे मिश्रण घेतल्यास शरीरातील वातदोष कमी होऊन अंग दुखणे बरे होते. 

पारिजातकाची पाने अंगदुखी कमी करणारी असतात. ताजी पाने वाटून काढलेल्या एक चमचा रसात चमचाभर आल्याचा रस व खडीसाखर मिसळून घेण्याने अंग दुखणे कमी होते. 

पारंपरिक पद्धतीने बनविलेले मेथ्यांचे लाडू वातशमन करून अंगदुखी कमी करणारे असतात. म्हणून आपल्याकडे बाळंतिणीला मेथ्यांचे लाडू खायला देण्याची पद्धत असते.

सब्जा म्हणून तुळशीसारखी एक वनस्पती असते. तिच्या पानांचा रस काढून अंगावर चोळल्यास अंग दुखणे कमी होते. 

हाडांमध्ये दुखत असले किंवा फ्रॅक्‍चर झाल्यामुळे हाड दुखत असेल तर बाभळीच्या बियांचे चूर्ण मधाबरोबर घेण्याने बरे वाटते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: family doctor health Limb pain