esakal | पथ्यापथ्य-अतिसार
sakal

बोलून बातमी शोधा

पथ्यापथ्य-अतिसार

पथ्यापथ्य-अतिसार

sakal_logo
By
डॉ. श्री बालाजी तांबे (www.balajitambe.com)

जुलाब होत असताना थकवा येत नाही ना आणि शरीरातील पाणी कमी होत नाही ना याकडे लक्ष ठेवणे गरजेचे असते. हळूहळू भूक लागायला लागली, की शरीरातील आमदोष कमी झाला आहे, हे समजते. त्यानंतर औषधी द्रव्यांनी संस्कारित पाण्यात तांदूळ शिजवून तयार केलेली यवागू, विलेपी, खड, यूष, मांसरस आणि भात या प्रकारे अन्न देणे योग्य असते. 
 

जुलाबाचा त्रास कधी ना कधी प्रत्येकाने अनुभवलेला असतो. तापाप्रमाणे अतिसारातही उपचारांची पहिली पायरी म्हणजे लंघन करणे आणि ज्या असंतुलित दोषामुळे जुलाब होत आहेत, ते असंतुलित दोष शरीराबाहेर जाईपर्यंत जुलाब थांबविण्याचे औषध न देणे. 

तस्मात्‌ उपेक्षेतोत्क्‍लिष्टान्‌ वर्तमानान्‌ स्वयं मलात्‌ । ....चरक चिकित्सास्थान
उत्क्‍लेषित झालेले मलरूप दोष शरीराबाहेर जात असेपर्यंत त्यांची उपेक्षा करावी.

जुलाबामध्ये अर्धवट पचलेले किंवा न पचलेले अन्न पडत असेल, जिभेवर पांढरा थर साठला असेल, पोटात दुखत असेल, मळाला दुर्गंध असेल, पोटात जडपणा जाणवत असेल आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे भूक लागलेली नसेल, काही खाण्याची इच्छा होत नसेल, तर जुलाब थांबविण्याचे औषध द्यायचे नसते आणि काही खायचेही नसते; मात्र या अवस्थेतही औषधांनी संस्कारित गरम पाणी प्यायला सांगितलेले आहे.

वचाप्रतिविषाभ्यां वा मुस्तपर्पटकेन वा । 
ऱ्हीबेर शृंगवेराभ्यां पक्वं वा पाययेत्‌ जलम्‌ ।। 
.... चरक चिकित्सास्थान

 

वेखंड, अतिविषा, नागरमोथा, पित्तपापडा, काळा वाळा, सुंठ यांनी षडंग पद्धतीने बनविलेले पाणी जुलाब होत असताना थोडे थोडे द्यावे. षडंग पद्धत म्हणजे औषधांच्या चौसष्ठपट पाणी घेऊन ते मंद आचेवर निम्मे शिल्लक राहीपर्यंत उकळणे आणि गाळून घेऊन प्यायला देणे. त्यामुळे एक लिटर पाण्यात वर उल्लेखलेली सहाही द्रव्ये प्रत्येकी अडीच-तीन ग्रॅम घेऊन अर्धा लिटर पाणी शिल्लक राहीपर्यंत उकळावे आणि गाळून घेऊन थर्मासमध्ये भरून ठेवून तहान लागेल त्यानुसार प्यायला द्यावे. ही सर्व द्रव्ये नसतील तर फक्‍त सुंठ, बडीशेप, वाळा यांच्यापासून बनविलेले पाणी प्यायले तरी चालते. 

जुलाब होत असताना थकवा येत नाही ना आणि शरीरातील पाणी कमी होत नाही ना याकडे लक्ष ठेवणे गरजेचे असते. या दृष्टीने वेळेवर वैद्यांचा सल्ला घेणे महत्त्वाचे असते. हळूहळू भूक लागायला लागली की शरीरातील आमदोष कमी झाला आहे हे समजते व त्यानंतर क्रमाक्रमाने अन्नाची योजना करता येते. 

यवागुभिर्विलेपीभिः खडर्यूषैः रसौदनैः ।
दीपनग्राहिसंयुक्‍तैः क्रमश्‍च स्यादतः परम्‌ ।।
....चरक चिकित्सास्थान


अग्नी प्रदीप्त करणाऱ्या आणि अपाचित दोषांना पचवून मलप्रवृत्ती बांधून होण्यास मदत करणाऱ्या (ग्राही) द्रव्यांनी संस्कारित पाण्यात तांदूळ शिजवून तयार केलेली यवागू, विलेपी, खड, यूष, मांसरस आणि भात या प्रकारे क्रमाक्रमाने अन्नाची योजना करावी. 

या ठिकाणी यवागू ही पचण्यास अतिशय हलकी, सोपी, तर भात हा रोजच्या आहारातील अन्नपदार्थ आहे. म्हणजेच जुलाबामुळे मंदावलेल्या अग्नीला क्रमाक्रमाने प्रदीप्त करण्यासाठी विशेष अन्नयोजना करणे भाग असते, हे यातून समजते. सर्वप्रथम ही अन्नयोजना करण्यासाठी कोणती औषधे वापरायची हे पाहू. चरकाचार्यांनी यासाठी बरीच औषधे सुचवली आहेत, त्यापैकी सहज मिळणारी आणि सर्वांच्या परिचयाची औषधे या ठिकाणी उल्लेख करत आहोत. 

दीपन व संग्राही गणातील निवडक औषधे - बेलफळ, सुंठ, धणे, वेखंड, जिरे, पिंपळी, कोकम, आंबट डाळिंबाचे दाणे, तुपावर परतून घेतलेला हिंग, सैंधव.

यवागू बनविण्याची पद्धत - यापैकी मिळतील ती द्रव्ये घेऊन अगोदर ‘षडंग’ पद्धतीने औषधी सिद्ध जल तयार करावे. यवागू बनविण्यासाठी तांदळाच्या सहापट पाणी घेऊन तांदूळ शिजेपर्यंत उष्णता द्यायची असते. नंतर शिजलेल्या तांदळासकट तयार झालेली यवागू भुकेनुसार सेवन करायची असते. त्यामुळे समजा ३० ग्रॅम तांदूळ त्याच्या सहापट म्हणजे १८० मिली औषधी सिद्ध जल घ्यायचे असते आणि १८० मिली औषधी सिद्ध जल तयार करण्यासाठी ३६० मिली पाण्यात साधारण ५.५ ग्रॅम औषधी द्रव्यांचे मिश्रण घ्यावे लागते. सैंधवाचे प्रमाण चवीनुसार कमी जास्त करायला हरकत नाही. 

विलेपी - विलेपी बनविण्यासाठी तांदूळ चौपट पाण्यात शिजवायचे असतात. या ठिकाणी वरील पद्धतीने औषधांनी संस्कारित करून घ्यायचे असते. 

खड - या प्रकारात डाळी (अतिसारामध्ये मूग उत्तम) ताकामध्ये शिजवायच्या असतात. एक भाग मुगाची डाळ, सोळा पट ताक घेऊन शिजेपर्यंत उष्णता देऊन नंतर त्यात जिरे, आले, सैंधव मीठ वगैरे मिसळायचे असते. या ठिकाणी ताक करण्यासाठी वापरायचे पाणी औषधांनी सिद्ध करता येते. 

यूष - कडधान्यांमध्ये सोळापट पाणी मिसळून ते निम्मे किंवा चतुर्थांश शिल्लक राहीपर्यंत उकळायचे व प्यायचे असते. जुलाबामध्ये मूग वापरणे उत्तम होय. याही ठिकाणी पाणी वरील पद्धतीने औषधांनी संस्कारित करून घ्यायचे असते. 

मांसरस - मांसाहारी व्यक्‍तीसाठी प्रकृतीचा विचार करून तसेच सांप्रत काळात मांसाच्या प्रतीचा, शुद्धीचा सारासार विचार करून सदर पाककृती बनविता येते. मांस चारपट पाण्यात शिजवून नंतर गाळून घेऊन मांसरस बनवायचा असतो.  

भात - रोजचा भात बनवतो त्याप्रमाणे, फक्‍त भांड्यात वरील पद्धतीने औषधांनी संस्कारित पाण्यात तांदूळ शिजवून भात तयार करता येतो. 

अतिसारातील अजून पथ्य- अपथ्य आपण पुढच्या वेळी पाहू.