दिवस प्रेमाचा

डॉ. श्री बालाजी तांबे www.balajitambe.com
Friday, 9 February 2018

उपचार करण्यासाठी माध्यम हवेच. सद्‌भावना, प्रेमभावना, स्पर्श यांची ताकद मोठी असली तरी त्यामुळे औषधाचे किंवा उपचारांचे महत्त्व कमी होत नाही. सर्व मनुष्यमात्रांवर प्रेम करणारा सर्वांसाठीच आरोग्याची व समृद्धीची इच्छा करतो. मनुष्य अडचणीत असला किंवा आजारी पडला, तर ज्याच्या मनात करुणा उत्पन्न होते, तोच वैद्य होण्यास सक्षम असतो. उपचार करणाऱ्या हातांमध्ये आरोग्यदायक स्पर्श विकसित करता येऊ शकतो. मात्र, त्यासाठी मनामध्ये रुग्णाबद्दल आपुलकी, स्नेहभाव असावा लागतो.

उपचार करण्यासाठी माध्यम हवेच. सद्‌भावना, प्रेमभावना, स्पर्श यांची ताकद मोठी असली तरी त्यामुळे औषधाचे किंवा उपचारांचे महत्त्व कमी होत नाही. सर्व मनुष्यमात्रांवर प्रेम करणारा सर्वांसाठीच आरोग्याची व समृद्धीची इच्छा करतो. मनुष्य अडचणीत असला किंवा आजारी पडला, तर ज्याच्या मनात करुणा उत्पन्न होते, तोच वैद्य होण्यास सक्षम असतो. उपचार करणाऱ्या हातांमध्ये आरोग्यदायक स्पर्श विकसित करता येऊ शकतो. मात्र, त्यासाठी मनामध्ये रुग्णाबद्दल आपुलकी, स्नेहभाव असावा लागतो.

फेब्रुवारी महिना सुरू झाला, की तरुण मंडळींना ‘व्हॅलेंटाइन डे’चे वेध लागतात. या निमित्ताने दुकानेही देवाण- घेवाण करायच्या भेटवस्तूंनी भरून जातात. प्रेम व्यक्‍त करण्यासाठी या दिवसाचे औचित्य साधता येत असले, तरी प्रेमभाव मनात कायम असणेही तितकेच आवश्‍यक असते. स्त्री- पुरुषातील आकर्षण, आई- बाळातील ममता, भावंडांतील बंधुत्वभाव, मित्रांमधील सख्य, नातेवाईक व ओळखीच्या व्यक्‍तींसाठीची आपुलकी, देवावरचा विश्वास, गुरुवर्य व ज्ञानी मंडळींबद्दलचा आदरभाव हे सगळे प्रेमाचेच वेगवेगळे आविष्कार म्हणता येतात. नाते कुठलेही असू दे, त्यामध्ये प्रेमभाव असला तर ते एकमेकाला आधार देते, आश्वस्त करते. 

म्हणूनच उपचार करताना वैद्याने रुग्णाला औषधांबरोबरच विश्वास, प्रेम समोरच्याला देण्यासाठी तयार असावे, असे शास्त्र सांगते. वैद्याची लक्षणे सांगताना ‘प्रियदर्शन’ असा शब्द वापरला आहे. तसेच, ‘रोगिणो यश्‍च पुत्रवत्‌ समुपाचरेत्‌’ असेही वर्णन केले आहे. प्रियदर्शन म्हणजे वैद्याचा आविष्कार सौम्य, प्रसन्न आणि समोरच्या रुग्णाला आश्वस्त करणारा असावा.

वैद्याच्या एकंदर आविर्भावातून रुग्णाला आपण बरे होऊ हा विश्वास वाटायला हवा. त्रासिक मुद्रा, कपाळावर आठ्या किंवा स्वतः वैद्याच्याच डोळ्यांत अविश्वासाचे भाव असले, तर रुग्णाची बरे होण्याची उमेद कमी होईल यात शंका नाही. 

‘रोगिणो यत्र पुत्रवत्‌ समुपाचरेत्‌‌‌’ म्हणजे जो रुग्णाकडे पुत्रवत्‌ भावनेने पाहतो, तो खरा वैद्य होय. म्हणजे आई- वडील ज्या भावनेने आपल्या मुलाची काळजी घेतात, त्या भावनेने, त्या आत्मीयतेने वैद्याने रुग्णावर उपचार केले पाहिजेत, रुग्णाची काळजी घ्यायला पाहिजे. अर्थात, ही आत्मीयता फक्‍त मानसिक समाधानापुरती कामाला येते असे नाही, तर रुग्णाचा विश्वास वाढला, श्रद्धा बसली, की औषधाचा गुण अनेक पटींनी वृद्धिंगत होण्यास मदत मिळते.

वैद्यामध्ये जसा हा भाव असायला हवा, तसाच परिचारकामध्ये म्हणजे प्रत्यक्ष उपचार करणाऱ्या थेरपिस्टमध्येही प्रेमभाव असायला हवा. अभ्यंग करताना किंवा इतर कोणतेही उपचार करताना परिचारकाचा रुग्णाशी प्रत्यक्ष संबंध येत असतो. त्यामुळे त्याच्या मनातील प्रेमाची, जिव्हाळ्याची भावना रुग्णापर्यंत प्रभावीपणे पोचू शकते. उपचार कक्षातील वातावरण पण फार थंड नसावे, त्या ठिकाणी खोली गरम करून घेण्याची व्यवस्था असावी व परिचारकाने आपले हात चोळून गरम करून मगच उपचाराला सुरवात करावी. आयुर्वेदाने विशेषतः मानसिक असंतुलनामुळे होणाऱ्या रोगांमध्ये रुग्णाला प्रेमपूर्वक शब्दांनी धीर द्यावा, त्याचे सांत्वन करावे, ज्या गोष्टीच्या नाशामुळे रुग्णाला धक्का बसला असेल, ती गोष्ट परत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत अशा प्रकारचे उपचार सांगितले आहेत. परंतु, फक्‍त मानसिक रोगातच नाही, तर कोणत्याही रोगात रुग्णाचे मनोबल कायम राहणे आवश्‍यक असते आणि त्यासाठी रुग्णाला त्याच्या कुटुंबीयांकडून, मित्रमंडळींकडून व सर्वांत महत्त्वाचे म्हणजे प्रत्यक्ष उपचार करणारे वैद्य, परिचारक यांच्याकडून आपुलकीची, प्रेमाची आवश्‍यकता असते. 

आयुर्वेद हे जीवनाचे शास्त्र असल्याने त्यात ‘सद्‌वृत्त’ म्हणजे रोजचे जीवन जगताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी हेही सांगितले आहे. 
अनुज्ञाता सुवार्तानां दीनानामनुकम्पकः । 
आश्वासकारी भीतानां क्रुद्धानामनुनायकः ।।
...अष्टांगसंग्रह सूत्रस्थान
चांगले विचार, चांगल्या गोष्टी स्वीकारण्याचा, त्यांचा प्रसार करण्याचा स्वभाव असावा. अडचणीत असणाऱ्याला मदत करण्याची तयारी हवी, भयभीत झालेल्याला आश्वस्त करण्याची प्रवृत्ती हवी आणि रागावलेल्याला शांत करण्याची क्षमता असावी. या सर्व गोष्टी मनात प्रेमभाव असल्याशिवाय येऊ शकत नाहीत. कुटुंब, मित्रमंडळीच नाही, तर संपूर्ण समाजाप्रती मनात आपुलकी असली तरच या प्रकारचे सद्‌वर्तन घडू शकते.

आयुर्वेदात रोगपरीक्षा करताना दर्शन, स्पर्शन आणि प्रश्न अशा तीन प्रकारच्या परीक्षा सांगितल्या आहेत. नुसते बघून जरी बऱ्याच गोष्टी समजत असल्या, तरी स्पर्शपरीक्षा करण्याने परीक्षणाबरोबरच प्रेम, आपुलकीही मिळू शकते. चार प्रश्न विचारण्यामुळे रुग्ण आणि वैद्य यांच्यात परस्परसंबंध तयार व्हायलाही मदत मिळते. आयुर्वेदिक उपचार करताना याचा अनेकदा अनुभव येतो, की प्रकृती, पचनशक्‍ती, मानसिक स्थिती, रोगाचे कारण वगैरे गोष्टी शोधून काढण्यासाठी वैद्याला अनेक प्रश्न विचारावे लागतात आणि अनेकदा रुग्ण आपणहून म्हणतात, की ‘एवढे सखोल परीक्षण आज पहिल्यांदाच होते आहे, तुम्ही एवढी चौकशी करता आहात, हे पाहून बरे वाटले.’ यातून रुग्णाच्या मनात वैद्यांबद्दल किंवा शास्त्राबद्दल आदर, प्रेम उत्पन्न झाले, की त्याचा पुढे बरे होण्यासाठी मोलाचा हातभार लागत असतो. 

उपचार करण्यासाठी माध्यम हवेच. सद्‌भावना, प्रेमभावना, स्पर्श यांची ताकद मोठी असली, तरी त्यामुळे औषधाचे किंवा उपचारांचे महत्त्व कमी होत नाही. सर्व मनुष्यमात्रांवर प्रेम करणारा सर्वांसाठीच आरोग्याची व समृद्धीची इच्छा करतो. मनुष्य अडचणीत असला किंवा आजारी पडला, तर ज्याच्या मनात करुणा उत्पन्न होते, तोच वैद्य होण्यास सक्षम असतो.
आयुर्वेदाने वैद्याची चार कर्तव्ये सांगितली आहेत, त्यावरून वैद्याच्या मनात रुग्णाबद्दल किती प्रेम असणे आवश्‍यक आहे हे समजते.
मैत्री कारुण्यमार्तेषु शक्‍ये प्रीतिरूपेक्षणम्‌ ।
 प्रकृतिस्थेषु भूतेषु वैद्यवृत्तिश्‍चतुर्विधा ।।
....चरक सूत्रस्थान
मैत्री - वैद्याने रुग्णाबरोबर तसेच त्याच्या कुटुंबीयांबरोबर मैत्रीपूर्ण व्यवहार करावा. 

आर्तेषु कारुण्यम्‌ - रुग्णाबद्दल मनात करुणा असावी, आपुलकी असावी.
शक्‍ये प्रीती - साध्य, कष्टसाध्य रोगात प्रेमपूर्वक उपचार करावेत आणि
प्रकृतिस्थेषु भूतेषु उपेक्षणम्‌ - असाध्य रोगामध्ये उपचार केले, सद्‌भावना ठेवली तरी फार मोठ्या फळाची अपेक्षा ठेवू नये.

स्पर्शामधून प्राणाची देवाण-घेवाण होत असते, तसेच स्पर्शामधून मनाच्या भावनाही व्यक्‍त होत असतात, वात्सल्याचा स्पर्श, प्रेमाचा स्पर्श, कृतज्ञतेचा स्पर्श जसे आपण वेगवेगळे जाणू शकतो, तसाच आरोग्यदायक स्पर्शही असू शकतो. उपचार करणाऱ्या हातांमध्ये हा स्पर्श विकसित करता येऊ शकतो. मात्र, त्यासाठी मनामध्ये रुग्णाबद्दल आपुलकी, स्नेहभाव असावा लागतो.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: family doctor love day