अग्र्यसंग्रह (श्रेष्ठत्व)

डॉ. श्री बालाजी तांबे
Friday, 15 June 2018

वाळा, ज्येष्ठमध, कुष्ठ आणि अनंतमूळ हे आपल्या शरीरासाठी खूप उपयुक्त आहेत. सुगंधी वाळा आणि नेहमीचा वाळा यांचा लेप शरीराचा दाह, त्वचारोग आणि घाम करणाऱ्या लेपांमध्ये श्रेष्ठ असतो. ज्येष्ठमधाचा छोटा तुकडा चघळल्याने आवाज सुधारतो, कंठ मोकळा होतो. रक्‍तशुद्धिकर असल्याने ज्येष्ठमधामुळे त्वचा उजळते, तेजस्वी होते.

मागच्या आठवड्यात आपण तेलाचा गंडुष दाताच्या आरोग्यासाठी आणि चवीची संवेदना कार्यरत राहण्यासाठी सर्वोत्तम असते हे पाहिले. आता यापुढची माहिती घेऊ या. 

वाळा, ज्येष्ठमध, कुष्ठ आणि अनंतमूळ हे आपल्या शरीरासाठी खूप उपयुक्त आहेत. सुगंधी वाळा आणि नेहमीचा वाळा यांचा लेप शरीराचा दाह, त्वचारोग आणि घाम करणाऱ्या लेपांमध्ये श्रेष्ठ असतो. ज्येष्ठमधाचा छोटा तुकडा चघळल्याने आवाज सुधारतो, कंठ मोकळा होतो. रक्‍तशुद्धिकर असल्याने ज्येष्ठमधामुळे त्वचा उजळते, तेजस्वी होते.

मागच्या आठवड्यात आपण तेलाचा गंडुष दाताच्या आरोग्यासाठी आणि चवीची संवेदना कार्यरत राहण्यासाठी सर्वोत्तम असते हे पाहिले. आता यापुढची माहिती घेऊ या. 

रास्नागुरुणी शीतापनयमप्रलेपनम्‌ - थंडीचा प्रतिकार करण्यासाठी लेप करावयाच्या द्रव्यांमध्ये रास्ना व अगरु हे उत्तम होत.

या दोन्ही वनस्पती उष्ण वीर्याच्या असतात, त्यामुळे थंडीच्या दिवसांत यांचा शरीरावर लेप करायचा असतो. थंडी वाजून येणाऱ्या तापातही अगरु-रास्नाचा लेप करण्याचा उपयोग होतो. त्वचेतील भ्राजक पित्ताला या वनस्पतींद्वारे उत्तेजना मिळाली की थंडी वाजणे दूर होते. अगरु उगाळून तयार केलेला लेप लावणे प्रशस्त असते, रास्ना वनस्पतीचे सूक्ष्म चूर्ण कोरडे चोळता येते किंवा गरम पाण्यात मिसळून लेप करता येतो. या प्रकारचे लेप वात कफदोषाचे शमन करणारेही असतात.

लामज्जकोशीरं दाहत्वग्दोषस्वेदापयनप्रलेपनानाम्‌ - सुगंधी वाळा (वाळ्याचा एक उपप्रकार) आणि नेहमीचा वाळा यांचा लेप शरीराचा दाह, त्वचारोग आणि घाम करणाऱ्या लेपांमध्ये श्रेष्ठ असतो. वाळ्याचे मूळ औषधी गुणांनी युक्‍त असते. वीर्याने शीत असणारा वाळा पित्त तसेच कफदोष कमी करणारा असतो, रक्‍ताची शुद्धी करणारा असतो, रक्‍तातील विषद्रव्य व आमदोष पचवून रक्‍ताचे प्रसादन करणारा असतो. म्हणून वाळ्याचा लेप लावण्याने त्वचेतील पित्तदोष व रक्‍तदोष यांचे शमन होऊन दाह शांत होतो.

त्वचारोगामध्ये वाळा, अनंतमूळ, ज्येष्ठमध वगैरे रक्‍तशुद्धीकर द्रव्यांचे उटणे हितकारक असते. तसेच अधिक घाम येत असल्यास अंगाला वाळ्याचे चूर्ण लावून स्नान करणे उपयोगी असते.

कुष्ठं वातहर अभ्यंगोपनाहोपयोगिनाम्‌ - वातदोष कमी करण्यासाठी, अभ्यंगासाठी व पोटिस हा उपचार करण्यासाठी कुष्ठ हे द्रव्य सर्वोत्तम होय. 
कुष्ठ ही वनस्पती फक्‍त उत्तर भारतात, हिमालयाच्या पायथ्याशी मिळते. रास्नाचे मूळ औषधांत वापरले जाते व ते अतिशय सुगंधी असते. वीर्याने उष्ण असल्याने कुष्ठ वातशमनासाठी उत्तम असते. म्हणूनच उपनाह उपचारात म्हणजे वनस्पती बारीक करून, शिजवून त्यांचा गरम गरम लेप करण्यासाठीही कुष्ठ उत्तम असते. रक्‍तशुद्धी करणारे, रक्‍ताभिसरणास मदत करणारे असल्याने अभ्यंगासाठीच्या तेलात समाविष्ट करणेही गुणकारी असते. त्वचारोगातही कुष्ठ वापरण्याचा खूप चांगला उपयोग होताना दिसतो. 

मधुकं चक्षुष्यवृष्यकेश्‍यकण्ठ्यवर्ण्यविरजनीय रोपणीयानाम्‌ - डोळ्यांसाठी हितकर, शुक्रवर्धक, केसांना तसेच आवाजाला उपयुक्‍त, कांतिवर्धक, मल-मूत्राचा रंग सुधारणाऱ्या व जखम भरून आणणाऱ्या द्रव्यांमध्ये ज्येष्ठमध उत्तम असतो. 

ज्येष्ठमध किती प्रकारची कार्ये उत्तम प्रकारे करू शकतो हे या सूत्रावरून समजते. ज्येष्ठमध डोळ्यांचे पोषण करतो, तसेच डोळे आले असता म्हणजे डोळ्यांतून पाणी येत असले, आग होत असली, प्रकाश सहन होत नसला तर नीट गाळून घेतलेल्या ज्येष्ठमधाच्या पाण्याने डोळे धुण्याचा उपयोग होतो. ज्येष्ठमध शुक्रवर्धक असल्याने तारुण्यरक्षणासाठी सहायक असते. यासाठी ज्येष्ठमध तूप-मध व दुधासह घेता येतो. या प्रकारे ज्येष्ठमध घेण्याने केसांचे गळणे, तुटणे, अकाली पांढरे होणे वगैरे त्रासही कमी होतात. त्रिफळा व ज्येष्ठमधाचे चूर्ण रोज रात्री झोपण्यापूर्वी तूप-मधाबरोबर घेण्याने डोळे व केसांची शक्‍ती वाढू शकते. ज्येष्ठमधाचा छोटा तुकडा चघळल्याने आवाज सुधारतो, कंठ मोकळा होतो. रक्‍तशुद्धिकर असल्याने ज्येष्ठमधामुळे त्वचा उजळते, तेजस्वी होते. मल-मूत्राचा नैसर्गिक रंग बदलला असल्यास ज्येष्ठमध घेण्याचा उपयोग होतो. ज्येष्ठमधाने संस्कारित तूप लावल्याने बघता बघता जखम भरून येते, शिवाय वेदनाही कमी होतात.
अग्र्यसंग्रहातील उर्वरित माहिती आपण पुढच्या अंकात पाहू.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: family doctor health Progressive collection